- अप्सरा आगा
पुण्यातील घनकचरा व्यवस्थापन हे स्वच्छ संस्थेचं आदर्श मॉडेल आहे. पुणे शहरात घरोघरी जाऊन कचरा गोळा करणारे तेरा हजार कर्मचारी पुणे शहर स्वच्छ ठेवण्यात महत्त्वाची भूमिका निभावतात.

सध्या घनकचरा व्यवस्थापन या मॉडेलचा अभ्यास घाना देशाकडून सुरु आहे. स्वच्छ संस्थेप्रमाणेच घाना देशातही घनकचरा व्यवस्थापनेत असंघटित कचरावेचकांना सामावून घेतले जाणार आहे. ते सकाळी सहा वाजल्यापासून घरोघरी जाऊन ओला आणि सुका कचरा वेगवेगळा गोळा करतात. शहर स्वच्छ ठेवतात पण त्यांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहतोच.

हातात भली मोठी कचरा गाडी असणाऱ्या महिला सकाळी सहा वाजल्यापासून घंटा वाजवून घरोघरी जाऊन कचरा गोळा करतात, ओला आणि सुखा कचरा वेगळा केला आहे का हे बघतात. कचऱ्यातून मिळणारा प्लास्टिक कचरा हा पुनर्निर्मित केला जातो, यामुळे प्लास्टिक कचऱ्याचे ठीक होत नाही. अशा पद्धतीने पर्यावरण संरक्षणासाठी कचरा वेचक महिला हातभार लावतात.


गोळा केलेल्या कचऱ्याची गाडी एका फिडरपॉईंटला मोकळी केली जाते. तिथे कचऱ्याची गाडी आली कि त्यामध्ये कचरा भरला जातो. सतत कचऱ्यामध्ये वावर असल्यामुळे महिलांच्या आरोग्यावर परिणाम होतो.
कचऱ्यामुळे अंगाला खाज सुटते, कचऱ्यांनी भरलेली गाडी ढकलून ढकलून हात, पाय दुखतात व कंबरेचा त्रास होतो. पावसाळ्यात पायाला चिखल्या पडतात, पुरळ येतात. या सर्व आजारांचा इलाज करायचा तर पैसे कुठून आणायचे? स्वच्छ संस्थेने कचरा वेचक महिलांना दिलेल्या आरोग्यकार्डावर 50 टक्के सवलत मिळते. ती सवलत अपुरी आहे. महानगरपालिकेच्या सफाई कामगारांना 90 टक्के सवलतीच आरोग्य कार्ड मिळतं. ते कार्ड आम्हाला का मिळत नाही? असा सवाल कचरा वेचक महिला करतात.

शहरी गरीब वैद्यकीय योजनेतंर्गत गरजू नागरिकांना महानगर पालिकेच्या दवाखान्यात मोफत उपचार मिळतात. याशिवाय खाजगी दवाखान्यात आवश्यक त्या उपचाराच्या 50 टक्के सूट मिळते. पण त्याच्यासाठी रहिवासी दाखला, उत्पनाचा दाखला लागतो. “कचरावेचक महिला बाहेरगावातून पोट भरण्यासाठी आलेले असतात. त्यांच्याकडे या कागद्पत्रांची मागणी न करता त्यांना रेशन कार्डावर या योजनेचा लाभ मिळावा”, अशी मागणी कागद काच पत्रा पंचायतीची आहे.
महानगरपालिका कचरावेचकांना पाच हजार रुपये विमा देते. तो आरोग्य विमा अपुरा असल्याचं पंचायतीचं म्हणणं आहे. आरोग्य विम्याची रक्कम वाढवावी अशी मागणी पंचायतीची आहे.