- ऋषिकेश देशमुख
सुप्रसिद्ध लेखक मनोज बोरगावकर यांच्या नदीष्ट या बहुचर्चित कादंबरीला बँक ऑफ बडोदाचा पाच लाखांचा राष्ट्रभाषा सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे. यात लेखकाला 3 लाख आणि अनुवादकाला 2 लाख रुपये देऊन गौरवण्यात येईल. नदीष्ट कादंबरीचा हिंदीमध्ये डॉ. गोरख थोरात यांनी अनुवाद केला आहे. बँक ऑफ बडोदाच्या राष्ट्रभाषा सन्मान पुरस्काराच्या अंतिम फेरीतही नदीष्ट कादंबरीने धडक मारली आहे. या फेरीत साहित्यकृतीने बाजी मारली, तर 36 लाखांच्या पुरस्काराने गौरवण्यात येईल. त्यात लेखकाला 21 लाख आणि अनुवादकाला 15 लाख रुपये देऊन सन्मान करण्यात येईल.
नदी, पर्यावरण व एल.जी.बी.टी. समूह ह्या आजच्या जागतिक स्तरावरील समस्यांवर ही कादंबरी आधारलेली आहे. निसर्ग , माणूस व त्यांचे अद्वैतभाव ती प्रकर्षाने दृग्गोचर करते. नदीष्टला आशय, विषय व रुपबंधाच्या आगळ्या-वेगळ्या मांडणीमुळे उदंड वाचक प्रेम तर लाभलेच पण राज्य शासनाचा हरी नारायण आपटे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कन्नड, हिंदी भाषेत तीचे अनुवाद झाले अनेक भाषांमध्ये अनुवादाचे काम सुरू आहे.

‘नदिष्ट’ कादंबरी इतकी लोकप्रिय का होतेय?
आजची मराठी कादंबरी ही अनेकस्तरीय जीवनानुभव कथन करणारी आहे. वास्तवाचे बहूस्तरीय आवाज कादंबरीतून प्रकटताना दिसत आहेत. आणि त्यामुळेच नवनव्या परिप्रेक्षाचे दर्शन आजची कादंबरी घडवण्यात यशस्वी झाली आहे. जीवनानुभवांचा व्यापक अवकाश कादंबरीच्या कक्षा विस्तीर्ण करणारा आहे. कादंबरी हा साहित्यप्रकार व्यापक जीवनावकाश मांडणारा साहित्यप्रकार असतो. त्यातून लेखकाला समष्टीला भिडता येते. भवतालातील सगळे पेचप्रसंग समजून घेऊन त्यांना आपल्या कलाकृतीच्या माध्यमातून मुखर करण्यासाठी लेखकाला आवश्यक असणारा कथनअवकाश कादंबरीतून मिळत असतो. आणि म्हणूनच कवी असणाऱ्या मनोज बोरगावकर यांनी आपल्या नदीकाठच्या वेगवेगळ्या जीवनानुभवांची गाथा ‘नदीष्ट’ या कादंबरीतून साकार केली आहे.
कादंबरी ही गद्यातले महाकाव्य असते असं म्हटलं जातं. महाकाव्यात निसर्ग, माणूस त्यांच्या विकार-विकृतीसह येत असतो. त्याचे सगुण-निर्गुण रूप दृग्गोचर होत असते अगदी तसंच ‘नदीष्ट’मध्ये साकार झालेलं आहे. नदीकाठचे जनजीवन तिथल्या अनेकस्तरीय तळकोपऱ्यांसह अधोरेखित झाले आहे. मानवी संस्कृती ही नदीकाठाने विकसित झालेली आहे. नदीचे आणि माणसाचे नाते आदिम स्वरूपाचे आहे. नव्हे तिचे आणि आपले नाते आई व मुलासारखे आहे. मात्र आजच्या चंगळवादी नि भौतिक सुखासाठी हापापलेल्या माणसाने निसर्गाशी असणारे आपले नाते जवळपास संपुष्टात आणले आहे. नद्याच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळे आणले, भरमसाठ वाळू तिच्या उदरातून उपसली, पाणी दूषित केले. जंगले तोडून टाकली. निसर्ग मानवाच्या गरजा भागवत असतो पण माणसाचा हावरेपणा निसर्गाला ओरबाडून टाकत आहे. अशा पर्यावर्णीय समस्यांसह समाज परिघाबाहेरचं उपेक्षित जगणं जगणाऱ्या असंख्य माणसांच्या हृदयद्रावक चित्तरकथा, निसर्ग आणि माणूस यांचं आदिम नातं. नदीवरील अपार निष्ठेतून ‘नदीष्ट’ ही कादंबरी साकार झालेली आहे. मानवी जगण्याचा आणि नदीचा सहसंबंध, माणसाच्या जन्मापासूनच्या प्रवासाची व नदीच्या उगमाची ते प्रवाहिपणे वाहण्याची असणारी समसमाता या सर्वांचा नेमका वेध ‘नदीष्ट’मधून मनोज बोरगावकर यांनी घेतला आहे. आपल्याभोवतीच्या विशिष्ट चाकोरीतून माणूस निसर्गाच्या विशालतेकडे गेल्यानंतर त्याला समजणारे माणूसपण हे फारच थोर असते. ते थोरपण निसर्गाएवढेच अमर्याद असते. हे मनोज बोरगावकर यांनी अत्यंत सशक्तपणे कादंबरीतून मांडले आहे.
