जंगल वाचवू शकत नाहीत… किमान ‘मियावाकी जंगल’ तरी उभारुया…

देशात दररोज 35 हेक्टर जंगल कमी होत असल्याचा धक्कादायक अहवाल आहे. जंगलाच्या मुळावर घाव घालण्याची वृत्ती वाढत असतानाच आता मानवनिर्मित जंगलाचा एक वेगळा पर्याय उभा राहाताना दिसतोय. हा पर्याय म्हणजे मियावाकी जंगल… नेमकं काय आहे मियावाकी जंगल आणि जपानच्या या मानवनिर्मित जंगल उभारणीचा प्रयोग भारतातही कसा यशस्वी होतोय? आजच्या जागतिक वन दिवसानिमित्त विशेष लेख…

  • टीम बाईमाणूस

पृथ्वीवरचे पर्यावरण संतुलन सांभाळायचे असेल तर जंगल आवश्यक. देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी 33 टक्के भाग जंगलाने व्यापलेला हवा हे धोरण 1988 साली ठरले. त्याला आता 35 वर्षे होत आली तरीही आपले उद्दिष्ट 24 टक्क्यांच्या पुढे सरकलेले नाही. धोरण ठरतेवेळी आपण 19 टक्क्यांवर होतो म्हणजे साडेतीन दशकांत अवघी पाच टक्क्यांची वाढ. याच वेगाने आपण पुढे गेलो तर उद्दिष्ट गाठायला आणखी 50 वर्षे लागतील. घनदाट जंगल तेव्हा जवळपास नष्ट झालेले असेल. 1980 ते 2016 पर्यंत देशात 15 लाख दहा हजार हेक्टर जंगल विकास प्रकल्पांमुळे नष्ट झाले.

नैसर्गिक जंगलांचे फायदे अनेक असतात कारण जैवविविधतेबरोबरच तेथे अनेक प्राणी-पक्ष्यांचा अधिवास असतो. जंगलांमुळे वातावरण बदलाचा प्रभाव कमी होतो, आदिवासींना अन्न सुरक्षा लाभते, विकासकामांसाठी लाकूड मिळते त्याचबरोबर कृषिक्षेत्रास आवश्यक असणारा पाऊसही भरपूर पडतो. या पावसामुळेच सर्व धरणे भरतात आणि आपल्या पाण्याचा प्रश्न सुटतो. एकीकडे जंगलाच्या मुळावर घाव घालण्याची वृत्ती वाढत असतानाच आता मानवनिर्मित जंगलाचा एक वेगळा पर्याय उभा राहाताना दिसतोय. मात्र नैसर्गिक जंगलासारखे फायदे मानवनिर्मित जंगल पद्धतीचे आहेत काय, असा प्रश्न हल्ली उपस्थित केला जातोय.

मियावाकी जंगल… हा शब्द सध्या प्रचलित आहे. ‘मियावाकी मेथड’ या नावाने प्रसिद्ध असलेली जलद वनीकरणाची एक जपानी पद्धत सध्या जगभर खूप लोकप्रिय होत आहे. जगप्रसिद्ध जपानी वनस्पतीशास्त्रज्ञ आणि पर्यावरणतज्ज्ञ डॉ. अकिरा मियावाकी यांनी विकसित केलेली असल्याने या पद्धतीला त्यांचे नाव दिले गेले आहे. गेल्या काही शतकांत कृत्रिम वृक्षारोपणाची आणि वनीकरणाची गरज निर्माण झाल्याने वृक्षलागवडीच्या काही पद्धती विकसित केल्या गेल्या. पण, या पारंपरिक पद्धती संथ व वेळखाऊ आहेत आणि जगभर होणाऱ्या जंगलतोडीचा वेग मात्र फार प्रचंड आहे. त्यामुळे वृक्षतोड व वृक्षलागवड यात संतुलन साधले जात नाही. दुसरी गोष्ट अशी की, पारंपरिक वृक्षारोपण हे घनदाट नैसर्गिक वनांशी साधर्म्य असलेली जंगले निर्माण करू शकतेच असे नाही. म्हणूनच ’मियावाकी’सारख्या जलद वनीकरणाच्या पद्धती आता विकसित होत आहेत.

