- अरुण पुराणिक
व्ही. शांताराम म्हणजे शांतारामबापू फारसे शिकले सवरलेले नव्हते. परंतु त्यांना चित्रकलेचे सखोल ज्ञान होते, ध्वनिपेक्षा चित्रातून प्रसंग उभे करण्याचे महत्व त्यांना पुरेपूर कळले होते. प्रेक्षकांचे वय लक्षात घेऊन चित्र निर्मिती करताना त्यातील नेमके काय दाखवले पाहिजे? ते चित्तवेधक कसे केले पाहिजे? सिने जाहिराती, पोस्टर्स, बुकलेट्स, शो कार्ड्स इतकेच नाही तर थिएटर डेकोरेशन यांचीही उत्तम जाण बापूंना होती. अगदी मेकअप करण्यापासून ते छायाचित्रण, संकलन, ध्वनिमुद्रण हे चित्रपट निर्मितीचे सर्व बारकावे त्यांनी आत्मसात केले होते. त्यामुळे त्यांनी आपल्या चित्रपटांना भाषेची अडचण कधी भासू दिली नाही. महत्वाचे म्हणजे, अनुभव, अभ्यास व कौशल्य अंगी असूनही बापूंनी चित्रपट निर्मितीची घाई केली नाही.
उत्तम दिग्दर्शक म्हणून त्यांनी पूर्वीच नावलौकिक मिळवला होता. आता त्यांना निर्मात्याच्या भूमिकेत उभे राहायचे होते. वडील राजाराम व आई कमला यांची आद्याक्षरे घेऊन त्यांनी आपल्या निर्मिती संस्थेची ‘राजकमल कलामंदिर’ संस्थेची स्थापना केली.
कोल्हापूरला असतानाच वयाच्या विसाव्या वर्षी शांतारामबापूंचा विवाह बारा वर्षांच्या विमलबरोबर झाला होता. बाबूराव पेंटरांच्या महाराष्ट्र फिल्म कंपनीत गेल्यावर त्यांच्यातील कलावंत जागा झाला होता. असामान्य प्रतिभाशक्तीच्या बळावर बापू पुढील दहा वर्षातच “प्रभात फिल्म कंपनी‘चे महत्त्वाचे भागीदार बनले होते. बापूंनी कंपनी सोडली तेव्हा, त्यांना विमला पासून प्रभातकुमार, मधुरा व सरोज ही तीन अपत्ये झाली होती. बापू निर्माता-दिग्दर्शक म्हणून कर्तबगार तर होतेच. पण त्याचबरोबर त्यांना रूबाबदार व्यक्तिमत्वही लाभले होते. “प्रभात’च्या “शेजारी’ चित्रपटामध्ये जयश्री कामुलकर तर हिंदी आवृत्ती “पडोसी’मध्ये अनीस खातून या दोन नवीन नायिका घेण्यात आल्या होत्या.

दोघीही दिसायला सुंदर होत्या. जयश्री तर, गिरिजाच्या भूमिकेत फारच मोहक दिसत होती. शांतारामबापूंवर जयश्रीची जबरदस्त मोहिनी पडली होती. कसलीही अपेक्षा न ठेवता दोघांनीही एकमेकांवर निर्व्याज प्रेम केले होते. अर्थात, बापू विवाहित होते. तीन मुलांचे पिता होते, ही गोष्ट त्यांच्या प्रेमाआड आली नव्हती. जयश्रीनेही प्राप्त परिस्थितीत त्यांचा मनोमन स्वीकार केला तेव्हा, बापूंनी प्रेमाची परिणीती विवाहात केली. जयश्रीला धर्मपत्नीचा दर्जा दिला. मान -सन्मान, घर, दागदागिने देऊन प्रेमाची पूर्तता केली. 22 ऑक्टोबर 1941 रोजी हिंदू वैदिक पद्धतीप्रमाणे मुंबईत त्यांचा विवाह पार पडला. फिल्मी उद्योगात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. वृत्तपत्रांचे रकाने भरले. दोघांवर शिंतोडे उडवले गेले. त्या कठीणसमयी बापूंनी जयश्रीची योग्यप्रकारे समजूत काढली. तिला धीर दिला. परंतु या सर्व घटनेत त्यांच्या पहिल्या पत्नीचा, तीन मुलांची आई असलेल्या विमलचा सर्वांनाच विसर पडला होता…
विमल ही एक साधीसुधी, अशिक्षित, खेडेगावातून आलेली. माहेरचा आधार नसलेली स्त्री होती. ती या धक्क्याने पार उन्मळून पडली. आपले पुढे काय होणार? या विचाराने सैरभैर झाली. तिच्यावर जणू मानसिक आघात झाला. या परिस्थितीत ती बिचारी काय करू शकणार होती? घरदार सोडून संसार मोडून कुठे जाणार होती? अशा वेळी परक्याच्या घरी जाऊन राहण्यापेक्षा इथेच परक्यासारखे राहाणे अधिक श्रेयस्कर आहे, असा त्या माऊलीने विचार केला. हा तिचा निर्णय व्यवहारी होता. प्रेमाच्या नवीन अनुभूतीने न्हाऊन निघालेल्या बापूंना आपण आपल्या पहिल्या पत्नीवर केलेल्या अन्यायाची पूर्ण जाणीव होती. त्यांनी आपल्या चुकीचे परिमार्जन केले. आपल्या पहिल्या पत्नीला व तिच्या मुलांना काहीही कमी पडून दिले नाही. विमलला पतीचे प्रेम दिले व मुलांना बापाची माया दिली. ही दोन्ही कुटुंबे एकाच घरात गुण्यागोविंदाने नांदू लागली…
वैयक्तिक आयुष्यातला अत्यंत जटील प्रश्न अत्यंत हुशारीने बापूंनी सोडवला होता. आता मुंबईत कायमचे स्थायिक होऊन, सिने व्यवसायात ताठ मानेेने त्यांना उभे रहायचे होते. चित्रपट व्यवसायातल्या धंद्याचे अवघड गणित सोडवायचे होते. पण आता ते एकटे नव्हते. पत्नी जयश्रीची त्यांना या कामी साथ होती. चित्रपटासारख्या बेभरवशाच्या धंद्यात घरच्या लक्ष्मीची साथ असणे, हे त्या काळात अत्यंत महत्त्वाचे होते.
