- शुभम सोळसकर
क्रिकेट वर्ल्डकप नुकताच पार पडला. या वर्ल्ड कप मधील भारत विरुद्ध न्युझीलंड मधील साखळी फेरीतील मॅच एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली. न्यूझीलंडने दिलेल्या 273 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शंभर धावा आणि दोन बळी अशी भारताची परिस्थिती होती. विराट कोहली आणि श्रेयस अय्यर खेळत होते. त्याचवेळी क्रिकेटच्या इतिहासात कधी नव्हे ती गोष्ट घडली. धरमशाला मैदानावर दाट धुक्याचा थर तयार झाला. दृश्यमानता कमी झाली आणि पहिल्यांदाच मैदावरील धुक्यामुळे मॅच काही काळ थांबवण्याचा निर्णय पंचांनी घेतला. काही वेळाने खेळ पूर्ववत करण्यात आला. एरवी डकवर्थ लुईसचा नियम आपण पावसामुळे मॅच रद्द करण्याची वेळ आली तर घेतलेला पाहिला आहे. भविष्यात धुके व वातावरणातील बदलामुळे होणाऱ्या पूर, प्रचंड तापमान यामुळे घ्यावा लागेल अशी चिन्हे दिसू लागली आहेत. याच वातावरणातील बदलांना सामोरे जाण्यासाठी आता ऑस्ट्रेलियन क्रिकेट प्लेअर पुढे आले आहेत.
तब्बल सहाव्यांदा वर्ल्डकप उंचावणाऱ्या ऑस्ट्रेलियन टीमचा कर्णधार पॅट कमिन्स व त्याच्या टीमची कामगिरी अतिशय चांगली राहिली. नॉक आऊट मॅचेस मधील ऑस्ट्रेलियन संघ ज्या ताकदीनिशी खेळ करतो तसेच तो मैदानाबाहेरही अभिमानास्पद अशी कामगिरी करतो आहे. कर्णधार पॅट कमिन्स याला नुकताच बीबीसी माध्यम समूहाचा ‘ग्रीन स्पोर्ट्स ॲथलीट’ हा पुरस्कार मिळाला. क्लायमेट हा काय केवळ सेक्सी टॉपिक नसून तो गांभीर्याने घेण्याचा मुद्दा आहे असे पुरस्कार वितरण सोहळ्यात कमिन्स म्हणाला. केवळ बोलून तो थांबला नाही त्याने पुढाकार घेऊन ऑस्ट्रेलियाच्या पुरुष व महिला क्रिकेट संघातील खेळाडू एकत्र करून वातावरण बदलावर काम करणारी एक प्रकारची आर्मीच तयार केली. ऑस्ट्रेलियातील जवळपास 400 हून अधिक स्थानिक क्रिकेट क्लबपासून सुरुवात केली आणि सुरू झालाय प्रवास क्रीडा क्षेत्रातील कार्बन फुटप्रिंट कमी करण्याचा.

प्रवासाची सुरुवात करायची तर काय असा प्रश्न होता. उत्तरही मिळाले. क्लब मैदानात लागणाऱ्या सर्व विजेचा वापर हा पारंपरिक स्त्रोतांपासून नसेल. मग चार हजार लोकल क्लबने सोलर पॅनल बसवून ऊर्जा निर्मिती व वापर सुरू केला. आता कर्णधारच एवढा पुढाकार घेतोय म्हणल्यावर बाकीचे खेळाडूही पुढे आले. स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, मिशेल स्टार्क, मार्नस लाबुशेन, ॲलेसा हेली इत्यादी पुरुष व महिला क्रिकेट संघातील खेळाडूंनी देखील या चळवळीत सक्रिय सहभाग घेतला आहे. दुधाने तोंड पोळले की माणूस ताकही फुंकून पितो. पॅट कमिन्स च्या बाबतीत देखील असाच काहीसा प्रकार घडला. दोन तीन अनुभवांनी वातावरणातील बदलांकडे पाहण्याचा कमिन्सचा दृष्टीकोन बदलला. दिल्ली आणि बांगलादेशमध्ये सरावादरम्यान त्याला हे अनुभव आले. दिल्लीत धुक्यामुळे तोंडावर मास्क लावून मॅचचा सराव करावा लागला.
बांगलादेशमध्ये अतिशय उकाड्याचा सामना करावा लागला. दोन ओव्हर झाल्यानंतर आईस बाथ घेण्याची वेळ यायची अशी आठवण त्याने सांगितली आहे. ऑस्ट्रेलियातील वणव्यामुळे बॉलिंग करण्यास अडचण निर्माण झाली होती. श्वास घेण्यास देखील अडचण येत होती. ही समस्या केवळ एकाच ठिकाणी नसून जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांचा सामना खेळाडूंना करावा लागत आहे. ऑस्ट्रेलिया महिला संघाची कर्णधार ॲलेसा हेली म्हणते की, “सोलर पॅनलचा उपक्रम एकप्रकारे विन विन परिस्थिती आहे. क्लबच्या वीजेचे बिल यामुळे कमी होण्यास मदत होत आहे आणि उरलेल्या पैशांतून खेळाडूंना चांगली साधने उपलब्ध होऊ शकतात.”
सामूहिक कृती गरजेची आहेच परंतु वैयक्तिक कृतीवर देखील कमिन्स भर देतो. क्रिकेटमुळे त्याला जगभर विमानाने प्रवास करावा लागतो. विमानातून बाहेर पडणारा वायू हा वातावरणातील बदलांना कारणीभूत ठरतो याची पुरती जाण त्यास आहे म्हणून तो वर्षातील एकदा तरी विमान प्रवास टाळतो. खेळात सर्वोत्तम संघ होण्यासाठी असलेले सर्वच प्रयत्न ऑस्ट्रेलिया संघ आजवर करत आला आहे. चिवट प्रतिकार करण्यासाठी ओळखले जाणारे ऑस्ट्रेलियन वणव्यांनी झालेल्या हानीमुळे भानावर आले. हळहळले.यावर उपाय म्हणून ऑस्ट्रेलियन सरकार आपापल्या परीने काम करीत आहे म्हणून केवळ हातावर हात ठेवून शांत न बसता खेळाडूंनी देखील पुढाकार घेणे कौतुकास्पद आहे. ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने आजवर एकदिवसीय सामन्याचा सात वेळा वर्ल्डकप जिंकला आहे तर पुरुष संघाने कालचा सामना जिंकत ही किमया सहा वेळा साधली आहे. मैदानावरील हा दबदबा पर्यावरणाच्या क्षेत्रात देखील उमटवण्यासाठी आता कांगारू सज्ज झाले आहेत.