जंगलात डोकावताना…!

‘हाऊ टू स्पीक इन पब्लिक?’, ‘हाऊ टू विन फ्रेण्ड‌्स?’, ‘हाऊ टू रिड बुक्स?’ अशी अनेक पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत. पण जंगल नावाचं पुस्तक कसं वाचायचं, असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. हा प्रश्न ज्यांना सतावतो आहे, त्यांच्यासाठी काही खास टिप्स...

  • सौरभ महाडिक

अरण्य म्हणजे जंगल. जंगलाचे वाचन म्हणजेच अरण्यवाचन. अरण्यावाचनाला ‘जंगल क्राफ्ट’ असेही म्हणतात. अरण्यात गेल्यावर तिथे अनेक अगम्य, दुर्मीळ बाबी आपल्याला आढळून येतात. त्या न कळल्यामुळे आपण त्यांचा आपापल्या परीने अर्थ लावतो. पण नुसते अर्थ लावणे किंवा शक्यता शोधणे हे अरण्यवाचन नाही. अरण्यवाचन हे सगळ्या बाबींचे अचूक उत्तर शोधणे आहे. जंगल हे अनेक घटकांपासून बनलेले असते. त्यात प्राणी आणि वनस्पती यांच्या अनेक प्रजातींचा समावेश असतो. या विविध घटकांचा परस्परसंबंध असतो. कुठे तो सहज दिसतो, तर कुठे तो अदृश्य असतो. मात्र हा सहजसंबंध शोधणे हासुद्धा अरण्यवाचनाचाच एक भाग आहे.

जंगलातील वनस्पतीय घटकांमध्ये वृक्ष, वेली, झुडपे, गवत इत्यादींचा समावेश होतो. या घटकांना चालता किंवा पळता येत नाही, त्यामुळे त्यांचे निरीक्षण बरेच सोपे असते. मात्र जीवित घटक हीच कुठल्याही वन्यजीव निरीक्षकासाठी आकर्षणाची व सर्वाधिक कठीण बाब असते. जीवित घटक चालतात, धावतात, उडतात, लपतात; त्यामुळे त्यांचे निरीक्षण करणे कुठल्याही वन्यप्रेमीसाठी आनंदाची बाब असते. पण प्रत्येक गोष्टीचा अर्थ लावण्याकरिता तुम्हाला अरण्यवाचनाची चांगली जाण पाहिजे. जनावरांच्या कित्येक खाणाखुणा अगम्य असतात. त्या नीट, संगतवार लावून त्यातून अर्थ काढणे यालाच ‘अरण्यवाचन’ म्हणतात.

निरीक्षण हा अरण्यवाचनातला सर्वाधिक महत्त्वाचा भाग आहे. याशिवाय तुमचे अरण्यवाचन सुरूच होऊ शकत नाही. निरीक्षक जेवढा उत्सुक, बारीक नजरेने पाहणारा असेल तेवढ्या त्याला अरण्यवाचनासाठी आवश्यक बाबी लवकर दिसतील. अरण्यवाचन हे पुस्तक वाचून न कळणारे शास्त्र आहे. किंबहुना हे वाचनाचे शास्त्रच नाही. याकरिता जेवढे जास्त जंगलात जाणे होईल, तेवढा निरीक्षक या शास्त्रात पारंगत होईल. मात्र तरीही काही महत्त्वाच्या बाबींबद्दल त्याला आधीच माहिती असणे आवश्यक असते. त्याशिवाय जंगलात कुठलीही गोष्ट कळायला फार कठीण असते. सोबत तज्ज्ञ मार्गदर्शक किंवा पारंगत निसर्ग अभ्यासक असला की अरण्यवाचन सोपे होते व त्याची गोडीही वाढत जाते.

अरण्यवाचन म्हटले की, जंगल हे आलेच. पण ते फक्त जंगलातच करता येते, असे नाही. माळरान, तळी, धरणे, पाणवठे, बागा, मोकळी मैदाने या ठिकाणीदेखील बरीच जीवित सृष्टी राहात असते. त्यांच्या निरीक्षणासाठी गेल्यावर या जागी पण अरण्यवाचनाची कला उपयोगात आणता येते. मात्र तरीही अरण्यवाचनाचा जंगल हा मुख्य आधार आहे. जंगलातील वेगवेगळ्या गोष्टींमुळे अरण्यवाचनाला जास्त वाव असतो. तिथे वन्यजीव, पक्षी, कीटक, फुलपाखरे, उभयचर प्राणी, सरपटणारे प्राणी अशी बरीच जीवित सृष्टी वास करते, त्यामुळे या सगळ्यांच्या खाणाखुणा कुठे ना कुठे उमटलेल्या असतात. त्यांचा शोध घेण्याचे कार्य जंगलातच उत्तम प्रकारे होऊ शकते.