बापूंना ‘अमर भूपाळी’साठी ‘संध्या’ मिळाली
1947 च्या दरम्यान “राजकमल’च्या “लोकशाहीर रामजोशी‘ व “मंगल पिक्चर्स’चा “जय मल्हार’ पासून मराठीत तमाशा प्रधान चित्रपटांचे युग अवतरले. त्याच दरम्यान विश्राम बेडेकरांनी व चिंतामण मराठे यांनी उत्तर पेशवाईतील कवी होनाजी बाळा व त्याचा मित्र बाळा यांची कथा व पटकथा लिहून बापूंना दिली. बापूंनी मराठी रंगभूमीवरील गायक नट पंडित नगरकर (होनाजी), अभिनेत्री कुसुम देशपांडे यांच्या धाकट्या भगिनी रंजना (गुणवंती) व ललिता पवार (विठाबाई) यांना घेऊन ‘अमर भूपाळी’ चित्रपटाची निर्मिती करण्याचे ठरविले. रंजनाने या भूमिकेसाठी आपले वजन थोडे कमी करावे, असे बापूंनी सुचवले. पण रंजनाला हे करणे जमले नव्हते. बापूंनी “अमर भूपाळी’साठी नवी नायिका घेण्याचे ठरवून तरुण मुलीचा शोध सुरू केला.
स्टुडिओ मॅनेजर वासू देसाई एका तरुण मुलीचा लहानसा फोटो घेऊन आले. बापूंना तिचा फोटोजनिक चेहरा व बोलके डोळे आवडले. दुसऱ्या दिवशी एक अठरा वर्षाची, उंच, सडपातळ गोरी मुलगी कपाळावर मोठा टिळा, डोक्यांवरून पदर अशी आपल्या वडिलांना सोबत घेऊन बापूंना स्टु़डिओत भेटायला आली. तिच्या वडिलांचे नाव श्रीधर देशमुख, तर तिचे नाव विजया देशमुख होते. मराठी असूनही गुजराती भाषेत संगीत नाटक सादर करणाऱ्या ‘देशी नाटक समाज’ या संस्थेत नायिकेची कामे करीत होती. बापूंनी तिच्याकडे निरखून बघितले. तिच्या चेहऱ्यावर रंगरंगोटीचा मागमूसही नव्हता. त्यामुळे तिचा नैसर्गिक गोरा रंग खुलून दिसत होता.
तिचे डोळे मोठे व नजर तीक्ष्ण होती. जाताना बापूंनी तिला मागूनही न्याहाळले. तिचा बांधा एखाद्या नर्तकीसारखा होता. तिची चाल डौलदार होती. कुणा निर्माता-दिग्दर्शकाचे तिच्याकडे अजूनही लक्ष कसे गेले नाही, याचे बापूंना त्या क्षणी आश्चर्य वाटले आणि तिथल्या तिथे ‘राजकमल स्टुडिओ’ने विजयाबरोबर तीन वर्षांचा करार केला. विजया ‘अमर भूपाळी’ चित्रपटाची नायिका झाली. बापूंनी विजया देशमुखचे ‘संध्या’ असे छोटे आणि सुटसुटीत नामकरण केले. कारण त्या काळी बालनट, बालकराम व बालनटी मंजू यांची बहीण अभिनेत्री विजया देसाई चित्रपटातून आधीपासूनच काम करीत होती.
