Neera Arya : भारताची पहिली महिला गुप्तहेर, जिचे ब्रिटिशांनी जेलमध्ये स्तन कापले!

ही कथा आहे एका वीरांगनेची… ही गोष्‍ट आहे एका ‘नीरा’ची, जिने अपरिमित यातना भोगतांनाही देशाशी गद्दारी केली नाही. ही गोष्‍ट आहे एका नीराची जिने देशासाठी स्‍वतःच्‍या पतीचे प्राण घ्‍यायलाही मागे-पुढे बघितले नाही. ही गोष्ट आहे भारताच्या पहिल्या महिला गुप्तहेराची….

  • टीम बाईमाणूस

ही कथा आहे एका वीरांगनेची… त्याकाळी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जीवाचं रान करणाऱ्या सुभाषचंद्र बोस यांची आझाद हिंद सेना आघाडीवर होती. या आझाद हिंद सेनेतील एक शिपाई ज्यांनी देशासाठी केलेला त्यागाची तुलना होऊ शकत नाही. त्या स्वातंत्र्यसेनानींचे नाव आहे नीरा आर्या. ही गोष्‍ट आहे एका ‘नीरा’ची, जिने अपरिमित यातना भोगतांनाही देशाशी गद्दारी केली नाही. ही गोष्‍ट आहे एका नीराची जिने देशासाठी स्‍वतःच्‍या पतीचे प्राण घ्‍यायलाही मागे-पुढे बघितले नाही. ही गोष्‍ट आहे एका नीराची जिने भारताच्‍या स्‍वातंत्र्यासाठी स्‍वतःच्‍या जिवाची पर्वा केली नाही; पण स्‍वतंत्र भारतात तिच्‍यावर अक्षरशः झोपडीत रहाण्‍याची वेळ आणली गेली; कारण इतिहासाची अशी कित्‍येक सोनेरी पाने एका कुटुंबासाठी जाणूनबुजून लुप्‍त करण्‍यात आली.

त्यावेळच्या संयुक्त प्रांतात खेकडा कसबे हे गाव उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यात आहे. तेथील सेठ छज्जूमल एक प्रतिष्ठित व्यापारी, त्यांच्या व्यापाराचे जाळे सर्व देशभर होते. त्यामुळे प्रचंड आर्थिक संपन्न असणारे कुटुंब. त्यांची मुलगी नीरा. तिचे प्राथमिक शिक्षण कोलकात्याजवळील भगवानपूर येथे झाले. शिक्षण घेत असतानाच अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन हिंदी-इंग्रजी-बंगाली सोबतच अन्य भाषेवर प्रभुत्व नीराने मिळविले. कोलकाता शहरातच शिक्षणाच्या निमित्ताने वास्तव्य असल्यामुळे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची भेट घेणे तिला शक्य झाले आणि ती खूप भारावून गेलीआणि लगेच आझाद हिंद सेनेत सहभागी होऊन एका समर्पित जीवनाला तिने सुरुवात केली.

नीरा नागिणी – पहिली गुप्तहेर

आझाद हिंद सेनेतील ‘झाशी राणी रेजिमेंट’मध्‍ये प्रवेश घेतला. त्यांना नीरा नागिणी या नावानेसुद्धा ओळखलं जायचं. नेताजींनी त्‍यांच्‍यावर सरस्‍वती राजामणी यांच्‍यासह हेरगिरी करण्‍याचे दायित्‍व दिले. त्‍या देशाच्‍या पहिल्‍या गुप्‍तहेर सैनिक बनल्‍या. कधी मुलगी, तर कधी पुरुष बनून ब्रिटीश अधिकारी आणि इंग्रजांच्‍या सैनिकी तळांमधील गोष्‍टी त्‍या आझाद हिंद सेनेला पुरवत राहिल्‍या. त्‍यांचे देशकार्य घरच्‍यांना कळू न देता चालू होते.

यांच्‍या या गुप्‍तहेर कार्याची माहिती नसलेल्‍या घरच्‍यांनी त्‍यांच्‍यासाठी प्रतिष्‍ठित अशा ब्रिटीश सेनेतील एका अधिकार्‍याशी त्‍यांचे लग्‍न जमवले. त्‍या अधिकार्‍याचे नाव होते श्रीकांत जयरंजन दास! ज्या व्यक्तीसोबत विवाहबंधनात अडकावे लागले, ती व्यक्ती ‘सीआयडी’ ऑफिसर श्रीकांत जयरंजन ब्रिटिशांचे जासूस म्हणून काम करीत होती. दोन टोकांच्या दोन दुधारी तलवारी एका म्यानात राहणार कशा? श्रीकांतवर जबाबदारी सोपविली होती, सुभाषचंद्र यांना संपविण्यासाठी हेरगिरी करणे आणि संधी मिळताच त्यांना गोळ्या घालण्याची.

