विपश्यना… एक साधना

विपश्यना एक साधना आहे… त्यामुळे उगाच धार्मिक कमेंट करून आपला वेळ दवडू नये..

  • स्नेहल पाटकर

मन शांत नाहीये, मनात असंख्य विचारांचं काहूर माजलय.. काय करावं कुणाला सांगावं, तर मागून चेष्टा करायला लोक तयारच असतात. बरेच दिवस विचार सुरू होता मेडिटेशन करू पण ते जमत नव्हतं, म्हणजे एकचित्तानं एक जागी बसायला जमेल तर ती स्नेहल कुठली… पण मग एक वेगळा सल्ला मिळाला, तो म्हणजे ‘तू विपश्यनेला जा’ असं एका गोव्यातल्या मैत्रिणीच्या आईने सांगितलं… आणि मग सुरू झालं विपश्यना काय आहे हे शोधणं… बघू म्हटलं इथे तरी शांतीची बहीण मनःशांती मिळतेय का… शिबिरात प्रवेश मिळायला मला फार तोषिश पडली नाही. कारण, जिजाजींनी आणि माझ्या मित्राने दोघांनीही प्रयत्न केले त्यामुळे मला तिथे प्रवेश मिळाला. तिथे दाखल झाल्यावर पहिल्यांदा मोबाईल जप्त केला जाणार असं सांगितलं गेलं, पुस्तके पण काढून घेतली… लोकांच्या बॅग मधली तर पेनं, तंबाखू, सिगारेटची पाकीटं पण काढून घेतली गेली… अगदी नोंदवही पण जवळ ठेवायची नाही… आता आली का पंचाईत… मला डायरी लिहायची सवय आता काय करायचं बुवा.. कळेनाच, त्यात डोक्यात सणक गेलेली ती म्हणजे मोबाइल तब्बल 11 दिवस जवळ नसणार होता आणि ही मनःशांती साठीची पहिली पायरी होती..

सगळं सामान जमा करून घेऊन एक हॉलमध्ये आम्हाला बसायला सांगितलं गेल… तिथं महिला आणि पुरुष असे दोन विभाग केले होते… काही नवरा-बायको जोडीने विपश्यनेसाठी आले होते त्यांच्याकडे पाहून तस वाटत होतं.. त्यांना वेगवेगळे बसण्यास सांगण्यात आलं… आधीच मोबाइल काढून घेतल्यामुळे दिव्यांग झालेलं मन… मनःशांती मिळवण्यासाठी कठोर आचारसंहिता असणार आहे आणि तिचे काटेकोर पालन करावे लागणार आहे ते शक्य असेल तरच या शिबिरात राहू शकणार आहात अन्यथा लगेच माघारी जाऊ शकता, ही वाक्य ऐकल्यावर अर्धमेलं झालं… असं वाटलं इथे का आले? आणि चाललंय काय… तिथल्या बाईनी शांततेत तिथला दिनक्रम आणि नियम सांगण्यास सुरुवात केली. पहाटे चार वाजता उठायचंय.. साडेचार ते साडेसहा धम्महॉलमध्ये ध्यानधारणा करायचीय.. साडेसहा ते आठ नाश्ता आणि आंघोळ उरकून आठ वाजता पुन्हा ध्यान धारणा मग पाच मिनिटांचा ब्रेक, पुन्हा नऊ ते अकरा ध्यानधारणा.

Meditation - Baimanus

अकरा वाजता जेवण आणि मग नंतर एक वाजेपर्यंत विश्रांती पुन्हा एक ते दोन ध्यानधारणा त्यानंतर पुन्हा पाच मिनिटांचा ब्रेक आणि दोन ते पाच ध्यानधारणा… मग पाच वाजता चहा आणि नाश्ता.. अर्धा तास विश्रांती सहा ते सात.. पुन्हा ध्यानधारणा मग पाच मिनिटे ब्रेक… मग सात ते साडेआठ गुरुजींचं प्रवचन पुन्हा पाच मिनिटं ब्रेक आणि अर्धा तास ध्यानधारण आणि मग नऊ वाजता आपापल्या खोल्यात जाऊन झोपण्याची परवानगी.. हुश्शश.. असा दिनक्रम.. म्हणजे दिवसाचे एकूण दहा ते अकरा तास नुस्ती ध्यानधारणा आणि ती करताना पाळायचे नियम म्हणजे तब्बल दहा दिवस आपापसात अजिबात बोलायचं नाही, हातवाऱ्यानी देखील बोलायचं नाही तसंच एकमेकांशी नजरेनं देखील बोलायचं नाही.. पूर्ण मौन बाळगायचं ज्याला तिथं आर्यमौन म्हटलं जातं, नोबल सायलेन्स काही अडचण आली तर फक्त ध्यान शिकविणाऱ्या आचार्यांशी आणि धम्मसेवकांशी बोलायची परवानगी होती… या दहा दिवसाच्या काळात बाहेरच्या जगाशी कसलाही संपर्क असणार नाही, शिवाय या कॅम्पसमधून अजिबात बाहेर जाता येणार नाही. हे शिबीर अर्धवट सोडता येणार नाही… हे सगळं ऐकून मी सुन्न झाले.

