- आशय बबिता दिलीप येडगे
“आदिवासींबाबत लिहायचे असेल, बोलायचे असेल, आदिवासींचे विषय मांडायचे असतील तर त्यांना फक्त लांबून पाहून नाही तर त्यांच्यासोबत जगून तसे करायला हवे.. आदिवासी समजून घेणे जरा अवघड आहे…” नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यात असणाऱ्या लक्कडकोट नावाच्या आदिवासी गावात एका वडाच्या झाडाखाली बसलेले युवा कवी संतोष पावरा सांगत होते. त्यांच्या गावात होळीची एकच लगबग सुरु होती. होळी हा आदिवासींसाठी एक अत्यंत महत्वाचा सण मानला जातो. आदिवासी जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात गेलेला असला तरी होळीनिमित्त काही दिवस काढून तो आपल्या मूळ गावी नक्की परत येतो. संतोष सांगतात की होळीच्या अनेक आख्यायिका आहेत. मागील काही दशकांमध्ये आदिवासींवर झालेल्या धार्मिक अतिक्रमणामुळे सणांचे अर्थ सांगणाऱ्या आख्यायिकांमध्ये काही ‘वैदिक’ बदल करण्यात आलेले असले तरी होळीनिमित्त पाळल्या जाणाऱ्या परंपरा, निसर्गाची केली जाणारी पूजाअर्चा विधी यांमध्ये मात्र आदिवासींनी अजूनही निसर्गाला धरून ठेवले आहे.
आदिवासींच्या बाबतीत जे काही लिखाण केले गेले आहे त्यावर संतोष पावरा आणि इतर सुशिक्षित आदिवासी तरुण काहीसे समाधानी नाहीयेत. त्यांचं असं म्हणणं आहे की आदिवासींच्या प्रथा परंपरांना नेहमीच एका ठराविक चष्म्यातून आणि अत्यंत दुरून पाहण्यात आले. आदिवासी संस्कृती समजावून सांगणाऱ्या दलालांनी लेखक, पत्रकारांना जे काही रंगवून सांगितले त्याच्याच आधारावर पुढे बातम्यांची आणि साहित्याची निर्मिती झाली. पण आता काळ बदलला आहे, अनेक आदिवासी शिकू लागले आहेत, बोलू लागले आहेत आणि लिहू लागली आहेत. अभिजन साहित्यात केले गेलेले चुकीचे वर्णन त्यांच्या लक्षात येऊ लागले आहे आणि म्हणूनच पावरा या आदिवासी समुदायाचे कवी संतोष पावरा यांनी त्यांच्या कवितांच्या माध्यमातून उर्वरित समाजाचे आदिवासींबाबत असणारे अनेक गैरसमज खोडून काढण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

‘आदिवासींचे प्रणयपर्व’ असा उल्लेख केला गेलेल्या पारंपरिक भोंगऱ्या बाजाराचीही गोष्ट अशीच काहीशी आहे. एखाद्या आदिवासी परंपरेचे काहीसे रंगीत आणि खोटे चित्रण करून लोकप्रियता मिळवण्याचा आणि आदिवासींना मुख्य प्रवाहापासून दूर लोटण्याचा प्रयत्न याआधीही केला गेलाय. पण भोंगऱ्या बाजार हा केवळ एक बाजार आहे, आदिवासी बांधवांचा आनंद साजरा करण्याचा तो एक साधा, सरळ मार्ग आहे आणि त्यामुळे हा भोंगऱ्या बाजार प्रत्येकाने समजून घेतला पाहिजे. आदिवासींसाठी होळीचा सण हा केवळ एक किंवा दोन दिवसांचा नसतो. खरं म्हणजे हा सण त्यांच्यासाठी होळीच्या पाच दिवस आधी सुरु होतो आणि होळीच्या नंतरही पाच दिवस तो सुरूच असतो. मुळात आदिवासी समाज कोणताही सण सामूहिक पद्धतीनेच साजरा करतो. आदिवासींच्या सणांमध्ये भेदभाव असत नाही, पैश्यांची उधळण असत नाही, निसर्गाचा अपमान असत नाही आणि त्यामुळेच आदिवासींची होळी आणि प्रत्येक सण नीट पाहिला पाहिजे, त्यामध्ये सहभागी होऊन समजून घेतला पाहिजे.
संबंधित वृत्त :

