वृद्धाने केली करोडोंची मालमत्ता सरकारला दान!

  • टीम बाईमाणूस

उत्तर प्रदेशमध्ये एका वृद्धाने आपली करोडोंची मालमत्ता सरकारला दान केली आहे. त्यांच्या पोटी जन्माला आलेल्या मुलांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने संतापून त्यांनी हे पाऊल उचलले आहे. एवढेच नाही तर त्यांनी त्यांचे शरीर दान करण्याचा देखील निर्णय घेतला असून त्यासाठी आपल्या मुलाला आणि चार मुलींना त्याच्या अंत्यसंस्कारात येऊ देऊ नये अशी विनंतीही त्यांनी केली आहे. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार करोडो रुपयांची संपत्ती असूनही या व्यक्तीला वृद्धाश्रमात रहावे लागत होते. मुजफ्फरनगरच्या बिरान गावातील हे प्रकरण असून इथे राहणाऱ्या 85 वर्षीय नथ्थू सिंग यांनी 4 मार्चला त्यांच्या नावे असलेली करोडो रुपयांची संपत्ती दान करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी तहसील गाठून आपले घर आणि सुमारे दीड कोटी रुपये किमतीची शेतजमीन उत्तर प्रदेशच्या राज्यपालांना सुपूर्द केली. एवढेच नाही तर त्यांनी शरीरही दान करण्याचा निर्णय घेतला आहे.

माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार नथ्थू सिंग यांना एक मुलगा असून तो शिक्षक आहे तसेच त्यांना चार मुलीदेखील आहेत. या सगळ्या मुलीही विवाहित आहेत. पत्नीच्या मृत्यूनंतर नथ्थू सिंग हे एकटेच राहत होते आणि सात महिन्यांपूर्वी त्यांच्या गावात असणाऱ्या वृद्धाश्रमात ते भरती झाले होते. त्यानंतर कुटुंबातील एकही सदस्य त्यांना भेटायला आला नाही. यामुळे संतापून नथ्थू सिंग यांनी यांनी आपली संपत्ती दान केली.

मृत्यूनंतर दान केलेल्या मालमत्तेवर रुग्णालय किंवा शाळा बांधली जावी, अशी इच्छा नाथू सिंह यांनी व्यक्त केली. “मी माझे शरीर, जमीन आणि संपत्ती उत्तर प्रदेश सरकारला दिली आहे. हे सर्व मी असहाय्यतेतून केले आहे. मला 4 मुली आणि 1 मुलगा आहे. मी खतौली वृद्धाश्रमात राहतो,” असे ते म्हणाले. नथ्थू सिंग म्हणाले की या वयात मी माझा मुलगा आणि सुनेसोबत राहायला हवे होते, पण त्यांनी माझ्याशी चांगली वागणूक दिली नाही. त्यामुळे मी माझी संपत्ती दान करण्याचा निर्णय घेतला आहे.

या प्रकरणाची माहिती देताना उपजिल्हाधिकारी अरुण कुमार म्हणाले की, “4 मार्च 2023 रोजी नथ्थू सिंग यांनी उत्तर प्रदेश सरकारच्या महामहिम राज्यपालांना त्यांचे घर आणि शेतजमीन सुपूर्द केली. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी मालक आहे, माझ्यानंतर ही मालमत्ता महामहिम राज्यपालांना द्यावी, असे त्यांनी लिहिले आहे.” अरुण कुमार यांनी सांगितले की, त्यांचा एक मुलगा सहारनपूरमध्ये राहतो. आणि मुलींची लग्ने झाली आहेत. अरुण पुढे म्हणाले की, मृत्युपत्रात खसरा क्रमांक किंवा रक्बा लिहिलेला नसल्यामुळे आम्ही आत्तापर्यंत मालमत्तेचे कोणतेही मूल्यांकन केलेले नाही.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here