एक आहे बॉलिवूड आणि एक आहे लॉलिवूड…

एक आहे, बॉलिवूड आणि एक आहे लॉलिवूड. एक भारतातलं दुसरं पाकिस्तानातलं. एक भारताची शान आणि दुसरी पाकिस्तानची शोकांतिका. आधी कट्टरपंथी राज्यकर्त्यांनी लॉलिवूडच्या अस्त्तित्त्वाला नख लावलं. मग भारतद्वेषामुळे बॉलिवूडवर बंदी आली, पाठोपाठ पाकिस्तानी कलाकारांसाठी भारताचे दरवाजे बंद झाले. पदरी पैसा नाही, नवकल्पनांचे धुमारे नाहीत. तंत्रप्रगतीला वाव नाही. परिणाम, पाकिस्तानी लॉलिवूड मरणपंथाला लागले. गुणवत्ता, क्षमता आणि सृजनशीलता असूनही दुर्दैवाच्या फेऱ्यात सापडलेल्या सीमेपलीकडच्या फिल्म इंडस्ट्रीची ही दर्दभरी कहाणी…

  • अभिजात शेखर

गेल्याच आठवड्यात पाकिस्तानच्या लाहोर येथील एका विद्यापिठात चक्क ‘बॉलिवूड डे‘ साजरा करण्यात आला. या उत्सवामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी भारतीय मनोरंजन सृष्टीतील शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान, ऋतिक रोशन आणि अनेक भारतीय अभिनेत्याच्या गाजलेल्या भूमिकांचा पेहराव करून उत्सवाला चार चांद चढवले होते. सलमान खानचा चुलबुल पांडे किंवा शाहरुख खानचा राहुल आणि रणबीर कपूरचा रॉकस्टार अशा विविध वेशभूषा मध्ये विद्यार्थ्यांनी विद्यापीठात येऊन कार्यक्रम सादर केले. विशेषत: विद्यार्थी आणि युवावर्गाने लाहोर विद्यापीठातील या उपक्रमाचे कौतुक केले असून देशात इतरत्र असे कार्यक्रम घ्यावेत अशी मागणी केली आहे. पाकिस्तानमधील सोशल मीडियावरून या विषयावर दोन गट पडले असून दोनही गट हिरिरीने आपली भूमिका मांडत आहेत. मनोरंजन क्षेत्राला कोणत्याही प्रकारचे धार्मिक वळण किंवा दोन देशातील संघर्षाचे वळण दिले जाऊ नये, अशा प्रकारची भूमिका युवा पिढीने घेतली आहे.

लाहोरमधील या ‘बॉलिवूड डे’ च्या निमित्ताने भारताचे बॉलिवूड आणि पाकिस्तानचे लॉलिवूड यांचा आढावा घेणे क्रमप्राप्त ठरते.

तो एक जमाना होता, पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्रीमध्ये वर्षाला जवळपास दीडशे चित्रपटांची निर्मिती व्हायची. परंतु आज पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्री दिवाळखोरीच्या वाटेवर आहे. फाळणीनंतरच्या काही दशकांनंतर भारतीय फिल्म इंडस्ट्रीचे बॉलिवूड तर पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्रीचे लॉलिवूड असे जरी नामकरण झाले असले, तरी खरी परिस्थिती अशी आहे, की बॉलिवूडनामे हिंदी फिल्म इंडस्ट्री आज थेट हॉलिवूडला टक्कर देतेय आणि पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्री मात्र स्वत:चे अस्तित्त्व शोधताना कसोशीने संघर्ष करतेय. अशातच आता पाकिस्तानमध्ये प्रश्न विचारले जात आहेत की, अखेर या फिल्म इंडस्ट्रीचे भविष्य तरी काय असणार आहे?

