- टीम बाईमाणूस
लोकसाहित्य आणि लोककला हे भारतीय लोकजीवनाचा जणू श्वास बनून राहिला आहे. त्यातूनच हजारो वर्षांची परंपरा लाभलेली आपली लोकसंस्कृती विकसीत होत गेली. येथील माणसाच्या भौतिक विकासा बरोबर लोकसाहित्य आणि लोककलांनीही हा विकास आणि बदल स्विकारीत आपला प्रवास आजही चालू ठेवला आहे. लोकजीवनात लोकसाहित्य, लोककला आणि आध्यात्म हातात हात घालून वावरू लागल्यामुळेच त्यांचा विकास शक्य झाला. लोककलातून आध्यात्माची शिकवण देणारे आणि माणसाला दु:खापासून दूर नेणारे विविध प्रकारचे तत्वज्ञान सोप्या भाषेत किंवा बोली भाषेत जपले गेले. या कलांमधील एक कला म्हणजे “तमाशा“. महाराष्ट्राच्या मातीत रुजली आणि फुललेली “तमाशा” ही कला जगाच्या विविध भागातील रसिकांना भुरळ पाडीत आली आहे. वेळोवेळी विविध संकटाशी सामना करीत आज ताठ मानेने समाजमनात स्थान निर्माण केलेल्या या लोककलेच्या विकासात अनेकांचे योगदान आहे. त्यातीलच एक आदराने घ्यावे असे नाव म्हणजे सौ. मंगलाताई बनसोडे.
गेली पाच दशक (55 वर्षे) आपल्या जादुई अदकारीने अवघ्या महाराष्ट्राला रिझवत सौ. मंगला बनसोडे यांनी रसिकांच्या हृदय सिहांसनावर अढळ स्थान प्राप्त केले आहे. कोणत्याही क्षेत्रात नाव कमवायचे म्हटले की त्यामध्ये संकटे आणि संघर्ष आलचं. अशा अनेक समस्यांना धीराने तोंड देत मंगलाताईनी आपल्या कलेचे कोरीव लेणे तयार करून ठेवले आहे. हे यशोशिखर सर झाल्यानं त्यामागची प्रेरणा सांगताना त्या अवर्जून उल्लेख करतात त्या आपल्या आईचा, राष्ट्रपती पारितोषिक विजेत्या विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांचा व पती रामचंद्र बनसोडे यांचा. सौ मंगला बनसोडे यांना तसा तमाशाचा वारसा जूना आहे. नारायण खुडे तमाशा मंडळ आजोबा भाऊ बापू मांग नारायणगावकर तमाशा मंडळ, आई विठाबाई भाऊ नारायणगावकर या त्यांच्या तमाशातील पिढ्या फार गाजल्या. आई विठाबाईचा तर भारत सरकारकडूनच गौरव झाला आहे. यानंतर त्यांनी स्वत: हा वारसा चालवीत तमाशाची पताका राज्यभर मिरविली. आजही ही सेवा अखंड सुरूच आहे.

वयाच्या सातव्या वर्षी पायात घुंगरू
वयाच्या सातव्या वर्षी पायात घुंगरू आलं आणि आजतागायत त्याचा छनछनाट सुरूच आहे. सुख दु:खाच्या हिंदोळ्यावर लहरत समाजमनाला आनंद देण्याचे काम मंगलाताईनी केले. आईची कलेची सेवा मंगलाताईंनी जवळून पाहिली. या कलेसाठी किती जीव तोडून काम करावे लागते याचा अनुभव सांगताना त्या म्हणतात, माझ्या आईने तमाशाच्या सेवेत सगळ आयुष्य वेचलं माती व बैलगाडीच्या स्टेजपासून आतापर्यंतचा प्रवास तिने केला. मीही अनुभवला आहे. आणि अनुभवत आहे. आमच्या उदर निर्वाहाच साधन तमाशाच असल्याने खूप कष्ट सोसावे लागले. पोटात बाळ असतानाही नऊ महिने नऊ दिवस नाचतच राहायचं आणि बाळंतीण म्हणून झोपून न राहता प्रसुतीनंतर अर्ध्या तासातच स्टेज गाठायचं. ताप, थंडी, खोकला काहीही न पाहता पाठीवर बिऱ्हाड घेऊन पोटाची खळगी भरायला आणि लोकांचे मनोरंजन करायला गावोगाव फिरायचे. आमच्या आजोबांच्या तमाशा फडात 10 ते 25 माणसांचा संच होता. हे सगळे घरातीलच कलाकार होते. आईच्या फडात ही संख्या वाढली. आम्ही चार बहिणी, तीन भाऊ, हे सगळे जावई, काका, मेहुणे, मामा, मावशी असा सुमारे 70 ते 75 माणसांचा हा संच होता. जोरदार संचामुळे संपूर्ण महाराष्ट्रात “विठाबाई भाऊ मांग” या नावाने वादळ उठीवले होते. तिने घेतलेल्या कष्टातून आम्ही घडलो. राष्ट्रपती पदकाने तिच्या कष्टाचेही चीज झाले.