‘अमर भूपाळी’ महाराष्ट्राबाहेरही यशस्वी ठरला. मद्रासला तो 22 आठवडे चालला. बंगाली दिग्दर्शक नितीन बोस यांनी हा चित्रपट बंगालीत डब करून कलकत्यात प्रदर्शित केला. फ्रान्स येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला पारितोषिक मिळाले. या चित्रपटाच्या यशात वसंत देसाई यांच्या संगीताचाही मोठा सहभाग होता. ‘घन:श्याम सुंदरा’ ही होनाजीची भूपाळी या चित्रपटामुळे अजरामर ठरली होती. केवळ मराठी घरातच नव्हे, तर इतर भाषिक घरांतही ती ऐकली जात होती. संध्याच्या भूमिकेने बापू इतके प्रभावित झाले की, कालांतराने आपल्या कोणत्याही चित्रपटासाठी संध्याशिवाय दुसऱ्या नायिकेचा विचार त्यांना करता येईनासा झाला. ते पुरते संध्यामय होऊन गेले.

“राजकमल’च्या ‘झनक झनक पायल बाजे’ (1955) या संगीत आणि नृत्यप्रधान चित्रपटाची कथा आणि संवाद दीवाण शरर यांनी लिहिले होते. नृत्य दिग्दर्शक गोपीकृष्ण तर, संगीत दिग्दर्शक वसंत देसाई होते. ३ सप्टेंबर 1955 रोजी प्रदर्शित झालेला ‘झनक ’मुंबईच्या मेट्रोमध्ये 11 आठवडे, ऑपेरा हाऊसमध्ये 80 आठवडे, तसेच लिबर्टीमध्ये 11 आठवडे चालला. समस्त मुंबईकरांच्या वतीने दादरच्या शिवाजी पार्कवर बापूंचा जाहीर सत्कार करण्यात आला. आचार्य अत्रे यांनी बापूंना ‘चित्रपती’ किताब दिला. या चित्रपटाला राष्ट्रपती पदक, तसेच फिल्मफेअरचे उत्कृष्ट दिगदर्शन, कला दिग्दर्शन, उत्कृष्ट ध्वनिलेखन, संकलन आदी पुरस्कार तसेच संगीतासाठी मानचिन्ह मिळाले. सर्वांवर कळस म्हणजे, उत्कृष्ट भारतीय चित्रपटासाठी भारत सरकारचा पुरस्कारही मिळाला. या चित्रपटापासूनच अभिनेत्री जयश्री गडकरांनी रूपेरी पडद्यावर पदार्पण केले.
या चित्रपटाचे सर्वत्र उत्स्फूर्त स्वागत झाले. मात्र चित्रपटाच्या यशाला केवळ आपली अदाकारी आणि नृत्य कारणीभूत आहे, असा अनपेक्षित सूर संध्या हिने लावला. तेव्हा संगीतकार वसंत देसाईंना उघडपणे सांगणे भाग पडले की ‘झनक झनक पायल बाजे’ यशस्वी होण्यामागे केवळ संध्याचा नृत्याभिनय नाही, तर गोपीकृष्ण यांचे उत्तम नृत्य, तसेच “वसंत देसाई’यांच्या संगीताचाही सिंहाचा वाटा आहे. या घटनेने देसाई मनोमन दुखावले होते. 1958 मध्ये त्यांनी “राजकमल’च्या नोकरीचा राजीनामा दिला. पण ‘झनक झनक पायल बाजे’ने चित्रपटसृष्टीत एक इतिहास घडवला होता.
‘नवरंगा’ची उधळण
‘दो आँखे बारह हाथ’च्या चित्रीकरण प्रसंगी उधळलेल्या बैलाशी झालेल्या झटापटीत बैलाचे शिंग लागून बापूंच्या डोळ्यांना इजा झाली. त्यासाठी शस्त्रक्रियाही करावी लागली. वर्षभर डोळ्यांवर पट्टी असल्याने त्यांना काहीच दिसत नव्हते. पण त्यांचे कलासक्त मन मात्र कल्पनांच्या विश्वात विहार करत होते. याच काळात त्यांना ‘नवरंग’ची कल्पना सुचली. या कल्पनेला अनुसरून ग.दि. माडगूळकरांनी कथा लिहिली. तर पटकथा स्वत: बापूंनी लिहिली. ‘झनक’सारखा हाही एक कला नृत्यसंगीताचा आविष्कार होता. वसंत देसाई ‘राजकमल’मधून बाहेर पडले होते, म्हणून संगीताची जबाबदारी सी. रामचंद्र यांच्यावर आली होती.
‘झनक’चे नृत्यदिग्दर्शन कथ्थकनर्तक गोपीकृष्ण यांनी केले होते. तर “नवरंग’चे नृत्यदिग्दर्शन ‘शाम’ यांनी केले होते. त्यातील भव्य सेट्स कनू देसाई यांनी उभारले होते. बापूंनी ‘नवरंग’च्या आधी ‘शाहीर प्रभाकर’ या नावाने मराठी चित्रपट सुरू केला होता. पण नंतर प्रभाकरला दिवाकर बनवून तो त्यांनी ‘नवरंग’ या नावाने हिंदीत निर्माण केला. “नवरंग’हा त्या काळातला राजकवी असल्याने “नवरंग’ मधील गीतांना उच्च दर्जाचे साहित्यिक मूल्य असणे गरजेचे होते. त्यासाठी बापूंनी गीतकार म्हणून पंडित भरत व्यास यांची निवड केली. त्यांनी त्या काळाला साजेशी उत्तम गीतरचना केली. चित्रपट संगीतातून अनेक होळीगीते नावारूपाला आली. परंतु “नवरंग’ मधील होळीगीत, शब्दअर्थ, भाव, संगीत नृत्य आणि चित्रीकरण या सर्वच बाबतीत बेजोड ठरले.
