- टीम बाईमाणूस
शिट्टी वाजवणे ही जरी एक कला असली तरी आपल्या समाजात त्याच्याशी एका प्रकारची नकारात्मकता निगडित आहे. भरल्या घरात शिट्टी वाजवली तर आई ओरडते. तरीही अनेकवेळा आपल्याही नकळत आपण शिट्टी वाजवतोच, कधी मन प्रसन्न असेल तेव्हा तर कधी उगाच. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याने विशिष्ट प्रकारचे आवाज काढून योग्य तो सांकेतिक संदेश मावळ्यांपर्यंत पोचवल्याचे अनेक दाखले इतिहासात सापडतात.
मेघालयातील खासी पर्वत रांगांच्या कुशीत वसलंय एक गाव ज्याचं नाव आहे कॉन्गथोंग. इथल्या इतर गावांसारखीच कॉन्गथोंग वरही निसर्गानं आपल्या सौंदर्याची मुक्त उधळण केली आहे. वनराई आणि धबधब्यांनी नटलेल्या ह्या गावाविषयी फारशी कुणाला माहिती नाहीये. इथे एक फार अनोखी परंपरा आहे. इथल्या प्रत्येक माणसाला त्याच्या नावासहित, शिट्टीच्या एका विशिष्ट आवाजाने ही ओळखलं जातं.
अनेक पिढ्यांपासून ही संस्कृती इथल्या गावकऱ्यांनी जतन केलेली आहे. इथल्या लोकांचे जीवन शेती आणि शिकार ह्यावर अवलंबून आहे. बाळ गर्भावस्थेत आईच्या पोटात असतानाच, प्रत्येक आई एक विशिष्ट धुन ठरवते आणि ती धुन शिट्टीतून वाजवत असते. बाळ जन्माला आल्यानंतर आई आणि इतर सारेच ही आई ने तयार केलेली धुन त्या बाळा समोर वाजवत राहतात जेणेकरून त्या बाळाला त्या शिट्टीचा पक्की ओळख व्हावी.

आणि अशा प्रकारे केवळ नावच नाही तर ही धुन सुद्धा इथल्या माणसाची ओळख बनते. ह्यात खास गोष्ट अशी आहे की एका माणसासाठी असलेली धुन केवळ त्याच्या साठीच असते, ती दुसऱ्या कुणासाठी परत वापरली जात नाही.
अगदी ती व्यक्ती मरण पावल्यानंतरही त्याची धुन पुन्हा दुसऱ्यासाठी वापरली जात नाही. ह्या गावाची लोकसंख्या आहे 800 ते 900, म्हणजे इथे साधारण 800 ते 900 प्रकारच्या शिट्ट्या वाजवल्या जातात. एखाद्याला जर आईकडून मिळालेली धुन बदलायची असल्यास तशी मोकळीक असते. मुळात आई ने बनवलेली ही धुन असते साधारण अर्ध्या किंवा एका मिनिटाची, परंतु गावकरी केवळ सुरवातीचे 5-6 सेकंद वाजवून एकमेकांना हाक मारतात.
नावांचा उल्लेख न करता धूनमार्फत एकमेकांना बोलावतात..
इतरांना ऐकताना कदाचित सर्व शिट्टया सारख्याच वाटू शकतात परंतु गावकऱ्यांना प्रत्येक शिट्टीमधील फरक नेमका ओळखता येतो. बहुतेक वेळा हा शिट्टीची धुन प्रेरित झालेली असते पक्ष्यांच्या किलबिलाटातून, ह्या शिट्ट्या वाजवण्याची ही पद्धत कुठून बरं सुरु झाली असावी? ह्याचे उत्तर निसर्गात असेल का? पर्वताची दाटी असलेल्या ह्या भागात नावाने हाक मारली तर ती दुसऱ्यापर्यंत पोहोचायला पुष्कळ वेळ लागू शकतो किंवा पूर्ण शब्द समोरच्या पर्यंत पोचणार ही नाही कदाचित.परंतु शिट्टीचा आवाज मात्र वाऱ्या बरोबर वेगाने पसरत असावा आणि त्यातूनच ह्या अनोख्या कल्पनेचा अविष्कार झाला असावा.
इथल्या गावकऱ्यांची अशी समजूत आहे की, जंगलात फिरणाऱ्या आत्म्यानी जर कुणाचे नाव ऐकले तर ती व्यक्ती आजारी पडू शकते आणि म्हणून नावा ऐवजी ह्या शिट्ट्यांचा वापर ते एकमेकांना हाक मारण्यासाठी करतात. केवळ एकमेकांना हाक मारण्यासाठी नाही तर इतर वेळीही या शिट्टीचा उपयोग इथले रहिवासी कसा करतात ते पहा
लग्न जमवणे : उन्हाळ्याच्या मोसमात पौर्णिमेच्या रात्री सारे गावकरी शेकोटी भोवती जमतात आणि तरुण मुले आपआपली धुन शिट्टीतून वाजवतात. जो सगळ्यात उत्तम शिट्टी वाजवेल त्याचे लग्न ठरते त्या गावातील सर्वात सुंदर मुलीशी.
संकट समयी : संकटात सापडल्यास शिट्टी वाजवून एकमेकांना सावध करता येते तसेच मदतीला धावून जाता येते. चोर दरोडेखोरांच्या हल्ल्यात शिट्टी वाजवून इतरांना सावध केल्याने चोर पळून गेल्याच्या सर्रास कथा इथे ऐकायला मिळतात.
शिकार करताना : रानावनातून शिकार करताना शिट्टी वाजवून एकमेकांशी संवाद साधता येतो आणि तो ही आजूबाजूच्या कुणालाही सुगावा न लागू देता.

गेल्या अनेक शतकात संवादाचे माध्यम म्हणून विविध भाषा संपूर्ण जगात वापरल्या गेल्या, काळाच्या ओघात नवनवीन संवादाची माध्यमे विकसित होत गेली तसच अनेक माध्यमे लोप पावली. एकविसाव्या शतकातही ही शिट्ट्यांची परंपरा ह्या गावाने टिकवून ठेवली, ह्याचे संपूर्ण श्रेय इथल्या गावकऱ्यांचेच आहे.
उत्तरपूर्वेकडील सात राज्ये आपल्या फारशी परिचयाची नसतात, एकूणच हा डोंगराळ भाग आहे, त्यामुळे आपल्याच देशातील ह्या भागाची आपल्याला माहिती नाही, परंतु त्यांच्याकडे ही अशा अनेक गोष्टी आहेत ज्या पाहून आपण थक्क होऊन जातो. वेगाने होणाऱ्या शहरीकरणात आपल्या परंपरा टिकवून ठेवणं आपल्याच हातात आहे ही फार मोठी शिकवण कॉन्गथोंग आपल्याला देत आहे. वैविध्यतेने नटलेल्या ह्या भारत देशात इतक्या अनोख्या रीतीने जगणारे हे गाव आहे.