मंगलाताई बनसोडे या तमाशा फडानेही असेच वादळ उठविले आणि रसिकांची सेवा केली. 1983-84 ला मंगलाताईनी पती रामचंद्र बनसोडे यांच्या पाठबळावर स्वतंत्र फड उभा केला. नृत्य आणि नाट्याच्या उत्तम गुंफणीमुळे रसिकांना खिळवून ठेवण्याची ताकद या फडात निर्माण झाली. मंगलाताईचे नृत्य आणि पती रामचंद्र बनसोडे यांचे वगनाट्य हे समीकरण पक्के झाले. उडत्या चालींच्या गाण्यासह बैठकीच्या आणि खड्या भावमधुर लावण्यांनी मंगलाताईनी महाराष्ट्रातील जत्रा, यात्रा, उरूस आणि बाजार घायाळ केले. तितक्याच ताकदीने त्यांची भक्त प्रल्हाद, येथे नांदते मराठेशाही, जिंकून आली शिवसेना, विष्णू बाळा पाटील, बापू बिरू वाटेगावकर, कारगिलच्या युध्य ज्वाला, राजीव गांधी हत्याकांड, जन्मठेप कुंकवाची, चंदन तस्कर डाकू वीरप्पन, हर्षद मेहता, गाव तंटामुक्त झाला पाहिजे आदी पौराणिक ऐतिहासिक व सामाजिक विषयावर भाष्य करणारी वगनाट्ये गाजली. धार्मिक आणि आध्यात्मिक वगही गावोगावी गाजविले.
मंगलताईनी तमाशा फड महाराष्ट्रात गाजवत असतानाच त्यांनी त्यासाठी आपल्या मुलाला नितीनलाही तयार करण्याचे काम केले. या दोघा माय लेकांनी पुन्हा रसिकांच्या मनावर मोहिनी घातली. ती आजही कायम आहे. बदलत्या रुची नुसार श्रोत्यांना काय हवे ते देण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होत आहे. मंगलताई म्हणतात “माझे शिक्षण चौथी इयत्तेपर्यंत झाले आहे. मात्र इतरांनी अधिक शिकावे असे वाटते. समाजाची सेवा करण्यासाठी स्वतः शिक्षण घेणे गरजेचे आहे. सामाजिक भान असल्यामुळे आणि त्याचा विकास व्हावा अशी भावना जपल्यामुळे राज्यातील पाच प्राथमिक व तीन माथ्यामिक तसेच कराड, सातारा, इगतपुरी पोलीस ठाण्याच्या इमारतीसाठी, काही ठिकाणी मंदिरे उभारण्यासाठी माझ्या कार्यक्रमातून मी मदत करू शकले. याचे मला मोठे समाधान आहे.“

मंगलाताईचे सारेच काम नवचैतन्य आणि उर्मी देणारे आहे. त्याची कदर महाराष्ट्र राज्य शासनालाही करावी लागली. त्याचे फळीत म्हणजे ताईना 2001 साठी प्रथमत:च सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अण्णाभाऊ साठे पुरस्काराने गौरविण्यात आले. याशिवाय शासनाने तमाशा कलावंतासाठी सुरु केलेला विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे. आणि याशिवाय कारकिर्दीतला सगळ्यात मोठा पुरस्कार म्हणजे राष्ट्रपती पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. हाच राष्ट्रपती पुरस्कार त्यांच्या आजोबांना आणि आईलाही प्राप्त झाला होता. आईच्या मृत्यू आणि कार्यक्रम करून परतत असताना बसने पेट घेऊन झालेला अपघात हे मंगलाताईच्या आयुष्यातील सर्वात मोठे दु:खाचे क्षण. आयुष्यात इतर अनेक दु:खे पचाविणाऱ्या ताईचे मन आईच्या जाण्याच्या घटनेने आजही व्याकुळ होते.
आता आमची पोरं पुस्तक घेऊन समाजाची सेवा करतील..
मंगला बनसोडे यांच्या नातींनी शिक्षण क्षेत्रात प्रगती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील एक नात एम.डी. पर्यंत शिक्षण घेऊन डॉक्टर झाली आहे, तर दुसरी पदवीचे शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. या दोघींवितिरिक्त आणखी एक नात इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहेत, तर एक फॅशन डिझायनर म्हणून काम करत आहे. एम. डी. पर्यंत शिक्षण घेतलेल्या माधुरी खैरमोडे या लग्नानंतर आता मुंबई येथे प्रॅक्टिस करत आहेत. त्यांचे पतीदेखील डॉक्टर आहेत. दुसरी नात दीक्षा बनसोडे यांनी कऱ्हाड येथे पदवीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर ती आता पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत.
मंगलाताई म्हणतात की, हा निर्णय यासाठी घेतला की सध्याच्या काळात शिक्षणाशिवाय आयुष्याला महत्व नाही आणि त्यासोबतच प्रेक्षकही पहिल्यासारखे राहिलेले नाहीत. मोबाइलमुळं बरीच लोकं तमाशा बघायला येत नाहीत आणि गेली पाच दशकं आम्ही तमाशा फडात राहून प्रेक्षकांची, लोकांची, समाजाची सेवाच केली की हो, कला लोकांपर्यंत पोहचवली, लोककला जिवंत ठेवली. आता आमच्या समोरच्या पिढीने शिक्षणाच्या माध्यमातून समाजाची सेवा करावी. आता माझी नात मुंबईला डॉक्टर आहे ती रुग्णांची सेवा करते. एक नात स्पर्धा परीक्षेची पुण्याला तयारी करतीये ती अधिकारी होऊन समाजासाठी, लोकांसाठी काम करेल.