पण मग ठरवलं आता आलोच आहोत तर बघू करून… सामान आपापल्या रूममध्ये ठेऊन धम्महॉल मध्ये यायला सांगितले गेलं.. तासाभराने मौन चालू होणार होते… काही मुलींनी एकमेकांची ओळख करून घेतली… पण मी काटेकोर नियम पाळायचेचं ठरवलं होतं म्हणून मी कुणाशीच बोलले नाही, थोड्याच वेळात आर्य मौन चालू झालं, ध्यान सुरू झालं… 40 मिनिटं ध्यानानंतर भोजनालयात जाऊन जेवण घेता येणार होतं… कधी एकदा ध्यान संपतय आणि मी जाऊन जेवतेय असं वाटत होतं, एकतर कुणाशी बोलायच नाही, कुणाकडे मान वर करून पाहायचं नाही, त्या 2 तासात वेड लागायची पाळी आली होती.. मला विपश्यना कर म्हणून सांगणाऱ्या मैत्रिणीच्या आईचा मी मनातल्या मनात उद्धार करायला सुरुवात केली, पुन्हा म्हटलं च्यामारी उद्धार नियमात पण बसत नाही आणि मग माझं मलाच हसू आलं, आणि त्यावेळी ते आलेलं हसू म्हणजे माझी बुस्टिंग पॉवर होती… नंतर सूचना झाली आता झोपा आणि तो दिवस संपला.

माझ्या सोबत रूममध्ये एक सोबती होती… तिच्याकडे मी सुरुवातीला रूममध्ये आल्यावर पाहिलं आणि शेवटचं पाहिलं होतं म्हणजे त्या 10 दिवसात नंतर तिच्याकडे पाहिलं सुध्दा नाही… ती मोठी सुटकेस घेऊन आली होती, कसली-कसली क्रिम, पावडरी, 2 बूट 2 चप्पल एक रुममध्ये तर एक बाथरुमध्ये घालायला, मऊमऊ उशी 2 चादरी बेडशीट आणि वेगवेगळे रंगीबेरंगी कपडे, परफ्युम… मनात विचार आला ही बाई मेनका होणार तर… (माझी समाधी भंगणार) ती बंगाली वाटत होती तिच्याकडे कालीमातेची फ्रेम होती, हातात गंडेधागे होते, ती मला धार्मिक वाटली… मी तिच्याकडे न बघता आर्यमौनात timeplease घेऊन तिला म्हटलं… ‘यहा कोनसे भी देवी-देवता की प्रार्थना निषिद्ध है, सिर्फ आर्यमौन ओर विपश्यना’ …तिने ऐकलं की नाही हे न बघता मी तोंड फिरवून झोपी गेले… पण सकाळी उठून पाहिलं तर फ्रेम दिसली नाही, तिने तिची देवीची फ्रेम बहूदा बॅग मध्ये ठेवली असावी…

दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजता घंटा वाजली.. ही तीच घंटा होती जी आदल्या दिवशी मी पाण्याच्या टाकीवर पाहिली होती, तेव्हा प्रश्न पडला होता ही घंटा इथे का लावली असेल त्याचं उत्तर मिळालं… पटकन उठून मी आधीच अंघोळ उरकून घेतली,(इथे आपली कामं आपल्याला करावी लागतात… रुमसोबतचं रुममधील बाथरुमही आपलं आपणच स्वच्छ करावं लागतं, मी रुममधील पारोसा केर काढून लादी पुसुन आंघोळ करुन तयार होते.. बंगलीबया अजूनही साखर झोपेत होती, मी माझे कपडे धुवून बाहेर वाळत घातले तरी बयेला जाग आली नाही… साडेचार वाजता रूम बाहेरून धम्मसेविका लहान (पूजेतली) घंटी असते तशी घंटी वाजवत धम्महॉलमध्ये या अस सांगून गेल्या म्हणजे न बोलता इशाऱ्यात सांगून गेल्या… मी रुम बाहेर पडले, पहाटेचा गारवा त्यात बर्फासारख्या थंड पाण्याने अंघोळ करून मी धम्महॉल कडे निघाले होते, पण प्रसन्न वाटत होतं कारण नवीन काहीतरी शिकायला मिळणार होतं.