अरण्यवाचनाचे वन्यजीव निरीक्षकाला बरेच फायदे व उपयोग आहेत. जंगल हे उघड्या पुस्तकासारखे असते. त्यात वन्यजिवांच्या पावलांची लिपी असते, झाडांच्या खोडावरील नक्षी असते, कुरतडलेली पाने असतात, वेगवेगळी विष्ठा असते, जागोजागी रेघोट्या किंवा खड्डे असतात. ही सगळी नवख्या निरीक्षकाला अगम्य वाटावी अशीच भाषा असते. याचा आपापल्या परीने अर्थ लावण्याचा प्रयत्न प्रत्येक निरीक्षक करतो, पण खाणाखुणांचे अचूक अर्थ त्याला लागलीच कळतात. त्या अर्थाच्या साहाय्याने तो तिथे घडलेल्या घटनेचा अप्रत्यक्ष साक्षीदार बनतो. त्या खुणांचे अर्थ ध्यानात घेऊन त्याला पुढचे निरीक्षण बरोबर करता येते. अचूक अरण्यवाचनामुळे निरीक्षणाला बरोबर दिशा मिळते. त्यातील अचूकता वाढते. जनावरांचा माग नीट काढता येतो. वन्यजिवांच्या अभ्यासामध्ये या बाबी खचितच फार महत्त्वाच्या आहेत. समोर दिसत नसलेली गोष्ट अरण्यवाचनाच्या साहाय्याने हुडकून काढणे तज्ज्ञाला शक्य होते. कधीकधी तर जंगलातली भाषा एवढी गूढ असते की, तिचा अर्थ लावायला खूप त्रास होतो. कधी खूप वेळही जातो, पण तज्ज्ञ अरण्यवाचकाला ती बरोबर वाचून तिचा अर्थ चटकन लावता येतो.

अरण्यवाचन अनेक प्रकारे करता येते. जंगलात किती भागात अरण्यवाचन करायचे आहे, त्यावर कोणते साधन वापरायचे, हे ठरवता येते. अरण्यवाचन जंगलात पायी चालून, दुचाकी वा चारचाकी वाहनातून, हवाईमार्गेसुद्धा करता येते. आपल्याकडे साधने नसल्याने हवाईमार्गे अरण्यवाचन अशक्यच आहे. पण दुचाकी किंवा चारचाकी वाहन आपण वापरू शकतो. यामुळे निरीक्षकाला कमी वेळात जास्त अंतर तोडता येते. जिथे रोजच खूप अंतर कापून निरीक्षण करण्याची गरज असते, तिथे वाहन वापरून अरण्यवाचन करता येते; पण ही खर्चिक बाब आहे. त्याचबरोबर या प्रकारात तुम्ही वेगात जात असल्यामुळे तुमच्या नजरेतून वाटेवरच्या पाऊलखुणा, झाडांवरचे नखांचे व्रण, लहान प्राणी, पक्षी, कीटक व इतर अनेक बाबी निसटून जाण्याची शक्यता असते. वाहनातून जाताना काही वेळेस तर लक्षात न आल्यामुळे जनावरांच्या पाऊलखुणासुद्धा चाकाखाली पुसल्या जाऊ शकतात.

संबंधित वृत्त :

