- टीम बाईमाणूस
भोजपुरी चित्रपट अभिनेत्री आकांक्षा दुबे हिच्या मृत्यू प्रकरणाने बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या गूढ मृत्यूचे प्रकरण पुन्हा ताजे झाले आहे. ज्या परिस्थितीत सुशांतचा मृत्यू झाला अगदी तशाच परिस्थितीत आकांक्षाचा मृत्यू झाल्याची चर्चा आहे. दोघेही खूप दडपणाखाली होते, करिअरची चिंता होती. त्यांच्या चित्रपटसृष्टीतून निर्माण झालेल्या काही परिस्थितीमुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. याप्रकरणी आकांक्षाच्या आईने आत्महत्येऐवजी मुलीचा खुन झाल्याचा आरोप करून हे प्रकरण खळबळजनक केले आहे. भोजपुरी गायक समर सिंग आणि त्याचा भाऊ संजय सिंग यांच्यावर आरोप ठेवण्यात आलायं. आकांक्षाची आई मधु दुबे यांच्या तक्रारीवरून वाराणसीच्या सारनाथ पोलिसांनी समर आणि संजयविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पण दिवंगत अभिनेत्रीला न्याय मिळणार का, हा प्रश्न उरतोच.
आकांक्षा दुबेने ‘वीरों के वीर’ आणि ‘कसम पडने वाले की 2’ यांसारख्या चित्रपटांमध्ये आणि ‘भुआरी’, ‘काशी हिले पटना हिले’, ‘नमरिया कमरिया में खोस देब’ आणि ‘तुम जवान हम लिका’ सारख्या संगीत अल्बममध्ये काम केले आहे.ज्या दिवशी तिचे निधन झाले, त्याच दिवशी भोजपुरी सिनेमातील आघाडीचा स्टार पवन सिंगसोबत तिचे ‘ये आरा कभी हरा नही’ हे गाणे रिलीज झाले. तिची आई मधु दुबे यांनी सांगितले आहे की, “आकांक्षाला कोट्यवधी रुपयांचे काम मिळवून देऊन समर सिंह आणि संजय सिंह यांनी तीन वर्षांपासून तिचे पैसे रोखून ठेवले होते. 21 तारखेला आकांक्षाने तिचे हक्काचे पैसे मागितल्यावर समरचा भाऊ संजय सिंह याने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. आकांक्षाने स्वत: मला फोनवरून याची माहिती दिली. त्यामुळे ती खूप नाराज झाली होती.”
कोणीतरी असा आरोप करण्याची ही पहिलीच वेळ नाही. भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करून घ्यायचे आणि पैसे रोखून धरायचे हा ट्रेंडच आहे.

बॉलीवूडप्रमाणे भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीतही मठाधीश आणि माफिया सक्रिय आहेत का? इथे खरोखरच कलाकारांचे आर्थिक, मानसिक, शारीरिक शोषण होते का? याबाबत भोजपुरीतील प्रसिद्ध चित्रपट समीक्षक मनोज भावुक यांना विचारले असता त्यांनी एक खुलासा केला. मनोज भावुक म्हणाले, “भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीची अवस्था बॉलीवूडपेक्षा वाईट आहे. याला ‘मेल डोमिनेटिंग’ किंवा ‘हिरो डॉमिनेटिंग’ फिल्म इंडस्ट्री म्हणता येईल. त्यातही मोजकेच लोक हा उद्योग चालवत आहेत. उदाहरणार्थ, पहिल्या ओळीत पवन सिंह आणि खेसारी लाल यादव यांची नावे घेता येतील. दुसरीकडे, रितेश पांडे, समर सिंह, यश मिश्रा आणि अरविंद अकेला कल्लू यांची नावे दुसऱ्या रांगेत आहेत. या लोकांमध्ये मनोज तिवारी, रवी किशन आणि दिनेश लाल यादव हे कलाकार आता राजकारणात व्यस्त झाले आहेत. मात्र राजकारणात असले तरी हे खुप मोठे आणि समजुतदार कलाकार आहेत. भोजपुरी सिनेसृष्टी वाढवण्यात त्यांचे योगदानही खूप आहे, पण या काळातील कथित भोजपुरी स्टार्स इंडस्ट्रीला उद्ध्वस्त करण्याचे काम करत आहेत.