Meditation - Baimanus

धम्महॉल मध्ये लहान छोट्या चौकोनी गाद्या होत्या त्यावर बसून विपश्यना करायची होती… इतका वेळ बसायचं म्हणजे सैलसर मउसुत कपडे घालायला हवे म्हणून मी त्या तयारीनी आले होते… धम्महॉलमध्ये लगेचच सत्यनारायण गोयंका गुरुजींच्या सूचनेनुसार ध्यानाला सुरुवात झाली.. आणापानसती म्हणजे मांडी घालून, डोळे बंद करून फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करायचं, जाणीवपूर्वक श्वास घेऊन नाही तर नैसर्गिकपणे येणाऱ्या जाणाऱ्या श्वासावर लक्ष ठेवून राहायचं… पण चारपाच मिनिटात मला कंटाळा यायला लागला… वाटलं हे काय आहे श्वासावर काय लक्ष द्यायचं… मांडी बदलत कंटाळा येऊन मनात समुद्र, बुलेट राईड, गडकिल्ले डोळ्यासमोर येऊ लागले, टपरी चहा पिऊयात असले विचार मनात येऊ लागले..

पहिल्याच दिवशी दुपारी 2 मुली शिबिर सोडून गेल्याचं कळलं पूर्ण दिवस चहा नाश्ता आणि जेवणाची वेळ वगळता पाच-पाच मिनिटांच्या ब्रेकने श्वासावर लक्ष ठेवण्याची साधना… बॅक ग्राऊंडला गोयंका गुरुजींच्या सूचना. बडे धिरजसे काम करे.. शांत चित्तसे, सजग चित्तसे, समता बनाये रखे..

दुसऱ्या दिवशी पुन्हा एक बाई शिबीर सोडून गेल्याचं कळलं, म्हणजे मी कुणाशी बोलत नव्हते पण कानावर शब्द पडत होते काही मुली सर्रास नियम मोडून गप्पा मारत होत्या… रात्री रूमवर गेल्यावर माझाही धीर खचला, का आले इथे असं वाटलं…वाचायला जवळ काहीच नव्हतं, मग दुसऱ्या दिवशीची तयारी करून झोपूयात असं वाटलं म्हणून बॅग उघडली, तर इस्त्रीच्या ड्रेस मधील कागद हाती लागला… अहाहा काय तो आनंद मला झाला… मी तो रद्दीचा कागद अगदी ऍड सकट वाचून काढला… इतकं की त्या कागदावर खाली कोड असतात ते पण मला पहिल्यांदा तेव्हाच कळल… वाचून झाल्यावर पुन्हा भूक लागली… तिथं दोन्ही वेळ जेवण होतं पण त्यात कांदा लसूण नाही… मी ठरवलं उद्या सकाळी काहीही झालं तरी इथून पळून जाऊ…. म्हणजे तिसऱ्या दिवशीची सकाळ आणि मी माझ्या घरी… असा प्लॅन होता.

पहाटे साधनेनंतर ब्रेकमध्ये मी आचार्यांना भेटायला गेले, त्यांना म्हणाले मला घुसमटल्यासारखं होतंय, मी घरीच जाते… साठे बाई म्हणाल्या आता नाही जाता येणार… तू शांत हो तुला जमेल.. काहीच नाही तरी तुझी तुझ्याशी मैत्री होईल प्रयत्न कर, त्यांचे शांत शब्द ऐकून मी पुन्हा जागेवर येऊन बसले… झक मारलंय आणि हय इलय असा म्हणत ध्यानाक बसलय… पण काही केल्या मन लागेना… व्हाट्सॲप आणि फेसबुक वरचे जोक, ट्रोल्स, मिम्स आठवायला लागले… सुषमा स्वराज कशा असतील? (त्या आजारी होत्या तशा बातम्या होत्याच) BJP नवीन काय करतंय.. पवार आजोबा काय करत असतील? मामींचं कुठलं नवं गाणं आलं असेल? सिरियलचे सगळे भाग कधी बघायला मिळतील? योगेश एक फोन करून इथे का सांगत नाही की स्नेहलला घरी पाठवा….असे असंख्य विचार… कोकणात आजी आजारी आहे इतक्यात गेली तर मला बाहेर नक्की जाता येईल असले नको ते विचार आणि असंख्य प्रश्न मला पडायला सुरुवात झाली?