लोकसाहित्यातून, संस्कृतीतून तयार झालेल्या आपल्या रूढ धारणा, पौराणिक मिथके यांचा वापर कादंबरीभर वेगवेगळ्या अनुषंगाने लेखकाने केला आहे. त्यामुळे त्या सर्वांची पुनर्मांडणी प्रक्रिया आपसूकच पार पडली आहे. नदी आणि माणूस यांचा संबंध एवढा अभिन्न आहे की ‘नदी म्हणजे आईचा विस्तारत गेलेला गर्भ’ असा अन्वय लेखकाने लावला आहे आणि ते अगदी खरंही आहे. आपल्या प्रत्येकात एक नदी वाहत असते. माणसाच्या जगण्यात आणि नदीच्या वाहण्यात केवढी समानता असते. नदी अनेक अडथळे दूर करून सागराला जावून मिळते. ती वाहताना मुक्तहस्ताने लोकजीवन फुलवत, समृद्ध करत असते. कधी विस्कटूनही टाकते. माणूसही जन्मल्यापासून मरेपर्यंत अनेक सुखदुःख भोगत विनातक्रार जगतच असतो. आपापल्या परीने जीवन अधिकाधिक संपन्न, समृद्ध करण्याचा प्रयत्न करतो.
नदीवर सतत दहा वर्षे पोहायला जाणाऱ्या लेखकाचे हे खरंतर आत्मानुभव आहेत. नायक ‘मी’चे हे कथनरूप आहे. मात्र न-नायकत्व त्यांनी स्वीकारले आहे. नायक होण्याची मोठी संधी प्रत्येक प्रसंगात असतानाही ते त्यांनी अत्यंत कलात्मकरितेने टाळलं आहे. आणि हेच या कादंबरीचे मोठे बलस्थान आहे. नदीच्या शांत प्रवाहाप्रमाणे कादंबरीचे कथनही प्रवाहिपणे वाहत राहते त्यात वेगवेगळ्या बोलीभाषेचा, उर्दू, हिंदीतल्या दोह्यांंचा चपखलपणे वापर आहे जो कथनाला ठसठशीत कोरीवपणा प्राप्त करून देतो. आणि त्यात आपल्या साऱ्या माणूसपणाच्या आस्था थरारून उठतात. रूढ समाज परिघा बाहेरच्या वेगवेगळ्या लोकसमूहाची जनरीत, त्यांची दुःख, त्यांच्या आयुष्यातील भोगवाटे वाचून अंगावर रोमांच उभे राहतात. ही सगळी चेहराविहीन माणसं त्यांच्या समूहाची अदृश्य भोगवाटे त्यांच्या आयुष्यातील घटना-घटिते उजागर करतात. ही सगळी माणसं व्यवस्थाशरण, परिस्थितीशरण, हतबल नि चेहराविहीन आहेत. पण ती सच्ची नि निसर्गाएवढीच निकोप अशी आहेत.

