- मेघना धर्मेश
बहुतेक सर्वांना शिस्त म्हणजे काहीतरी भयंकर आहे असंच वाटतं आणि त्यामुळे सर्वजण ह्या पासून दूर पळतात. शिस्त म्हणजे ध्येय आणि साध्य यांच्यातील पूल, दुवा म्हणा ना! शिस्त म्हणजे अश्या काही गोष्टी, सवयी जे करणे आवश्यक आहे ते करणे, जरी मनांत तुम्हाला ते करायचे नसले तरी. ज्या व्यक्तीकडे शिस्त पाळण्याची इच्छाशक्ती, निर्धार, दृढनिश्चय आणि समर्पण असतं त्यांच्यासाठी जबाबदारी, बांधिलकी (commitment) महत्वाची असते. शिस्तीमुळे आपणं वेळेच्या आत पण कामं पूर्ण करू शकतो, deadlines ची भीती वाटतं नाही. आयुष्यात पुढे जाण्यासाठी विविध गुणांची जोपासना करणे गरजेचे असते त्यातले शिस्त आणि सातत्य हे महत्वाचे आहे.
कोणी तुम्हाला वारंवार कामासाठी मागे लागतात, तेव्हा ते नक्कीचं तुम्हाला आवडतं नाही. पण जेव्हा तुम्ही मनाने, आवडीने आपली कामं करता जबाबदारी समजून तेव्हा आपसूक तुमचा ताण कमी होतो. दबावामुळे निर्णय चुकू शकतात. ताण-तणावात घेतलेल्या निर्णयामुळे पुढे पश्चात्ताप होऊ शकतो. पण शिस्तीचे पालन करून योग्य निर्णय घेता येतातं, आपल्याला आपले ध्येय, लक्ष्य पूर्ण करण्यासाठी मदत होते. स्वशिस्त आपल्याला आत्म-जागरूकता, चिकाटी, वेळेचे नियोजन, स्व-नियंत्रण, लक्ष केंद्रित करणे ह्या सगळ्यांसाठी उपयोगी ठरते. आळस, चाल-ढकल, आज करू, उद्या करू, बघू हे शब्द जेव्हा तुम्ही स्वप्रेरित असतात तेव्हा तुमच्या शब्दकोशात येतं नाही हे नक्की! स्व:प्रेरणा आणि स्वयं-शिस्त हे एकमेकांशी संबंधित आहे.
संबंधित वृत्त :
खूप वेळा आपणं छान प्रेरणादायक गोष्ट ऐकतो, बघतो तेवढ्या पुरते आपल्याला प्रेरित वाटतं, पण जो पर्यंत स्व:प्रेरणा जागृत होणार नाही आपले लक्ष्य आपणं गाठू शकणार नाही, त्यासाठी स्वयं-शिस्त महत्वाची आहे. चिकाटी, दृढनिश्चय आणि सातत्य हे आपल्याला प्रगती, यश आणि भरभराट यासाठी महत्वाचे आहेत. जी व्यक्ती, शिस्त पाळते त्या व्यक्तीला नियोजन, आयोजन आणि अंमलबजावणी ( planning, organising & executing) सहज जमतं. आयुष्यात सगळ्या आघाड्यांवर आपल्याला मदत होते. शिस्त न पाळणे म्हणजे कामाचे तीन तेरा वाजणे. आपल्याला स्वयंशिस्तीचे काय फायदे होतात ते बघूया.
- व्यक्तिमत्व विकास आणि आंतरिक शक्तीसाठी ते महत्वाचे आहे.
- आपल्याला आळशीपणा, प्रलोभन आणि विचलनापासून दूर राहण्यास मदत करते.
- चांगले परस्पर संबंध ठेवण्यास मदत करते.
- प्रभावी आणि कार्यक्षम होण्यास मदत करते.
- ध्येय साध्य करणयास उपयोगी ठरते.
- व्यसनांवर आणि विलंबावर मात करू शकतो.
- कामाचे उच्च प्रतीचे समाधान मिळते.
- आपले स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मदत होते.
सुरवातीला शिस्त लावताना थोडा त्रास होईल, कठीण वाटेल, आळस येईल, कंटाळा वाटेल पण त्यात अशक्य असे काही नाही. आयुष्यात प्रत्येक क्षेत्रात घरी, कामाच्या ठिकाणी, सामाजिक क्षेत्रात शिस्तीचे महत्त्व आहे हे विसरून चालणारं नाही. शिस्त ही आपल्याला प्रत्येक क्षेत्रात उपयोगी पडते आणि यशस्वी बनण्याची गुरुकिल्ली असते. शिस्तीचे महत्त्व जेवढ्या लवकर आपल्याला कळेल, तेवढाच आयुष्यातील संघर्ष कमी होण्यास मदत होईल. आयुष्यात कोणत्याही क्षेत्रात तुम्ही कार्यरत असा, शिस्त महत्त्वाची आहेच, कर्मचारी, गृहिणी, विद्यार्थी सर्वांना!
शिस्तीमुळे सवयी (habits) लागतात, सवयीमुळे सातत्य (consistency) येते आणि त्यामुळे आपली वाढ होते, प्रगती (growth) होते. जर शिस्तीची सोबत असेल तर आपण अजून चिकाटीने पुढे जातो, give up करतं नाही. एकदा करून तर बघा, जसे तुम्हाला काय बदल दिसतात ते पहा लवकर उठून, वेळेत राहून, नियमित व्यायाम आणि योगासने करून. मुलांनी दरररोज अभ्यास करून परीक्षा किती छान जाते बघा. आपल्या जगण्यात सकारात्मक फरक जाणवेल जर आपणं शिस्त अंगी बाणवली तर. स्वीकार, इच्छाशक्ती, कठोर परिश्रम आणि चिकाटी ह्या शिस्तीच्या समूहातल्या शब्दांना समजून घेतले, तसे वागले तर क्या बातं? प्रेरणा तुम्हाला कामासाठी प्रेरित करते तर शिस्त तुमच्या प्रगतीला कारणीभूत असते. छोट्या, चांगल्या, दररोजच्या सवयी आपली आयुष्याची शिस्त बनतात आणि आपला यशाचा मार्ग मोकळा करतात. चला प्रयत्न करूया!