धम्महॉल मध्ये मी एकदा ध्यान करणाऱ्या इतरांचं निरीक्षण केलं… तेव्हा मला सगळे मन लावून ध्यान करतायत असं जाणवलं… मग मीही स्वतःला समजावलं.. आणि तितक्यात लगेचच गोयंका गुरुजींची सूचना कानावर आली.. स्टार्ट अगेssन फिर शूरु करते है.. बडे शांत चित्तसे, सजग चित्तसे अपने नासिका के द्वारपर मन को लाये… गुरुजींचा आवाज आश्वासक वाटायचा आणि मन शांत व्हायचं… माझे पळस्प्याचे आजोबाच माझ्याशी बोलतायत असा भास व्हायचा… (अर्थात मला बाबासाहेब पुरंदरे आणि शरद पवार आठवले की आजोबा (आईचे वडील) आठवायचेच आता त्या लिस्टीत सत्यनारायण गोयंका गुरुंजींची भर पडली होती.)

धम्महॉल मध्ये 2 पार्टिशन केले गेले होते एक महिला आणि एक पुरुष त्यात कुणीतरी पादत होतं, तुम्हाला वाचून हसू येईल… पण तिथे कोण ते कळायचं नाही कारण डोळे बंद असायचे.. पण कुणाचा हसण्याचा आवाज यायचा नाही… एकदा असंच ते कुणीतरी जोरात पादलं आणि तेवढ्यात लगेचच कॅसेट मधून गुरुजींची सूचना आली… स्टार्ट अगेssन फिर शूरु करते है.. गुरुंजींना त्या पादणाऱ्या माणसाला तर सुचना केली नसेलं ह्या विचारांनी मला हसू आलं आजूबाजूला पण कुणीतरी हसत होतं… तो दिवसही सरला.. संध्याकाळी प्रवचनात बुद्ध वचने आणि बुद्धाच्या जीवनातील काही प्रसंगावर गोयंका गुरुजी सांगायचे… या तीनचार दिवसात शील समाधीवर भर देत शिकविल्या जाणाऱ्या ध्यानावर माझ्या नकळत माझं थोडं थोडं लक्ष लागू लागले. आणि चौथ्या दिवशी पहाटे मला माझ्या नवव्या वर्षातील घटना डोळ्यासमोर येऊ लागल्या.

मला आश्चर्य वाटलं कारण त्यावेळीचा आजी आजोबांचा चेहरा, माझ्या शाळेतल्या काळे बाई, वेदपाठक बाई, धनावडे बाई… विमलाबाई मेहेंदळे शाळा आठवली आणि बऱ्याच गोष्टी डोळ्यासमोर येऊ लागल्या… कधी नातेवाईक माझ्याशी वाईट वागलेले तर कधी मी चिडचिड करुन वाईट वागलेले हे आठवायला लागलं… घरी माझ्याशी झालेला दुजाभाव स्पष्ट समोर दिसायला लागला… काही नातेवाईक आई-बाबांना कमी समजायचे आणि मुलगी म्हणून मलाही वाईट वागणूक द्यायचे, माझी आई साधी होती तिच्या स्वभावाचा फायदा घ्यायचे हे सगळं आठवू लागलं आणि त्याचा त्रास होऊन डोळ्यातून गंगा-जमुना वाहू लागल्या…

Meditation - Baimanus

मी ज्यांना ज्यांना कळत-नकळत दुखावलं होतं त्यांना सॉरी कधी म्हणेन असं झालं होतं. (त्यातील काहींना मी कॉल करुन बोलायचा प्रयत्न केलाही पण ते नीट बोलले नाहीत, मग ठरवलं आपण प्रयत्न केला आता त्यांना बोलायचं नाही तर गेले खड्ड्यात) हा पण ज्यांनी मला दुखावलं, हिणवलं त्यांना वेळ येईल तेव्हा उत्तर देईनच हे ही मनाशी पक्क केलं… बाबांचं रागावणं, आईचा काही बाबतीत आजीने आणि काकूने केलेला मानसिक छळ आठवून तर खूप त्रास झाला… मनातून एक एक वादळं बाहेर पडू लागली अगदी ज्वालामुखीसारखी… आजोबा म्हणायचे, मन समुद्रासारखं ठेवता आलं पाहिजे सगळं पोटात घेता आलं पाहिजे.. त्सुनामी एकदाच येते हे खर असलं तरी… ती त्सुनामी आल्याचा मला भास होतं होता…