संकरी गली में मारी कंकरी कन्हय्याने
पकरी बांह और की अठखेली
भरी पिचकारी मारी सररररर…
यातील लयबद्ध शब्दातील माधुर्य अवर्णनीय आहे. कथ्थक नर्तिकांना हेवा वाटेल, असे अप्रतिम नृत्य संध्याने या गाण्यावर केले. बापू नवोदित कलाकारांकडून उत्तम भूमिका वठवून घेत. “शकुंतला ‘मध्ये त्यांनी ‘मदन’ या हरिणाकडून भूमिका करून घेतली. तर “नवरंग’साठी त्यांनी कोल्हापूरहून खास आपला आवडता ‘गजराज’ रामचंद्र संध्याबरोबर होळी खेळण्यासाठी आणला होता. पायात घुंगरू बांधून हा हत्ती गाण्यात नाचला आहे आजकाल संगणकाच्या मदतीने वाटेल ते इफेक्ट्स दाखवता येतात. बापूंनी पंचावन्न वर्षांपूर्वी संगणकाच्या मदतीशिवाय ही करामत करून दाखवली होती. “नवरंग‘साठी राजकमलने चित्तवेधक पोस्टर बनवले होते. जमुना व मोहिनी ही संध्याची दोन वेगवेगळी रूपे एकाच चेहऱ्यातून दाखविली होती. या संगीत आणि नृत्यप्रधान चित्रपटाचेही प्रेक्षकांनी उत्साहाने स्वागत केले. अनेक चित्रपटगृहात “नवरंग’ने सुवर्णजयंती साजरी केली.

मोहमयी ‘पिंजरा’
एखाद्या चित्रपटाच्या बाबतीत सुवर्णयोग सहज जुळूत येतात,असे म्हणतात, ‘पिंजरा’ चित्रपटाच्या बाबतीत तेच नेमके घडले. अनंत माने यांनी उत्साहाने आपले सारे दिग्दर्शन कौशल्य पणाला लावून ‘अशीच एक रात्र होती’ चित्रपटाची निर्मिती केली. पण छायाचित्रणात काही तांत्रिक बाबी जमून न आल्याने चित्रपट धूसर झाला आणि पडद्यावर येताच साफ कोसळला. एकीकडे ‘नवरंग’नंतर बापूंचे हिंदी चित्रपटही अपयशी ठरू लागले होते. याच दरम्यान बापूंनी अनंत माने यांच्याकडून मराठी चित्रपट करून घेण्याचे ठरविले. दिग्दर्शनाची जबाबदारीही त्यांनी मानेंना घेण्यास सांगितली. बापूंची फक्त एकच अट होती, या मराठी चित्रपटाची नायिका ‘संध्या’च असेल!
अनंत माने यांच्या मनात आगामी मराठी चित्रपटाची कथा कल्पना तयारच होती. ती कल्पना त्यांना दोन पाश्चात्य चित्रपटांवरून सुचली होती. ही कथा कल्पना अनंत माने, लेखक शंकर पाटील व स्वत: बापू यांनी फुलवली. शंकर पाटीलांनी त्यातील एका दृश्यासाठी संवाद लिहिले-
श्रीधरपंत गुरुजी तमासगीर नर्तकी चंद्रकलेच्या मोहजालात गुरफटले जातात. तेव्हा ते नर्तकीला म्हणतात. ‘खरं सांगू, माझं अंर्तमन मला सारखं म्हणतंय की, आपण नको त्या पिंजऱ्यात अडकत चाललोय! त्यावर नर्तकी त्यांची समजूत घालते.’
‘गुरुजी, पिंजरा? त्यो कुनाला चुकलाय? अवो मानसाचं घर तरी काय असतं? ‘त्यो बी एक पिंजरा’च की!