आणि नवऱ्याचा कोथळा बाहेर काढला

लग्‍नाचे सोनेरी दिवस सरले तसे त्‍यांच्‍या आणि त्‍यांच्‍या नवर्‍याच्‍या विचारांमधील दरी वाढायला लागली. श्रीकांत दास यांना नीराच्‍या वेगळ्‍या रूपाविषयी कल्‍पना आली. ‘नीरा ब्रिटीश सत्तेविरुद्ध हेरगिरी करून आझाद हिंद सेनेला साहाय्‍य करत आहे’, हे समजल्‍यावर त्‍यांनी तिला नेताजींविषयी विचारण्‍यास प्रारंभ केला. नेताजींचा ठावठिकाणा सांगण्‍यासाठी तिच्‍यावर अनेक प्रकारे बळजोरी केली; पण नीरा कशाला दबल्‍या नाहीत. उलट नीरा यांनी अजून वेगाने स्‍वातंत्र्यलढ्यात स्‍वतःला झोकून दिले. एके दिवशी महत्त्वाची माहिती नेताजींना कळवण्‍यासाठी नीरा या एका गुप्‍त भेटीसाठी निघाल्‍या असतांना याची माहिती श्रीकांत दास यांना लागली. त्‍यांनी गुपचूप नीरा यांचा पाठलाग केला. नेताजींशी भेट होत असतांना श्रीकांत यांनी त्‍यांच्‍या दिशेने गोळी झाडली; पण ती गोळी नेताजींच्‍या वाहनचालकाला लागली. पुढे काय होणार, याचा नीरा यांना अंदाज आला. एका क्षणाचाही विलंब न करता नीरा यांनी आपल्‍याजवळ असलेल्‍या चाकूने स्‍वतःच्‍या जोडीदाराचा म्‍हणजे श्रीकांत दास यांचा कोथळा बाहेर काढला आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जीव वाचवला.

…म्हणून सुभाषचंद्रबाबूंचा जीव वाचला

आझाद हिंद सेनेच्या शरणागतीनंतर नोव्हेम्बर 1945 ते मे 1946 या काळात लाल किल्यावर खटला भरला. बऱ्याच आरोपीना यातून सुटका मिळाली पण एका ब्रिटीश अधिकार्‍याची हत्‍या केल्‍याप्रकरणी सरकारने नीरा आर्या यांना काळ्‍या पाण्‍याच्‍या जन्‍मठेपेच्‍या शिक्षेसाठी सेल्‍युलर जेल म्‍हणजेच अंदमानमध्‍ये पाठवले. अंदमानच्या सेल्युलर जेलात त्यांना डांबण्यात आलं. या काळात ब्रिटिश सैनिकांनी निरा आर्य यांना अतिशय हीन वागणूक दिली. जेलमध्ये अनेकदा त्यांना त्रास दिला. सेल्युलर जेलमध्ये नीरा आर्य यांच्यासमोर प्रस्ताव ठेवण्यात आला की नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा ठावठिकाणा सांगितला तर सोडून देण्यात येईल. निराने याला प्रत्युत्तर म्हणून सांगितलं की, सुभाषबाबूंचं निधन विमान दुर्घटनेत झालं आहे. जेलरने सांगितलं की, तू खोटं बोलत आहेस, बोस जिवंत आहेत. नीराने निडरपणे सांगितलं कि हो ते जिवंत आहेत, माझ्या काळजात ते जिवंत आहेत.

अंदमान जेलमध्ये स्तन कापले

स्वातंत्र्यानंतर नीराने आपल्या आत्मकथेत स्वातंत्र्यलढ्यातील काळीज पिळवटून जावेत, असे प्रसंग सांगितले आहेत. मला पकडल्यावर सुरुवातीला कोलकाता येथील कारागृहात नेण्यात आले. त्यानंतर अंदमान येथील सेल्युलर कारागृहात माझी रवानगी करण्यात आली. तिथे एका कोठडीत बंद करण्यात आले. त्या ठिकाणी अंथरूण पांघरून काहीच नव्हते. ते मागण्याचे धाडसही मी करू शकत नव्हते. मनात एका विचाराने थैमान घातले होते. इथे एवढ्या दूर अज्ञात बेटावर बंद कोठडीत राहून आम्हाला स्वातंत्र्य कसे मिळणार? या विचारातच थोड्या वेळात अतिथकव्याने जमिनीवर कशी झोप लागली, काहीच समजले नाही. रात्री 12च्या सुमारास एक पहारेकरी काहीही न बोलता येऊन दरवाजाच्या फटीतून चटई व ब्लँकेट टाकून निघून गेला. त्या आवाजामुळे खाडकन जागे झाले. झोपमोड झाल्यामुळे अस्वस्थ झाले, पण अंथरूण पांघरूण मिळाले, याचा आनंद होता. हातापायात हातकड्या होत्याच. सकाळी जेवणात खिचडी मिळाली. त्यानंतर एक लोहार आला. त्याने हातकडी काढताना जाणीवपूर्वक हाताला जखम केली.

