- प्रतीक गोयल
“मला सर्वात जास्त वाईट या गोष्टीचं वाटतं ते म्हणजे मी माझ्या तिसर्या सेमिस्टरच्या परीक्षांना बसू शकले नाही. कॉलेज प्रशासनाने सुरक्षिततेच्या कारणास्तव मला वर्गामध्ये बसू देण्यास मज्जाव केला असून, आमच्यावर दबाव आहे असे ते खाजगीत म्हणतात.’’ गेल्या 50 दिवसांपासून तुरुंगात असलेली सोनू मंसूरी आता तुरुंगातून बाहेर आली आहे. सोनू मध्यप्रदेशच्या खरगोन जिल्ह्यातील बोरनवा या भागात राहते. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर सोनूने स्वत:ला घरातच कैद करून घेतलयं, बाहेर पडायला ती घाबरते. मंसूरीच्या कुटुंबात सोनू ही पदवीधर होणारी पहिलीच तरुणी असून तिला एक क्रिमिनल वकील म्हणून कारकिर्द घडवायची आहे. मात्र आता परीक्षेला बसू न दिल्याने पुढचं शैक्षणिक करियर धोक्यात येईल की काय या एकमेव भितीने सोनू सध्या प्रचंड काळजीत आहे.
‘पीएफआय एजंट’ असल्याचा आरोप
इंदौरच्या जिल्हा न्यायालयात इंटर्नशिप करणाऱ्या ‘लॉ’ कॉलेजच्या द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी असलेल्या सोनू मंसूरीच्या आयुष्याला जानेवारी महिन्यात मोठी कलाटणी मिळाली. तिचं आयुष्यच एकप्रकारे उद्ध्वस्त झालं. हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित काही वकिलांनी सोनू मंसूरीवर थेट ‘पीएफआय एजंट’ असल्याचा आरोप करून तिच्यासोबत गैरवर्तन केले. पीएफआय (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) ही एक वादग्रस्त संघटना असून या संघटनेवर बंदी आणण्याची मागणी अनेक राज्यांनी केली आहे. वकिलांच्या एका गटाने सोनूवर ‘पीएफआय एजंट’ असल्याचा आरोप केल्यानंतर लगेगच तिला अटक झाली. तिच्यावर हा आरोप होता की, तिने वकिल असल्याचे भासवून कोर्टात सुरू असलेल्या एका सुनावणीचे लपून चित्रिकरण केले आणि तो व्हिडियो पीएफआय या संघटनेकडे ‘लिक’ केला. सोनूचा खटला लढवण्यास एकही स्थानिक वकील तयार नव्हता जेणेकरून तिला जामीन मिळू शकेल. काही बाहेरच्या वकिलांनी मग सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आणि अटक झाल्याच्या दोन महिन्यांनंतर सोनूला सर्वोच्च न्यायालयाकडून अखेर दिलासा मिळाला.
ऐन सुनावणीच्या वेळेस वकील अनुपस्थित राहिल्यामुळे तुरुंग अधिकाऱ्यांनी परीक्षेस बसू देण्याची परवानगी द्यावी असे अपील सोनू कोर्टात करू शकली नाही. त्यानंतर देवास गवर्नमेंट लॉ कॉलेजच्या प्रशासनाकडे सोनूने परिक्षेला बसू देण्यासाठी अर्ज केला, मात्र त्याला परवानगी मिळाली नाही. सोनूला आता पुन्हा तिसऱ्या सेमिस्टरची परीक्षा द्यावी लागेल, असे कॉलेज प्रशासनाचे म्हणणे आहे. जानेवारी 2023 मध्ये सोनूला अटक केल्यानंतर काही मीडियाने तिची बाजू न ऐकताच तिला पीएफआय एजंट म्हणून घोषित केले होते. सोनूने आरोप केला की, “अटक झाल्यानंतर सात दिवसांपर्यंत मला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते आणि त्यादरम्यान काही पत्रकारांनी माझी बाजू ऐकूनही घेतली होती. परंतू जेव्हा मी तुरुंगातून बाहेर आले तेव्हा कळलं की जे मी बोलले होते त्यावर तर एकही अक्षर छापून आलं नाही, उलट पत्रकारांनी काहीही खोट्यानाट्या कहाण्या रचून मला अडकवलं होतं.’’

मीडियामध्ये झालेली सोनूची बदनामी इंदौरच्या सेंट्रल जेलपर्यंत पोहचली जिथे सोनूला न्यायालयीन कोठडी मिळाली होती. तेथील वातावरणाबद्दल सोनू सांगते की, अत्यंत वाईट दिवस होते ते. तुरुंगातील कैदी सरळसरळ मला अतिरेकी म्हणून हिणवत होते. माझ्याशी कोणीही बोलू नये, असा आदेश त्या कैद्यांना देण्यात आला होता.
भारत जोडो यात्रा, नमाज, पीएफआई आणि दाऊद इब्राहिम
“पोलिस कोठडीतील त्या सात दिवसांत किमान पाचपेक्षा अधिक वेगवेगळ्या चौकशी पथकाच्या अधिकाऱ्यांनी माझी कसून चौकशी केली. त्या सात दिवसांत ना मला कपडे बदलायला दिले ना माझ्या कुटुंबाला भेटायला दिले. सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत सलग मला वेगवेगळे प्रश्न विचारण्यात आले. माझ्या कुटुंबियांना कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. जेव्हा मला माझ्या बहिणीकडून कळले की, बाहेर एकही वकील केस घ्यायला तयार नाही तेव्हा तर मी तुरूंगातच बेशुद्ध झाली.’’ सोनू सांगत होती.
“चौकशीदरम्यान मला वारंवार नमाज, मदरसा, पाकिस्तान आणि पीएफआयशी संबंधित प्रश्न विचारले गेले. मी आजपर्यंत एकदाही मदरश्यात गेलेली नाही. मला विचारलं की दाऊद इब्राहिमला ओळखतेस का? तुझी मुळ ओळख का लपवतेस? इतकचं नव्हे तर राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या काहीजणांसोबत माझे काय संबंध आहेत, असेही प्रश्न मला पोलिसांनी विचारले. भारत जोडो यात्रेतील काही फोटो दाखवून फोटोतील व्यक्तीला तु ओळखतेस का, दिवसातून कितीवेळा नमाज पढतेस, कितीवेळा पाकिस्तानला जाऊन आली आहेस, तिकडे कोणकोण ओळखीचे आहेत, पीएफआयशी कशी जोडली गेलीस असे नानाविध प्रश्न विचारले गेले.