मी त्यादिवशी दुपारीच साठे बाईंना हे सगळं खूप त्रासदायक होतंय हे सांगितलं… त्या म्हणाल्या, जुन्या गोष्टींना कवटाळू नको, त्यांचा विचार करु नको निर्विकार आणि निर्विचार मनासाठीची ही साधना आहे तशीच करायची. घडून गेलेल्याबद्दल आता का विचार करायचा? तुझं माईंड प्युरीफिकेशनसाठी ही साधना आहे. मी त्या दिवसापासून मनःपूर्वक सगळं पाळू लागले. बुद्धाच्या मार्गाची जादू पटली. प्रयत्नपूर्वक शांत राहून तटस्थपणे मी ध्यान करायचं ठरवलं… पण अंश काही पाठ सोडेना. हा अंश म्हणजे ती व्यक्ती जी मला मनापासून आवडत होती. अर्थात प्रत्येकाला ज्या वयात ते होतं ते मला ही वाटून गेलं होतं… आता त्याला प्रेम म्हणाल की आणखी काही… मी पुन्हा आचार्यबाईंना सांगितलं, त्या म्हणाल्या आता हा सगळया विचार नको, हा झाला भूतकाळ आता आठवून उपयोग नाहीच, अंशला विसरणं कठीणचं. (अंश हे मी ठेवलेलं नाव, बाकी त्याच्या रुपात मला कृष्ण दिसायचा किंबहुना कृष्ण अधिक आवडू लागला होता) आता अंशलाही समुद्र तळाशी पाठवलं, म्हटलं तिथेच बसं तू किमान पुढचे काही दिवस मग पुढचं पुढे बघू..

सगळे विचार सोडल्यावर मग आता ध्यान करताना काहीच डिस्टर्ब करत नव्हतं. टिव्हीची, मोबाईलची वर्तमानपत्राची, लिहायची, वाचायची कसलीच आता अजिबात गरज नाही हे मनोमनी पटलं आणि पाचव्या दिवसापासून रात्रीची भूक लागणं बंद झालं, नऊ वाजता बेडवर पडल्यानंतर आपोआप दहा मिनिटात झोप येऊ लागली. सकाळी ध्यानाला जाण्यासाठी घंटी वाजवत येणाऱ्या धम्मसेविकेच्या आधी मी बाहेर पडून धम्महॉलमध्ये जाऊन बसू लागले. शारीरिक संवेदना आणि अंतर्मन त्याच्याशी जोडलेलं असणं हे कळू लागलं. संवेदना सुखद असो वा दुःखद तिच्याकडे तटस्थपणे बघता यायला लागलं आणि प्रचंड शांत वाटू लागलं. अध्यात्मिक वगैरे कसल्याही लफडयात न पडता जे जसं आहे तसं पाहायला शिकवणाऱ्या विपश्यनेकडे मी फार आधुनिक आणि व्यावहारिक दृष्टीने पाहिलं, ध्यानधारणा करत असताना सबकॉन्शस माईंडचं प्युरीफिकेशन आणि मनाची एकाग्रता, निर्मळ चित्तशुद्धी करण्याची संधी हा दहा दिवसांचा अनुभव मला देऊन गेला. चौथ्या दिवसाच्या पहाटेनंतर पुढचे सगळे दिवसं कसे गेले ते कळलं सुध्दा नाही. अजून पुढचा महिनाभर मी इथं राहू शकेन याची खात्री पटली.

