गौतमी पाटील… लावणी आणि जातीय संघटनांची पुरुषसत्ताकता…

‘पाटील आडनाव लावून गौतमी पाटलांची बदनामी करतेय. गौतमीने पाटील हे आडनाव लावू नये. अन्यथा महाराष्ट्रात तिचे कार्यक्रम होऊ देणार नाही', असा इशारा एका संघटनेने दिला. यापूर्वी पुण्याच्या लाल महालात लावणीचे शुटिंग झाल्याप्रकरणीही काही संघटनांनी तीव्र आक्षेप घेतला होता. मुळात मुद्दा नाचण्याचा नसून मुद्दा पुरुषसत्तेचा आहे.

  • सारिका उबाळे

कला ही कधीही उच्च वा नीच नसते. नृत्य हा कलाप्रकारही कमीजास्त तोलामोलाचा नसतो. लावणीऐवजी भरतनाट्यम, कथ्थक सादरीकरणाचे कार्यक्रम झाले असते तर ऐवढा गदारोळ माजला असता का ?

खरं तर, आजकालच्या तरुण तरुणींचा या कलाप्रकाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन अगदी निर्लेप आहे. भरतनाट्यम, कथ्थक, मणिपुरी असो वा महाराष्ट्रातील लावणी असो. हल्ली सोशल मीडियावर तरुण मुलीच नाही तर मुलंसुध्दा एकापेक्षा एक सरस लावणी नृत्याचे व्हिडीओ त्यांच्या क्लासच्या जाहिरातीसाठी प्रसारीत करत असतात. तरुण मुलांची चपळाई आणि लिंगसापेक्षता ही खरं तर आनंद आणि समाधान देणारी बाब आहे.

“महाराष्ट्राच्या लोकगीतांचा किंवा शाहिरीचा लावणी हा ग्रामीण शृंगारिक काव्याचा प्रकार म्हणून ओळखला जातो. लावणीचा एक अर्थ सौंदर्य असा आहे. म्हणूनच, आदर्श, सौंदर्य, भव्यता यांचा एकत्रितपणे मिलाफ म्हणजे स्वतःची एक वेगळी ओळख असलेली शास्त्रीय लोकनृत्य लावणी. परंतु सामंतशाही, पेशवाई आणि चित्रपटांमधून लावणी हा काव्य आणि नृत्यप्रकार बदनाम केला गेला आहे.

Gautami Patil - baimanus

लावणी, गण, गौळण, पोवाडे, अभंग हे सगळे काव्यप्रकार जात-वर्ग-वर्ण-लिंगभावात विभागले गेलेले आहेत. अभंगांची रचना देवाचं नामस्मरण करणाऱ्या संतांनी केली. किंवा भजन किर्तनात नामस्मरण आहे, जीवनाविषयीचं तत्त्वज्ञान आहे, विरक्ती आहे म्हणून ते श्रेष्ठ. पोवाडे वीररसाची निर्मिती करतात, पुरुषार्थाला आव्हान देतात म्हणून ते श्रेष्ठ आणि लावणी ही शृंगारिक, उत्तान, मनोरंजक म्हणून ती कनिष्ठ असे समजायचे का?

पुरुषांचं मन रिझवण्यासाठी…

पुरुषांचं मन रिझवण्यासाठी, त्याच्या रंजनासाठी शृंगारी लावणीचा उपयोग केला जाऊ लागला आणि कनिष्ठवर्गीय जसे महार, कोल्हाटी, कुंभार, मातंग जातीतील स्त्रिया नाचवल्या जाऊ लागल्या. त्यातही बैठकीची लावणी, फडावरची लावणी कमीजास्त दर्जाची ठरवली गेली. पुढे पुढे तर लावणी आणि तमाशाला घर, कुटुंब उध्वस्त करणारा असा हीन दर्जा आणि ते करणाऱ्या कलावंताकडे पाहण्याचा हिणकस दृष्टिकोन तयार झाला. यामुळे लावणी नृत्यांगनांची वाताहत झाली; तर गण-गौळण सादर करणाऱ्या नाच्यांचीही अवहेलना झाली.