तृतीयपंथी समूहाबद्दल आपला समाज हा अत्यंत निष्ठुरपणे वागत असतो त्यांच्याबद्दल अनेक गैरसमज आपल्या मनात ठेवून त्यांच्याशी कमालीचे अंतर ठेवून वावरत असतो. ते माणूस नाहीतच की काय असं वाटावं एवढी मोठी दरी त्यांच्यात आणि आपल्यात निर्माण झालेली आहे मात्र या कादंबरीतला जवळपास अर्ध्यापेक्षा अधिक भाग तृतीयपंथी समूहाचे जग, त्यांचा जीवनव्यवहार, त्यांच्या चाली-रीती, त्यांची समाजाकडून होणारी उपेक्षा त्यात त्याचं भरडून निघणारे आयुष्य आणि त्यामुळे त्यांच्या मनात समाजाबद्दल निर्माण होणारी आंदोलने त्यांची समाजाकडून माणूसपणाच्या वागणुकीची नितळ निर्मळ आस ह्या सगळ्यांचं प्रत्ययकारी चित्रण ‘नदीष्ट’मध्ये पहिल्यांदा आलेले आहे. ‘सगुणा’ ही तृतीयपंथी नायिका पहिल्यांदा नदीवर आणि पुन्हा रेल्वेच्या प्रवासात नायकाला भेटते. पुढे नदीकाठी यांच्या भेटी घडत जातात आणि ती तिच्या आयुष्यातली सगळी दृश्य-अदृश्य तळकोपरे लेखकाला सांगते. तिचे आयुष्य तृतीयपंथी समूहाच्या आयुष्याचं प्रातिनिधिक रूप आहे. तृतीयपंथी समूहात दीक्षा देण्याचा जो विधी असतो इथपासून ते त्यांच्या मृत्यूपश्चात केल्या जाणाऱ्या विधीपर्यंतचा सगळा वृतांत अंगावर शहारे आणणारा आहे. समाज त्यांच्याकडे उपहासाने, कुत्सितपणे पाहत असतो पण ते किती वाईट आहे हे ही कादंबरी वाचल्यानंतर प्रकर्षाने जाणवते. केवळ लिंगभावात्मक फरकाने त्यांच्या वाट्याला येणाऱ्या ह्या भोगवाट्याला तेही जबाबदार नाहीत. ते त्यांचे नैसर्गिक आयुष्य आहे हे समजून घ्यायला हवे. त्यासाठी आपण आपल्याच संवेदना सजग करायला हव्यात.
सकीनाबी ही रेल्वेस्थानकावरभीक मागणारी स्त्री नदीपरिसरात अंग स्वच्छ करायला येणारी. तिची आणि नायकाची कधीतरी आठ दहा दिवसात तुरळक भेट व्हायची. आणि बोलणंही ती नायकाला माटीमिले म्हणत त्याच्याशी बोलायची तर कधी पैसे मोजून घ्यायची. तेवढ्याच ओळखीने ती नायकाला म्हणते रेल्वेस्थानकात रात्रीच्या वेळी गळ्यात सोन्याची चैन ठेवून येत जाऊ नकोस गुंड वाईट आहेत ते तुझ्या जीवाचे बरवाईटही करतील. तिची नायकप्रति असणारी ही काळजी तिच्याच परिसरातील लोकांविरुद्ध हे सांगण्याचे धाडस करणारी आहे. खरंतर पैसे मागणारी ती पण तिला पैशाची हाव नाही. मिळतील तेवढे आपले ह्या न्यायाने जगणारी.
नदीवर मासेमारी करणारा पुरभाजी झिंगाभोई बामनवाड अत्यंत संवेदनशील माणूस. नदी पात्राची सखोल माहिती असणारा. नदीच्या अस्पर्श वाळूची महती सांगणारा. नदीच्या गाळात रुतून बसलेली प्रेते वर काढणारा हिंमतवान माणूस. पण एका अघटित घटनेने तो किती संवेदनशील आहे याची साक्ष देणारा. एका संध्याकाळी एक तरुणी स्त्री नदीवर नवस फेडण्यासाठी येते तेव्हा तिच्यावर त्या परिसरातील गुंड चाकूचा धाक दाखवून बाजूला असणाऱ्या निर्जन ठिकाणी नेऊन बलात्कार करतात. ते सगळं बामनवाड पाहतो पण एकटा असल्यामुळे जिवाच्या भीतीने प्रतिकार करु शकत नाही. मात्र तो त्याच्या या अपरिहार्य हतबलतेसबद्दल स्वतःला दोषी समजतो, स्वतःलाच कोसत राहतो अस्वस्थ होतो. त्याला त्या स्त्रीच्या ओघळणाऱ्या अश्रूंंपुढे गोदावरीचा प्रवाह कमजोरही वाटतो. आजच्या आपल्या समाजाचे चित्र काही अघटित घडत असेल तर त्याचा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात मग्न असतो असं आहे. मासेमारीवर बामनवाडच्या संपूर्ण कुटूंबाचे पोट अवलंबून असूनही दोन महिने मासेमारी न करून त्या अघटित घटनेचे प्रायश्चित्त तो घेतो. त्यांची ही संवेदना अंतर्मुख करणारी आहे.
