- टीम बाईमाणूस
शादी डॉट कॉम या मॅट्रिमोनियल साइटने केलेल्या ताज्या संशोधनातून असे दिसून आले आहे की, नोकरी करणाऱ्या महिलांना जोडीदार म्हणून अधिक पसंती मिळत आहे. Shaadi.com ही भारतातल्या सर्वात लोकप्रिय वैवाहिक साइट्सपैकी एक आहे आणि जोड्या जुळवून आणण्याच्या उद्योगात ही कंपनी मागील दोन दशकांपासून काम करत आहे. आजपर्यंत 50 दशलक्षाहून अधिक भारतीय वापरकर्ते त्याच्या सेवांचा आनंद घेतात.
Shaadi.com द्वारे करण्यात आलेल्या एका ताज्या सर्वेक्षणात भावी जोडीदाराच्या गुणांबाबत रंजक माहिती समोर आली आहे. या संशोधनात वय, स्थान, व्यवसाय आणि उत्पन्न यांचा समावेश होता. वैवाहिक जीवनाचा विचार करताना एखादी व्यक्ती आपल्या जोडीदारामध्ये कोणती वैशिष्ट्ये शोधते यावर या अभ्यासात प्रकाश टाकण्यात आला आहे.
हे संशोधन 2.5 दशलक्ष वापरकर्त्यांवर आधारित आहे ज्यांनी 1 डिसेंबर 2021 ते 31 डिसेंबर 2022 पर्यंत ही वेबसाईट वापरली होती. 2.5 दशलक्ष वापरकर्त्यांपैकी 0.9 दशलक्ष महिला आणि 1.6 दशलक्ष पुरुष होते. या अभ्यासात केवळ अशा वापरकर्त्यांचा विचार केला गेला ज्यांनी त्यांच्या जोडीदाराबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी किमान एक आठवडा ही वेबसाईट सक्रियपणे वापरली होती.

सरकारी नोकऱ्यांतील महिलांना अभ्यासात अधिक प्राधान्य दिल्याचे दिसून आले. या अभ्यासानुसार विवाहासाठी सर्वात पात्र महिला ही कायदा अंमलबजावणी अधिकारी आहे. वार्षिक 30 लाख कमावणार्या महिलांना 17 टक्के जास्त पसंती मिळत असल्याचेही या अभ्यासात दिसून आले. एव्हिएशन सेक्टर आणि आर्किटेक्चरमधील महिलांना या यादीत सर्वोच्च स्थान देण्यात आले आहे.
या अभ्यासानुसार काम न करणाऱ्या महिला या काम करणाऱ्या महिलांपेक्षा 31 टक्क्यांनी पसंतीच्या बाबतीत मागे आहेत. या अभ्यासावर प्रतिक्रिया देताना AVP मार्केटिंग आदिश झवेरी म्हणाले की, “हा अभ्यास दर्शवतो की, एक राष्ट्र म्हणून, आम्ही विवाहांमध्ये लैंगिक समानतेसाठी योग्य दिशेने वाटचाल करत आहोत खऱ्या अर्थाने संतुलित नातेसंबंधांच्या बाबतीत आम्हाला अजून बराच पल्ला गाठायचा आहे. भारतीय तरुणांना कशा पद्धतीची बायको हवी आहे याबाबतचा हा प्रामाणिक अभ्यास आहे. विवाहानंतर या जोड्यांचा संसार कसा असेल हे या निवडींवरून दिसून येते. नोकरी करणार्या महिलांसाठी आणि विशेषत: जास्त उत्पन्न असलेल्यांसाठी असणारी पसंती ही अत्यंत सकारात्मक निदर्शक आहे. महिलांचा कार्यक्षेत्रातील वाढता सहभाग यामुळे दिसून येतो.”