- टीम बाईमाणूस
नात्यात असलेल्या महिला जोडीदाराने नाते तुटल्यानंतर पुरुषावर केलेला बलात्काराचा आरोप फेटाळून लावत मुंबई उच्च न्यायालयाने आरोप लावण्यात आलेल्या पुरुष जोडीदाराची सुटका केली आहे. यावर निकाल देताना न्यायालय म्हणाले की, एखादे नाते तुटण्याच्या मार्गावर आल्यानंतर त्या नात्यामध्ये असणाऱ्या महिलेने पुरुषावर तिच्यावर बलात्कार केल्याचे आरोप लावल्यास त्या पुरुष जोडीदाराला त्याबाबत दोषी ठरवता येणार नाही. म्हणजे एखाद्या नातेसंबंधांचे रूपांतर लग्नात झाले नाही म्हणून केवळ महिला पुरुषावर बलात्काराचा आरोप लावू शकत नाही.
मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या एकल न्यायाधीशाच्या खंडपीठासमोर त्या व्यक्तीने दाखल केलेल्या फौजदारी पुनर्विचार अर्जावर सुनावणी सुरू होती. 2016 मध्ये मुंबईतील वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये त्याच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. हा खटला सुरु असताना संबंधित आरोपाने दिंडोशी न्यायालयात सुटकेचा अर्ज केला होता मात्र त्यावेळी त्याने केलेला हा अर्ज फेटाळून लावण्यात आला.
न्यायमूर्ती डांगरे यांनी खटल्यातील तथ्यांचा अभ्यास केला आणि सांगितले की, जेव्हा दोन प्रौढ व्यक्ती एकत्र येतात आणि एखाद्या नातेसंबंधाची सुरुवात करतात त्यानंतर जर हे नातेसंबंध खराब झाले आणि त्या नात्याचे विवाहात रूपांतर होऊ शकले नाही तर या नात्यात असणारा एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर नात्यात असताना केलेल्या कृतीवरून आरोप लावू शकत नाही.
संबंधित वृत्त :
- विवाहित महिलेला लग्नाचे वचन देऊन ठेवलेले शरीरसंबंध बलात्कार ठरत नाही
- बलात्काराची मानसिकता बदलायलाच हवी…
ज्या महिलेने ही तक्रार दाखल केली होती तिचे असे म्हणणे होते की, तिची आणि संबंधित पुरुषाची ओळख ऑर्कुट या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून झालेली होती. हे दोघेही जवळ जवळ आठ वर्षे एकमेकांसोबत नात्यात होते. महिलेचा असा दावा आहे की दोघांच्याही कुटुंबियांना त्यांच्या नात्याची माहिती होती. त्यानंतर या महिलेने आरोप लावला की लग्नाचे वचन देऊन या पुरुषाने माझ्यासोबत लैंगिक संबंध ठेवले आणि नंतर त्याने माझ्याशी लग्न करण्यास नकार दिला.
न्यायालयाने या गोष्टीची दखल घेतली की या नात्याची सुरुवात करत असताना संबंधित महिला की सज्ञान होती. ती करत असलेल्या कृतीचे परिणाम तिला समजतील या वयाची ती होती. तसेच या महिलेने देखील हे मान्य केले आहे की, काही वेळा दोघांच्याही संमतीने संबंध होत होते तर काही वेळा बळजबरीने अशाप्रकारे संबंध प्रस्थापित केले जात असल्याचा आरोपही या महिलेने केला.
केवळ त्या पुरुषाने तिच्याशी लग्न करण्याचे दिलेले वचन हेच लैंगिक संबंधांचे एकमेव कारण नव्हते हे त्या महिलेने देखील मान्य केले तसेच तिचे असे म्हणणे होते की, तिचे त्याच्यावर प्रेम होते म्हणूनही तिने या लैंगिक संबंधांना मान्यता दिली होती. लैंगिक संबंध प्रस्थापित केल्यानांतर निर्माण होणाऱ्या परिणामांची पूर्ण कल्पना संबंधित महिलेला होती याचीही नोंद यावेळी उच्च न्यायालयाने घेतली. हे संबंध बराच काळ चालू होते, ज्यामुळे प्रत्येक वेळी केवळ लग्नाच्या आश्वासनावर दोघांमध्ये लैंगिक संबंध प्रस्थापित झाले असा निष्कर्ष यामुळे निघत नसल्याचेही न्यायमूर्ती डांगरे यांनी सांगितले.
विभक्त होण्यापूर्वी हे जोडपे काहीकाळ सोबतही राहिले होते. त्यामुळे तक्रारदार महिलेने केवळ त्याने लग्नाला नकार दिल्याचा एक आरोप यामध्ये केलेला आहे. न्यायमूर्ती डांगरे यांनी असा युक्तिवाद केला की तक्रारदार महिला ही या नात्याची सुरुवात करत असतानाही प्रौढ होती. त्यामुळे दोघांच्या संमतीने हे दोघे शारीरिक आणि भावनिक नात्यात गुंतले होते. त्यामुळे आता केवळ या नात्यात गोडवा राहिला नाही, संबंध खराब झाले म्हणून या महिलेने केलेले आरोप खरे आहेत असे म्हणता येणार नाही. नात्यात असताना या दोघांनी प्रस्थापित केलेले शारीरिक संबंध हे महिलेच्या इच्छेविरुद्ध केलेलं कृत्य असल्याचे सिद्ध होत नाही.
या प्रकरणातील महिला हे स्वीकारत नाही की या पुरुषाने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला आणि त्यांचे नाते संपवले. त्यामुळे केवळ एखाद्या नात्याचे लग्नात रूपांतर झाले नाही म्हणून लैंगिक संबंधांसाठी माझ्यावर बळजबरी केली होती असा आरोप महिलेला लावता येणार नाही कारण बलात्कार हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे. असे केल्यास बलात्कारातून वाचलेल्या लोकांसाठी हा निकाल न्याय्य ठरणार नाही आणि यामुळे बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्याची तीव्रता कमी होईल.