जगामधील आठ प्रगत राष्ट्रांत समाविष्ट असलेला हा देश वृक्षावर अतिशय प्रेम करतो. म्हणूनच याला ‘चेरी ब्लॉसमचा देश’ असेही म्हणतात. जपान हा देश तेथील नावीन्यपूर्ण प्रयोगासाठी प्रसिद्ध आहे. ‘मियावाकी’ हासुद्धा असाच दोन-तीन दशकापूर्वीचा जंगल निर्मितीचा प्रयोग. याचे निर्माते आणि संशोधक आहेत डॉ. अकिरा मियावाकी. वनस्पतिशास्त्रामधील आपले उच्च संशोधन हिरोशिमा विद्यापीठात पूर्ण करीत असताना त्यांनी 1960-70 च्या दशकात जपानमधील वृक्षराजींनी समृद्ध असलेल्या जवळपास 10 हजार भूभागांचा अभ्यास केला. तेव्हा त्यांच्या लक्षात आले, की मंदिर, प्रार्थनास्थळे, स्मशान आणि देवराई भागात आढळणारे हजारो वर्षांपूर्वीचे वृक्ष त्या ठिकाणाशिवाय इतर कुठेही आढळत नाहीत. त्यांची संख्याही आता मानवी हस्तक्षेपामुळे झपाट्याने कमी होत आहे. त्यांच्या असेही लक्षात आले, की जपानच्या अनेक जंगलामध्ये जपानबाहेरील वृक्षांनी अतिक्रमण करून स्थानिक वृक्षांना आणि त्या सोबत जोडलेल्या जैवविविधतेला नष्ट केले आहे. हे सर्व लक्षात आल्यावर त्यांनी स्थानिक वृक्षांचा नैसर्गिक पद्धतीने जंगल निर्मितीचा ध्यास घेतला आणि या ध्यासामधूनच त्यांच्या ‘मियावाकी’ जंगल पद्धतीचा जपानमध्ये उदय आणि प्रसारही झाला. आज तेथे 1300 आणि जगाच्या इतर भागांत 1700 मियावाकी जंगले विखुरलेली आहेत. त्यात चीन आणि भारत आघाडीवर आहेत. आपल्या देशात 33 मियावाकी जंगले आहेत.

नैसर्गिक जंगलासारखे फायदे मानवनिर्मित जंगल पद्धतीचे आहेत काय, या प्रश्नाला मियावाकी पद्धतीकडे पाहिल्यास उत्तर होकारार्थी मिळते. अतिशय दाटीवाटीने वाढणाऱ्या या विविध वृक्ष मांदियाळीमधून आपणास सलोखा आणि मैत्रीचे नाते कसे असते याचे उत्कृष्ट शिक्षण मिळते. चार वेगळय़ा आकारांच्या अनेक प्रकारच्या भिन्न कुळांमधील वृक्ष दिलेल्या मर्यादित बंदिस्त जागेत एकमेकांना सहकार्य करून सलोख्याने कसे राहतात, हे तर येथे पाहायला मिळतेच; त्याचबरोबर भारताच्या ग्रामीण भागांत, खेडय़ापाडय़ांत निसर्गाचे हेच प्रारूप पूर्वी कसे रुजले होते, हेसुद्धा अनुभवता येते. मियावाकी पद्धतीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे येथील समृद्ध जैवविविधता. या जंगलात विविध फुलपाखरे, कीटक तर पाहण्यास मिळतातच, पण त्याचबरोबर हा अनेक लहान पक्ष्यांचासुद्धा अधिवास आहे.