एकीकडे भारतीय चित्रपटांवर पाकिस्तानमध्ये बंदी आहे आणि दुसऱ्या बाजूला थिएटरमध्ये पैसे खर्च करून चित्रपट बघावा इतक्या लायकीचे पाकिस्तानमध्ये चित्रपट तयार होत नाहीत. त्यात कोरोनानंतर तर उरलीसुरली आशाही संपुष्टात आली. जगभराची फिल्म इंडस्ट्री वाढत असताना पाकिस्तानी निर्मात्यांकडे चित्रपटावर लावण्यासाठी पैसेच नाहीत. या घडीला सबंध पाकिस्तानात चित्रपटांसाठी फक्त 150 स्क्रीन्स शिल्लक आहेत. त्यातच जर एखादा पाकिस्तानी चित्रपट सुपर-डुपर हिट ठरलाच तर त्याची कमाई असते, फारतर 50 कोटी… जेव्हा बॉलिवूडचे चित्रपट पाकिस्तानमध्ये प्रदर्शित होत होते तेव्हा ‘बजरंगी भाईजान’ आणि ‘सुल्तान’ या दोन चित्रपटांनी अनुक्रमे 23 आणि 37 कोटींचा धंदा केला होता. मात्र, भारतीय चित्रपटांवर बंदी घलण्यात आली. त्यानंतरच्या काळात पाकिस्तानमध्ये फार तुरळक प्रमाणात चित्रपटांची निर्मिती होत राहिली. त्या चित्रपटांचे बजेटसुद्धा 20 ते 25 कोटींपेक्षा जास्त नव्हते. चित्रपटांचे बजेट जितके कमी, तितका तो चित्रपट चालणे कठीण. या परिस्थितीमुळे पाकिस्तानी चित्रपट आता इतके मागे पडले आहेत, की परदेशी चित्रपटांसोबत त्याची तुलना अशक्य आहे आणि इतर देशांतही पाकिस्तानी चित्रपटांना स्थान नाही.

बंदीच्या काळातही चस्का बॉलिवूडचाच

बॉलिवूड चित्रपटांना बंदी जरी असली तरी आजही पाकिस्तानात हे चित्रपट छुप्या मार्गाने पाहिले जातातच. आजही पाकिस्तानी स्टार्सच्या तुलनेत पाकिस्तानी सिनेरसिक सलमान, शाहरुख, रणबीर कपूर आणि रणवीर सिंग यांच्याच प्रेमात आहेत. अर्थात, अलीकडे मात्र पाकिस्तानमध्ये तुर्की चित्रपट आणि वेब सिरीजने शिरकाव केला असून त्यांनाही प्रेक्षकांची प्रचंड मागणी आहे. त्यामुळे ओटीटी माध्यम क्षेत्रातही आता तुर्की फिल्म इंडस्ट्रीने पाकिस्तानचे नुकसान करायला सुरूवात केली आहे.

अंधःपतनाचा पट

पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्रीचे हे असे अध:पतन का झाले असे विचाराल तर त्याचे उत्तर अगदी सरळ आहे, ते म्हणजे पाकिस्तानी कट्टरपंथी विचारधारा. 80च्या दशकात जनरल जिया उल हक यांनी पाकिस्तानची सूत्रे आपल्या हाती घेतली, तेव्हा त्यांनी इस्लामी शासन लागू केले, ज्याचा मोठा फटका पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्रीला पडला. बीबीसी’च्या एका अहवालानुसार जिया उल हक सत्तेत येण्यापूर्वी कित्येक वर्ष या फिल्म इंडस्ट्रीचा आलेख चढता होता, मात्र 80 च्या दशकानंतर त्याला ग्रहण लागायला सुरूवात झाली. सिनेमागृह कसे तरी तग धरून राहिले. मात्र सिनेमा निर्मितीचे मूळ घर म्हणजे, स्टुडियो एकापाठोपाठ एक मरणपंथाला लागले.

शाहजहाँ रिज़वी हे लाहोरच्या शाहनूर स्टुडियोचे मालक शौकत हुसैन रिझवी यांचे पुत्र. शाहजहाँचे सगळं लहानपण आणि तारुण्य याच स्टुडियोमध्ये गेले. शाहनूर स्टुडियोची झळाळी त्यांनी आपल्या नजरेसमोर अनुभवली होती. आज हा शाहनूर स्टुडियो बरबाद झालाय. त्याच्या एका मोठ्या हिश्श्याचे रुपांतर मुर्दाड गोदामामध्ये झाले आहे. “अस्तित्त्वाचा प्रश्न निर्माण झाला होता आमच्या… एकेकाळी या स्टुडियोमध्ये एकाचवेळी तब्बल आठ चित्रपटांचे शूटिंग व्हायचं आणि त्याच दरम्यान वर्षकाठी जवळपास 140 चित्रपटांची निर्मिती व्हायची, असे शाहजहाँ सांगतात.