‘मानूस कुटंबी गेला तरी त्येला घराची वड असती का न्हाई?’ एव्हढंच काय, तुमचा जीव… तो सुद्धा देहाच्या पिंजऱ्यातच हाय नव्हं? म्हणून म्हणते, पिंजरा हाय तर सगळं हाय.’ आणि या संवादातूनच चित्रपटाला नाव सुचलं… ‘पिंजरा’
जीवनाचे तत्वज्ञान आपल्या रांगड्या भाषेत सांगणारी तमाशातील नर्तकी चंद्रकला (संध्या) आणि ‘व्यक्ती मेली तरी चालेल, पण समाजापुढील आदर्श जिवंत राहिले पाहिजेत’,या तत्वावर श्रद्धा असलेले श्रीधरपंत गुरुजी (डॉ. श्रीराम लागू) या दोघांच्या संघर्षाची हृदयस्पर्शी कथा म्हणजे, राजकमलचा हा ‘पिंजरा’. गीतकार जगदीश खेबुडकर व संगीतकार राम कदम हे अनंत माने यांचे जुनेच सहकारी होते. राम कदम ‘राजकमल’च्या चित्रपटासाठी प्रथमच संगीत देत होते. दोघांनी जिद्दीला पेटून, “पिंजरा’साठी उत्तम संगीत दिले. नायिकेसाठी संध्या बाईंची निवड ठरलेलीच होती, प्रश्न होता,तो गुरुजींच्या समर्थ भूमिकेसाठी कुणाची निवड करायची? गुरुजींच्या भूमिकेसाठी डॉ. श्रीराम लागूंचे नाव जयश्री गडकर यांनी सुचवले. डॉ. लागू त्या काळात ‘नटसम्राट’ नाटकात भूमिका करत होते. पण या आधी त्यांनी कुठल्याही चित्रपटात कधी भूमिका केली नव्हती. ‘पिंजरा’मध्ये ते नायक बनले.
या चित्रपटाच्या संकलनाच्या वेळी दोन अतिशय अभिनव कल्पना राबविल्या गेल्या. त्यातील एक होती ती, म्हणजे शॉट फ्रिज करण्याची! चित्रपटातील एका प्रसंगात नर्तकी चंद्रकलाचा दुखावलेला गुडघा पाहाण्यासाठी गुरुजी तिची साडी वर करतात. ब्रह्मचारी गुरुजी आयुष्यात प्रथमच एका स्त्री देहाची केळीच्या खांबासारखी गोरीपान, मांसल उघडी मांडी पहातात अन् स्तिमित होऊन तिच्याकडे पहातच राहातात. त्यांच्यातील सुप्त कामवासना जागी होते. हा परिणाम साधण्यासाठी संध्याच्या दोन्ही उघड्या मांड्या आणि गुरुजींची स्तिमित होऊन पहाणारी कामूक नजर हे दोन्ही शॉट्स फ्रिज करून हा परिणाम साधला गेला. गुरुजी जेव्हा प्रथम दारू पितात, तेव्हा त्यांची द्विधा मन:स्थिती दर्शविण्यासाठी तिथेही फ्रिज शॉटचा उपयोग केला गेला.
ग्रामीण तमाशाप्रधान चित्रपटात लावणीची जान असते, ती ढोलकीच्या कडकडाटात, तुणतुणे आणि मंजिरीच्या नादात! ‘पिंजरा’ चित्रपटातील सर्व गाणी, शहरांत, खेड्यापाड्यांत, लग्न-मुंज-बारसं, सण-उत्सव, यात्रा-जत्रा-उरूस अशा सर्व प्रसंगी अनेक वर्षे गाजत होती. गाण्यांच्या हजारो कॅसेट खपल्या होत्या . संध्या यांना उत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला तेव्हा या चित्रपटाचा रौप्य महोत्सवी सोहळा पुण्याच्या, हॉटेल ब्ल्यू डायमंडमध्ये मोठ्या थाटात साजरा झाला. ‘पिंजरा’ मुंबईच्या ‘प्लाझा’मध्ये 33 आठवडे, तर पुण्याच्या ‘प्रभात’मध्ये 25 आठवडे चालला.

व्यावसायिक पातळ्यांवर “राजकमल’ची भरभराट होत असतानाच, दुसरीकडे साधारण 1955 च्या सुरुवातीपासून बापूंच्या घरचे वातावरण हळुहळू कलुषित होऊ लागले. बापू आणि जयश्रीमधील मतभेद दिवसेंदिवस वाढू लागले. बापू आपला जास्तीत जास्त वेळ स्टुडिओत व्यतीत करू लागले. खरं तर जयश्रीला संध्या आणि बापू यांच्यातील जवळीक खुपू लागली होती. एक दिवस जयश्रीने संध्याला “राजकमल’ मधून काढून टाका म्हणून हट्ट धरला. त्याकाळी संध्याची आर्थिक परिस्थितीही बरी नव्हती. तिला मदतीची गरज होती. जयश्रीलाही ते पटले. तिने संध्याशी समझोता केला. आपले काही दागिने, साड्या- पोशाख संध्याला देऊन टाकले. संध्यानी ते घेण्यास स्पष्ट नकार दिला. ती म्हणाली, मी माझे सर्व जीवन अभिनयाला आणि नृत्यकलेला वाहिले आहे, मला या गोष्टींचा बिलकुल शौक नाही. वास्तवातही घरी सध्या साध्या सूती कपड्यातच वावरत असे. परंतु, बापू आणि जयश्रीचे दुरावलेले संबंध शेवटी संपुष्टात आले आणि 13 नोव्हेंबर 1956 रोजी त्यांचा कायदेशीर घटस्फोट झाला.
