- संपत मोरे
‘माझ्या वडिलांनी राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा जिंकली. तसे ते पहिले हिंदकेसरी. ते आंध्रप्रदेश केसरी झाले. त्यांनी अनेक कुस्त्या केल्या, सगळं आयुष्य कुस्तीसाठी खर्ची घातलं पण खूप उपेक्षा झाली त्यांची. त्यांना मानसन्मान मिळाले नाहीत. एवढंच नाही, तर त्यांचं नावही नव्या पिढीला माहीत नाही. राष्ट्रीय कुस्तीतला विजेता पैलवान कुस्तीतल्या जातीय राजकारणामुळे मरेपर्यंत उपेक्षित राहिला…’
1958 ची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा जिंकलेल्या दिवंगत बापू नाना बेलदार यांची कन्या राणी पोटतिडकीने बोलत होत्या. बापू बेलदार हे मिरज तालुक्यातील आरग गावचे. सध्या या राष्ट्रीय विजेत्या मल्लाची पत्नी आणि कन्या मिरज येथे एका भाड्याच्या घरात राहतात. मुले गावाकडे शेती करतात.
मिरजेत एखाद्या नगरसेवकाचं घर विचारलं असतं, तर आम्हाला त्याच्या घरात नेऊन पोहोचवलं असतं, पण बापूंचं घर मात्र शोधून सापडत नव्हतं. ‘बापू बेलदार…’ असं नाव विचारल्यावर माणसांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्हं दिसायची, ते पाहूनच आम्हाला त्रास होत होता. राष्ट्रीय कीर्तीच्या पैलवानाला हे शहर विसरलं आहे, हे वास्तव पचवायला जड जात होतं. शेवटी एकदाचं घर सापडलं. छोटीशी खोली होती. खोलीच्या भिंतीवर बापूंचे कुस्तीतील आणि मान्यवरांसोबतचे फोटो दिसत होते. त्याच खोलीत दाटीवाटीने सगळा संसार मांडलेला. आम्ही बापूंची माहिती घ्यायला आलोय, म्हटल्यावर त्यांच्या पत्नीने डोळ्याला पदर लावला. म्हणाल्या, ‘आवं, वाघ गेला. या सरावणात दोन वर्षे हुत्याली. आता कुठलं व दिसायला. दिसायच्या रस्त्याला न्हायती गेलं.’ मग त्यांच्या कन्या राणी यांनी बापूंबद्दल बरीच माहिती सांगितली.

आरग गावात बापूंचा जन्म झाला. वडील गवंडीकाम करायचे. दगडी बांधकाम करणे, हा बेलदार समाजाचा पारंपरिक व्यवसाय. भटके प्रवर्गात या समाजाची गणना होते. जन्मल्यानंतर सहा महिन्यांनी बापूंची आई वारली. त्यानंतर वडिलांनी त्यांचा सांभाळ केला, त्यांना आईची माया दिली. बापूंना लहानपणापासून व्यायामाची आवड होती. दांडपट्टा आणि कुस्ती हे आवडते खेळ. ते लहान असतानाच आरग शेजारील एरंडोली गावच्या तालमीत व्यायाम करत होते, कुस्त्यांचे धडे गिरवत होते. एक दिवस आरगच्या कुस्ती मैदानात त्यांनी कोंगनोळी येथील त्या काळात प्रसिद्ध असलेल्या शिवा पैलवान याच्यासोबत कुस्ती करून त्याला पराभूत केले.
बापूंचा हा पराक्रम पाहून आरग येथील लोक खुश झाले. त्यांनी बापूंची मिरवणूक काढली. ‘हा मुलगा गावचे नाव मोठे करेल’ या विश्वासाने गावकऱ्यांनी वर्गणी काढून बापूंना दुधासाठी म्हैस घेऊन दिली. विठ्ठल बोकारे आणि धनपाल वडगावे, यांनी यात पुढाकार घेतला होता. पुढे तर धनपाल वडगावे यांनी बापूंना कुस्तीतील चांगले प्रशिक्षण मिळावे म्हणून, मिरजेच्या बाबगोंडा पाटील या नामांकित वस्तादाकडे ठेवले. या वस्तादांनी बापूंना घडवले. या काळात बापूंच्या खुराकाचा सगळा खर्च वडगावे यांनी केला. मिरजेत आल्यावर बापू पैलवान म्हणून घडले. याच सुमारास त्यांनी अनेक मैदानं गाजवली. 1954 मध्ये त्यांनी आंध्रप्रदेशातील पदटटूर येथे झालेल्या आंध्रप्रदेश केसरी स्पर्धेत बिहारच्या सत्यम बाब, कर्नाटक केसरी मेहबूब काश्मिरी, रफिक पंजाबी, आंध्रचे कडाप्पा या पैलवानांना पराभूत करत ‘आंध्रप्रदेश केसरी’ हा किताब मिळवला. या स्पर्धेनंतर दक्षिण भारतातील एक तुफानी मल्ल म्हणून त्यांचा बोलबाला झाला.