नवव्या दिवशी माझ्या रुमच्या बाहेर साप आलाय म्हणून मुलींचा गोंधळ सुरु होता.. मी बाहेर जाऊन पाहिलं तर छोटं फुरसं दिसलं (काही साप मला ओळखता येतात कारण साप मला आवडतात, थोड विचित्र वाटेल पण त्यावर पुन्हा लिहिन कधीतरी) हा तर फुरसं तसं विषारी पण आपण का त्याच्या वाटेला जा, सगळ्यांनी आर्यमौन सोडलं होतं, मात्र मला इच्छा झाली नाही. मी तटस्थपणे त्या मुलींच्याकडे पाहिलं आणि सापाच्या बाजुनं उडी मारून धम्महॉलकडे निघून गेले… त्या रात्री आर्यमौन बाजूला ठेऊन माझ्या आजुबाजुला राहणाऱ्या मुलींमध्ये जाऊन बसले, त्या जवळपास रोज गप्पा मारायच्या मी त्यांना ऐकत होते समोरच्याला ऐकणं ही एक कला आहे.. त्यांच्याकडून कोण का आलंय ते मला कळंल, त्यांच्यापैकी सगळ्याचजणी आयुष्याच्या कटीकटींपासूनच्या मुक्ततेसाठी, शांततेसाठी आल्या होत्या… कुणाचं लग्न मोडलं होतं, कुणाचं ब्रेकअप झालं होतं… कुणाला मुलं होत नव्हतं त्याचे विचार त्रास देत होते, आयटी सेक्टरवाल्या मुलीही होत्याच…

मी का आले होते आणि ते साध्य झालंय का? होतंय का? ह्याचा विचार मीही करु लागले तर मला जमायला लागलं होतं.. स्वत:ला कंट्रोल करणं यायला लागलं होतं… माझं मी ओळखायला लागले होते. दहाव्या दिवशीची सकाळ आणखी नवी होती, हातात मोबाईल मिळाला, माझी पुस्तकं मिळाली, माझी डायरी मिळाली… पण पुस्तकं मी जशीच्या तशी बॅगेत ठेऊन दिली… मोबाईल ऑन करुन कुणाशी तरी बोलावं असं अजिबात वाटलं नाही, मी तो लगेच ऑनही केला नाही, पुन्हा हॉलमध्ये येऊन बसायला सांगण्यात आलं, आमचं आर्यमौन संपलय असंही सांगण्यात आलं पण मला वाटलं का संपलंय असू दे ना अजून मौन चांगलं आहे. (मौनं सर्वार्थं साधनम्)

जिच्यासोबत मी आठवडाभर त्या रुमध्ये राहिले होते तिच्याकडे पाहिलं, तिलाही माझ्याशी काहितरी बोलायचं होतं असं जाणवलं… तिच्याशी बोलले तेव्हा कळंल की, ती आणि तिचा नवरा इन्फोसिसमध्ये काम करतात, तीच्याकडे मोठं घर आहे, पैसा आहे गलेलठ्ठ पगाराची नोकरी आहे पण तिला मुल हवंय आणि प्रयत्न करुनही तिला ते होत नाहीय आणि म्हणून तिचं मानसिक खच्चीकरण झालंय ती मानसिक शांततेसाठी तिथे आलीय तिने मला विचारल, आप क्यो आये यहॉ? मी शांतपणे म्हणाले, सहजंच माझ्यातल्या मला शोधायला आणि शांत व्हायला… पुन्हा येणार आहे मी. मी पुन्हा येणार म्हटल्यावर ती म्हणाली मी अजिबात येणार नाही… मला मनात हसू आलं.. की हिने आयुष्यातले 10 दिवस फुकट घालवले तिला जगताचं आले नाहीत, समजले नाहीत..

इतर रुममधल्या मुली-महिला बाहेर बोलतायत तेव्हा त्यांना पाहिल्यानंतर मला जाणवलं सगळेच अगदी शांत झालेले आहेत. कुणीही अतिउत्साह दाखवत नाहीय, त्या अगदी पुर्ण आर्यमौनात नव्हत्या.. पण नीट ध्यान करत होत्या असं जाणवत होत. मैत्री दिवसाची प्रार्थना आणि ध्यान करून बाहेर येताना पार बुद्ध होऊन कोणी बाहेर येत नाही, पण जगण्याची एक कला नक्कीच घेऊन येतो. यात शंका नाही. मी फोन हातात आल्यानंतर अगदी निवांत दोन-तीन तासांनंतर योगेशला पहिला आणि आईला दुसरा फोन केला त्या दोघांशीही फार काही बोलले नाही तिथून जीजीकडे (बहिणीकडे) जाणार होते म्हणून जीजीला तिसरा फोन केला आणि त्यानंतर चक्क फोन स्वीचऑफ केला.

