चेटकीण कुप्रथेत बळी पडलेल्या स्त्रियांचे प्रतिनिधित्व करणारे अनोखे स्मारक

जगभरात अनेक प्रतिष्ठित नेत्यांची, संत-समाजसुधारकांची स्मारके तयार केली जातात. परंतु चेटकीण प्रथेच्या बळी पडलेल्या पीडित महिलांचे अनोखे स्मारक ओरिसा पोलिसांनी केऊंझर जिल्ह्यात उभे केले आहे. ओरिसा पोलीस दलातील जय नारायण पंकज या कल्पक आणि संवेदनशील पोलीस अधिकार्‍याला असे स्मारक का उभे करावेसे वाटले याविषयी त्यांच्याशी केलेली ही बातचीत…

  • राहुल थोरात

जगभरात अनेक प्रतिष्ठित नेत्यांची, संत-समाजसुधारकांची स्मारके तयार केली जातात. परंतु चेटकीण प्रथेच्या बळी पडलेल्या पीडित महिलांचे अनोखे स्मारक ओरिसा पोलिसांनी केऊंझर जिल्ह्यात उभे केले आहे. महिलांवर समाजाने केलेल्या दुष्कर्मांची साक्ष देत हे स्मारक आजही उभे आहे. चेटकीण प्रथेच्या बळी पडलेल्या कुटुंबीयांचे अश्रू पुसणारे हे अनोखे आणि जगातील एकमेव स्मारक उभे केले आहे, ओरिसा पोलीस दलातील जय नारायण पंकज (आय.पी.एस) या कल्पक आणि संवेदनशील पोलीस अधिकार्‍याने.

आमच्या ओरिसा दौर्‍यात या स्मारकाला भेट देण्याची आमची तीव्र इच्छा होती. तसेच हे स्मारक बनविणार्‍या जय नारायण पंकज या पोलीस अधिकार्‍याला भेटून त्यांची मुलाखत आम्हाला घ्यायची होती. एवढ्या मोठ्या अधिकार्‍याची वेळ मिळविण्यासाठी आम्ही ‘अंनिस’चे हितचिंतक आणि राजकोंडा पोलीस कमिशनर महेश भागवत सरांशी संपर्क साधला. त्यांनी ओरिसामधील मराठी आय.पी.एस. अधिकारी नितीन कुसाळकर यांचा फोन नंबर दिला. त्यांना आम्ही फोन करून पंकज सरांच्या भेटीची वेळ मागितली. त्यांनी लगेच पंकज सरांशी बोलून आमची आणि त्यांची एक तासाची भेट घडवून आणली.
आम्ही भुवनेश्वरमधील ओरिसा पोलिसांच्या सी.आय.डी. ऑफीसला पोचलो. चेटकीण प्रथेविरोधात काम केल्याबद्दल आणि चेटकीण पीडितांचे अनोखे स्मारक उभे केल्याबद्दल सुरुवातीला आम्ही त्यांचे ‘महाराष्ट्र अंनिस’च्या वतीने मन:पूर्वक अभिनंदन करून मुलाखतीस सुरुवात केली…

आय.पी.एस जय नारायण पंकज

पंकज सर, सुरुवातीला आपल्याविषयी थोडे सांगाल का?

मी बिहार राज्यातील भागलपूर जिल्ह्यातील एका खेडेगावात जन्मलो. लहानपणापासून चेटकीण प्रथेच्या कहाण्या ऐकत मोठा झालो. ग्रामीण भागात राहत असल्यामुळे गावातील वेगवेगळ्या अंधश्रद्धा, रुढी-परंपरा जवळून पाहता आल्या. 2005 मध्ये मी आय.पी.एस. झाल्यानंतर मला ओरिसा केडर मिळाले. ओरिसा राज्यातील रामगढा, कंधमाल या जिल्ह्यांत सुरुवातीच्या काळात मी काम केले. हे दोन जिल्हे आदिवासी आणि नक्षलग्रस्त म्हणून ओळखले जातात. तेथेही चेटकिणीची प्रथा होती. पण माझ्याकडे नक्षलविरोधी मोहिमेची जबाबदारी असल्यामुळे चेटकीण प्रथेच्या कामाकडे पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो. अशातच माझी बदली केऊंझर या जिल्ह्याचा एस. पी. म्हणून झाली. हा जिल्हा आदिवासीबहुल आहे. पण तेथे नक्षली प्रभाव कमी असल्याने मी चेटकीण प्रथेविरोधी कामाकडे अधिक लक्ष द्यायचे ठरविले.