मुळात नृत्य, नाटक, अभिनय हाच कनिष्ठवर्गियांनी उच्चवर्णियांच्या मनोरंजनासाठी करण्याचा प्रकार आहे, अशी धारणा कित्येक काळ समाजात होती. पूर्वी ब्राह्मण स्त्रियांनी या क्षेत्रात येणे, तोंडाला रंग फासणे, नाटक सिनेमात काम करणे अप्रतिष्ठेचे समजले जाई. म्हणूनच तर बालगंधर्वांना स्त्रीपात्र साकारावे लागले. हंसा वाडकर, शांता हुबळीकर, लीला गांधी या कोल्हाटी किंवा तत्सम जातीतल्या स्त्रियांनी चित्रपटासारख्या प्रभावी माध्यमात अभिनय, नृत्य गाणी या माध्यमातून प्रवेश करुन महाराष्ट्राची ओळख निर्माण केली आणि पुढे इतर जातींतील स्त्रियांचा मार्ग मोकळा केला. पुढे उच्च म्हणवल्या जाणाऱ्या जातीतल्या स्त्रिया चित्रपट, नाटक, दूरदर्शन आणि मनोरंजक क्षेत्राकडे वळल्या आणि पाहता पाहता उच्चवर्णीय समाजाने या क्षेत्रात आपले वर्चस्व प्रस्थापित केले. ते एकाचवेळी पुरुषसत्ताक आणि वर्ण-वर्गभेदी होते.

Gautami Patil - baimanus

19व्या शतकात म्हणजे अगदी अलिकडच्या काळात तामिळनाडूतील मंदिरांमध्ये देवदासींची भरतनाट्यम् ही नृत्यकला ब्राह्मण / उच्चजातीय स्त्रियांनी आत्मसात करून शास्त्रीय पध्दतीने त्याचे सादरीकरण करण्यात येऊ लागले. त्या स्टेज शोजमध्ये आज लाखो रुपयांची उलाढाल होते आणि मंदिरातल्या देवदासी मात्र हिणवल्या जातात.

लावणी जातपितृसत्तेची बळी

इतिहासाचा मागोवा घेत गेल्यास साधारणत: सतराव्या शतकाच्या सुमारास लावणी हा काव्यप्रकार आढळतो. या लावण्या भक्तीरसपर असलेल्या दिसतात. कामुकतेचे उघड प्रदर्शन करणाऱ्या शृंगारिक लावण्या पेशवाईच्या उत्तरार्धात दिसून येतात. त्याचे मूळ पहिल्या ते सातव्या शतकातील प्राकृत रचनांचे संकलन केलेल्या “गाथासप्तशती” मध्ये दिसून येते. या रचनांमध्ये प्राकृत जनांच्या दैनंदिन जीवनाचे वर्णन आढळते. त्याचप्रमाणे “काव्यानुशासन” व “ज्ञानेश्वरी” यामध्ये उद्धृत केले आहे की, कनिष्ठ जातींतील स्त्रिया डोंब व मातंगी गीते सादर करीत असत.

“गाथासप्तशती” मधील शृंगारिक चरणांच्या संदर्भातून असे महत्त्वपूर्ण निरीक्षण दृष्टीस येते की, ते दैनंदिन जीवनातील कामुक इच्छांचे प्रकटन असते. त्याचप्रमाणे “ज्ञानेश्वरी”च्या ओव्यांमध्ये असे वर्णन आढळते की कनिष्ठ जातीतील स्त्रिया ज्या शृंगारिक लावण्या सादर करीत असत त्यामधून पुरुषांना उत्तेजित करून त्यांची संपत्ती उधळण्यास लावणे हा उघडउघड हेतू असे. यावरुन असे सूचित होते की, लावणी हे देवघेवीचे साधन झाले.