व्हाट्सॲप, फेसबुक, मनातला-आतला-बाहेरचा गदारोळ, व्यावहारिक जगराहटी या सगळ्यात आपल्याला आपल्या आत डोकावून पाहणं शक्य होत नाही जे पाहिलं जातं ते किती वरवरचं असतं हे या शिबिरातल्या दहा दिवसात लक्षात येतं. अकराव्या दिवशी घरी जाताना तुम्ही तुमचे स्वत:ला नव्याने भेटता. प्रेम, करुणा, मैत्री याचे खोल खोल अर्थ समजतात. 20 मिनिटांत जेवताना, 10 मिनिटांत नाश्ता करताना हजारदा व्हाट्सॲप, फेसबुक चेक करणारे आपण शेवटच्या दिवशी अनित्य भावनेने जगू लागतो. खरंच अगदी खरंच अस्सं होतं… मला वाटलं मला असं 10 दिवस अलिप्त राहणं जमणार नाही, पण मी 3 वेळा विपश्यना केलीय गोवा, इगतपुरी आणि आळंदीजवळच मरकल ह्या केंद्रात..आणि त्याचा मला फायदा होतोय अगदी रोज..

दुसरी विपश्यना केली तेव्हा त्या 10 दिवसात एकवेळ जेवण आणि एकवेळ उपाशी…बाकी दिनचर्या सारखीचं….तरीही ते मला उत्तम जमलं…रागावर कंट्रोल आला….हाणामाऱ्या करणारी मी काहीशी शांत झाले..(आधी ड्रायव्हिंग करताना कट मारणाऱ्या माणसालाही मी हाणायचे आता तु तुझ्याघरचा असं म्हणून सोडून देऊ लागले…अंशला समुद्रतळाशी ठेवण्यात यशस्वी झाले..कुणी शिवी जरी दिली तरी माझ्या अंगाला भोकं पडतं नाहीत जाऊदेत असं ठामपणे म्हणता यायला लागलं..ह्या सगळ्याचा परिणाम म्हणजे मन शांत झालं आणि रिकामे विचार बंद झाले..मिळाळेला वेळ मला वाचनासाठी मिळाला, कामासाठी नवनवीन कल्पना सुचायला लागल्या..

तिसरी विपश्यना करायला मी कारणाने गेले होते..म्हणजे दोन विपश्यना केल्यामुळे आणि रोज 15 ते 20 मिनिटं स्वत:ला विपश्यनेसाठी मी देत होते म्हणून तरले होते..पण तरी तिसऱ्या विपश्यनेची गरज वाटलीच..लग्नाला 12 वर्ष होऊनही मुलं होत नाही म्हणून समाज कुजबुजू लागला होता….पण जेव्हा योगेशवर प्रश्न उठू लागला तेव्हा फार त्रास झाला, आणि मला कंट्रोल करु शकणारी मी खचू लागले….पण हे ही खरंय की मी आधी विपश्यना साधक होते म्हणून त्यातल्या त्यात तरले…मला मुलं होतं नाही म्हणून त्रास देणाऱ्या बायकाचं जास्त होत्या, अगदी ऑफिसमध्येही होत्याच..(त्याविषयी सविस्तर लिहायचं आहेच) मला झोपेत माझ्या कुशीत बाळ दिसायंच, मी प्लास्टिकच बाळ घेऊन झोपू लागले होते…पण ह्या तिसऱ्या विपश्यनेमुळे पुन्हा मी माझी मलाच भेटले…

भूतकाळातल्या घटनांविषयी पश्चाताप आणि भविष्यातील स्वप्नरंजन याने फक्त वेळ वाया जातो, वर्तमानातला आताचा क्षण मनावर पाळत ठेऊन बुद्धाने सांगितलेल्या उपदेशाच्या ओळींचं आचरण करत विवेकाने शांत जगण्याची कला म्हणजे विपश्यना…

सब्ब पापस्स अकरणं,
कुसलस्स उप संपदा सचित्तपरियोदपनं,
एतं बुध्दानसासनं…. ह्याच त्या ओळी…