ओरिसा राज्यात चेटकीण प्रथेचे स्वरूप काय आहे?

राज्यातील ग्रामीण आदिवासी भागात आजही चेटकीण या कल्पनेवर विश्वास आहे. राज्यभरात दरमहा तीन ते चार घटना घडत असतात. चेटकीण बळीच्या हत्येमध्ये देशात ओरिसाचा दुसरा क्रमांक लागतो, हे खेदाने सांगावे वाटते. याची दखल घेऊनच ओरिसा सरकारने सन 2013 ला राज्यात चेटकीण हत्या प्रतिबंधक कायदा केला आहे. ओरिसामध्ये पुरुषांनाही चेटकीण ठरवले जाते, हे इथले वेगळेपण आहे.

कोणत्या कारणाने चेटकीण म्हणून हत्या होतात?

आजही आदिवासी भागात शिक्षण आणि आरोग्य सेवांची कमतरता आहे. मलेरिया आणि डायरिया हे रोग येथे मोठ्या प्रमाणात होतात. घरातील मूल आजारी पडले, गाय आजारी पडली तर आदिवासी लोक ‘गुनिया’ (देवऋषी) कडे घेऊन जातात. हे गुनिया लोक आदिवासींना सांकेतिक माहिती देऊन एखाद्या महिलेचे वर्णन सांगतात आणि हीच चेटकीण (आदिवासी भाषेत ‘दहिनी’) आहे, असे समजून त्या निरपराध महिलेची हत्या करतात. एखादा मुलगा कुपोषणाने आजारी पडून गेला, तर तो चेटकीण करणार्‍या महिलेने टोणाटोटका करून मारला, असे मानले जाते. केवळ संशयावरून आणि अंधश्रद्धेतून अशा हत्या घडत आहेत. आदिवासी लोकं चेटकीण हत्येचा गुन्हा केल्यावर पळूनही जात नाहीत. ते सरळ गुन्हा कबूल करतात. ‘माझ्या मुलाला ती खाणार होती, माझ्या मुलाचे प्राण वाचविण्यासाठी मी तिला मारले,’ असा सरळ कबुलीजबाब ते पोलिसांना देतात. खरेतर हे आरोपीही या अघोरी प्रथेचे एक प्रकारचे बळीच आहेत. हे आरोपी ही अशा प्रकारच्या भ्रमाने, अंधश्रध्देने ग्रासलेले असतात.

केऊंझर जिल्ह्यात चेटकीण प्रथेचे स्वरूप कसे होते?

मी केऊंझर जिल्ह्याचा पोलीस प्रमुख असताना चेटकिणीच्या दरमहा चार-पाच केसेस दाखल होत असत. केऊंझर हा जिल्हा आदिवासीबहुल आहे. या जिल्ह्यात पहाडी क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. तेथे आजही आदिवासी लोक पहाडी एरियामध्ये राहतात. 2015 मध्ये केऊंझर जिल्ह्यातील लहांडा या आदिवासी पाड्यावर चेटकिणीच्या संशयाने एकाच कुटुंबातील सहा जणांना ठार केले गेले. तेव्हा या प्रथेचे क्रूर स्वरूप जगासमोर आले. हे हत्याकांड त्या वेळी खूप गाजले. लहांडा हत्याकांडानंतर ओरिसा सरकारने चेटकीण प्रतिबंधक कायदा सर्वत्र राबवण्याचा निश्चय केला.