कलाकारांना सोडा, भोजपुरी सिनेमाच्या निर्मात्या-दिग्दर्शकांची अवस्थाही दयनीय आहे. त्यांच्याबद्दल मनोज भावुक म्हणतात, “इथे प्रस्थापित निर्माता नसेल, तर तो बळीचा बकरा होणार हे नक्की समजून घ्या.” अभय सिन्हा सारखे काही निर्माते आहेत, जे स्वतः चित्रपट निर्माता आणि वितरक आहेत, त्यांचे दुकान चांगले चालले आहे. पण जे नवे निर्माते येतात, ते चित्रपट करून पळून जातात. याशिवाय चित्रपटाचा दिग्दर्शक, ज्याला कॅप्टन म्हणतात, तो कठपुतलीसारखा काम करतो. हिरोसमोर त्यांचे काहीही चालत नाही. हिरोच सर्व काही ठरवतो. स्टारकास्ट कोणती असेल, नायिका कोण असेल, संगीत दिग्दर्शक कोण असेल, एवढेच नाही तर प्रॉडक्शन आणि कॅन्टीन कोण बघणार, हेही अभिनेता ठरवतात. अशा प्रकारे एक माणूस संपूर्ण चित्रपट ठरवतो. अशा परिस्थितीत कलाकारांवर खूप दडपण असणार हे समजू शकते.
आकांक्षा दुबेला आत्महत्या करण्यास भाग पाडले, तुम्ही ही हत्या मानता की आत्महत्या? या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, हा खून असू शकतो, तो पूर्णपणे खून असू शकतो. प्रथमदर्शनी याला आत्महत्या म्हणता येईल, पण भोजपुरी सिनेमात अशा अनेक घटना घडल्या आहेत. या प्रकाराचे दडपण येथील कलाकारांवर खूप आहे. 2001 ते 2023 या काळात अशा अनेक घटना घडल्या आहेत. येथे इतका दबाव आहे, जो लोक सहन करू शकत नाहीत. याची अनेक कारणे असू शकतात. हिरोईन असेल तर तिच्या पेमेंटपासून सगळ्या सोयी मिळतील असं बाहेरून लोकांना वाटतं, पण वरच्या स्तरातील काही बडे कलाकार सोडले तर इथल्या लोकांची अवस्था फार वाईट आहे. स्टार लोक सोडले तर सगळे स्ट्रगलर्स आहेत. याशिवाय हिरोइन्समध्ये खूप स्पर्धा आहे. त्या एकमेकांशी भांडणही करतात. हिरो किंवा दिग्दर्शकाच्या जवळ जाण्यासाठी अनेक क्लृप्त्या केल्या जातात. ज्यांच्यापर्यंत पोहोचता येत नाही, ते डिप्रेशनमध्ये जातात. यामध्ये काही लोक त्यांचा गैरफायदाही घेतात.

‘निराश चित्रपटसृष्टी, म्हणूनच विकास होऊ शकला नाही’
भोजपुरी चित्रपट किंवा म्युझिक व्हिडिओमध्ये काम करणाऱ्या कलाकारांचे पैसे रोखले जात असल्याच्या प्रश्नावर मनोज भावुक म्हणतात, “नायक-नायिका सोडा, चित्रपटाच्या शूटिंगसाठी येणाऱ्या स्पॉट बॉईजचे पैसेही रोखले जाते. त्यांची रोजची मजुरी अवघे काहीशे रुपये असली तरीही…. म्हणूनच मी याला निराश चित्रपट उद्योग म्हणतो. राहिला मुद्दा भोजपुरी संगीत इंडस्ट्रीचा तर सिनेमानंतर सर्वाधिक कमाई करणारा हाच उद्योग आहे. या कंपन्या हिरो किंवा हिरोईनसोबत थेट काम करतात. त्यात पैसा असल्याने आता अनेक नायिकाही गाणे म्हणू लागल्या आहेत. गेल्या काही वर्षांत भोजपुरी सिनेमा आणि संगीत उद्योग डिजिटल प्लॅटफॉर्मच्या विशेषतः यूट्यूबच्या जीवावर चालत आहे. सध्या त्यांना मोठ्या OTT प्लॅटफॉर्मवर संधी मिळाली नसली तरी वेगवेगळ्या कॉपीराईट्समधून चांगले पैसे मिळत आहेत.
