- प्रशांत पवार
अलीकडच्या काळात पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या अल्पसंख्यांक समाजावरचे हल्ले प्रचंड वाढले असले तरी काही वर्षांपूर्वी या देशात अशी स्थिती नव्हती. इथला हिंदू समाज त्यांच्या त्यांच्या परीने आपापले सण साजरे करायचा आणि पाकिस्तानी सरकारचीही त्याला काही आडकाठी नसायची. बाबरीच्या विध्वंसानंतर मात्र पाकिस्तानमध्ये हळूहळू परिस्थिती बदलायला लागली आणि आता तर येथील अल्पसंख्यांकांवर होणाऱ्या अत्याचाराने क्रुरतेचा कळस गाठायला सुरूवात केली आहे.
ही गोष्ट आहे जवळपास वीसएक वर्षांपूर्वीची… जवळपास दीड महिने माझे वास्तव्य त्यावेळी पाकिस्तानमध्ये होते. या देशातल्या जवळपास सगळ्या शहरात म्हणजे लाहोर, कराची, इस्लामाबाद, रावळपिंडी, मुलतान आणि पेशावर या शहरात मी काही दिवस राहिलो होतो.

2004 साल होते ते… आणि मी त्यावेळी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मुलतान या शहरात होतो. चिनाब नदीच्या काठावर वसलेलं हे एक सुंदर शहर. मुलतानच्या सरकारी बसमधून मी प्रवास करत होतो. अचानक खिडकीतून बाहेर बघताना मला भगवा झेंडा दिसला आणि क्षणभर थबकलोच. पाकिस्तानसारख्या देशात चक्क भगवा झेंडा फडकतोय यावर माझा विश्वासच बसेना आणि त्वरित ड्रायव्हरला बस थांबवायला सांगून खाली उतरलो.
भगव्या झेंड्याचा पाठलाग करत करत एका वस्तीत शिरलो. चाळसदृष्य ती वस्ती होती आणि चक्क वस्तीत लाऊडस्पिकरवर मोठ्या आवाजात भजन सुरू होते. लोकांची लगबग सुरू होती. काही सेकंदातच माझ्या लक्षात आलं की ही सगळी मंडळी हिंदू आहेत आणि कसल्या तरी उत्सवाच्या तयारी आहे.
वस्तीच्या तोंडावरच जी पहिली व्यक्ती मला दिसली तिला मी काय सुरू आहे असं विचारलं, माझी ओळख सांगितली, भारतातून आलोय हे सांगितलं आणि त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वहायला लागला.
बाबू मुराद असं त्या व्यक्तीचं नाव होतं. बाबू म्हणला, “रामनवमी सिर्फ आपके हिंदुस्तान में नही मनायी जाती, हमारे पाकिस्तान में भी हम इसे मनाते है’’

त्या दिवशी रामनवमी होती आणि मी पाकिस्तानच्या एका हिंदु वस्तीत त्यांच्यासोबत रामनवमी साजरी करत होतो…
‘हिंदुस्थान की अवाम से सिर्फ एक ही गुजारिश है, वहाँ अमन बना रखे तो यहाँ हम सुकूनसे रह सकेंगे,‘ हे उद्गार होते बाबू मुरादचे. 48 वर्षाचा बाबू हा पाकिस्तानी हिंदू आहे. मी हिंदू असलो तरी मी पाकिस्तानी आहे, असे बाबू मोठ्या अभिमानाने सांगतो. बाबरी मशिद पाडल्यानंतर पाकिस्तानी समाजकंटकांनी बाबूला आणि बाबूसारख्या हजारो हिंदूंना मारहाण केली, त्यांची घरे लुटली, त्यांनी बांधलेले मंदिर उद्ध्वस्त केले. मात्र तरीही बाबूला त्याची खंत नाही. तुम्ही लोकांनी असा प्रकार केल्यानंतर पाकिस्तानी लोकांकडून आम्ही अशाच प्रतिक्रियेची अपेक्षा ठेवली होती. नशीब चांगले की गुजरातमध्ये झालेल्या दंगलीनंतरही येथे आम्ही सुखरुप राहिलो, अन्यथा पाकिस्तानातील सुमारे दीड कोटी हिंदूंचे जीणे अवघड झाले असते.
बाबू मुराद हा वाल्मिकी समाजाचा आहे. मुलतानमधील डबल फाटक या वसाहतीत बाबू मुरादसारखे सुमारे शंभरजणांचे वाल्मिकी समाजाचे कुटुंब अतिशय मोकळ्या वातावरणात राहात आहेत. त्यांचे पूर्वज जरी भारताच्या हरियाणा भागातील असले तरी फाळणीच्या पूर्वीपासूनच बाबूचे आजी-आजोबा मुलतानमध्येच वास्तव्य करून आहेत. भारतात स्थिरावण्याचा विचारही त्यांच्या मनाला कधी शिवला नाही. भारत पाहण्याची मात्र त्यांना तीव्र इच्छा आहे. या समाजातील प्रत्येक कर्ता पुरुष रेल्वे खात्यात, सरकारी इस्पितळात किंवा विमानतळावर तृतीय श्रेणी कामगार म्हणून काम करतो. पाकिस्तानातील ‘अकलियत‘ म्हणजे अल्पसंख्यांकांमध्ये त्यांची विभागणी होत असल्याने पाच टक्के आरक्षण या समाजासाठी सरकारने राखून ठेवले आहे. बाबूचा मोठा मुलगा राम मुराद इंग्रजी शाळेत नववीत शिकत आहे. एकट्या मुलतानमध्ये सुमारे 1500 वाल्मिकी समाजाचे कुटुंब आहेत.
सध्या जेवढ्या मोकळ्या वातावरणात आम्ही राहात आहोत तेवढे मोकळे वातावरण यापूर्वी पाकिस्तानमध्ये आम्हाला कधीही मिळाले नाही, असे बाबूच्याच शेजारी राहत असलेला काशीलाल सांगतो. पाकिस्तानमध्ये राहूनही आम्ही जवळपास प्रत्येक सण साजरे करतो. अलीकडेच आम्ही मोठ्या उत्साहात रामनवमी साजरी केली. दिवाळी, गणपती, नवरात्रोत्सव या प्रत्येक सणाला आमच्या विभागात आनंदीआनंद असतो. स्वतःच्या पदरचे पैसे टाकून आम्ही या विभागात एक मंदिरही बांधले आहे, असे काशीलाल सांगत असतो.