आणि बापूंनी संध्याशी विवाह केला…
त्याच वर्षी बापूंनी 22 डिसेंबर रोजी संध्याशी कायदेशीर विवाह केला. तोवर सर्व सिनेनट्यांमध्ये संध्याने स्वत:चे असे एक वेगळे स्थान केले होते. इतर सर्व नट्या स्वतंत्ररित्या वेगवेगळ्या सिनेमातून काम करत होत्या. त्यातील काही वर्षाला वीस-वीस सिनेमांतून काम करत होत्या. संध्याने मात्र फक्त एकाच निर्मात्याकडे जवळजवळ वीस वर्ष आपली कारकीर्द घडवली. या काळात “राजकमल’च्या 12 चित्रपटांतून ती झळकली. गंमत म्हणजे,‘अमरभूपाळी’च्या भव्य यशानंतर मेहबूब खान यांनी संध्याला आपल्या चित्रपटात काम करण्यासाठी मोठी ऑफर दिली होती, पण संध्याने ती नम्रपणे नाकारली होती.
“राजकमल’च्या ‘परछाई’ चित्रपटातून संध्या हिंदी सिनेमात आली. ‘परछाई’मध्ये तिच्याबरोबर जयश्री आणि व्ही. शांतारामही होते. परंतु तिथेही तिने स्वत:चा वेगळेपणा जपला. ‘तीन बत्ती चार रस्ता’ चित्रपटात तर तिने एका कुरूप गायिकेची भूमिका केली. या भूमिकेसाठी तिला चेहऱ्यावर डार्क मेकअप केला होता. या चित्रपटांनी राष्ट्रीय आणि भावनिक एकात्मतेचा संदेश दिला होता. मात्र, संध्याचे एक नृत्यनिपुण नायिका आणि कलाकार म्हणून बापूंच्या पहिल्या रंगीत चित्रपटापासून म्हणजेच ‘झनक झनक पायल बाजे’पासून सर्वत्र नाव झाले. संध्या कथ्थक नृत्यात पारंगत नव्हती, तरीही अक्षरश: दिवस -रात्र रियाज करून तिने गोपीकृष्ण यांच्यासारख्या महान कथ्थक नर्तकाबरोबर आत्मविश्वासाने चित्रपटात नृत्य केले. या चित्रपटाने विक्रमी धंदा केला. मुंबईतील एकाच थिएटरला ‘ऑपेरा हाऊस’ला तो जवळजवळ दोन वर्षे चालला. सिनेमाला आणि संध्याला अनेक पारितोषिके व पुरस्कार मिळाले.
संध्याच्या अभिनयाचा एक अतिशय वेगळा पैलू बापूंच्या ‘दो आँखे बारह हाथ’ या चित्रपटात रसिकांना पहायला मिळाला. यामध्ये तिने एका खेळणीवालीची भूमिका केली आहे. ही खेळणीवाली मनोमन जेलरवर प्रेम करत असते. तिचे हे एकतर्फी प्रेम चित्रपटाच्या शेवटी फक्त एका प्रसंगातून व्यक्त होते. तिला जेव्हा जेलरचे निधन झाले आहे, हे समजते ती भिंतीवर हात आपटून रडत आपल्या बांगड्या फोडते. ‘नवरंग’मध्ये संध्याची दुहेरी भूमिका होती. एका बाजूला एक सामान्य गृहिणी तर दुसऱ्या बाजूला एका कवीची कल्पना, कवीच्या स्वप्नातील त्याच्या कल्पनेप्रमाणे गाणारी आणि नाचणारी त्याची प्रेयसी. एक खरी, तर दुसरी भ्रामक. अशा आव्हानात्मक दोन भूमिका तिने एकाच वेळी साकारल्या होत्या. कालिदासाच्या ‘शाकुंतल’ नाटकावर आधारित ‘स्त्री’ चित्रपटात तिने शकुंतलेची भूमिका केली. यामध्ये तिने खऱ्याखुऱ्या वाघाबरोबर काम केले. दुर्दैवाने, या चित्रपटाला बापूंच्या “शाकुंतल’ सारखे भव्य दिव्य यश लाभले नाही.
प्रेमकथेवर आधारित ‘सेहरा’ चित्रपटातही संध्याची भूमिका होती. तरीही सर्वोत्कृष्ट, नृत्य आविष्कार ‘जल बीन मछली नृत्य बीन बिजली’मध्येच पाहायला मिळाला. त्याच्या आधीच्या काळात पाठीच्या दुखण्यामुळे तिने नृत्याचा रियाज करणे सोडून दिले होते. तिचे या चित्रपटातील सर्प नृत्य पाहणे, म्हणजे रसिकांसाठी एक पर्वणी ठरली होती. ‘इये मराठीचिये नगरी’(याची हिंदी आवृत्ती ‘लडकी सह्याद्री की’) मधून ती परत मराठी चित्रपटात आली. पण हे दोन्ही चित्रपट फारसे चालले नाहीत. पुढच्या ‘पिंजरा’ चित्रपटाने मात्र बॉक्स ऑफिसवर इतिहास घडवला. यातील संध्याच्या सर्व लावण्या प्रेक्षणीय झाल्या. ‘चंदनाची चोळी अंग अंग जाळी’ हा संध्याचा शेवटचा म्हणजे,बारावा चित्रपट.
