सत्यपाल महाराज : गरिबीमुळे शिकता आलं नाही, आज मात्र साऱ्या समाजाला ‘शिकवतो’

सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराजांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. चाहते त्यांना 'महाराज' म्हणतात. 'सत्यपाल महाराज चिंचोलीकर' हे त्यांचं ग्रामीण भागातील लोकप्रिय नाव. स्वत: सत्यपालला मात्र 'महाराज' म्हटलेलं आवडत नाही. समाजातील इतर महाराजांचं कर्तृत्व (?) बघितल्यानंतर 'महाराज' या शब्दापासून जरा चार हात लांब राहण्याचा त्याचा प्रयत्न असतो. एका खऱ्याखुऱ्या ‘महाराष्ट्र भूषण’ असलेल्या सत्यपाल महाराजांच्या आजच्या वाढदिवसानिमित्त…

  • गजानन जानभोर

सत्यपाल महाराजांच्या कीर्तनाची जाहिरात वर्तमानपत्रत नसते. बातमीही येत नाही. ती यावी म्हणून बापू-नाथांप्रमाणो ते खटपटी-लटपटीही करीत नाहीत. पण हजारो लोकं त्यांच्या कीर्तनासाठी येतात. ते आत्मसात करतात आणि आयुष्याचे सार्थक झाल्याचे समाधान घेऊन घरी परततात. लातूरनजीकच्या गावात महाराजांच्या कीर्तनात बंदोबस्तावर असलेला पोलीस त्यांचे प्रबोधन ऐकतो आणि एका क्षणात दारू सोडतो. लग्न, तेरवीतील अवाजवी खर्च हे बहुजनांच्या अनर्थाचे मूळ आहे, या त्यांच्या कळवळ्यातून शेकडो माणसे प्रेरणा घेतात. हे अद्भुत सत्यपाल महाराजांच्या कीर्तनातूनच घडू शकते. ते खरे ‘महाराष्ट्रभूषण’ आहेत. पण त्यासाठी ते राजकारण्यांचे, संपादकांचे लांगुलचालन करीत नाहीत.

एरवी इतर महाराजांसारख्या सामान्य माणसाला भुरळ पाडणाऱ्या कुठल्याही करामती न करता सत्यपाल चार दशकांपासून त्याच सामान्य माणसांच्या मनावर अधिराज्य गाजवून आहे. जाहिरात नाही, बातमी नाही, मार्केटिंगही नाही, तरीही हजारो बाया-बापड्या सत्यपालचं कीर्तन ऐकण्यासाठी येतात. प्रबोधनातील अनेक गोष्टी आत्मसात करतात आणि आयुष्याचं साधंक झाल्याचं समाधान घेऊन घरी परततात. हे ‘अद्भुत’ (‘चमत्कार’ हा शब्द सत्यपालला न आवडणारा) चाळीस वर्षापासून आपण सारेच जण पाहात आहोत.

आपल्या प्रत्येक कीर्तनाला एकवटणारा जनसमुदाय बघून एरवी एखाद्या महाराजाच्या मनात राजकारणात जाण्याची, निवडणूक लढण्याची महत्त्वांकाक्षा निर्माण झाली असती. किमान त्याला राजकीय गुरू तरी होता आलं असतं.. पण सत्यपालला ते जमणं शक्य नव्हतं. कारण सामान्य माणसाचं प्रबोधन करणं, हा त्याचा धंदा नव्हे तर जीवनधर्म आहे. या जीवनधर्माच्या मुळाशी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगेबाबांचा विचार रुजला असल्याने कुठल्याही आमिषाला सत्यपाल कधी बळी पडला नाही. अत्यंत साध्या, सोप्या शब्दांत सत्यपाल ग्रामविकासाचा, प्रबोधनाचा विचार मांडतो. अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, हुंडाबळी, स्त्रीमुक्ती, साक्षरता, शिक्षण हे त्याच्या कीर्तनातील प्रमुख विषय. सामान्यांना समजेल आणि उमजेल, अशा पद्धतीने प्रबोधनाचा विचार तो मांडतो. मनोरंजनाच्या अंगाने जाताना डोळ्यांत अंजन घालण्याचं सामर्थ्यही त्याच्या भजनात असतं.

समाजातील जातीयवादावर तो कळवळून बोलतो. जातीय विद्वेषाचा विखार कधीतरी संपायला हवा, ही त्याची तळमळ. कारण या ‘जाती’चे चटके त्याने सहन केले आहेत. लहानपणी गावातल्या सावकाराकडे लग्न असलं की, सत्यपालच्या घराला कधीच आमंत्रण नसायचं. एकदा सत्यपालनं आईला विचारलं.. आई म्हणाली, ‘आपण खालच्या जातीचे आहोत म्हणून…’ गावागावांतून फिरताना प्रत्येक ठिकाणी त्याला अजूनही ती ‘जात’ भेटत असते. लोकांच्या मनातली जात आपण संपवू शकत नाही म्हणून सत्यपाल अस्वस्थ होतो, कळवळतो. गरिबीचे चटके सत्यपालने जन्मापासून भोगले.

