टीम बाईमाणूस
भारताच्या ईशान्येकडील मेघालय राज्यात खासी जमात अजूनही मातृवंशाच्या प्राचीन परंपरेचे पालन करते. जिथे स्त्रिया वडिलोपार्जित मालमत्तेचा वारसा घेतात, मुले त्यांच्या आईचे आडनाव धारण करतात आणि स्थानिक बाजारपेठ स्वतंत्र महिला विक्रेत्यांनी गजबजलेली असते, ज्यांचे त्यांच्या व्यवसायावर पूर्ण नियंत्रण असते. खासी समाजात पुरुषांना दुय्यम स्थान असून अशी परिस्थिती भारतात इतरत्र क्वचितच आढळते कारण देशात इतर सर्वत्र समाज पितृसत्ताक नियमांचे पालन करतांना आणि त्याप्रमाणे चालविला जातो.

ईशान्य भारतातील सर्वात मोठी आदिवासी जमात असलेले ‘खासी’ समाज मातृसत्ताक नियमांचे पालन करून समाज चालवणारे जगातील शेवटच्या उरलेल्या मातृसत्ताक समाजांपैकी एक आहेत.

मेघालयची मातृसत्ताक सामाजिक रचना भारतातील इतर सामाजिक रचनेपेक्षा अनेक प्रकारे वेगळी आहे. येथे कुटुंब प्रमुख म्हणून महिला परिवाराचे प्रतिनिधीत्व करतात आणि मुलं त्यांच्या आईचे नाव आडनाव म्हणून वापरतात.

येथील महिला प्रामुख्याने शेतात काम करताना दिसतात आणि कुटुंबासाठी कमाईचे मुख्य स्रोत त्याच असतात.

खासी समाजाच्या मातृवंशीय समाजात, कुटुंबातील सर्वात लहान मुलीला सर्व वडिलोपार्जित संपत्तीचा वारसा मिळतो. लग्नानंतर पती सासूच्या घरी राहतात.

भाजीपाला, फळे, फुले आणि अन्नधान्यांसाठी लेवडुहचा घाऊक बाजार हा ईशान्य भारतातील सर्वात जुन्या पारंपारिक बाजारपेठांपैकी एक आहे. येथील सर्व दुकाने खासी समाजातील महिला मालक म्हणून चालवतात.

ह्या आहेत लेवदुहच्या बाजारपेठेत स्वतःचे दुकान असणाऱ्या हिमा टायनसाँग. त्या म्हणतात की त्यांचे व्यावसायिक यश मुख्यत्वे सामाजिक नियमांमुळे आहे आणि त्यामध्येच येथील महिला सक्षमीकरणाचे मूळ दडलेले आहे.

बहुतांश खासी समाजातील लोकं सुशिक्षित आहेत आणि जवळपास 80 टक्के लोकांचं ख्रिश्चन धर्मामध्ये धर्मांतर झाल आहे.

बाजारपेठेत काम करत असतांना खासी समाजातील माणसं अश्याप्रकारे कामातून विश्रांती घेऊन धूम्रपान करताना दिसतात. या ईशान्येकडील जमातीच्या मातृवंशीय समाजात, पुरुष सामान्यतः व्यवसायावर नियंत्रण ठेवणार्या स्त्रियांच्या हाथाखाली काम करतात.

खासी महिलांमध्ये समाजात वावरतांना आपआपसातल्या वागणुकीमध्ये एक सुशीलपणा आणि आपुलकीची विलक्षण भावना आहे. त्यांच्या समजुतीनुसार त्यांनी हे मान्य केलं आहे कि नातेसंबंध जोडताना एकाच कुळातील असणं किंवा रक्ताचं नातं असणं गरजेचे नाही. नातेसंबंध हे मैत्रीवर देखील जोडले जाऊ शकतात.

खासी लोककथेनुसार त्यांच्या समाजरचनेचे मुळ हे पितृसत्ताक होते. तर पूर्वीच्या काळी परकीय आक्रमणाच्या लढाई मध्ये खासी समाजातील पुरुष बहुसंख्य प्रमाणात मारले गेले. परिणामी त्यांच्या जोडीदारांना नंतर पुनर्विवाह करावा लागत असे आणि कधीकधी मुलाचे पितृत्व निश्चित करणे कठीण जायचं. त्यामुळे इतिहासकारांचा असा विश्वास आहे की हे मातृवंशीय समाजाच्या हळूहळू उत्क्रांतीचे मूळ कारण हे होते आणि म्हणूनच खासी समाजाने मातृसत्ताक समाजपद्धतीचा अवलंब केला.
फोटो क्रेडीट : सुगातो मुखर्जी (The Diplomat)