लावणीच्या रचना पूर्णपणे पुरुषांकडून केल्या जात व त्याचे सादरीकरण पुरुष प्रेक्षकांपुढे स्त्रियांकडून केले जात असे. त्यामध्ये पुरुषी दृष्टिकोनातून प्रभावित झालेल्या स्त्रियांच्या इच्छा उघडपणे कामुकतेने प्रदर्शित केल्या जात असत. प्रेक्षकांमधील उच्चभ्रू पुरुषांची तिच्याकडून शारीरिक सुखाची अपेक्षा होतीच. अशा प्रकारच्या लोककलांची स्त्रीवादी चिकित्सा कशी करावी?” असे प्रतिपादन शर्मिला रेगे यांनी आपल्या ‘मऱ्हाटी शृंगारीक लावणी’ या लेखात विस्तृतपणे केले आहे. त्यात त्या पुढे म्हणतात, दुसऱ्या बाजीराव पेशव्याच्या राजवटीत छोटे शेतकरी कर्जबाजारी होऊन भिकेला लागले. इ. स. 1803 साली भीषण दुष्काळ पडला. बाणाजी यांनी कर्जबाजारीपणाचे आणि दुष्काळाचे पुढीलप्रमाणे वर्णन केले आहे. क्लेषदायक परिस्थितीतून सुटण्यासाठी आयांनी स्वत:ला व मुलांना विकले. तरुण स्त्रियांनी वेश्याव्यवसाय सुरु केला. परपुरुषांबरोबर रखेली म्हणून राहू लागल्या. कोणताही कायदेशीर अधिकार नसताना आपली संपत्ती समजणाऱ्या दलालांच्या आहारी गेल्या.

दुष्काळ, कर्जाबाजारीपणा यामुळे कनिष्ठ जातीतील स्त्रियांच्या विक्रीचे प्रमाण वाढले. पेशवाईच्या उत्तरार्धातील गुलामगिरीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे स्त्री गुलामांचे आधिक्य होय. साधारण परिस्थितीत शासनाला स्त्री गुलामविक्री हा महसूल मिळवण्याचा एक महत्त्वपूर्ण मार्ग होता. शेवटच्या पेशव्याच्या उधळेपणावरुन असा अंदाज करता येतो की, दुष्काळाच्या परिस्थितीत महसूल गोळा करणे सरकारला कठीण जात होते. त्यावेळी बराचसा महसूल स्त्री गुलामविक्रीतून मिळत असे. साधारणत: दोन मार्गांनी त्यांना गुलाम बनविले जात असे. अ) युद्धातून पळवून आणणे ब) कनिष्ठ जातीतील स्त्रीवर व्याभिचाराचा आरोप करून तिला गुलाम बनवणे

Gautami Patil - baimanus

दुसऱ्या बाजीरावाने एकही युद्ध केले नाही. त्यामुळे स्त्रियांना गुलाम बनविण्यासाठी त्याला दुसरा पर्याय हाताळावा लागला. सरकारकडून व्याभिचारिणी म्हणून पकडून गुलाम बनविलेल्या स्त्रियांमध्ये मुख्यतः कनिष्ठ जातीच्या स्त्रियांचा भरणा होता. तर उच्च जातीतील ‘व्याभिचारी स्त्रियांना त्यांच्या जातीतील लोकांकडून वाळीत टाकले जात असे. गुलाम स्त्रिया पेशव्यांच्या दरबारात, नाटक शाळेत व इतर खात्यात कामाला नेमलेल्या असत. याचप्रमाणे गुलाम स्त्रिया घरांमध्ये, गोठ्यांमध्ये, तबेल्यामध्ये कोठारामध्ये नृत्यशाळेत, गोदामांमध्ये निरोप्या म्हणून आणि बांधकामावर काम करीत असत पेशवे सरकार नेहमी आपल्या अधिकाऱ्यांना पगाराऐवजी अशा स्त्रिया देत असत.

लावणी रचनांमधे कनिष्ठ जातीतील स्त्रियांचे चित्र हे लैंगिक इच्छा अतृप्त असलेल्या व मुलतः व्याभिचारी असे रंगवले आहे. उत्तरेमध्य मराठा काळातील तिच्या गुलामगिरीचे तात्त्विक समर्थन केले गेले. दुसऱ्या बाजीराव पेशव्याच्या दरबारात लावणीचे सार्वजनिक सादरीकरण होऊन लावणी खासगी नाटकशाळेकडून सार्वजनिक क्षेत्राकडे वळली. तेव्हा ती लोकप्रियतेच्या शिखरावर होती. सर्व पुरुष प्रेक्षक असलेले हे सार्वजनिक सादरीकरण ‘लावणी’ ‘तमाशा’ म्हणून ओळखले गेले. जास्तीतजास्त शृंगारिक लावण्या होळीच्या तिन्हीसांजेला सादर केल्या जात असत. परंतु जेव्हा बाजीराव पेशवा ब्रिटिशांना शरण गेला (1818) व पेशवाईचा अंत झाला. त्यावेळी तमाशावर नवीन आश्रयदाता शोधण्याची वेळ आली. इ.स. 1840च्या सुमारास लावणी तमाशा ग्रामीण भागाकडे वळला. त्या काळातील बरेचसे लावणी रचनाकार हे विशेषत: महार, मांग अशा कनिष्ठ जातींतील होते.”