अरण्यवाचन करण्याचा सगळ्यात चांगला मार्ग आहे, पायी चालत जाऊन निरीक्षण करणे. पायी चालताना वेग अगदी हळू असतो, त्यामुळे नीट सगळीकडे बघत चालता येते. या सगळ्या कारणांमुळे कुठलीही बाब नजरेतून सुटण्याची शक्यता कमी असते. चालताना काही दिसल्यास चटकन थांबता येते. कुठल्याही खाणाखुणा दिसताच त्यांच्याजवळ जाऊन हवा तेवढा वेळ निरीक्षणही करता येते. त्याचा नीट अर्थ लावायला भरपूर वेळ मिळतो. मात्र यालाही सध्याच्या काळात बंधने आली आहेत. वन्य प्राण्यांची चोरटी शिकार, जंगलतोड, गुरचराई यामुळे जंगले नष्ट होत आहेत. त्यामुळे शासनाने बऱ्याच जंगलांना व्याघ्रप्रकल्प, राष्ट्रीय उद्याने किंवा अभयारण्यांचा दर्जा देऊन संरक्षित घोषित केले आहे. अशा जंगलांमध्ये माणसांचा वावर निषिद्ध असतो. मात्र वन्यजीवप्रेमींना निरीक्षणाकरिता विशिष्ट अटींवर आत सोडले जाते. सध्या बऱ्याच अभयारण्यांमध्ये वन्य प्राण्यांना व माणसांनाही त्रास होऊ नये, म्हणून माणसांना पायी फिरायला बंदी घातली आहे. पण काही अभयारण्यांत असे पायी फिरण्याकरिता वनविभागाने विशेष ‘निसर्ग पायवाटा’ तयार केलेल्या आहेत. ज्या ठिकाणी जायचे असेल तिथल्या वनाधिकाऱ्यांची परवानगी घेऊनच मग जंगलात जावे, सगळीकडेच बघितल्यावर जंगलात झाडेच झाडे दिसतात, त्यामुळे जंगल फार फसवे असते. माहिती नसलेल्या जंगलात तुम्ही सहज चुकू शकता.

त्यामुळे नेहमी अशा जंगलात अरण्यवाचनासाठी जाताना सोबत माहितगार वाटाड्या घेणे खूपच आवश्यक असते. तो नुसते रस्ते, रानवाटा, पाणझरे, पाणवठेच दाखवणार नाही, तर त्याच्याकडून तुम्हाला वन्यजीव, पक्षी, वृक्षवेली व जंगलाबद्दल अतिशय रोमांचक माहितीसुद्धा मिळेल. असे वाटाडे बहुतेक जंगलात राहणारे स्थानिक लोक किंवा आदिवासीच असतात. सदोदित जंगलात फिरत असल्यामुळे त्यांच्याजवळ माहितीचा मोठा साठा असतो. त्यांच्या सोबतीने जंगलात गेल्यावर तुम्हाला अरण्यवाचनाची कला आत्मसात करण्याकरिता लागणारी अनेक प्रकारची माहिती मिळवता येईल. अशा वाटाड्यांना जनावरांच्या गुहा, खारमातीचे चाटण, लोटण हे पण माहीत असते. या माहितीचा खूप उपयोग वन्यजीव निरीक्षणामध्ये होतो. तुम्हाला वन्यजिवांबद्दल शास्त्रीय माहितीची गरज असेल तर त्याकरिता एखादा तज्ज्ञ अभ्यासक सोबत असणे आवश्यक आहे. त्याच्याकडून तुम्हाला सगळ्या घटकांची शास्त्रीय नावे, आढळ, घनता, संख्या, शास्त्रोक्त मोजणीच्या पद्धतींची माहिती घेता येईल. जसे गुरुशिवाय ज्ञान मिळत नाही, तसेच जंगलही तज्ज्ञांच्या सोबतीविना वाचता येणे कठीण असते. अरण्यवाचनाची सुरुवात करताना असा वन्यजीव तज्ज्ञ सोबती मिळाल्यास तुम्हाला जंगल चटकन वाचता येणे शक्य होईल.

अरण्यवाचन ही कोणत्याही वन्यजीव निरीक्षकासाठी अतिशय आवश्यक कला आहे. जंगल उत्तमरीत्या वाचता आल्याशिवाय त्याचा नीट आनंद घेता येणे शक्य नाही. जंगलात गेल्यावर कुठूनही अरण्यवाचन सुरू होऊ शकते. पण त्याकरिता तुम्हाला बरीच तयारी करणे आवश्यक असते. अरण्यवाचनासाठी काही अत्यंत महत्त्वाचे साहित्य तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे. त्याशिवाय तुम्हाला जंगलात अरण्यवाचन करताना बऱ्याच अडचणी येण्याचा संभव असतो. हे महत्त्वाचे साहित्य रानात फिरताना सतत जवळ बाळगावे लागते. कुठेही त्याचा उपयोग होऊ शकतो.