संगमरवरी दगडाच्या या मंदिरात हिंदूंचा प्रत्येक देवाची तसवीर ठेवण्यात आली होती. दररोज संध्याकाळी या मंदिरात पुजा होते, रामायणाचे पाठ होतात. हे रामायण मात्र उर्दु भाषेत आहे हे विशेष. एका उच्चशिक्षण घेतलेल्या पाकिस्तानच्या युवकानेच आम्हाला रामायणाचे उर्दुत भाषांतर करून दिले आहे, अशी माहिती काशीलाल यांनी दिली. उर्दू ही पाकिस्तानची राष्ट्रीय भाषा असल्यामुळे येथील अल्पसंख्यांकानाही याच भाषेचा वापर करावा लागतो. जर पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला तर सर्वात पहिली सुरक्षा आमच्या विभागासाठी पुरविण्यात येते. सणांनादेखील येथील पोलीस बंदोबस्त असतो. पाकिस्तानमध्ये या समाजासाठी स्वतंत्र मतदारसंघ नेमून दिला आहे. मात्र या नियमामुळे आमचे नुकसानही झाले असल्याची भावना काहीजणांनी बोलून दाखवली. अर्थात आम्ही निवडून दिलेला लोकप्रतिनिधी आमच्या संपर्कात असतो, असे मत रामप्रसाद रहवत याने व्यक्त केली.
भारताचे त्यांना प्रचंड आकर्षण आहे. येथील प्रत्येकाच्या घरात भारतीय नटनट्यांची पोस्टर आढळतात. घरातील टेपरेकॉर्डरवर भारतीय गाण्यांचीच धून वाजत असते. भारतात राहण्याची नाही मात्र भारत पाहण्याची त्यांना तीव्र इच्छा आहे. पासपोर्ट, व्हिसा या कायदेशीर बाबींचा त्यांना राग आहे.
“आप जब हिंदुस्थान जाओगे तो हमे खत जरुर लिखना, और खत मे हमे वहाँ पर बुलाना. तो हम आपका खत पुलिस को दिखाएंगे, और हमे हिंदुस्थान आने की वजह मिल जाएगी’’, अशी विनंती ते त्यांना भेटायला येणाऱ्या प्रत्येक भारतीयांना करीत असतात.

आपले हिंदूपण जपण्यासाठी इथल्या हिंदूंनी गीता, रामायण व संस्कार-परंपरा समजावून सांगणारे वर्ग चालवले आहेत. इथल्या तरुण मुलांना भारतातल्या हिंदू मुलांपेक्षा कितीतरी अधिक माहिती स्वतःच्या संस्कृती व इतिहासाबद्दल आहे. रामनवमी साजरी करण्यासाठी त्यांनी किमान महिनाभर तयारी केली होती.
रामनवमीच्या दिवशी रामायणाचे पाठ झाल्यानंतर संध्याकाळी वस्तीत जमलेल्या किमान पाचशे प्रेक्षकांसमोर बाबू मुराद आणि त्याच्या सहकाऱ्यांनी रामायणातील काही प्रसंग सादर केले.
बाबू मुरादच्या नववीत शिकणाऱ्या मुलाला शाळेत मुस्लिम मित्रांमध्येच वावरावे लागते. तिथे त्याला कोणीही दुजाभाव जाणवू देत नाही. उलट मी हिंदू आहे म्हणून माझ्या मित्रांना माझ्याबद्दल अधिक उत्सुकता आहे. झी व स्टार टीव्हीवर दाखविण्यात येणाऱ्या मालिका येथे प्रचंड लोकप्रिय असल्यामुळे या मालिकेमधून दाखविण्यात येणारे हिंदू सण येथे घराघरात पोहोचले आहेत. आजूबाजूला राहणारे अनेक मुस्लिम बांधव या सणांमध्ये सहभागी होत असतात.