खरंतर मी अजुनही स्वत:ला ह्यासाठी परफेक्ट समजत नाही..पण जे जमलंय ते कम्माल आहे..कुणी कितीही आणि कसंही माझ्याशी वागलं तरी ही साधना मला शांत ठेवते…आणि योग्य वेळी योग्य वागण्याची बुध्दी देते असं म्हणायला हरकत नाही… ( पण आलेला अनुभव असाही आहे की मला जो व्यक्ती त्रास देतो, त्याला त्याचे भोग भोगावे लागतात..अशी अनेक उदाहरण आहेत, त्याबद्दल सांगेन केव्हातरी….कारण देवही पाहात असतोच ना, आणि सत्यनारायण गोयंका गुरुजी जे सांगतात तो कर्म सिद्धांत…म्हणजे मी निस्वार्थी भावनेने वागते पण लोक त्याचा फायदा घेऊन वाईट वागतात आणि मग त्याचे त्यांना फटकेही बसतात)

विपश्यनेच्या शेवटच्या दिवसाचे फोटो काढले होते..एका तिथे झालेल्या मैत्रिणीने शेअर केले होते….मला तिथे निसर्गाच्या सानिध्यात बसूनही ध्यान करावसं वाटतं होतं ..मी अशीच बसलेली असताना तिने काढलेले फोटो..

शेवटी महत्वाचं…आणि हे लिहायची गरज आहेच असं वाटतं म्हणून…कारण काही नातेवाईक, ओळखीचे किंवा काही वाचकही..नक्की कमेंट करतील..त्यातले काही घरच्यांना कॉल करुन विचारतीलही..काय लेकीने बौध्द धर्म स्वीकारला वाटतं?…तर त्यांच्यासाठी…
विपश्यना म्हणजे एक साधना आहे.. आणि मी केलेल्या ह्या शिबीरात बुद्ध धर्म किंवा बौद्ध धर्म अंगिकारण शिकवत नाहीत…मी हिंदू आहेच, त्यात बऱ्याच जणांना माहितीय मी कुडाळदेशकर आद्य गौ़ड ब्राह्मण आहे, मालवणी आहे आणि त्याचा मला अभिमानही आहे… प्रत्येकाला आपापल्या जाती-धर्माचा ज्या भागातले आहोत त्याचा अभिमान असावा, पण त्याचा बाऊ करू नये…मी ही त्याचा बाऊ करत नाही किंवा तेच धरून बसत नाही… इतर धर्मातील जे जे चांगलं आहे ते ते घ्यावं अस मला वाटतं…आणि विपश्यना ही तर एक साधना….तसं बऱ्याच जणांना माहिती आहे पण नसलेल्यांच्या माहितीसाठी ते म्हणजे मी जातपात मानत नाही त्याचं एक उदाहरण म्हणजे मी आंतरजातीय विवाह केलाय..
दुसरं उदाहरण म्हणजे माझ्या घरी काम करणाऱ्या बाई सुद्धा इतर धर्माच्या होत्या..होत्या म्हणजे आता त्या नाहीत पण त्याही कायम म्हणायच्या की ताई तुम्ही किती छान वागणूक देता, तुमच्यातलं म्हणूनच वागवता असा अनुभव आम्हाला इतर ठिकाणी येत नाही….
मी गीतेबरोबरचं, कुराण मराठीतून समजून घेतलंय, बायबल वाचलंय त्यात मला वेगळं काही जाणवलं नाही…त्यातलंही जितकं चांगलं वाटलं, मनाला पटलं ते ते घेतलं…..आणि आणखी सांगायचं म्हणजे मी हिंदू ब्राम्हण आहे तर त्याच चाकोरित विचार करेन, फक्त ब्राम्हणच मित्र-मैत्रिणी करेन अस नाही (हे सांगावं लागतंय कारण शहरातही अशी वागणारी लोकं आहेत मी पाहिलीयत,अनुभवलीयत काही तर माझे नातेवाईकचं आहेत) मी जेव्हा आंतरजातीय विवाह केला तेव्हाही ह्याच लोकांनी मला खुप बोल लावले..काही लोकांनी असंही म्हटलं की, ब्राम्हण मुलं नव्हती का गं मराठ्याशी लग्न केलंस….मला माझा जोडीदार कुठल्या जातीचा आहे हे पाहण्यापेक्षा तो कीती समजून घेतोय किती प्रेमळ आहे हे पाहणं जास्त गरजेचं वाटलं होतं…( तेव्हा मला बोल लावणारे आता म्हणतायत, चांगला जोडीदार निवडलास गं..) तर ह्या असल्या लोकांसाठी लिहिलेला हा शेवटचा प्यारेग्राफ आहे….विपश्यना एक साधना आहे… त्यामुळे उगाच धार्मिक कमेंट करून आपला वेळ दवडू नये..

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here