मंदिर… ड्रेसकोड आणि पितृसत्ता…!

मंदिरात प्रवेश करताना ठराविक ड्रेसकोड सक्तीचा करणे यावरून सध्या राज्याचे वातावरण ढवळून निघाले आहे. हा निर्णय संस्कृती व परंपरेच्या नावाखाली उथळपणे विचार करणाऱ्यांकडून काळाच्या एक पाऊल मागे येणाऱ्यांच्या वैचारिक मागासलेपणाचाच. याच पार्श्वभूमीवरचे एक प्रासंगिक…

  • सुची गोविंदराजन

महोदय/ महोदया,

भारतीय समाजाचे जे काही अध:पतन होत आहे त्याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी मी हे पत्र लिहीत आहे. समाजातील सर्व वाईट गोष्टी, टीव्हीवरील उत्तेजक दृश्ये, अश्लील चित्रपट, प्रौढांमधील मधुमेह, खिसे कापणे, शेट्टीच्या हॉटेलमधील खोबऱ्याच्या चटणीतील वाढलेले पाण्याचे प्रमाण हे सर्व त्या सैतानी पाश्चिमात्य संस्कृतीचा परिणाम आहे. पण सर्वात धक्कादायक बाब अशी आहे की आपली ‘उच्च दर्जाची सर्वश्रेष्ठ भारतीय संस्कृती’ सुद्धा या अध:पतनाला पाठिंबा देत आहे.

महोदय/ महोदया, समस्या अशी आहे की देशात लोक अंगप्रदर्शन करणारे कपडे घालत आहेत. खोल गळ्याचे, बिनबाह्यांचे कपडे, पाय दाखवणारे कपडे लोक घालत आहेत आणि हे लोक आहेत आपले मध्यमवयीन पुजारी! काही पुजारी तर चक्क वरचे कपडे घालतच नाहीत! (शिव शिव!) आणि मी असेही ऐकले आहे की काही देवस्थानांचे व्यवस्थापन या अशा वागण्याला खुलेआम पाठिंबा देत आहे. पण सर्वात वाईट गोष्ट तर पुढे आहे. ते हे सर्व स्त्रिया आणि देवांसमोर करताहेत, अगदी कोणतीही लज्जा किंवा तमा न बाळगता. एके दिवशी मी एका पुजा-याला पाहिले, ज्याने उघड्या अंगाने देवाला प्रसाद चढवला (किती शरमेची बाब आहे ही) आणि कहर म्हणजे बाहेर उभ्या असणाऱ्या स्त्रियांना प्रसाद वाटण्यासाठी तो तसाच उघड्या अंगाने बाहेर आला. त्याच्या या कृतीमुळे सर्व प्रसंगाचे पावित्र्य भंग झाले. आता जर तो अशाच उघड्या अंगाने त्या स्त्रियांशी बोलला तर विचार करा, काय दुष्परिणाम होतील त्याच्या या अशा वागण्याचे!

restriction on clothes - baimanus

आपल्या समाजात जर मुले आणि पुरुषांना अशा पद्धतीचे पोशाख वापरू दिले जात असतील तर ही खूपच चिंतेची बाब आहे. अजूनही असे काही महाभाग आहेत, जे कसल्याशा पातळ कापडाचे धोतर आणि कुर्ता वापरतात आणि म्हणे अंगभर कपडे घालतात! अहो, त्या कापडामधून तुम्हाला त्यांच्या अंतर्वस्त्रांची बाह्यरेखा अगदी सहज दिसते. कधी-कधी तर तुम्हाला ती कोणत्या ब्रॅण्डची आहे हेसुद्धा सहज वाचता येते. त्यांच्या या अशा तारतम्य सोडून वागण्याचे अनुकरण तरुण पिढीतील मुले करत आहेत. ही मुले भडक रंगाची, काहीबाही छापलेली अंतर्वस्त्रे वापरू लागलेली आहेत. (हरे राम!)

काही सभ्य माणसे मात्र पूर्ण पँट आणि शर्ट घालतात. मात्र त्यांच्या पँटला झिप नावाचे सैतानी पाश्चिमात्य संशोधन जोडलेले असते, जे वापरून ते बिनधास्त रस्त्याच्या कडेला उभे राहून सर्व लोकांसमोर निसर्गाच्या हाकेला प्रतिसाद देत असतात. आणि हा शॉटर्स नावाचा काय अघोरी प्रकार आहे? ज्या खेळांमध्ये भारतीय मुलांना आपले पाय दाखवावे लागतील असे खेळ खेळणे खरेच गरजेचे आहे का? त्यापेक्षा त्यांनी फक्त बुद्धिबळ आणि क्रिकेट खेळले तर काय वाईट आहे? (तसेही हे दोन खेळ सोडले तर इतर खेळांमध्ये आपली मुले जगावर राज्य करताहेत असे काही चित्र नाही.) आणि मुख्य म्हणजे जलतरण. कपड्यांसह अंघोळ करण्याची आपली पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. असे असताना त्या इवल्याशा स्पीडोज घालून पोहण्याची काही गरज आहे का? अंगप्रदर्शन करण्याचे बहाणे आहेत हे नुसते.

संबंधित वृत्त :

पण मला असा प्रश्न पडला आहे की या मुलांचे पालक याबाबतीत काय करताहेत? त्यांना आपल्या मुलांना नीट संस्कार देता येत नाहीत का? हल्ली सगळ्यांचे वडील कामावर जातात. त्यांच्यामुळेच हे होते आहे. या वडलांना त्यांच्या करिअरपुढे मुलांकडे लक्ष द्यायला वेळ मिळेल तर… मला अशी घोर चिंता सतावते आहे की ही मुले आणि पुरुष असेच वागत राहिले तर त्यांची लग्ने कशी व्हायची? कोणत्या सासूला आवडेल की तिचा जावई फक्त एक बनियन घालून काखेतले केस दाखवत तिला कॉफी पिण्याचा आग्रह करत आहे? (आणि तीसुद्धा ब्रूची इन्स्टंट कॉफी. कारण हल्ली या मुलांना चांगली कॉफी कशी बनवावी हे कोणी शिकवतच नाही.)

restriction on clothes - baimanus

या अशा असभ्य वागण्याचे पुढे खूप गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतील. एकदा का मुलांना कळले की असे अंगप्रदर्शन करण्यात काही वावगे नाही की मग ते हे प्रकरण कोणत्या थराला नेतील आणि आपल्याला काय पाहावे लागेल देव जाणे! अशाने मुले हाताबाहेर जातील. मला तर असे वाटते की आपण भारतीय मुले आणि पुरुषांवर थेट पोशाखाचे बंधनच घातले पाहिजे. सर्वात चांगला उपाय म्हणजे त्यांना त्यांच्या पोशाख करण्याच्या पद्धतीवरून वेगवेगळ्या वर्गवाऱ्यांमध्ये टाकणे. आणि हो, उद्या जर एखादा मुलगा किंवा पुरुष लैंगिक अत्याचाराला बळी पडला तर आपण हल्लेखोराकडे पूर्णपणे दुर्लक्ष करावे आणि त्या मुलाला किंवा पुरुषालाच लक्ष्य करून विचारावे, ‘कोणते कपडे घातले होतेस तू?’ आपल्या समाजाला वाचवण्याचा हा एकच मार्ग आहे.

(अनुवाद- निकिता अपराज)

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here