संध्या ही मधुबाला, बीना रायसारखी सौंदर्यवती नव्हती. मीनाकुमारी, नूतन, नर्गिस सारखी कुशल अभिनेत्री नव्हती. वैजयंती मालासारखी प्रशिक्षित नृत्यांगनाही नव्हती. पण संध्याने या उणीवा बापूंसारख्या श्रेष्ठ दिग्दर्शकाच्या हाताखाली अभिनयाचे धडे गिरवून भरून काढल्या. आपल्या बहुतेक चित्रपटांतून तिने नृत्ये सादर केली. नृत्ये पण कशी? प्रचंड दमछाक करणारी, हाडे खिळखिळी करणारी. इतर कोणत्याही दिग्दर्शकाने ‘झनक झनक पायल बाजे’ व ‘नवरंग’ या नृत्यप्रधान चित्रपटांसाठी नायिका म्हणून वैजयंतीमालाचा विचार केला असता. पण बापूंचा आपल्या दिग्दर्शनावर व संध्याच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास होता.संध्यानेही तो विश्वास सार्थ ठरवला. भूमिका अचूक वठविण्याच्या बाबतीत संध्याने कधीच तडजोड केली नाही. ‘जल बिन मछली’च्या वेळी तर हाडे दुखावली गेल्यामुळे तिला चक्क प्लास्टरमध्ये ठेवावे लागले होते. पण तिने त्याची तमा बाळगली नव्हती…

सिंहांच्या घोळक्यात संध्या
एक दिवस बाबूराव मालपेकर धावतच बापूंकडे आले. धापा टाकत म्हणाले, ‘अण्णासाहेब खाली स्टुडिओत चला, लवकर! संध्याबाई सिंहाच्या पिंजऱ्यात गेल्या आहेत. त्यांच्या जिवाला धोका आहे. बापू खाली जाऊन पाहतात, तर संध्या खरोखरच त्या सिंहांच्या घोळक्यात उभी होती. तिच्या अवतीभवती सिंह आपले अक्राळविक्राळ जबडे पसरून डरकाळ्या फोडत होते. सिंहाचे मालक व प्रशिक्षक वालावलकर बाजूला उभे राहून त्या सिंहांशी खेळत होते. त्यांना चिडवत होते. बापूंना वाटले, मोठ्याने ओरडून संध्याला त्या पिंजऱ्याबाहेर येण्यास सांगावे. पण घाबरल्यामुळे त्यांच्या तोंडून शब्द फुटेना. त्यांच्या आरडाओरड्याने सिंह जास्त चवताळले तर? या विचाराने ते तसेच गप्प उभे राहिले. स्टुडिओतील इतर कर्मचारी संध्याचे हे ‘धाडस’ पाहायला गोळा झालेे. थोड्या वेळात सिंहांची तालीम संपली. संध्या पिंजऱ्याबाहेर आली. बापू तिच्यावर चांगलेच संतापले. ‘मला न विचारता तू आत गेलीस तरी कशी?’ त्यांनी खडसावून तिला विचारले. तेव्हा त घाबरतच बापूंकडे बोट दाखवून म्हणाली, ‘मी माझ्या गुरुजींचे नाव घेत पिंजऱ्यात गेले आणि त्यांच्याच कृपेने सुखरूप बाहेर आले. आता ‘स्त्री’ चित्रपटातील हा प्रसंग मी स्वत:च करणार आहे. तेव्हा या स्टंट प्रसंगासाठी तुम्ही माझी डमी (किंवा डुप्लिकेट) वापरू नका. मी त्या प्रसंगाचे प्रात्यक्षिक करत होते. आता तरी हे धाडसी सीन्स मी स्वत: करण्यास तुमची हरकत नाही ना? शांताराम बापूंना यावर काय बोलावं तेच सुचेना.
एके काळी स्वत:च्या मालकीची ब्यूक गाडी बाळगणारे फक्त तीन तरुण संबंध मुंबईत होते. स्वत: शांताराम बापू, काँग्रेसचे नेते स.का. पाटील व “फिल्म इंडिया’चे मालक बाबूराव पटेल! संध्या ही गरीब मध्यमवर्गीय कुटुंबातून आली होती. बापू व संध्याच्या वयामध्ये अंतरही खूप होते. तेव्हा काही लोक म्हणू लागले की, संध्याने पैशाकडे बघून हा विवाह केला. प्रत्यक्षात मात्र,संध्याने हा विवाह कलेची सेवा करण्यासाठी केला होता. घरी ती सफेद सुती साडी, हातात हिरव्या बांगड्या, कपाळावर कुंकवाचा टिळा व गळ्यात साधेसे मंगळसूत्र या वेशात वावरत होती. संध्या ही पडद्यावर बापूंच्या चित्रपटाची नायिका, खाजगी आयुष्यात त्यांची पत्नी होती. बापूंच्या सर्व मुलांची धाकटी आई होती. संध्याने आपले सर्व जीवन आणि निष्ठा बापूंच्या चरणी वाहिली होती. संध्याला मूलबाळ होऊ शकले नाही. परंतु संध्याने याची कधीही खंत बाळगली नाही.