का झाली सोनू मंसूरीला अटक?
सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ सोनू वकील नूरी खान यांच्याकडे इंदौर जिल्हा न्यायालयात इंटर्नशिप करत होती. विश्व हिंदू परिषदेशी संबंधित काही वकिलांनी सोनूवर आरोप केल्यानंतर 29 जानेवारीला तिला अटक झाली. ही घटना बजरंग दलचा एक नेता तनु शर्माच्या विरुद्ध सुरू असलेल्या एका सुनावणीदरम्यान झाली होती. शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाला विरोध करताना महंमद पैंगबरांविरुद्ध आपत्तीजनक वक्तव्य केल्यामुळे तनु शर्माला अटक झाली होती.
त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे वकील एहतेशाम हाशमी तनु शर्माच्या विरुद्ध केस लढण्यासाठी इंदौरला आले होते. सोनू सांगते की, मला याची जराही कल्पना नव्हती, मात्र माझ्या गुरू वकील नुरी खानचे ते सीनियर असल्याकारणाने मी 42 क्रमांकाच्या कोर्टाच्या खोलीत हजर होती. कोर्ट खचाखच भरले होते त्यामुळे न्यायाधीशांनी इंर्टनशिप करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि ज्युनियर वकीलांना कोर्टाबाहेर जाण्याचा आदेश दिला. त्याच दरम्यान मला नुरी खान यांचा फोन आला आणि त्यांनी एका ग्राहकाकडून मला पाच वकीलनामा आणि पैसे आणण्यास सांगितले. मी ते काम पूर्ण करून जेव्हा कोर्टच्या खोलीत जाऊ लागली तेव्हा एका महिला वकीलाने आणि दोन पुरुषांनी मला अडवलं. इथे 42 क्रमांकाच्या खोलीत काय करतेस, असे विचाल्यावर मी सांगितलं की, सुनावणी ऐकण्यासाठी आली आहे.’’
त्यावेळी सोनूच्या खिश्यातून तिचे ओळखपत्र काढण्यात आले आणि तिला तिचा धर्म विचारू लागले. सोनू म्हणते की, तिथल्याच राज्य बार कार्यालयामध्ये वकिलांच्या एका गटाने तिला डांबून ठेवलं. एक वकील जेव्हा माझी झडती घेऊ लागली तेव्हा मी विरोध केला, त्यावर ती म्हणाली की, अशीही तुझी तक्रार कोण दाखल करून घेणार आहे. आम्ही तुझ्यावर अशी केस ठोकू की आयुष्यात कधीही तु तुरुंगातून बाहेर पडू शकणार नाहीस. त्यांनी दरवाजा लावून घेतला, माझ्या खिशातले पैसे लंपास केले आणि माझ्या हातात असलेले वकीलनामा आणि फोन हिसकावून घेतला.


सोनूने सांगितलं की, जवळपास तासाभरानंतर एका महिला वकिलाला बार कार्यालयात बोलावून घेण्यात आले आणि पुन्हा माझी झडती घेण्यात आली. त्यावेळी आणखी एकजण व्हिडियो रेकॉर्डिंग करत होता. हे सर्व झाल्यानंतर ‘जय श्रीराम’चे नारे देत त्या लोकांनी मला येथील एमजी रोड पोलिस ठाण्यात आणले. खोटं स्टेटमेंट देण्यासाठी माझ्यावरचा दबाव वाढत होता. मी नकार दिल्यावर माझ्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्यासाठी पोलीस इस्पेक्टरकडे घेऊन गेले आणि सांगितलं की न्यायालयाच्या सुनावणीचे चित्रिकरण करताना हिला आम्ही पकडलं. जेव्हा इन्स्पेक्टर म्हणाले की अशा कृत्यामुळे ते मला अटक करू शकत नाहीत तेव्हा त्या लोकांनी मी पीएफआयची एजंट आहे आणि न्यायालयाच्या सुनावणीचे व्हिडियो ही पीएफआयकडे लिक करत असल्याचे सांगितले.
29 जानेवारीला सोनूवर 419, 420 आणि 120-B अशी कलमे लावण्यात आली. सोनू आता जामिनावर बाहेर आहे. सर्वोच्च न्यायालयाने पुढच्या सुनावणीच्यावेळी राज्याला त्यांची बाजू मांडण्यास सांगितले आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर सोनू म्हणते ती, कायद्याच्या या लढाईत मी खचून जाणार नाही, मला माझे लक्ष्य गाठायचे आहे. मला शिकवण्यासाठी माझ्या कुटुंबाने खुप मेहनत केली आहे, मी ते वाया जाऊ देणार नाही. हार न मानता मी माझा अभ्यास पुढे सुरूच ठेवणार आहे.
(सौजन्य – न्यूज लॉँन्ड्री)