- आशय बबिता दिलीप येडगे
नेदरलँडमधल्या एका न्यायालयाने जगभरातील महिलांसाठी एका अतिशय महत्वाचा निकाल दिला आहे. भारतासारख्या देशात जिथे सेक्स, लिंग, लैंगिक संबंध असे शब्द उच्चारले की उपहासाने किंवा आश्चर्याने अजूनही कान टवकारले जातात. या देशात राहणाऱ्या कोट्यवधी स्त्री, पुरुष आणि इतर लिंगभाव असणाऱ्या लोकांनी या न्यायालयाने दिलेल्या निकालाकडे अतिशय सजगपणे पहिले पाहिजे आणि जग एवढ्या नाजूक प्रकरणाची हाताळणी कशापद्धतीने करते आणि मानवी शरीराच्या संदर्भात घडणाऱ्या गुन्ह्यांकडे किती संवेदनशीलतेने पहिले जाते हे सुद्धा आपण शिकले पाहिजे. भारतात एकीकडे सामूहिक बलात्कार प्रकरणामध्ये दोषी आढळलेल्या बलात्काऱ्यांना त्यांच्या शिक्षेचा कालावधी संपण्याच्या आधीच तुरुंगातून सोडले जात असताना, ती सामूहिक बलात्कार पीडित महिला जिवंत असताना तिच्यासमोर तिच्यावर बलात्कार केलेल्यांचे हारतुरे घालून सत्कार केले जात असताना नेदरलँडमधील एका न्यायालयाने त्या देशाच्या इतिहासात पाहिलांदाच लैंगिक संबंध प्रस्थापित करत असताना पुरुष साथीदाराने महिलेला कसलीही कल्पना न देता कंडोम काढल्याने शिक्षा सुनावली आहे. होय तुम्ही बरोबर ऐकलंत ही शिक्षा बलात्कारासाठी नसून महिलेची संमती न घेतल्याने दिली गेली आहे. आता हा निकाल का महत्वाचा आहे, आपण या निकालाकडे कसे पाहिले पाहिजे आणि जगभरातील महिला या निकालाचा वापर कशापद्धतीने करून घेऊ शकतात आणि स्वतःच्या शरीरावर असणारा त्यांचा हक्क कसा स्थापित करू शकतात ही आपण पाहूया.
नेमके प्रकरण काय आहे?
नेदरलँडमधल्या एका न्यायालयाने एका 28 वर्षीय युवकाला शारीरिक संबंधांदरम्यान साथीदाराला न सांगता कंडोम काढल्याने दोषी ठरवले आहे. हा निकाल देताना हे न्यायालय म्हणाले की या आरोपीने असुरक्षित लैंगिक संबंध बनविण्यासाठी या महिलेवर बळजबरी करून तिचे ‘वैयक्तिक स्वातंत्र्य’ आणि ‘विश्वास’ तोडला आहे आणि त्यामुळे तो दोषी आहे. नेदरलँडमध्ये राहणाऱ्या या सीरियन वंशाच्या व्यक्तीला या गुन्ह्यासाठी तीन महिन्यांचा कारावास आणि 1000 युरोचा दंड ठोठावला आहे. आरोपीने महिलेवर असुरक्षित लैंगिक संबंधांसाठी बळजबरी केल्याचे कबूल केले तिचा विरोध असतानाही त्याने तसे केल्याचे न्यायालयात सांगितले.

आता याला इंग्रजी शब्द आहे स्टेल्थिंग (Stealthing) याचा अर्थ असा होतो की एखाद्या पुरुषाने लैंगिक संबंधांच्या आधी किंवा दरम्यान जोडीदाराला कसलीही कल्पना न देता कंडोम काढले तर त्या प्रकाराला स्टेल्थिंग म्हणले जाते. हा एकप्रकारचा गुन्हाच असून लैंगिक संबंधांमध्ये महिलेची संमती किती महत्वाची आहे हे सांगणारा हा निकाल म्हणावा लागेल. कधी कधी एखाद्या व्यक्तीद्वारे कंडोम वापरावा लागू नये म्हणून बॉक्समध्ये असतानाच कंडोमला छिद्र पाडण्याचे प्रकार केले जातात किंवा कंडोम फाडले जातात तो देखील एक गुन्हाच आहे. या अशाप्रकारच्या गैरवर्तनामुळे महिलांना अनेकदा लैंगिक आजारांचा किंवा मग नको असलेल्या गर्भधारणेचा सामना करावा लागतो. बळजबरीने केलेल्या लैंगिक संबंधांप्रमाणेच याकडे पाहिले पाहिजे.