4 मे ते 11 मे 1958 दरम्यान हैद्राबादला झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत बापूंनी जोरदार कामगिरी केली. त्यांनी पाच मोठ्या कुस्त्या केल्या. बिहारचे सत्यजितसिंह, म्हैसूरचे सुदर्शन, आंध्रप्रदेशचे रफिक मुल्ला, बंगलोरचे नरसिंम या मल्लांना पराभूत करत फायनलमध्ये गेले. फायनल कुस्तीत दिल्लीच्या गियानारायण यांना पराभूत करून, राष्ट्रीय विजेतेपद मिळवले. राष्ट्रीय स्पर्धा जिंकलेले बापू हे पहिले मल्ल ठरले. त्या वेळी त्यांना 500 रुपये आणि चांदीची गदा मिळाली होती. 1958 मध्ये या स्पर्धेला हिंदकेसरी हा किताब नव्हता, पण दुसऱ्या वर्षांपासून 1959 पासून ‘हिंदकेसरी’ किताब मिळू लागला. पण पहिली राष्ट्रीय स्पर्धा जिंकल्यामुळे बापूंना त्यांचे चाहते हिंदकेसरीच म्हणत.
बापूंच्या एकूण 400 कुस्त्या झाल्या. त्यापैकी सखाराम बागडी, जिनाप्पा अकिवाटे, छोटूलाल पंजाबी, केशव पाटील यांना बापूंनी पराभूत केले होते. श्रीपती खंचनाळे, गणपतराव आंधळकर, मारुती माने या ‘हिंदकेसरी’सोबतच्या त्यांच्या कुस्त्या बरोबरीत सुटल्या होत्या. तर रामचंद्र बीडकर यांनी बापूंना पराभूत केले होते. बेलदार समाजातील गवंडीकाम करणाऱ्या बापाचा मुलगा असलेले बापू बेलदार हे कष्टाच्या बळावर ‘कुस्तीतील वाघ’ झाले. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनीही बापूंचे कौतुक केले होते. बापूंच्या कीर्तीच्या काळात आरग येथे त्यांना जमीनही मिळाली. त्या काळात त्यांचे कौतुक झाले, पण उतरत्या काळात मात्र परवड झाली.
कुस्ती सुटल्यावर या राष्ट्रीय कुस्ती विजेत्याला वॉचमनची नोकरी करावी लागली. ती नोकरीही कालांतराने सुटली, मग उदरनिर्वाहासाठी ते शिलाईकाम करू लागले. पैलवानांचे लंगोट आणि चड्ड्या शिवू लागले. त्यांना कोणी भेटायला गेले तर घराबाहेर असलेल्या शिलाई मशीनवर ते शिवत बसलेले असायचे. रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्याला एक म्हातारा माणूस शिलाईकाम करत बसलेला दिसायचा, पण हा म्हातारा कधीकाळी शेकडो कुस्तीशौकिनांच्या गळ्यातील ताईत होता, कुस्तीतला वाघ होता, हे बिलकुल माहीत नव्हतं. अगदी शेजारील लोकांनाही त्यांच्याबद्दल माहिती नव्हती. राणी म्हणाल्या, ‘त्यांना आत्मचरित्र लिहायचं होतं, पण जमलं नाही. शेवटपर्यंत ते म्हणत होते, अंधारात ठेवलंय. मी जर दुसऱ्या जातील जन्माला आलो असतो, तर कुठल्या कुठं पोहोचलो असतो? पण मी भटक्या जातीत जन्मलो म्हणून माझी कदर केली नाही. ते बोलताना खूप आठवणी सांगायचे, गहिवरून जायचे.