संबंधित वृत्त :
प्रत्येकाचे आयुष्य हे एक न उलगडणारे कोडे असते. आणि प्रत्येकाला त्याचे आयुष्य काय दाखवेल याचाही अंदाज येत नाही. लग्न झाल्यावर माणूस सुखी होतो हा मोठाच भ्रम आपल्या समाजात आहे. निव्वळ लग्न झाले म्हणून नात्यांचे जोखंड वागवणारी कितीतरी जोडी आजूबाजूला जगत असतात फक्त ते समाज काय म्हणेल म्हणून किंवा या समाज व्यवस्थेचे घटक असतात म्हणून जीव मारत जगत असतात. अशाच एका मूळच्या नोकरदार असणाऱ्या पण नात्यातील कोरडेपणा घेऊन जगणाऱ्या, शरीरधर्म म्हणून पत्नीशी रत होणाऱ्या व दारूच्या नशेत मांजर समजून आपल्या तान्ह्या मुलीला भिंतीवर आपटणाऱ्या भीकाजीची कथा या कथानकात येते. तो गुन्हेगार आहे सजा भोगून आल्यानंतर तो भीक मागून जगतोय. आपल्या पापांचे प्रायश्चित्त घेतोय.
तशीच या कादंबरीत पशुपालन कालूभैय्या, त्याची प्रियसी त्यांचे एकमेकांप्रति समर्पित जगणे तसेच सर्पमित्र असणाऱ्या प्रसादाचे अद्भुत विश्व फारच वेगळे अनुभव देणारे आहे. माकडांनी चिंचेच्या झाडावर हरणाच्या पाडसाची केलेली शिकार त्यांच्या हिंस्त्रपणाची आणि आपण त्यांचेच वंशज आहोत म्हणून तीच हिंस्त्रता आपल्यातही आल्याची साक्ष देतात.
आपल्या लहानपणीच आईच्या प्रेमाला पारखे झालेले दादाराव गोदावरी नदीलाच आपली आई समजून तिच्यावर प्रेम करत असतात तिच्या डोहात पोहण्यासाठी शिरलं की आईच्या कुशीत शिरल्याचा अनुभव घेतात. ते या नदीवर पोहणाऱ्या या लोकांचे वरिष्ठ सोबती. नदीचा प्रवाह, तिचा अंदाज पाण्याच्या वेगवेगळ्या धारा तसेच पूर आल्यावर नदीत पोहण्याच्या वेगवेगळ्या क्लुप्त्या ते लेखकांना सांगत असतात.
असा हा संपूर्ण नदीनकाशा मनोज बोरगावकर यांनी आपल्या नदीष्ट मधून सजीव केला आहे. ही सगळी पात्रे अभावग्रस्त जीवन जगणारी आहेत पण त्यांची आयुष्याविषयी तक्रार नाही. त्याचं जग निसर्गाशी नाते जोडून आहे त्यामुळे त्याला निसर्गाची निरागसता लाभलेली आहे. ही कादंबरी चेहरविहीन माणसांच्या आयुष्याला त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडते. मानवी आयुष्य हे अत्यंत गुंतागुंतीचे नि जटिल असते. त्याला भूतवर्तमानाचे संदर्भ असतात आणि त्यामुळेच हे गुंते सोडवणे एवढे सोपे नसते कारण त्यांना पीळ पडण्याचा गाठी घट्ट होण्याचा धोका अधिक असतो पण मनोज बोरगावकर यांनी ते गुंते फारच अलगदपणे उलगडले आहेत. निसर्ग आणि मानवी जीवनाचे अद्वैतसंबंध ही कादंबरी दृग्गोचर करते. आणि त्यामुळेच ती मराठी कादंबरीविश्वात मौलिक ठरेल यात शंकाच नाही.
कादंबरी :- नदीष्ट
लेखक :- मनोज बोरगावकर
प्रकाशक :- ग्रंथाली प्रकाशन, मुंबई
मुखपृष्ठ :- नयन बाराहाते, नांदेड
मूल्य :- 200 रुपये, पृष्ठसंख्या :- 168