यादों कि बारात…

फक्त शाहनूर नव्हे, तर पाकिस्तानच्या मोठमोठ्या स्टुडियोचे हेच हाल झाले आहेत. मात्र असे असले, तरी ज्या कलाकारांनी पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्रीला नावलौकिक मिळवून दिला होता, ते मात्र अजूनही ही तबाही स्वीकारायला तयार नाहीत. आजही अनेक जुने कलाकार ‘एव्हर न्यू’ नावाच्या एका भकास स्टुडियोमध्ये जमतात आणि नॉस्टॅल्जिक होतात. जुन्या कलावंतांच्या या मैफलमधील गप्पा बाहेरच्या दुनियेला मात्र ऐकू येत नाहीत. ज्येष्ठ अभिनेते गुलाम मुहिउद्दीन सांगतात की, “इतना ज्यादा दुख होता है शायद आप इसको मानेंगे नहीं. मैं सोचता हूँ, बहुत कोशिश करता हूँ कि ऐसा कौन सा रास्ता है कि इसको ठीक किया जा सकता है लेकिन कोशिश के बावजूद भी कुछ नहीं हो पाता है.”

आणखी एक ज्येष्ठ कॅमेरामन अली जान म्हणतात, “लोगों ने बहुत अच्छा वक्त देखा हुआ था और अच्छे पैसे कमा लेते थे लेकिन आज वही लोग काफी तंगी में हैं और यह देख कर काफी दुख होता है.” फिल्म इंडस्ट्रीच्या वाताहातीनंतर अनेक कलाकार रंगभूमीकडे वळले आणि कसेही करून आपली अभिनय कला जिवंत ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र आजही त्यांचे मन भूतकाळातच रमतंय. नरगिस ही पाकिस्तानची अनुभवी अभिनेत्री म्हणते, “मुझे बहुत दुख होता है, और जब आपका घर टूटता है तो ज़ाहिर सी बात है कि काफी दुख होता है, हमारा वह घर है और हमें बड़ा दुख होता है जब हम देखते हैं लेकिन हम भी क्या कर सकते हैं ?”

फिल्म इंडस्ट्रीच्या अनेक लोकांचे म्हणणे आहे की, अत्याधुनिक तंत्रज्ञान नसल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरचे चित्रपट आता बनू शकणार नाहीत. मात्र स्टुडियोच्या मालकांचे म्हणणे यापेक्षा वेगळे आहे. शाहजहाँ रिज़वी सांगतात की, अत्याधुनिक तंत्रज्ञान नाहीये हे जरी खरे असले तरी कथा-पटकथा, गाणी, संगीत, चित्रपटाची ट्रीटमेंट यावर तरी कुठे काम होतंय? ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत त्या तर अगोदर ठीक करा…’

संबंधित वृत्त :

भारत हाच शत्रू आणि टिळाधारी जवान हाच खलनायक

हे तर स्पष्टच आहे, कट्टरपंथी विचारधारेने पाकिस्तानी सिनेमाचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेतले. चित्रपटांची कथा वारंवार बदलायला लावली. सेन्सॉरची बेसुमार कात्री चालवली. पाकिस्तानच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींवर चित्रपट बनवण्यापेक्षा भारताविरोधी चित्रपट तयार बनवण्याला प्रोत्साहन देण्यात आले. किंबहुना त्यासाठी जाणीवपूर्वक परिस्थिती निर्माण केली गेली. 1971 नंतर भारताविरोधात पाकिस्तानमध्ये पद्धतशीरपणे घृणा परसवली गेली. भारत हा पाकिस्तानविरोधी नव्हे तर इस्लामविरोधी आहे, अशा कथानकांवरचे चित्रपट तयार होऊ लागले. जिहाद, घर कब आओगे ही त्यापैकी काही उदाहरणे… काश्मीरचे जवान ज्यांच्या कपाळावर भगवा टिळा, हे त्या चित्रपटांचे खलनायक. सुरुवातीच्या काळात असे चित्रपट चालले, नंतर मात्र त्यातला एकसुरीपणा प्रेक्षकांच्या लक्षात येऊ लागला आणि त्यांनी त्याकडे पाठ फिरवायला सुरूवात केली. आता तर अशी परिस्थिती आहे की काही नवीन दाखवण्याची संधीच पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्रीसमोर नाहीये.