वरवर पाहाता या लावण्यांमध्ये स्त्रीची लैंगिकता शब्दांकित झाल्यासारखे वाटते. परंतु सखोल विश्लेषणातून असे लक्षात येते की, त्या लावणीत बटीक विरुद्ध सौभाग्यवती असा विरोधाभास आहे. या लावणी रचनांतून स्त्रीच्या अतृप्त इच्छा या कनिष्ठ जातीच्या बटीक स्त्रीच्या मुखातून ध्वनित होतात; तर विरहाचे दुःख पत्नीच्या मुखातून व्यक्त होते. लावणी साहित्यातील बटीक ही शारिरीक सुखाची आत्यंतिक गरज व्यक्त करते. ती पुरुषाला तिच्यावर पत्नीप्रमाणे अधिकार गाजविण्याचे आव्हान देते. पेशवाईच्या उत्तरार्धात स्त्रियांच्या इच्छा आकांक्षांवर एकूणच पुरुषी दृष्टिकोनाचा प्रभाव दिसून येत असे. तेव्हापासून लावणीच्या आशयात व स्वरुपात बरेचसे बदल झाले.

संबंधित वृत्त :

खरे तमाशा फड बंद पडले आणि मराठी चित्रपटांच्या केंद्रस्थानी लावणीशैली आली. तमाशा लोकरंगभूमीवर अश्लिलतेचा आणि अनुचिततेचा शिक्का मारल्यामुळे नाचीची कामुकता कमी झाली. संगीतबारीच्या कोल्हाटी स्त्रिया शृंगारिक लावण्या सादर करीत असत. आणि कंत्राटदारांकडून जास्तीतजास्त पैसे देणाऱ्यांना त्यांचे लैंगिक श्रम विकले जात असत. त्यामुळे यापेक्षा वग श्रेष्ठ ठरला. व्हिक्टोरियन संस्कृतीने स्त्रियांच्या कामुकतेच्या प्रदर्शनात केलेल्या बदलांमुळे वरिष्ठ जातींची शहरी नाट्यगृहे नैतिक व सुसंस्कृत ठरली. कोल्हाटी स्त्रिया त्यांच्या सर्जनशीलतेपासून आणि लैंगिक श्रमांपासून वंचित झाल्या. प्रेक्षकांना हवे असलेल्या लैंगिकतेचे नियंत्रण कंत्राटदारांनी केले. 1930 च्या दशकामध्ये उदयाला आलेल्या मराठी बोलपटांमुळे ही प्रक्रिया जोमाने वाढली.

सुरुवातीला मराठी बोलपटाच्या दुनियेत (1932-1942) पौराणिक कथांवरील आणि सामाजिक विषयांवरील चित्रपट लोकप्रिय होऊन भरभराटीस आले. त्याचवेळी अनेक लहान मोठ्या शहरांतून तमाशाची थिएटर्स बंद पडली.

दुसऱ्या महायुद्धामुळे चित्रपट बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल आणि यंत्रसामग्रीच्या आयाती वर अनेक बंधने लादण्यात आली. चित्रपटांची प्रक्रिया सुरु होण्यापूर्वीच परवाना घेण्याची वेळ आली. मध्यंतरी हिंदी सिनेमा हा राष्ट्रीय संस्कृती म्हणून उदयाला आला आणि त्यांना परवाना व कच्चा माल याबाबत प्राधान्य दिले जाऊ लागले.महायुद्धानंतरच्या काळात तमाशा शैलीच्या उदयातून प्रादेशिक मराठी चित्रपटांचे पुनरुज्जीवन झाले. जय मल्हार व रामजोशी हे या शैलीचे पहिले चित्रपट होते. हे चित्रपट त्यातील लावण्यांमुळे खूपच यशस्वी झाले. मराठी चित्रपटांच्या मुख्य प्रवाहाने प्रादेशिकतेवर भर देऊन तमाशाशैलीचा स्वीकार केला. तमाशा शैलीला प्रसिद्धी मिळण्याचे एक कारण म्हणजे मुंबई राज्याने 1940 मध्ये तमाशावर बंदी जाहीर केली होती. या बंदीचे कारण देताना लावणीतील शब्द अश्लिल आणि असभ्य असून तमाशा म्हणजे छुपा वेश्या व्यवसायच आहे असे म्हटले गेले होते.