अरण्यवाचनासाठी जंगलात जाताना तुमच्याजवळ पाठीवरची पिशवी किंवा हॅवरसॅक असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या पिशवीमुळे तुमचे दोन्ही हात कोणतीही वस्तू धरायला मोकळे राहतात. हॅवरसॅक शक्यतो हिरव्या खाकी किंवा गडद रंगाची असावी. अरण्यवाचनाकरिता जंगलात जाताना किती दूर जावे लागेल, किती चालावे लागेल, याचा अंदाज नसतो. त्यामुळे पाण्याची बाटली बरोबर घेणे अत्यावश्यक आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत भरपूर चालण्यामुळे घामाच्या धारा लागतात. त्या वेळी मिठाची कमतरता भरून काढण्याकरिता एक इलेक्ट्रॉल पावडरचे पाकीट असू द्यावे. फार दूर जावे लागले तर भूक लागण्याची शक्यता असते. त्यामुळे एखादा बिस्किटाचा पुडा असावा. एखादे होकायंत्र, बारीक वस्तू नीट बघण्याकरिता भिंग, जनावरांच्या पाऊलखुणा मोजण्याकरिता टेप, नोंदवही, पेन, स्केच पेन, लेंड्या किंवा काही इतर वस्तू गोळा करण्याकरिता प्लास्टिकच्या पिशव्या असू द्याव्यात.

जंगलात अरण्यवाचनासाठी भटकताना लहान कीटक, कोळी, जनावरांच्या व पक्ष्यांच्या विष्ठा, फुलपाखरांची व कीटकांची अंडी अशा बारीक वस्तू दिसतात. त्यांचे नीट निरीक्षण करण्याकरिता भिंगाचा चांगलाच उपयोग होतो. भक्षक जनावरांच्या विष्ठेतील प्राण्यांचे केस, कीटकांचे अवशेष पण भिंगातून नीट बघून ओळखता येतात. फुलपाखरांच्या अंड्यासारखी लहान वस्तू तर यामुळे आश्चर्यजनकपणे मोठी करून बघता येते. वाघ, बिबळ्या अशा जनावरांच्या पाऊलखुणा जंगलात खूप ठिकाणी आढळतात. त्या खुणा मोजल्याशिवाय जनावरांच्या लांबीचा अंदाज करता येत नाही. याकरिता तुमच्याजवळच्या साहित्यामध्ये मेझरिंग टेप असणे गरजेचे आहे. कधी कधी तृणभक्षी प्राण्यांच्या लेंड्या लगेच ओळखू येत नाहीत. त्या तज्ज्ञांकडून नंतर ओळखून घेण्याकरिता गोळा करणे आवश्यक असते. कित्येक वेळेस वाघाची विष्ठाही गोळा करावी लागते. त्याकरिता वरून बंद करता येईल, असे प्लास्टिकचे पाकीट जवळ बाळगावे. पाकिटावर स्थळ, काळ, दिनांक, वेळ यांची नोंद त्वरित करणे अत्यावश्यक असते. त्याकरिता साहित्यामध्ये एक पर्मनन्ट मार्कर पेन पण असावे. वाघ व बिबळ्यांच्या ठशांचे ट्रेसिंग करण्याकरिता स्केच पेन, ट्रेसिंग ग्लास हेही जवळ असावे. या सगळ्या बाबींची नोंद ठेवण्याकरिता नोंदवही व पेन पण असावे. त्याचबरोबर टॉर्च, लहान चाकू, जंगलाचा नकाशाही असावा.

जंगलात अरण्यवाचनाकरिता जाताना जनावरे, पक्षी खूप दूरवर दिसतात. त्यांना नीट बघून ते ओळखणे फार आवश्यक असते. पण दुर्बिणीअभावी ते शक्य होत नाही. याकरिता चांगल्या प्रतीची दुर्बीण गळ्यात असणे फार महत्त्वाचे असते. दुर्बिणीमुळे तुम्ही जनावरांच्या फार जवळ न जाताही त्यांचे छान निरीक्षण करू शकता. मचाण किंवा लपणातून तर दुर्बीण खूपच उपयोगी सिद्ध होते. जनावरांच्या जवळ न जाता निरीक्षण केल्याने त्याला तुमचा सुगावा लागत नाही आणि ते पळून जात नाही. शिवाय त्यामुळे त्याच्या सगळ्या नैसर्गिक वागणुकीचे चांगले निरीक्षण करता येते. दुर्बिणी हल्ली वेगवेगळ्या प्रकारात मिळतात. त्यापैकी 8×30, 7×35, 8×40, 10×50 या उत्तम दुर्बिणी आहेत. वन्यजिवांच्या निरीक्षणाकरिता 7×50 दुर्बीण फार चांगली असते. दूरचे निरीक्षण करायचे असेल तर 10×50, 8×40 या चांगल्या दुर्बिणी आहेत. साधारणत: 50च्या वर फील्ड डिग्री असणारी दुर्बीणच घ्यावी. त्यामुळे पळणारा प्राणी किंवा उडणारा पक्षी चटकन बघता येतो. दुर्बीण साधारणत: 3000 रुपयांपासून पुढे मिळू शकते. चांगल्या कंपनीच्या दुर्बिणीला जास्त किंमत पडते. पण अरण्यवाचकाने त्याचे बजेट बघून दुर्बिणीची निवड करावी.

