- शुभम सोळसकर
कोठे ना सहानुभूती
कोठे ना स्नेह ना प्रीति
कोठेहि संगत सोबत नसे
एकान्त काळिज पिंजत बसे.
कुसुमाग्रजांनी ओसाड माळरानाच्या भावना येथे व्यक्त केल्या आहेत. मात्र आता, मानवी जीवनातील असाच एकटेपणा दुर्लक्षित करता येण्यासारखा नाही. जागतिक आरोग्य संघटनेने एकटेपणास जागतिक आरोग्य समस्या घोषित केले आहे. अमेरिकेचे सर्जन जनरल डॉ. विवेक मूर्ती आणि जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या संशोधनानंतर ही घोषणा करण्यात आली आहे. एकटेपणा आणि समाजापासूनची विलगता यांमुळे स्मृतिभ्रंश, अकाली मृत्यू व हृदयरोग होण्याच्या शक्यता यांमध्ये वाढ दिसून आली आहे. एकटेपणामुळे स्मृतीभ्रंशाचे प्रमाण पन्नास टक्क्यांनी, अकाली मृत्यू होण्याचे प्रमाण पंचवीस टक्क्यांनी तर हृदयरोग होण्याचे प्रमाण तीस टक्क्यांनी वाढल्याचे गंभीर निष्कर्ष संशोधनातून समोर आले आहेत.
जगभरातील साधारणतः चार व्यक्तींपैकी एका व्यक्ती एकटेपणाच्या समस्येने ग्रस्त आहे. हे प्रमाण जगात सर्वत्र सारखेच आहे. तरुणांमध्ये हेच प्रमाण पाच ते पंधरा टक्क्यांच्या दरम्यान आहे. या समस्येवर प्रतिक्रिया देताना जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष टेड्रोस घेब्रासिस म्हणाले की, “जगातील एकटेपणाच्या समस्येचे वाढते प्रमाण हे आरोग्यावर घातक परिणाम करणारे आहे. चांगले व सशक्त सामाजिक संबंध नसलेल्या लोकांना ॲटॅक, नैराश्य, स्मृतीभ्रंश, आत्महत्येचे विचार अशा गंभीर बाबींना सामोरे जावे लागते. त्यामुळे यावर उपाय कसा योजता येईल यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने आयोग स्थापन करण्याची घोषणा केली आहे. हा आयोग चांगले उपाय सुचवेल”

एकटेपणावरील WHO निर्मित आयोग
या समस्येची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असल्याने जागतिक आरोग्य संघटनेने यावर त्वरित पावले उचलली आहेत. केवळ समाजापासूनची विलगता आणि एकटेपणा या समस्यांचा सामना करण्यासाठी वेगळ्या आयोगाची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा आयोग एकटेपणावर मात करण्यासाठी जागतिक अजेंडा ठरवेल. उपाय सुचवेल. हे उपाय प्रत्येक व्यक्तीस, देशास या समस्येचा सामना करण्यासाठी उपयोगी पडतील. कोविड 19 च्या साथीत ज्याप्रकारे जागतिक आरोग्य संघटनेने अजेंडा ठरवला होता त्याच धर्तीवर हा देखील अजेंडा असेल. या आयोगाचे जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्यालयातच सचिवालय असेल. पहिली महत्वाची बैठक 6 ते 8 डिसेंबर या कालावधीत होईल. एकूण तीन वर्षाचा कालावधी लक्षात घेऊन जागतिक अजेंडा संबंधित रिपोर्ट आयोगाकडून सादर केला जाईल.
एकटेपणा आणि विविध क्षेत्रांवर होणारे परिणाम
एकटेपणामुळे आरोग्यासहीत शैक्षणिक व आर्थिक क्षेत्रांवर देखील नकारात्मक परिणाम होत आहेत. माध्यमिक शाळांमध्ये जाणवणारा एकटेपणा यामुळे विद्यार्थ्यांचे उच्चशिक्षणातील गळतीचे प्रमाण वाढत आहे. वारंवार जाणवणारा एकटेपणा व विलगतेची भावना यांमुळे कामगारांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे. परिणामी गुणवत्तापूर्ण काम होत नसल्याचे अभ्यासातून दिसून येत आहे. केवळ तरुणाईच नाही तर सगळ्याच वयोगटातील लोक या समस्येने ग्रस्त आहेत.

आरोग्यावरील परिणाम
यामुळे शारीरिक तसेच मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. तुलना करण्यासाठी संशोधनात एक उदाहरण दिले आहे. एकटेपणाची समस्या बरोबर पंधरा सिगरेट एका दिवशी ओढण्यासारखा प्रकार आहे असे हे उदाहरण. यावरून या समस्येची गंभीरता लक्षात येऊ शकते. धूम्रपान, मादक द्रव्यांचे सेवन, कमी शारीरिक हालचाली, स्थुलत्व या आजारांच्या समकक्ष किंबहुना जास्तच मृत्यूचा धोका एकटेपणामुळे होत आहे असे संशोधनातून समोर आले आहे. यामुळे नैराश्य, स्मृतिभ्रंश आणि हृदयरोग यांचा धोका तीस टक्के वाढतो आहे. डॉ. विवेक मूर्ती म्हणतात की, “एकटेपणाच्या समस्येसोबतच त्यासंबंधित इतर आरोग्याच्या समस्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. या समस्या म्हणजे मादक पदार्थांचे सेवन, स्थुलत्व आणि कोणत्याही प्रकारचे व्यसन.”