- लक्ष्मी यादव
(एसटी कंडक्टर हसत) “असा आजपर्यंत कुणी प्रश्न विचारला नाही, त्यामुळे यावर विचार केला नाही. सवलत आहे तर सगळ्यांनाच पाहिजे. तुम्ही पहिल्याच आहात नको म्हणणाऱ्या. पण सध्या तरी अर्धेच देऊ शकतो.”
“तिकीट हाफ करण्यापेक्षा नीट सुविधा पाहिजेत हो आम्हाला. आम्ही सुविधांबद्दल तक्रारी करत होतो, तिकीट दराबाबत नाही.”
नातेपुतेच्यापुढे गारवा या एसटीच्या अधिकृत हॉटेल थांब्यावर दहा मिनिटांसाठी गाडी थांबली. टॉयलेटच्या दरवाज्यातून भपकन घाण वास आला. दोन्ही टॉयलेट प्रचंड घाण अवस्थेत. पाणी थेंबे थेंबे. काउंटरवर जाऊन फोटो दाखवून तक्रार केली. “या हॉटेलला काहीतरी क्राईटेरियावर थांबा मिळाला असेल ना? अशीच अवस्था राहिली तर थांबा रद्द होईल. “फोटोकडे पाहून पोरगा मख्खपणे म्हणाला, “स्वच्छ तर आहे की, अजून किती स्वच्छ पाहिजे?”
पंढरपूर ते मुंबई या प्रवासात गारवा, स्वारगेट एसटी स्टँड (इथल्या टॉयलेटमध्ये तर सगळे सॅनिटरी पॅड भिजत वास मारत लोळत पडलेले असतात) आणि मेगा हायवेला एक असे तीन वॉशरुम स्टॉप येतात. पैकी मेगा हायवेचा स्टॉप स्वच्छ असतो. बाकीचे प्रचंड घाण असूनही दूरचा प्रवास असल्याने जावेच लागते. गावाकडील टॉयलेटमध्ये जाण्यापेक्षा बाया आडोशाला जाऊन मोकळ्या होऊन येतात. पायाला पोलिओ झालेल्या माझ्या मैत्रिणी अशा टॉयलेटमध्ये जाऊही शकत नाहीत. पण जातात, जायला लागते. त्यांचे किती हाल होत असतील याची कल्पना पण आपण करू शकणार नाही. जास्त अपंगत्व असेल तर हालच हाल. पुरुषांचे पण.

सोबत मूल असेल तर या टॉयलेटमध्ये घेऊन जाणे अशक्य. तरी बाया लहान मुलांना घाणीत उभे करून घाणीत बसून लघवी करतात. चुकून माकून संडास करायची वेळ आली तर परिस्थिती महा भयंकर. संडास धुण्यासाठी पाणीच नसते बऱ्याचदा. मग महिला तशाच उठून येतात बाहेर. मागच्या येणारनीला ते टॉयलेट वापरता येणे बंद होते. अशावेळी बायकांनी स्वतःची पाण्याची बाटली नेलेली बरी. (अतिशयोक्ती किंवा अमानवीय वाटेल, पण टॉयलेटमध्ये जाताना बायांनी दगड नेला तरी स्व स्वच्छ्ता तरी होईल. गावाकडच्या बाया टिश्यू नेऊ शकत नाहीत, दगड उपलब्ध तरी असतात..) मी तर म्हणेन पुरुषांनी कधीतरी बायकांचे टॉयलेट्स किती घाण असतात हे पाहावेच (अर्थात बाहेर संबंधित व्यक्तीला उभे करूनच). पुरुषांची याबाबतीतील सहभाग गरजेचा आणि महत्त्वाचा आहे. (आणि हीच संवेदनशीलता पुरुषांनी घरातील टॉयलेट स्वच्छ ठेवण्यात आपला सहभाग नोंदवून दाखवली पाहिजे) पुरुषांचे टॉयलेट पण वास मारत असतात, त्याबद्दल पुरुषांनीसुद्धा तक्रारी करायला हव्यात.
देशाचा पंतप्रधान पुरुष, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पुरुष, एसटी महामंडळ प्रमुख पुरुष, एसटी कर्मचारी पुरुष, हॉटेल मालक, चालक पुरुष, टॉयलेट बांधणारे पुरुष, स्वच्छ्ता करणारे (न करणारे पुरुष) त्यामुळे बाईला स्वच्छ टॉयलेटची गरज असते, तिच्या योनीच्या विशिष्ट रचनेमुळे टॉयलेट सीटवर बसून नैसर्गिक विधी उरकावे लागतात, तिला पाळीत पॅड बदलण्यासाठी, Menstrual कप बदलासाठी स्वच्छ टॉयलेटची गरज असते हे पुरुषांना कसे, कधी कळणार? आणि यातलं काही नसलं तरी टॉयलेट स्वच्छच हवीत. पारलींगींसाठीही. एक तर पुरुषांनी समजून घेण्याची संवेदनशीलता दाखवावी, नाही तर 50% महिलांची/पारलिंगिंची लोकसंख्या आहे, त्यांच्या गरजा पुरुषांच्या लक्षात येत नाहीत म्हणून स्त्रियांचा, पारलिंगिंचा जास्तीत समावेश सर्व स्तरांवर करावा, ते नसेल होत तर आहे त्यांनी पायउतार व्हावे.
खरं तर आपल्याकडे स्त्री, पारलिंगी (इथे अजून स्त्री पुरुषांची सोय नीट होत नाही, पारलींगिंचा विचार तर आणखी दूरची गोष्ट), पुरुषांसाठी एसटी स्टँडवर छोटंसं तरी आरामगृह हवं. ते तर अशक्य. निदान सद्यकालीन टॉयलेट इतके स्वच्छ आणि जागा असलेले हवेत की त्यात केवळ नैसर्गिक विधी उरकता येऊ नयेत तर बाळाला दूध पाजण्यासाठी किंवा त्याचे लंगोट, डायपर बदलता यावेत, स्त्रीला कपडे बदलता यावेत यासाठी सोय हवी. हेही सध्या तरी दिवास्वप्न आहे. अपंगस्नेही शौचालय सगळीकडे यायला आणखी बरीच वर्षे जावी लागतील.
टॉयलेट्स अस्वच्छ असतील तर तिथला थांबा रद्द व्हायला पाहिजे. स्वच्छ टॉयलेट हा पुरुषांचासुद्धा अधिकार आहेच.