‘एकतर फायटर व्हा किंवा सेटर’
आकांक्षासोबत झालेल्या भेटीची आठवण करून देताना मनोज सांगतात की ती एक महत्त्वाकांक्षी मुलगी होती. कुटुंबाशी भांडून ती भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीत काम करायला आली. पहिल्या भेटीची आठवण करून देताना ते म्हणाले की, “आकांक्षा दुबे तेव्हा इंडस्ट्रीत नवीन होती. त्या आनंदी आणि मिलनसार मुलीने मला सा रे ग म प च्या सेटवर विचारले होते की सर, तुम्ही भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीतील मोठ्या लोकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. इथे जगण्यासाठी आणि चमकण्यासाठी काय करावे लागेल. मी उत्तर दिले की यासाठी एखाद्याला फायटर किंवा सेटर व्हायला हवे. त्यानंतर टॅलेंटचा क्रमांक येतो. तेव्हा मी सा रे ग म प चा प्रोजेक्ट हेड होतो. आकांक्षाला अनेक मोठ्या हिरोइन्ससोबत पाहुणे म्हणून बोलावण्यात आले होते. ही 2017 ची गोष्ट आहे.”

मनोजच्या या शब्दात तथ्य आहे, कारण चित्रपटसृष्टीत टिकून राहण्यासाठी फायटर किंवा सेटर असणे आवश्यक आहे. जो सेटर आहे, तो निर्माता, दिग्दर्शक आणि हिरोसोबत व्यवस्थित सेटिंग करून स्वत:चे करियर घडवतो, कधी कधी तो तडजोडही करतो. पण ज्याला हे सर्व जमत नाही, त्याला लढवय्याप्रमाणे संघर्ष करावा लागतो.
भोजपुरी फिल्म इंडस्ट्री माफियाच्या हातात
भोजपुरी चित्रपटसृष्टीतील एका निर्माता-दिग्दर्शकाचे म्हणणे आहे की, भोजपुरी चित्रपटसृष्टीच्या वरच्या स्तरावर माफिया बसले आहेत. खालच्या कलाकारांना त्रास देणे, कमी बजेटमध्ये काम करणे, त्यांच्या कामाचे श्रेयही खाणे, त्यांना त्रास देणे हे त्यांचे काम आहे. येथील माफियांना स्वतःचा फायदा करून घ्यायचाय. लोकांना चिरडून यश मिळवायचे आहे. त्यांच्यामुळे चित्रपट निर्माते देशोधडीला लागले आहेत. नवीन कलाकारांना कराराच्या नादात बांधून कमी बजेटमध्ये काम करून घेण्याचे त्यांचे धोरण बनले आहे. जसे हत्तीचे खायचे आणि दाखवण्याचे दात वेगवेगळे आहेत अगदी तसेच. भोजपुरी फिल्म इंडस्ट्री ही अशी आहे, ज्यात समोर जे दिसतं ते दिसत नाही. आकांक्षा दुबे ही एक प्रसिद्ध कलाकार होती, म्हणूनच तिच्या मृत्यूची बातमी देखील बनली, याआधी अशा अनेक कलाकारांचा मृत्यू झाला, ज्यांच्याबद्दल आजपर्यंत कोणीही चर्चा केलेली नाही. अनेक कलाकार त्यांच्यासमोर संघर्ष करून थकून परत जातात. काही लोक व्यवसाय करू लागतात, तर काही गावात जाऊन शेती करतात. खूप धडपड केल्यानंतर, काही लोक बराच वेळ घालवून यशस्वी होतात.