यानंतर कृष्ण धवल मराठी चित्रपटांचा शहरी प्रेक्षकवर्ग इस्टमन कलर हिंदी चित्रपटांकडे आकर्षित झाला. हा एक मोठा विरोधाभास होय. मराठी चित्रपटांनी तमाशा शैलीचा स्वीकार केल्याने लावणीवर नाच करणाऱ्या कोल्हाटी व कनिष्ठ जातीच्या स्त्रियांचे कामुक अविर्भाव काढून टाकले गेले. मराठी चित्रपटांवर ब्राह्मण व मराठ्यांचे प्रभुत्व होते. कोल्हाटी, महार, मांग यांच्या लावणी तमाशाचे साहित्य घेऊन त्याचे एक क्रयवस्तूत रूपांतर करुन छोट्या शहरातील प्रेक्षका समोर सादर केले जात असे व दुप्पट किंमत वसूल करण्यात येत असे.

Gautami Patil - baimanus

काही मराठी चित्रपटांत नाचीला ‘पाखरू’, ‘बिजली’, ‘जवानीचा बाग’ असे संबोधले आहे. या लावण्यांतून नाचीची लैंगिकता ही ग्राम्य, गांवढळ जंगली असल्याचे भासविले जाते. मराठी चित्रपटातल्या नाच्या या बहुतेक कोल्हाटी जमातीतून आलेल्या आहेत. त्यातल्या फारच थोड्या कलाकार ( उषा चव्हाण, लीला गांधी, सरला येवले कर, मधू कांबीकर ) मराठी सिनेमात ‘नाचणाऱ्या बाया’ म्हणून यशस्वी झालेल्या आहेत.

जातीसंघटना आणि पितृसत्तेचे राजकारण

पुरुषांना हवी असलेली दिलखेचक, आकर्षक, शृंगारिक अशी लावणीची बांधणी करुन स्वतःचे मनोरंजन करुन घ्यायचे. मद्यपान, विलासी, चैनीत जीवन जगायचे आणि विशिष्ट नृत्य विशिष्ट जाती आणि स्त्रियांना वेठीस धरुन बदनाम करायचे हे या व्यवस्थेचे कुटील डाव पूर्वीपासूनच चालत आलेले आहेत. त्यात धार्मिक तेढ निर्माण करून आपली पोळी भाजून घेणाऱ्या राजकारण्यांनीही गलिच्छतेचा कळस गाठलाय.

“प्रथम स्वधर्म सोडून मन मानेल तसे वर्तन करणे, दारू पिऊन रस्त्यांत लोळणे, पोऱ्यांचे तमाशे पाहत फिरणे, जुवा खेळणे, गांजा वगैरे ओढणे, रांडा ठेवणे इत्यादी वाईट व घाणरेडी आचरणे तुम्ही करू लागला… आता रांडा कोण? यांची काही सृष्टिविरहित उत्त्पत्ती झाली का? का या कोणी दुसऱ्या देवाने केल्या? रांडा या तुम्हीच फसवून घराबाहेर काढलेल्या स्त्रियांपैकी स्त्रिया असतात.” असे 1882 साली ताराबाई शिंदेंनी आपल्या, ‘स्त्री पुरुष तुलना’ या पुस्तकात नमूद करून ठेवले आहे.

म्हणजे एकंदरीतच लावणी ही शूद्रजातीतील आणि त्यातही पुरुषांसाठी भोगवस्तू असलेल्या स्त्रियांकडून केली जाते. म्हणून ती बदनाम असा एक सामाजिक संकेत तयार झाला. कोवळ्या मुली देवाला सोडायच्या, गरीब, लाचार मुलींना वेश्या व्यवसायात ढकलायचे आणि वर समाजापासून त्यांना दूर ठेवून त्यांचे शोषण करायचे. ही पुरुषांच्या सोयीची व्यवस्था लक्षात घेतली पाहीजे. जात ही पुरुषसत्तेला बळकटी देते आणि जातीय संघटनादेखील पुरुषसत्तेला बळकटी देण्याचेच काम करीत आहेत.

(साभार – ‘द वायर’ मराठी

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here