- खंडूराज गायकवाड
तमाशा सम्राज्ञी कै. विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार… खरं तर हा पुरस्कार वितरण समारंभ तमाम लोककलावंतांसाठी बहुमोल क्षणाचा वाटतो. कारण हा गौरव आपलं आयुष्य या कलेसाठी वाहून घेणाऱ्या व्यक्तीचा असतो. घरावर तुळशी पत्र ठेवून गावोगावी कार्यक्रम करणाऱ्या जातीवंत कलावंताचा हा बहुमान असतो, म्हणूनच या पुरस्काराला अधिक महत्व आहे.
नुकताच विठाबाई नायारणगावकर पुरस्कार वितरण समारंभ वाशी येथे पार पडला. जेष्ठ तमाशा कलावंत आतांबर (तात्या) शिरढोणकर यांना सन 2019-20 या वर्षाचा, तर श्रीमती संध्या माने सोलापूरकर यांना सन 2020-21 या वर्षाचा पुरस्कार राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यानिमित्ताने एक गोष्ट प्रकर्षाने आढळली ती म्हणजे शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाची लोककलावंतांबद्दलची असलेली उदासिनता. आतांबर तात्या शिरढोणकर आणि संध्या माने यांचा जीवनगौरव पुरस्कार सोहळा डोळ्याने पाहिला, पण मनाला नाही भावाला. हा कसला समारंभ, केवळ उशीरा तमाशा महोत्सव घेवून अनौपचारिकता पार पडण्याचा प्रकार सांस्कृतिक कार्य संचालनालय करीत आहे. शासनाने असे जीवनगौरव पुरस्कार देताना त्या व्यक्तीच्या वयाचा, त्याने दिलेल्या योगदानाचा विचार करून वेळेत आणि सन्मानाने पुरस्कार बहाल केला पाहिजे. लावणी सम्राज्ञी कै. गुलाबबाई संगमनेरकर यांना सन 2018-19 या वर्षाचा विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला. पण आज त्या हयात नसल्याने परवाच्या कार्यक्रमात मंत्री महोदयांनी त्यांच्या नातेवाईकांकडे हा पुरस्कार सुपूर्द केला. म्हणजे केवळ लोककलावंतांनाकडे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचा दृष्टीकोन अजूनही बघण्याचा वेगळा असल्याने अशी दुर्दैवी वेळ लोककलावंतावर वारंवार येत राहणार. आज दोन वर्षे झाली सरकारचे कोरोना अनुदान पॅकेज या लोककलावंतांच्या पदरी पडायला तयार नाही. मात्र चित्रपट आणि नाटकांना पायघड्या घालायच्या, हा किती विरोधाभास आहे.

एप्रिल 2022 रोजी तत्कालीन सांस्कृतिक कार्य मंत्र्यांनी पुरस्कार निवड समितीची बैठक घेवून तमाशा क्षेत्रातील या मातब्बरांना पुरस्कार जाहीर केला. मात्र तब्बल अकरा महिन्यानंतर हा पुरस्कार सोहळा वाशी येथे पार पडला. अंजलीराजे नाशिककर लोकनाट्य तमाशा मंडळाचा सुंदर असा कार्यक्रम सुरू होता. पारंपारिक हा तमाशा बघायला रसिकांची सुरुवात झाली होती. काही मिनिटांत जीवनगौरव पुरस्कार सोहळा सुरू होणार होता. पण अचानक पावसाची अवकृपा झाली. अन रसिकांची पांगापांग झाली. लाखो रुपये खर्च करून उभारलेला संपूर्ण मंडप भिजला. एकच पळापळ सुरू झाली.
त्यातच सांस्कृतिक कार्य मंत्री यांचे आगमन झाले.आता पुरस्कार वितरण सोहळा कसा करायचा. हा सर्वां समोर प्रश्न पडला होता.
कोणी म्हणे बाजूला असलेल्या एका हॉलमध्ये करूया, कोण म्हणे एखाद्या वातानुकूलित हॉल घेऊन पुरस्कार देवू या. अनेकांनी हा पुरस्कार वितरण सोहळा पुढे ढकलू या, असे म्हटले. जसा पाऊस पडावा तसा सल्ल्याचा पाऊस पडत होता. शेवटी रसिकांच्या उपस्थिती शिवायच हा पुरस्कार सोहळा त्याच मंडपात पार पडला. तमाशा कलावंत हा समोर असलेल्या प्रेक्षकांशिवाय जगू शकत नाही. अन आज त्यांना हा आपत्कालीन प्रसंग बघून नक्कीच दुःख झाले असावे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे काही अधिकारी तर मंत्री बाहेर पडताच, गायब झाले. हे जर नाटक – चित्रपट महोत्सव असते तर त्यांच्या कलाकारांना घरापर्यत पोहोचवायला अधिकारी गेले असते. कार्यक्रम संपल्यानंतर सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक आणि सह संचालक तर एक क्षण सुद्धा थांबले नाही, ही खेदाची बाब आहे. हा भेद कायम लोकलावंतांच्या पदरी राहणार आहे. यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही.
आज हाच पुरस्कार वेळेत दिला असता तर अनेक प्रसंगाला तोंड देण्याची वेळ आली नसती. आता तरी विनाविलंब कोरोना अनुदान पॅकेज या लोकलावंतांच्या पदरी लवकर पडावा. ही अपेक्षा. मातीची मडकी घडविताना वेगवेगळे भेद होवू शकतात.पण मातीत कधी भेद नसतो. तसं कला प्रकारांमध्ये भेद असू शकतात. पण या मातीतील एकच कला आहे, ती म्हणजे लोककला, त्यामध्ये कधीच भेद होवू शकत नाही.