शहरातील माती आणि गवत हरवल्यामुळे अनेक छोटे पक्षी दिसेनासे झाले आहेत, जे दिसतात ते मोठय़ा शिकारी पक्ष्यांच्या भीतीच्या छायेत जगत असतात. मियावाकी जंगल पद्धती या छोटय़ा पक्ष्यांना सुरक्षित निवारा तर देतेच त्याचबरोबर शाश्वत अन्न पुरवठासुद्धा करते. या तंत्रज्ञानात पारंपरिक देशी वृक्षांची आपणास ओळख तर होतेच त्याचबरोबर त्यांच्या रोपवाटिका निर्मितीमधून शेकडो रोजगार निर्माण होऊ शकतात. या पद्धतीमध्ये भूगर्भातील देशी गांडुळांना पृष्ठभागावर येण्याचे आमंत्रण मिळते त्यामुळे जमीन सच्छिद्र होऊन भूगर्भात पाणी साठवणक्षमता वाढू शकते. मियावाकीमुळे शहरातील हरित क्षेत्र वाढते. या जंगल पद्धतीत वृक्षांचा मृत्यूदर जवळपास शून्य असतो. मियावाकीच्या घनदाट जंगलात मनुष्य प्रवेश वर्ज्य आहे. मात्र तिची निर्मिती करतानाच आतील वृक्षांची ओळख होण्यासाठी यामध्ये पायवाट तयार करता येते. स्थानिक वृक्षांचे संवर्धन, शहराच्या हरित पट्टय़ात वाढ, जैवविविधतेचा सांभाळ, लोकशिक्षणाचे माध्यम, अतिक्रमण थोपवणे हे या पद्धतीचे फायदे आहेत.

संबंधित वृत्त :

‘मियावाकी’ पद्धत नक्की काय आहे?

‘मियावाकी’ वनीकरणाची सुरुवात जिथे वनराई उभारायची आहे, तिथल्या माती परीक्षणापासून होते. मातीतील पोषकद्रव्यांची उपलब्धता, सच्छिद्रता, पाणी धरून ठेवण्याची क्षमता याचा अभ्यास केला जातो. मग आजूबाजूच्या परिसरात कोणती देशी/स्थानिक झाडे आढळतात, याचे सर्वेक्षण करून त्यांच्या बिया गोळा केल्या जातात व त्याची रोपे बनविली जातात. अशी रोपे नर्सरीत तयार मिळाल्यास ती आणली जातात. मग वनीकरणाची संपूर्ण जमीन जेसीबीने खणून घेतली जाते व त्या मातीत गरजेनुसार कोकोपीट, धान्याची साळ, शेणखत मिसळून ती माती परत खड्ड्यात भरली जाते. अशा प्रकारे तयार झालेल्या बेडवर (पायावर) आधी गोळा केलेल्या झाडांची रोपं अगदी जवळजवळ लावली जातात. पुढे सुमारे दोन वर्षे तण काढणे आणि पाणी घालणे एवढेच व्यवस्थापन करुन मग या जंगलाला निसर्गाच्या भरवशावर सोडून दिले जाते.

मियावाकी या जपानी पद्धतीमध्ये अतिशय कमी जागेत जास्तीत जास्त झाडांची शाश्वत वाढ केली जाते. या जंगल निर्मितीमध्ये फक्त स्थानिक वृक्षांनाच स्थान आहे, हे आपण प्रथम लक्षात ठेवणे गरजेचे आहे. उदाहरण द्यावयाचे झालेच, तर आपल्या जवळपासच्या जंगलात वाढणारा हिरडा, बेहडा, बेल, आवळा, बोर, गावठी आंबे, जांभूळ, अर्जुन, पळस, चिंच आदी. गावामधील वृक्ष जानकार मंडळी, औषधी वनस्पती गोळा करणारा वैद्य या अशा शेकडो वृक्षांची माहिती आपणास सहज देऊ शकतात. ‘मियावाकी’ जंगल निर्मिती 100 चौ. मी पासून 10 हजार चौ.मी. मध्येसुद्धा करता येते. एकूण खर्चाचा अंदाज घेता कमीत कमी क्षेत्र म्हणजे 100 चौ. मी हे निश्चित करावे. या क्षेत्रात आपणास चारशे वृक्ष लागवड करावयाची आहे, हे ठरवून रोपवाटिकेमध्ये स्थानिक वृक्षामधील उंच, मध्यम, लहान, दुर्मीळ या विविध स्तरामधील वृक्षांची निश्चिती करावी. 100 चौ.मी. जागा आपण आपल्या शेतामध्ये, घराच्या पुढे अथवा मागे, व्यावसायिक ठिकाणी अथवा पडीक जमीन असेल, तर तेथे निवडावी. आपणास कोणत्या भूमिती पद्धतीचे म्हणजे चौकोनी, त्रिकोणी, लंबाकार, चंद्रकोर अथवा वर्तुळाकार जंगल निर्माण करावयाचे आहे.