बापूंच्या सर्व मुलांना तिने आपलेसे केले. बापूंचे पडल्यामुळे कमरेचे हाड मोडले होते. ते बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल होते.तेव्हा त्यांची सेवा शुश्रूषा संध्यानेच केली होती. त्यांना उलट्यांचा त्रास होऊ लागला, तेव्हा त्यांच्या उलट्या या तिनेे स्वत:च्या ओंजळीत जमा केल्या होत्या. शांताराम बापू हे धोरणी, दूरदर्शी व व्यवहारचतुर गृहस्थ होते. त्यांची पहिली पत्नी विमला ही कोल्हापूरकडची साधी गरीबाघरची तरुणी होती. जयश्री ही आधी नटी होती, नंतर ती बापूंची पत्नी झाली. तिच्या ‘शकुंतला’, डॉ. कोटणीस व दहेज चित्रपटांनी “राजकमल’ला आर्थिक स्थैर्य व प्रतिष्ठा मिळवून दिली होती. या वास्तवाची बापूंना मनोमन जाण होती. म्हणूनही बापूंनी आपल्या पत्नी व मुलांमध्ये कधीही भेदभाव केला नाही. विमला व जयश्रीला पेडर रोडसारख्या उच्चभ्रू आलिशान वस्तीत फ्लॅट घेऊन दिला. कपडेलत्ते, दागदागिने घेऊन दिले. मुलांच्या शिक्षणावर खर्च केला. किरणकडे स्टुडिओची जबाबदारी सोपवली.
बापूंनी संध्याला मात्र शेवटपर्यंत आपल्या जवळच ठेवले. राजकमल स्टुडिओमधील आपल्या दुसऱ्या मजल्यावरील आलिशान कार्यालयाच्या समोरचा फ्लॅट त्यांनी संध्याला राहायला दिला. ते स्वत:ही तिथेच राहत. तिथे राहत असूनसुद्धा संध्याने स्टुडिओच्या कामात कधीच ढवळाढवळ केली नाही. कधीही पार्टी नाही की शॉपिंग नाही. ही साध्वी स्टुडिओ सोडून शक्यतो फारशी कुठे गेली नाही. फक्त शांतारामबापू आणि आपले घर या शिवाय तिला दुसरे विश्व नव्हते.
कधीमधी पेडर रोडवरून विमला, बापू आणि संध्याला भेटायला येत असत. पॅसेजमधल्या सोफ्यावर त्यांची तास- दोन तास मैफल जमत असे. चहापाणी झाल्यावर संध्या विमलताईंना सोडायला खाली जात असे. जणू काही मोठी बहीण माहेरी आली आहे…
1990 मध्ये शांताराम बापूंचे निधन झाले. अंत्ययात्रेला जयश्री आवर्जून आली होती. विमला तर अंथरुणाला खिळून होती. 1996 मध्ये तिचेही निधन झाले. पती निधनानंतर गेली सत्तावीस वर्षे फिल्मी झगमटापासन दूर “राजकमल स्टुडिओ’च्या दुसऱ्या मजल्यावर संध्या स्वेच्छेने शांत विरक्तीचे जीवन जगत आहे. वाचन व टीव्ही पहाण्यात वेळ घालवत आहे. काही वर्षापूर्वी राजकमल स्टुडिओत बापूंचे सेक्रेटरी चंद्रकांत पाटलांना भेटायला गेलो होतो. संध्याच्या फ्लॅटसमोरच पाटील यांचे कार्यालय होते. अंधार पडला होता. संध्या त्यावेळी घरीच टी.व्ही.वर “नवरंग’ सिनेमा पहात होत्या. निघताना आम्ही त्यांना भेटायला गेलो. पाटलांनी त्यांची विचारपूस केली. तेव्हा अत्यंत शांत स्वरांत संध्या म्हणाल्या, काही नाही, माझ्या आयुष्याचा सिनेमा (नवरंग) टी.व्ही.वर पहात बसले आहे…
आता उषा वहिनी (प्रभातकुमारच्या पत्नी) व पाटील अधूनमधून संध्याशी गप्पा मारायला घरी जातात. किरण शांताराम आपल्या धाकट्या आईची सर्वोतोपरी काळजी घेतो. सोबतीला चोवीस तास नर्स असते. एखाद-दुसरा अपवाद वगळता संध्या बाहेरच्या लोकांना भेटत नाहीत. भूतकाळ जणू त्यांचासाठी मागे पडला आहे. मात्र, गतकाळातील एक आठवण त्यांनी आवर्जून जपून ठेवली आहे. ती म्हणजे, “पिंजरा’ चित्रपटातला मोठा पितळी पिंजरा त्यांनी आपल्या दारात आजही टांगून ठेवला आहे. तो पिंजरा “राजकमल’च्या गतवैभवाचे, तसेच संध्याच्या स्वेच्छेने स्वीकारलेल्या आयुष्याचेही जणू प्रतीक ठरला आहे…