अरण्यवाचन करताना दिसणाऱ्या जनावरांचे किंवा पक्ष्यांचे प्रकाशचित्र घेणे त्यांना ओळखण्याकरिता फार आवश्यक असते. जंगलात ओळखू न आलेला कुठलाही वन्यजीव फोटो घेऊन ठेवल्यास नंतर तज्ज्ञांकडून ओळखून घेता येतो. कॅमेरा हे महत्त्वाचे उपकरण असले तरी ते फार महागडे आहे. यामध्ये मॅन्युअल व ऑटोफोकस असे दोन प्रकार येतात. मॅन्युअल कॅमेरा संपूर्णत: हातानेच वापरला जातो. ऑटोफोकस कॅमेरे मात्र परिस्थितीनुसार अ‍ॅपॅरचर शटरस्पीड सेट करतात. मात्र ऑटोफोकस कॅमेरे महाग असतात. लेन्स हा कॅमेऱ्याचा महत्त्वाचा घटक. वन्यजीव व पक्ष्यांच्या प्रकाशचित्रणासाठी किमान 300 मि.मी.ची लेन्स आवश्यक असते. लेन्स व मॅन्युअल कॅमेरा साधारण 20,000 पर्यंत येतो. कॅनन किंवा निकॉन या कंपन्यांचे कॅमेरे उत्तम प्रतीचे मानले जातात व प्रकाशचित्रीकरणासाठी वापरले जातात. लहान कीटक, फुलपाखरांसाठी मॅक्रो लेन्स वापरावी लागते. सध्या ‘क्लोजअप लेन्स’ फार कमी किमतीला मिळतात. त्यांचाही वापर करून अरण्यवाचकाला उत्तम फोटो घेणे शक्य आहे.

अरण्यवाचन करताना वन्यजिवांबद्दलचे उत्तम संदर्भग्रंथ जवळ असणे आवश्यक असते. त्यामुळे तुम्हाला त्या जनावरांची, त्यांच्या सवयी, अधिवासाची माहिती मिळू शकते. वन्यजिवांसाठी ‘बुक ऑफ इंडियन अ‍ॅनिमल्स’, तर पक्ष्यांसाठी डॉ. सलीम अलींचा ‘बुक ऑफ इंडियन बर्ड‌्स’ हे संदर्भग्रंथ वापरावे. फुलपाखरांकरिता ‘विश्व प्रकृती निधी’ने तयार केलेले पुस्तक वापरले तरी चालेल. उत्तम संदर्भपुस्तकांशिवाय अरण्यवाचन शक्य होत नाही. ज्या भागात अरण्यवाचनासाठी जायचे आहे, तिथे कोणकोणती जनावरे व पक्षी दिसतात, हे आधीच पुस्तकात बघून निघावे. त्यामुळे प्रत्यक्ष जंगलात त्यांना चटकन ओळखता येईल, घोळ होणार नाही व अरण्यवाचनाची मौज द्विगुणित होईल. या सर्व गोष्टींचे भान ठेवून व त्या आचरणात आणून अरण्यवाचनाकडे एक आव्हान म्हणून न बघता एक कला म्हणून जोपासायचा प्रयत्न केल्यास व जंगलातील प्राणीमात्र आचरणात आणत असलेला ‘जीवो जीवस्य जीवनम्’ हा मंत्र आपणही आचरणात आणल्यास आपल्यालाही जंगलाचे पुस्तक वाचणे अत्यंत सोपे जाईल.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here