या कामाला सुरुवात कशी केलीत?

ओरिसा सरकारने चेटकीण प्रतिबंधक कायदा 2013 मध्ये पास केला. या कायद्याचा मला माझ्या या कामात मोठा आधार होणार होता. मी माझ्या जिल्ह्यातील चेटकीण कुप्रथेच्या बळी पडलेल्या केसेसचा डाटा एकत्र केला. तेव्हा मला त्यातील भयानक दाहकता दिसली. गेल्या वीस वर्षांत जिल्ह्यात 100 पेक्षा जास्त निरपराध लोक या कुप्रथेला बळी पडले आहेत. हा चेटकीण प्रतिबंधक कायदा आदिवासी भागात पोचला नव्हता. शहरी भागात याची थोडीफार माहिती होती.

या कायद्याचा प्रचार करण्यासाठी तुम्ही जे प्रबोधन अभियान राबविले, त्याविषयी आम्हाला सांगा.

मी केऊंझर जिल्ह्यात चेटकीण प्रतिबंधक कायद्याचा प्रचार/प्रसार करण्याचे ठरविले. यासाठी एक व्हॅन भाड्याने घेऊन तिला पोस्टरने सजवले, त्यावर कायद्याची कलमे लिहिली. पोलिसांचा एक फोन नंबर जाहीर केला. ही चित्ररुपी व्हॅन जिल्ह्यातील पहाडी आदिवासी भागात जात असे. चेटकीण प्रथेविरोधात पत्रके वाटत असे. मोठ्या गावातील आठवडे बाजारात आमचे पोलीस अधिकारी ही व्हॅन घेऊन उभे राहत आणि चेटकीण प्रथेविरोधात प्रचार करत. गावातील अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, पोलीस पाटील यांच्याशी संपर्क साधून या नव्या कायद्याची माहिती पोलीस देत असत. (आपल्या महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायदा आणि सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्याबाबत असेच घडायला हवे, अशी पटकन इच्छा आमच्या मनात आली)

या प्रबोधन अभियानाचा काय उपयोग झाला?

दुर्गम भागात चेटकीण हत्येची केस घडली, तर ती खबर पोलिसांपर्यंत येत नसे. कारण संपूर्ण गाव एका बाजूला असायचे; मग खबर देणार कोण? या अभियानानंतर चेटकीण प्रथेविरोधात लोकांचे प्रबोधन होऊन चेटकीण हत्येच्या केसेस पोलिसांपर्यंत यायला लागल्या. आम्ही त्यावर लगेच कारवाई करत असू. पोलीस त्या गावात मीटिंग घेऊन चेटकीण कुप्रथेविरोधी प्रबोधन करीत. आमच्या या अभियानामुळे गुन्हा दाखल होण्याचे प्रमाण वाढले. खून, मारामारी, चोरी या नेहमी घडणार्‍या गुन्ह्यांच्या तपासात पोलीस गुंतल्यामुळे त्यांची चेटकीण हत्येच्या गुन्ह्याबाबत प्राथमिकता नसायची. या अभियानामुळे पोलिसांचाही या गुन्ह्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला.

चेटकीण प्रथेच्या पीडितांचे हे अभिनव स्मारक उभे करण्याची कल्पना कशी सुचली?