सत्यपाल सहज बोलून जातो, “माझी माय सावकाराकडे भांडे घासायची. मायची घरी परत यायची वेळ व्हायची तेव्हा आम्हांला खूप आनंद व्हायचा, कारण सावकाराच्या घरातील खारवटलेल्या भांड्यातील तूप आम्हांला खायला मिळायचं.” ‘या गरिबीने मला शाळेत जाता आलं नाही, मावशीकडे जाऊ शकलो नाही, मामाचं घर मला कधीच दिसलं नाही. पण याच गरिबीने मला शिकवलं आणि खंजेरीने घडवलं.’ सत्यपालच्या आयुष्यात आईचं स्थान देवापेक्षाही मोठं. ती दोन वर्गही शिकलेली नाही. पण तिने सत्यपालला घडवलं. सत्यपालच्या खंजेरीचे बोल कानी पडले की आपण त्या दिशेने धावत सुटतो, ती पुण्याई याच माय सुशीलाची. मुलानं शिकावं, मास्तर व्हावं, असं तिला वाटायचं पण गरिबी आड यायची. मुंडगावच्या वसतिगृहात सत्यपालला शिकायला ठेवलं. पोराला पैसे पाठवावे लागतात म्हणून ती उपाशी राहायची. दोन पैशांचे शेंगदाणे घेऊन शेतावर कामाला जायची. फाटलेल्या तीन-चार लुगड्यांचे तुकडे एकत्र शिवून घालायची. कीर्तनाला आईची आठवण आली की, सत्यपाल विठ्ठल वाघांची कविता सहज म्हणून जातो, “कापसाच्या बोंडाले चंद्र चोरूनिया पाहे, तरी माय माऊलीची मांडी उघडीच राहे’….

शाळेत असतानाची गोष्ट… प्रार्थनेच्या वेळी गुरुजींनी सत्यपालला रांगेतून बाहर काढलं, कारण त्याचे कपडे फाटलेले होते. ही गोष्ट त्याच्या जिव्हारी लागली. तो आत्महत्या करायला निघाला. मायनं त्याला थांबवलं. ‘तू चोरी तर केली नाही ना! आपलं आयुष्यच फाटकं असेल तर त्याला गुरुजी तरी काय करणार? आत्महत्या करून आपल्या दुर्दैवाचे दशावतार थोडीच संपणार आहेत? त्यापेक्षा पोटापाण्यासाठी कमवायला शीक’… निरक्षर मायच्या तोंडून तो आयुष्याची ‘गीताई’च ऐकत होता. येथूनच सत्यपाल घडू लागला. सत्यपाल गावात डबलरोटी विकू लागला, दुसरा भाऊ हॉटेलात कामावर होता. भजनांचा नाद सत्यपालला लहानपणापासूनच. तुकडोजी महाराजांचं, ‘या झोपडीत माझ्या, आनंद साठवावा’ हे माय सुशीलाचं आवडतं भजन. ‘सत्यपालला भजनांची आवड तुमच्यामुळे लागली का?’ या प्रश्नावर माय सुशीलाचं उत्तर मिळत नाही. ‘सत्यपाल पोटात असताना आसलगावला तुकडोजी महाराजांचं कीर्तन ऐकलं होतं’ ही एकच आठवण त्या सांगतात, तेव्हा महाभारतातील गर्भातल्या अभिमन्यूची गोष्ट खरी वाटू लागते….

लहानपणी भजनी मंडळींच्या हातात असलेली खंजेरी सत्यपालला साद घालायची. पण खंजेरीला कुणी हात लावू देत नव्हतं. माय सुशीला हे सर्व बघायची. ती मडक्याला कागद लावून सत्यपालच्या हातात द्यायची. त्यावर सत्यपालची बोटं फिरायची. गावातले लोकं टिंगल-टवाळी करायचे. शाळेतले मास्तर चिडून म्हणायचे, ‘सत्या वाया गेला, याचं आयुष्य खंजेरीतच वाहावत जाईल.’ माय सुशीलाला मात्र आपल्या लेकराचं आयुष्य वेगळ्या वाटेनं घडवायचं होतं. गरिबीमुळे आपण पोराला शिकवू शकलो नाही, पण त्यानं समाजाला शिकवावं, ही या माउलीची तळमळ होती. सत्यपालने गाडगेबाबांना पाहिलं नाही, तुकडोजी महाराजांचंही सान्निध्य लाभलं नाही. मात्र, माय सुशीलाच्या रूपाने हे महापुरुष त्याच्या सतत सोबतीला होते. आकोटच्या बाजारात फाटक्या कपड्याचा एखादा गरीब मुलगा दिसला की सत्यपाल कळवळतो. त्याला नवीन कपडे घेऊन देतो. गरीब मुलांच्या शाळेची फी भरतो. गांजलेल्या माय सुशीला सुरुवातीला खूप धार्मिक होती. कर्मकांडं करायची. सत्यपाल घडत गेला, तसतशी ही कर्मकांडं बंद होत गेली. आता सत्यपालच्या घरात कुठलंही कर्मकांड होत नाही. वटसावित्रीच्या दिवशी या माउलीच्या सुना वडाच्या झाडाला फेऱ्या मारीत नाहीत. अक्षयतृतीयेला घास टाकत नाही. देवीदेवतांच्या नावाचे उपवास धरत नाहीत, पोथ्याही वाचत नाहीत, घरातील आनंदाच्या प्रत्येक क्षणी गावातील गरीब जीवांना सामावून घेण्याची या सर्वांची धडपड असते.

