- टीम बाईमाणूस

शकुंतला देवी या प्रसिद्ध भारतीय गणितज्ञ आहेत. त्यांना कॅलक्यूलेशनमुळे ह्यूमन कॉम्प्युटर म्हणून ओळखले जायचे. विशेष म्हणजे ज्यावेळी कॅलक्यूलेटर उफलब्ध नव्हते, कॉम्प्युटरबाबत जास्त कोणाला माहिती नव्हते; अशावेळी शकुंतला देवी यांनी आपल्या कौशल्याने सर्वांना प्रभावित केले होते. त्या कोणत्याही प्रश्नांचे उत्तर अवघ्या काही सेकंदात तोंडी देत असे.

शकुंतला देवी यांचा जन्म 4 डिसेंबर 1929 ला बंगळुरू येथे झाला. गरीब कुटुंबात जन्म झालेल्या शकुंतला यांचे लहानपण झोपडपट्टी भागात गेले. त्यांचे वडील सर्कसमध्ये काम करत असे. गरीबी असल्याने त्यांना औपचारिक शिक्षण देखील पूर्ण करता आले नाही. एवढ्या समस्येनंतर देखील त्यांचे प्रतिभेवर कोणताच परिणाम झाला नाही.

शकुंतला या तीन वर्षे वयाच्या असतानाच एकदा पत्ते खेळत होत्या. त्यावेळीच गणितातील त्यांची विलक्षण प्रतिभा त्यांच्या वडिलांनी हेरली होती. वयानं लहान असतानाही शकुंतला ज्या वेगानं अंक लक्षात ठेवत असत, ते पाहून त्यांचे वडील आश्चर्यचकित होत असत. पाच वर्षांच्या झाल्यानंतर त्यांनी गणितातील प्रश्नही सहज सोडवण्यास सुरुवात केली. गणितातले प्रश्न सोडवण्यासाठी शेजारची मुलंही शकुंतला यांच्याकडेच येत. हळूहळू गणितातील त्यांची कुशलता सर्वत्र पसरू लागली.

शकुंतला त्यावेळी शाळकरी मुलगी होती, जगात प्रज्ञेचा अर्क मानल्या जाणारा वैज्ञानिक अल्बर्ट आइनस्टाइन यांची तिने भेट घेतली होती. आइनस्टाइन यांनी तिच्या गणिती कौशल्याची पारख करण्याचे ठरवले अर्थातच समोर एक फळा व खडू ठेवलेला होता. त्यांनी तिला एक अवघड असा गणिती कूटप्रश्न विचारला. त्यांनी तो प्रश्न विचारून संपवण्याच्या आत छोट्या शकुंतलाने त्याचे उत्तर फळ्यावर लिहिले होते अन् ते बरोबरही होते. फळा आकड्यांनी भरून वाहत होता. या चिमुरडीने आइनस्टाइन यांनाही तोंडात बोटे घालायला भाग पाडले.

1982 साली शकुंतला यांनी 13 अंकांचा गुणाकार केवळ 28 सेकंदात सांगून, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली. 1980 साली लंडनमध्ये एम्पेरियल कॉलेजमध्ये 7,686,369,774,870 आणि 2,465,099,745,779 या 13 अंकांच्या दोन संख्या निवडल्या गेल्या. या दोन संख्येचा गुणाकार करून उत्तर शोधायचं होतं. शकुंतला देवी यांनी अवघ्या काही सेकंदात उत्तर सांगितलं. शकुंतला यांच्या ज्योतिषविद्येतून आपलं भविष्य जाणून घेण्यासाठी मोठ-मोठे नेते त्यांच्याकडे रांगा लावून बसत. त्यांच्या अद्भुत प्रतिभेला समजून घेण्यासाठी शास्त्रज्ञ हजारो प्रश्नांसह विचार करत बसत.

बीबीसीने त्यांची मुलाखत घेतली होती. तेव्हा प्रश्न विचारला गेला होता की, लंडनमध्ये तुम्ही गणिताच्या प्रश्नांना व्यवस्थित सोडवलंत, पण तुम्ही शालेय शिक्षण तर घेतलं नाहीय, मग हे कसं शक्य झालं? त्यावेळी शकुंतला यांनी उत्तर दिलं, “मी इंग्रजीचंही शिक्षण घेतलं नाही, पण चांगलं इंग्रजी बोलते. शालेय शिक्षण मी घेतलं नहीय. इंग्रजीतून कादंबऱ्याही मी लिहिल्या आहेत. तामिळमध्ये कुठलाच सराव न करताही कथा लिहिल्यात. भाषा तर इतरांशी बोलता बोलता शिकत गेले. हिंदी मला लिहिता, वाचता येत नाही, मात्र हिंदी उत्तम बोलते. मी शिक्षण घेतलं नाही, पण मला हे सर्व अभ्यासातून येत गेलं,” असं शकुंतला यांनी बीबीसीला सांगितलं होतं.

मोठ-मोठ्या संख्यांची गणितं काही सेकंदात सोडवणाऱ्या शकुंतला यांच्यावर 1988 साली कॅलिफोर्निया विद्यापीठातील मानसशास्त्रज्ञ प्रा. आर्थर जेन्सन यांनी अभ्यास केला होता. प्रा. जेन्सन यांनी त्यांच्या अहवालात म्हटलंय की, एखाद्या गणिताचं उत्तर वहीत लिहिण्याआधीच शकुंतला उत्तर सांगत असत.
वर्ष 1969 मध्ये शकुंतला यांना वुमन ऑफ द ईयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना रामानुजन पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील त्यांचे नाव नमूद आहे. वर्ष 2013 मध्ये या प्रतिभावान गणितज्ञ महिलेचे निधन झाले. वर्ष 2020 मध्ये त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट देखील आला होता. या चित्रपटात विद्या बालनने प्रमुख भूमिका साकारली आहे.

शकुंतला देवी यांच्या अंगी एक अद्भूत प्रतिभा होती. अख्ख्या भारतास त्याची दखल घ्यावी लागली. गुगलने त्यांच्या पहिल्या जयंतीनिमित्त डुडल बनवून त्यांना आदरांजली वाहिली होती. भारतात परतल्यावर 1988 मध्ये त्यांना अमेरिकेतून बर्कलेच्या कॅलिफोर्निया विद्यापीठामधील मानसशास्त्र विभागाचे विशेष आमंत्रण आले. या विभागातील प्रा. आर्थर जेनसन यांनी त्यांच्यावर संशोधन करण्यास सुरुवात केली. प्रा.आर्थर जेनसन यांनी देखील त्यांच्यावर असंख्य प्रयोग केले. कोणत्याही अवघड बहुअंकी संख्येचे घनमूळ काढणे किंवा कोणत्याही बहुअंकी संख्येचा सातवा किवा आठवा घात काढायला सांगण्याची खोटी की शकुंतला देवी यांचे उत्तर तयार असायचे. अशा या महान गणितज्ज्ञाचे 21 एप्रिल 2013 रोजी निधन झाले.