कुस्तीत जातीचं राजकारण आहे, ठरावीक दोन-तीन जातीतील लोकांचाच कुस्ती क्षेत्रात प्रभाव आहे. या जातीय राजकारणाची झळ त्यांना बसली. बाहेरच्या स्पर्धेत पाठवताना त्यांचा विचार केला गेला नाही. नंतरच्या काळात त्यांना संधीच मिळू दिली नाही. त्यांना नकार देण्यासाठी अनेक तांत्रिक कारणं पुढे आणली. पण त्यांना नाकारण्याचं खरं कारण जात हेच होतं. त्यांच्या जोडीतले दुसरे पैलवान खूप पुढे गेले, म्हणजे त्यांना पुढे जाण्यासाठी संधी देण्यात आली. कुस्तीमुळे त्यांना खूप काही मिळाले, त्यांच्या नावाचा गवगवा झाला, आजही त्यांची नावं टिकून आहेत, कारण ते प्रस्थापित जातीतील होते, त्यांना सगळ्यांनी मदत केली. वडील मात्र अल्पसंख्य जातीतील असल्यामुळे त्यांची उपेक्षा झाली. ते कागदाचे भेंडोळे घेऊन अनेकांना भेटले, पण एकानेही त्यांची दाद घेतली नाही. त्यांना शेवटपर्यंत वाटायचं मानधन मिळावं, पण त्यांना मानधन मिळालं नाही. अण्णांचं आत्मचरित्र आलं असतं, तर आज कुस्तीच्या आधाराने मिरवणाऱ्या अनेकांचं बुरखाहरण झालं असतं, आणि कुस्तीतील गटबाजी, जातीय राजकारणही समोर आलं असतं. आता ते गेले, त्यांच्या पाठीमागे तरी कुस्तीच्या इतिहासात त्यांची नोंद घ्यावी.’
कुस्तीच्या इतिहासातील सोनेरी पान असलेल्या बापू बेलदार यांची उपेक्षा झाल्यामुळेच त्यांच्या कन्येने पुढाकार घेऊन त्यांचे एक अल्पचरित्र प्रकाशित केले आहे. त्यात बापूंच्या कुस्तीतील कामगिरीचा थोडक्यात आढावा घेतला आहे. बापूच्या पत्नी म्हणाल्या, ‘मरेपर्यंत त्यांना वाटायचं सरकारचा सांगावा येईल, पण त्यांना सांगावा आलाच नाही. त्यांना एकदा दोन हजार मिळाले होते, पुन्हा काहीही पैसे मिळाले नाहीत.’
भटक्या समाजातील गवंड्याचा मुलगा ते राष्ट्रीय पातळीवरील कुस्तीपटू, पुन्हा वॉचमन ते शिलाईकाम करणारा कारागीर, असा शोकात्म प्रवास बापूंच्या वाट्याला आला. ते अखेरच्या क्षणापर्यंत स्वतःची दखल घ्यावी म्हणून झगडत होते, पण त्यांची दखल घेतली गेली नाही. कुस्तीत भरीव कामगिरी केलेला हा माणूस कुस्तीतील जातीय राजकारणामुळे मान आणि सन्मान यापासून दूरच राहिल्याचा त्यांच्या कन्येचा राणी यांचा ठाम आक्षेप आहे. पण कुस्तीबद्दलची सरकारी पातळीवरची अनास्थासुद्धा बापू यांच्या उपेक्षेचं कारण असल्याचं काही कुस्तीप्रेमींचं मत आहे.
मी बापूंच्या घराच्या बाहेर पडलो. दारात एका बाजूला शिलाई मशीन होती. त्यावर कापड झाकलं होतं. मी विचारलं, ‘अण्णा याच मशीनवर शिलाईकाम करायचे ना?” ‘व्हय…’ राणी म्हणाल्या आणि मग एकदम त्यांना भरून आलं. त्यांचे डोळे पाण्याने डबडबले. हुंदके देतच त्या आत निघून गेल्या. मन सुन्न झालं. भरल्या डोळ्यांनी तिथून निघालो, तेव्हा बापू बेलदार नावाची शोकांतिका माझी सोबत करत होती…