लैंगिक संबंधांदरम्यान होणाऱ्या गुन्ह्यांची हाताळणी कशापद्धतीने करायची, अशा गुन्ह्यांची व्याख्या कशी करायची यावर जगभरातील न्यायाधीश विचार करत असताना स्टेल्थिंगचे प्रकार जगभर वाढले आहेत. खरंतर वाढले आहेत असे म्हणण्यापेक्षा याविरोधात महिला आता जागरूक झाल्या आहेत आणि अशी प्रकरणे समोर येत आहेत असेच म्हणावे लागेल आणि यामुळेच कदाचित नेदरलँडसारख्या पुढारलेल्या देशांमध्ये अशा प्रकरणात पीडित झालेल्या महिलांनी याविरोधात एकवटण्यासाठी Stealthing.nl सारख्या वेबसाईटच्या माध्यमातून एक आंदोलन उभे केले आहे. मात्र अजूनही या अशा प्रकारच्या आरोपांना बलात्कारासारखेच पहिले जात असल्याने यावर वेगळा न्यायनिवाडा करणे अवघड होऊन बसले आहे.
मात्र आता नेदरलँडच्या या न्यायालयाने या प्रकरणात दिलेला हा निकाल एक दिशादर्शक म्हणून काम करू शकेल. लैंगिक संबंधांदरम्यान दोन्ही जोडीदारांची असणारी संमती आणि एकमेकांवर असणाऱ्या विश्वासाचे महत्व अधोरेखित करणारा हा निकाल म्हणावा लागेल. अशा पद्धतीच्या गुन्ह्याला बळी पडलेल्याना न्याय देण्यासाठी प्रशासक आणि न्यायव्यवस्थेला हा निकाल नक्कीच मदत करू शकेल. जगभरात या निकालाचा वापर करता येऊ शकतो आणि असे गुन्हे केलेल्यांना त्यांच्या गुन्ह्याची जाणीव करून देऊन शिक्षा दिली जाऊ शकते.
भारतात काय परिस्थिती आहे?
केवळ नेदरलँडच नाही तर याआधी अशा गुन्ह्यांमध्ये जर्मनी, स्वित्झर्लंड आणि न्यूझीलंड सारख्या देशांमध्येही असे निकाल देण्यात आलेले आहेत. अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्येही या प्रकाराला गुन्हा ठरवण्यात आले आहे. अनेक देशांनी असे कायदे बनवूनसुद्धा भारतीय न्यायव्यवस्थेला आणि एकूणच भारतीय प्रशासनाला स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानांतरही हा प्रश्न कधीच महत्वाचा वाटलेला नाही. ज्या देशात अजूनही समाजाचा ठपका बसेल या भीतीमुळे बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांच्या विरोधात तक्रारी दाखल केल्या जात नसताना लैंगिक संबंधांदरम्यान घडणाऱ्या स्टेल्थिंग सारख्या गुन्ह्याला ‘गुन्हा’ समजण्याची हिंमतही या समाजात, सरकारी व्यवस्थेत आणि न्यायपालिकेकडे एवढेच काय तर यामुळे पीडित झालेल्या व्यक्तींकडेही नाही.

संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी (UNFPA)ने जगभर केलेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले की जगभरातील तब्बल 12.1 करोड महिलांना त्यांची इच्छा नसताना गर्भवती व्हावे लागते आणि अनिच्छेने गर्भवती झालेल्या सातपैकी एक महिला ही भारतातून असल्याचेही या सर्वेक्षणात आढळून आले आहे. ‘अनपेक्षित गर्भधारणेची कारणे आणि ते रोखण्यासाठी केले जाणारे उपाय’ यावर भारताने अधिक गुंतवणूक करण्याची आवश्यकता असल्याचे यामध्ये सांगण्यात आले आहे.
अनिच्छेने होणाऱ्या गर्भधारणेकडे संवेदनशीलतेने पाहणे गरजेचे आहे. महिलांचा त्यांच्या शरीरावर असणारा हक्क समजून घेणे आणि त्यांना तो देऊ करणे आपल्या समाजाच्या आणि देशाच्या सुरक्षित भवितव्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. मुळात लैंगिक शिक्षणाची वानवा असताना या देशात अजूनही लैंगिक संबंधांच्या बाबतीत असणारी उदासीनता, अडाणीपणा आणि एका सामूहिक शहाणपणाचा गंभीर अभाव दिसून येतो आणि यामुळे दरवर्षी लाखो महिलांना त्यांचे जगणे उध्वस्त करून घ्यावे लागते हे मात्र नक्की.