दारिद्र्यामुळे आपल्याला शिकता आलं नाही, ही खंत सत्यपालला सतत बोचत असते. आपल्या वाट्याला आलं ते इतरांच्या वाट्याला येऊ नये, यासाठी त्याची सारखी धडपड सुरू असते. ज्या गावात कीर्तन असतं त्या गावातील हुशार, गरीब विद्यार्थ्याला गणवेश, वह्या-पुस्तकं घेऊन देणं, हा त्याचा नित्यक्रम. चिंधी-बाजारातले जुने कपडे सत्यपाल स्वतः घालतो आणि गरीब विद्यार्थ्यांना नवीन कपडे घेऊन देत असतो. कीर्तन-प्रबोधनाच्या कार्यक्रमातून लाखो रुपये त्याला सहज कमावता आले असते, पण धनसंचय करणं त्याने जाणीवपूर्वक टाळलं. जेथून आपण आलो ती नाळ तुटू नये, ‘महाराज’ या उपाधीचा संसर्ग होऊ नये यासाठी आपलं सामान्यत्व जपणारा सत्यपाल आकोटच्या बाजारात कंगवे, गॉगल्स विकताना आपल्याला नेहमी भेटतो. महाराष्ट्रातील ज्या ज्या गावात सत्यपालचं कीर्तन असतं, त्या गावातील माणसं दारू-मांसाहार सोडतात, तरुण हुंडा न घेण्याची शपथ घेतात. कीर्तनासाठी एकवटलेल्या गर्दीच्या बंदोबस्तासाठी असलेला लातूर जिल्ह्यातील मुरुडचा एक पोलिस कीर्तन ऐकून दारू न पिण्याची शपथ घेतो, हे अद्भुत सत्यपालच्या कीर्तनातच पाहायला मिळतं.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगेबाबा हे सत्यपालचे प्राणबिंदू. हे महापुरुष नसते तर मी कुठे असतो? ही त्याची विनम्रता. महिन्यातून 22 दिवस महाराष्ट्रातील कुठल्या ना कुठल्या गावात त्याचे कार्यक्रम असतात. मध्यप्रदेश, आंध्रप्रदेशातही त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. ‘ग्रामगीता’ ही त्याच्या जीवनाची दिशा, सोबतीला बाबासाहेबांच्या राज्यघटनेचं बळ. ‘पोथ्यांची पारायणं करण्याऐवजी राज्यघटनेचं पारायण करा’ असं पोटतिडिकीनं सांगणारा सत्यपाल खऱ्या अर्थाने दलित-बहुजन समाजात ‘आयडॉल’ आहे. ‘शिक्षणाचा अभाव’, हा दलित-बहुजन समाजाच्या प्रगतीतील सर्वांत मोठा अडसर आहे, हे कटू वास्तव सत्यपालला ठाऊक आहे. त्यामुळेच शिक्षणापासून कुणी वंचित राहू नये, हा त्याच्या जीवनाचा ध्यास. ‘कुणी न राहावे खुळे-अडाणी, शिक्षण घ्यावे, व्हावे ज्ञानी’ हे गाडगेबाबांचं भजन म्हणताना त्याच्या डोळ्यांतून ओघळणारे अश्रू त्याच्या प्रामाणिक तळमळीचे दर्शक असतात.

सत्यपाल हा उपेक्षित समाजाचं प्राक्तन मांडतो. त्यामुळे तोसुद्धा माध्यमांच्या दृष्टीने उपेक्षितच. स्वाभाविकच विविध वाहिन्यांवर रोज सकाळी होणाऱ्या महाराजांच्या गर्दीत सत्यपाल दिसत नाही. वर्तमानपत्रातील रकान्यांत त्याचे फोटोही बघायला मिळत नाहीत…. भूषण, रत्न अशा पुरस्कारांचा मानकरीही तो कधी ठरत नाही. म्हणूनच दहा हजार कार्यक्रमांच्या विक्रमाचं अप्रूप विसरून गावागावांतील माणूस जागविण्यासाठी, माणूसपणाची धग जिवंत ठेवण्यासाठी सत्यपालची धडपड सुरू असते. हीच धडपड समाजातील अभावग्रस्तांना जागवण्याचं काम करीत आहे. एखाद्या निष्कांचन कार्यकर्त्याच्या कार्याचं मोठेपण यापेक्षा दुसरं कोणतं असू शकेल?

(लेखक लोकमत नागपूर आ‌वृत्तीचे माजी निवासी संपादक आहेत)

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here