पायातील बेडी काढताना तीन वेळेस मुद्दामच हातोडा मारला. असह्य वेदना झाल्या. मी विव्हळून म्हणाले, “आंधळा आहेस का? पायावर मारतोस!” तो कुत्सितपणे हसून म्हणाला, “पायावरच काय, आम्ही कुठेही मारू शकतो! काय करणार आहेस?” मी मनाशीच पुटपुटले, “खरंच मी काय करू शकते? मी इथे फक्त एक कैदी आहे.“ पण मला हे सर्व असह्य झाले होते. मनातून खूप चीड आली. त्यानंतर मी त्याच्या तोंडावर थुंकले आणि म्हणाले, “महिलांचा सन्मान करायला शिका.” जेलर सोबतच होता. तो म्हणाला, “सुभाषचंद्रांचा पत्ता सांगितला तर तुला सोडले जाईल.” मी म्हणाले, “त्यांचा विमान अपघातात मृत्यू झाला, हे सर्व जगाला माहीत आहे.” तो रागाने पाहत ओरडला, “खोटं बोलतेस तू. ते जीवंत आहेत. सांग कुठे आहेत ते?” मी छातीवर हात ठेवून उत्तर दिले, “ते माझ्या अंतःकरणात आहेत.” माझे उत्तर ऐकून तो गोरा लालबुंद झाला आणि म्हणाला, “नेताजीला तुझ्या अंत:करणातून आम्ही बाहेर काढू!” लगेच त्याने माझ्या छातीवर हात टाकला. त्या नराधमांनी माझ्या छातीवरील वस्त्र फाडून लगेच लोहाराला संकेत दिले.

लोहाराने त्याच्याजवळील ‘ब्रेस्ट रिपर’ (झाडाची पाने छाटण्याचे लोखंडी अवजार) उचलले आणि माझ्या डाव्या स्तनावर ठेवून स्तन कापण्याचा प्रयत्न केला. त्याला धार नसल्यामुळे तो त्याच्या कामात यशस्वी होऊ शकला नाही. पण त्या नराधमांच्या हातांनी माझ्या स्तनाला असह्य पीडा दिल्या. या मानवी जगातून मानवतेचा अंत झाल्याचा अनुभव मी घेत होते. त्याचवेळी जेलर माझी मान पकडून त्वेषाने ओरडला, “जर आता काही बोललीस तर तुझे दोन्ही स्तन छातीपासून वेगळे केले जातील!” त्याने एक लोखंडी चिमटा माझ्या नाकावर मारला आणि म्हणाला, “आभार मान आमच्या महाराणी व्हिक्टोरियाचे, याला अग्नीत तापविले नाही. तापविले असते तर तुझे दोन्ही स्तन मुळासह काढून टाकले असते.”

पण त्‍यावरही नीरा यांनी नेताजींचा ठावठिकाणा किंवा त्‍यांच्‍याविषयी एक शब्‍दही बोलण्‍यास नकार दिला.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर या दुर्भागी वीरांगनेला 51 वर्षांचे आयुष्य लाभले, स्वातंत्र्यामधील दुःख पचविण्यासाठी. वृद्धावस्थेत व्याधीग्रस्त होऊन 26 जुलै, 1998 ला या जगाचा त्यांनी निरोप घेतला आणि सर्व पीडांमधून मुक्ती मिळविली. त्या महान वीरांगनेचा अंत्यसंस्कार वादग्रस्त चित्रकार एम. एफ. हुसेन आणि दै. ‘स्वतंत्र वार्ता’चे पत्रकार तेजपाल सिंह धामा यांनी आपल्या मित्रांना सोबत घेऊन केला. ज्या क्रांतिकारकांच्या त्यागाने व पराक्रमाने इंग्रज सरकारला घाम फुटत होता, त्यांचा इतिहास असाच दडपून टाकण्यात आला.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here