माझ्या हे लक्षात आले की, एखाद्या कुटुंबातील व्यक्तीचा चेटकिणीच्या संशयावरून खून होतो, तेव्हा त्या संपूर्ण कुटुंबाकडे संशयाने बघितले जाते. चेटकिणीचे कुटुंब म्हणून त्यांची समाजात हेटाळणी केली जाते. अगोदरच खोट्या आरोपातून हत्या आणि वरून समाजाकडून होणारी निंदा-नालस्ती यामुळे हे कुटुंब सामाजिकदृष्ट्या बहिष्कृत होते. या कुटुंबीयांना आपण आधार देण्यासाठी काहीतरी केले पाहिजे, असे मला नेहमी वाटायचे. अशा कुटुंबांना समाजाकडून मान-सन्मान मिळाला पाहिजे, समाजाची त्यांच्याकडे पाहण्याची दृष्टी निकोप झाली पाहिजे, असे मला मनोमन वाटते. त्यातूनच मला एके दिवशी या पीडितांचेच स्मारक उभारण्याची कल्पना सुचली. जगामध्ये अनेक नेत्यांची स्मारके असतात; पण गरीब, पीडित, अंधश्रद्धेचे बळी पडलेल्या निरपराध लोकांचे कोणीच स्मारक उभे करत नाहीत. आपण हे काम ओरिसा पोलिसांच्या वतीने करायचे, असे ठरवून कामाला लागलो.

अनोख्या स्मारकाचे स्वरूप काय आहे?

आमच्या केऊंझर मुख्यालयाच्या परिसरामध्येच हे स्मारक उभे केले. स्थानिक कलाकाराकडून आदिवासी महिलेचे एक सात फुटी दगडी शिल्प बनवून घेतले. या शिल्पातील महिलेच्या चेहर्‍यावरचे भाव हे ‘माझ्याकडे चेटकीण म्हणून पाहू नका, तर एक शालीन स्त्री म्हणून पाहा’ असे आहेत. हे दगडी शिल्प चेटकीण कुप्रथेत बळी पडलेल्या समस्त स्त्रियांचे प्रतिनिधित्व करते. या स्मारकाच्या भोवती मार्बल दगडावर केऊंझर जिल्ह्यातील चेटकीण प्रथेच्या बळी पडलेल्या सर्व स्त्री-पुरुषांची नावे कोरून मरणोत्तर त्यांना आम्ही सन्मानित केले आहे. समाजात असणार्‍या कुप्रथेमुळे बळी पडलेल्या स्त्री-पुरुषांचे हे जगातील पहिले स्मारक असावे, या स्मारकाचे उद्घाटन तत्कालीन डी. आय. जी. शर्मा साहेब यांच्या हस्ते आणि या जिल्ह्याचे मराठी जिल्हाधिकारी आशिष ठाकरे सर यांच्या उपस्थितीत केले. उद्घाटनानंतर सर्व पोलीस अधिकार्‍यांनी पीडित कुटुंबीयांसोबत सहभोजन केले. या सहभोजनाने सामाजिक बहिष्कार टाकलेली पीडित कुटुंबे भारावून गेली. या स्मारकाची चर्चा संपूर्ण देशभर झाली. इंग्रजी वर्तमानपत्राने याच्या बातम्या केल्या. ओरिसा पोलिसांच्या या कामाचे सर्वांनी कौतुक केले.

ओरिसाचे सी.आय.डी.चे महासंचालक असणार्‍या जय नारायण पंकज या संवेदनशील आणि कल्पक अधिकार्‍याशी गप्पा मारताना एक तास कसा गेला, हे समजले नाही. सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांचे काम एक शासकीय अधिकारी आपल्या अधिकारातून कसे करू शकतो, याचे पंकज सर हे आदर्श उदाहरण आहेत. प्रशासकीय कामासोबत असे समाजसेवी काम प्रत्येक अधिकार्‍याने केले, तर सामाजिक बदलाचा वेग नक्की वाढेल. पंकज सरांचे आम्ही पुन्हा एकदा अभिनंदन करून केऊंझर जिल्ह्यातील या स्मारकाला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी लगेच याबाबत केऊंझरचे एस. पी. मित्रभानू मोहपात्रा यांना फोन करून आम्हास सहकार्य करण्यास सांगितले.

(सौजन्य : अंधश्रद्धा निमुर्लन वार्तापत्र)

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here