धोरणांचा अभाव

पाकिस्तानी प्रशासनाच्या प्रमुख धोरणांमध्ये फिल्म इंडस्ट्रीचा समावेश नसल्याबद्दल अनेक पाकिस्तानी निर्माते खंत व्यक्त करतात. राशिद नावाचे एक निर्माते म्हणतात, मी 50 लाख रुपये खर्च करून “जर्नी ऑफ आयकॉन्स’ हा चित्रपट बनवला. माझा इतका खर्च निघणार नाही, याची मला पूर्ण कल्पना होती. मात्र इतर मार्गाने म्हणजे कॉपीराइट, संगीत यातून मी काहीतरी कमावणार होतो. मात्र सरकारने माझी सगळीकडूनच नाकेबंदी केली आणि मी पुरता बुडालो. पाकिस्तानी चित्रपट निर्माता संघाचे अध्यक्ष अमजद राशिद सांगतात की, 17-18 निर्मात्यांचे शिष्टमंडळ घेऊन आम्ही पाकिस्तानी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्रीच्या आर्थिक डबघाईवर किमान 13 वेळा बैठका केल्या आहेत. शेवटच्या मिटिंगनंतर आम्हाला असे सांगण्यात आले की, याबाबतचा अहवाल पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडे पाठवला आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्मने मेटाकुटीस आणले

दुसरीकडे ओटीटी प्लॅटफॉर्मने हा खेळ आणखी बिघडवला. कोरोना संक्रमणाच्या काळात अनेक चित्रपट ओटीटीवर रिलीज झाले. हॉलिवूडला एकाच दिवशी थिएटरमध्ये आणि ओटीटीवर चित्रपट रिलीज करणे परवडू शकते. मात्र पाकिस्तानमध्ये ते जराही शक्य नाही. ओटीटीवर चित्रपट रिलीज झाल्यानंतर पाकिस्तानी चित्रपटाच्या निर्मितीचा निम्मा खर्चही निघत नाही. अनेक चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहेत, परंतु कोरोनामुळे अद्यापही प्रेक्षक थिएटरमध्ये फिरकत नाहीयेत. पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्रीचे भवितव्य काय असेल या प्रश्नावर निर्माते “उम्मीद पे दुनिया कायम है’ असे उत्तर जरी आज देत असले तरी पुढे “कहीं एक दिन सारी उम्मीदें ही खत्म ना हो जाए’ असे म्हणायलाही ते विसरत नाहीत…

बॉलिवूडमुळे पाकिस्तानला 100 कोटींचा फटका

पुलवामामध्ये भारतीय जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर बॉलिवूडमधूनही नाराजीचा सूर उमटला होता. या हल्ल्याविरोधात भारतीय चित्रपट निर्माते एकवटले आणि त्यांनी आपले चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे भारतीय चित्रपट निर्मात्यांचं काही प्रमाणात नुकसान झालं असलं तरी पाकिस्तानी सिनेउद्योगाला सुमारे 100 कोटींचा फटका बसला आहे. पाकिस्तानमध्ये बॉलिवूडच्या चित्रपटांना प्रचंड मागणी असते. तिथल्या चित्रपटसृष्टीच्या एकूण उलाढालीत 70-80 टक्के वाटा भारतीय चित्रपटांचा असतो. भारताच्या तुलनेत पाकमध्ये चित्रपटनिर्मिती कमी प्रमाणात होत असल्यानं थिएटर मालकांची 60 टक्के कमाई भारतीय चित्रपटांवर अवलंबून असते. भारतीय चित्रपटांचं प्रदर्शन थांबल्याने तेथील थिएटर मालकांची ही कमाई बंद झाली आहे. आर्थिक नुकसानीचा हा आकडा 100 कोटींपर्यंत असेल, असा अंदाज प्रसिद्ध फिल्म अँड ट्रेड बिझनेस अ‍ॅनालिस्ट गिरीश जोहर यांनी वर्तवलाय. याशिवाय पाकिस्तानी गायकांना चित्रपटातून वगळल्यानं त्यांचेही नुकसान होत आहे. भारतात या कलाकारांना बरंच काम आणि भरघोस मानधन मिळतं. पाकमधील म्युझिक इंडस्ट्री भारताएवढी विकसित नाही. त्यामुळे तेथील कलाकार भारतात येऊन प्रसिद्धी व पैसा मिळवतात. मात्र, आता त्यांचेही कार्यक्रम बंद झाले आहेत. त्यामुळे त्यांच्याही कमाईवरही गदा आली आहे.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here