त्याचे डिझाइन तयार करून ज्या जमिनीवर ते करावयाचे आहे तेथे चुन्याच्या साहाय्याने आखणी करावी. एकदा डीझाइन तयार झाले की ‘जेसीबी’ मशिनच्या साहाय्याने डिझाइनच्या आतील तीन फूट माती बाहेर काढून घ्यावी. वर्तुळाकार खड्डा आतून समांतर झाल्यावर त्यावर योग्य प्रमाणात जिवामृत शिंपडावे. त्यानंतर चांगले कुजलेले शेणखत आणि भाताचे तुस यांचे समप्रमाण करून खड्डा पूर्णपणे भरून घ्यावा. त्यावर पुन्हा जिवामृतचे योग्य मिश्रण शिंपडावे आणि खत सारखे करून घ्यावे. खताचे मिश्रण सारखे केल्यावर त्याच्या पृष्ठभागावर एक फूट अंतरावर लहान लहान खड्डे करून प्रत्येकात एक वृक्ष लागवड करावी. साधारणपणे 100 चौ. मी. मध्ये 370 झाडे बसतात. झाड लावल्यावर खड्डा भरुन त्यास जिवामृत द्यावे. वृक्ष लागवड पूर्ण झाल्यावर त्यावर उसाचे पाचट अथवा शेतामधील कुठल्याही पिकाच्या टाकावू भागाचा अंदाजे एक फूट उंचीचा आच्छादनाचा थर द्यावा. तुषार सिंचन पद्धतीने पाणी द्यावे.

‘मियावाकी’ पद्धतीची मूलतत्त्वे

‘मियावाकी’ पद्धतीने लावलेली झाडे ‘स्पर्धा’ (Competition), ‘परस्पर सहकार्य’ (Cooperation) आणि ‘नैसर्गिक निवड’ (Natural selection) या तीन नियमांनुसार वाढतात. सुरुवातीच्या काळात आपण दिलेले पाणी, जमिनीतून मिळणारी पोषकद्रव्ये आणि वरून मिळणारा सूर्यप्रकाश यासाठी रोपांची एकमेकांत तीव्र स्पर्धा लागते आणि दोन वर्षांत झाडे आपली जास्तीत जास्त वाढ करून घेतात. हे करताना आपल्या फांद्या उभ्या-आडव्या पसरण्यासाठी ती एकमेकांना सहकार्य करून जागा वाटूनही घेतात. पुढे झाडांची निगा राखणे बंद केल्यावर निसर्ग त्यांच्यात हस्तक्षेप करतो. ’Survival of Fittest’ या निसर्गनियमानुसार, अस्तित्वाच्या संघर्षात अधलीमधली काही झाडे दगावतात. जी जीवंत राहतात ती आणखी वाढून नंतर निर्माण होणाऱ्या जंगलाचा भाग बनतात. झाडांची लागवड करताना प्रत्येक जातीच्या रोपांची इतकी जास्त संख्या लावलेली असते की, त्यातील दोन-चार झाडे जरी जिवंत राहिली, तरी प्रत्येक जातीचा एक तरी प्रतिनिधी त्या छोट्या जंगलाच्या पट्ट्यात शिल्लक असतो. अशा प्रकारे झाडांची जैवविविधता असलेली एक समृद्ध वनराई तयार होते.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here