काय आहे भोंगऱ्या बाजार?
होळीसाठी लागणारे जिन्नस खरेदी करण्याचा हा एक साधा बाजार आहे. एखाद्या मोठ्या बाजारपेठेच्या गावात हा बाजार भरवला जातो आणि त्या गावाच्या आजूबाजूला असणाऱ्या छोट्या छोट्या आदिवासी पाड्यांवरून शेकडो आदिवासी वर्षभर जमा केलेले पैसे घेऊन येतात आणि होळीसाठी लागणारे कपडे, खाद्यपदार्थ, मिठाई खरेदी करतात. मात्र या बाजाराचे मुख्य आकर्षण ठरते भोंगऱ्याची मिरवणूक.
यावर्षीच्या होळीनिमित लक्कडकोटमध्ये राहणारे आदिवासी म्हसावद नावाच्या एका मोठ्या गावात भोंगऱ्या बाजाराला गेले होते. लक्कडकोटवासियांसाठी हा बाजार अत्यंत महत्वाचा होता कारण यावर्षीचा भोंगऱ्याचा मान या गावाला देण्यात आला होता. आता मान देण्यात आला होता म्हणजे नेमकं काय तर या बाजारातून निघणाऱ्या मिरवणुकीत लक्कडकोटचे आदिवासी सगळ्यात पुढे असणार होते. त्यामुळे होळीच्या काही दिवस आधीपासूनच लक्कडकोटमध्ये राहणाऱ्या शेकडो आदिवासी तरुणांनी भोंगऱ्याची तयारी सुरु केलेली होती. या मिरवणुकीत नाचण्यासाठी एक अट असते आणि ती अट म्हणजे पुरुषांना होळीच्या काहीदिवस आधीच ‘गेर’ बनून घराबाहेर पडावे लागते.
‘गेर’ बनणे म्हणजे काय तर एखाद्या देवाला आपल्या मनातली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून नवस मागायचा आणि मग एकदा का नवस मागितला की पुढच्या पाच वर्षांमध्ये येणाऱ्या प्रत्येक होळीच्या सणात गेर बनायचं. हातात एखादी काठी घ्यायची आणि होळीच्या आधीचे पाच दिवस आणि नंतरचे पाच दिवस असे एकूण अकरा दिवस शरीराला पाण्याचा आणि महिलेचा स्पर्शही होऊ द्यायचा नाही. गावात एखाद्या सार्वजनिक ठिकाणी झोपायचं आणि रात्रीच्या वेळी नाचाचा सराव करायचा. होळीच्या आधी जर तुम्ही या पाड्यांवर गेलात तर हातात काठी घेऊन झाडाखाली गप्पा ठोकत बसलेले शेकडो आदिवासी तरुण तुम्हाला सहज नजरेला पडतील.

तर भोंगऱ्या बाजाराचा दिवस दरवर्षी वेगवेगळा असतो, होळीच्या आधी येणारा आठवडी बाजार हा भोंगऱ्या बाजार म्हणून ठरवला जातो. ज्या दिवशी भोंगऱ्या बाजार आहे त्यादिवशी सकाळी लवकर उठूनच भोंगऱ्याची तयारी सुरु होते. या बाजारात निघणाऱ्या मिरवणुकीमध्ये सहभागी होण्यासाठी प्रत्येकाने वेगवेगळे सोंग घेण्याचे ठरवलेले असते. कुणी पोलिसाचं सोंग घेतं, कुणी कैद्याचं सोंग घेतं, कुणी पारंपरिक आदिवासी पेहराव करत तर कुणी कंबरेभोवती भोपळ्याची आभूषणं गुंडाळून या मिरवणुकीत नाचायला तयार होतं. मात्र या सगळ्या सोंगांसाठी आणलेले कपडे, पारंपरिक आदिवासी हत्यारे आणि इतर सगळ्या गोष्टी अंगावर चढवण्याच्या आधी हे सगळं सामान गावाच्या चौकात एकत्र ठेवून गावातील पुजाऱ्यातर्फे त्याची एक साग्रसंगीत पूजा केली जाते. या पूजेत धान्य, अगरबत्ती, भाताची पेज आणि मोहाची दारू वापरली जाते. एकदा का ही पूजा झाली की मगच आपापले सामान घेऊन हे सगळे ‘गेर’ सोंगाची तयारी करू लागतात. वर्षभर विचार करून बनवलेल्या या वेशभूषेत प्रत्येकजण मजेशीर दिसू लागतो. एकदा का सगळी सोंगं तयार झाली की मग मिळेल त्या वाहनाने प्रत्येकजण भोंगऱ्याला निघतो.
या भोंगऱ्या बाजारातल्या मिरवणुकीचे वर्णने हे पाश्चात्य जगात होणाऱ्या हॅलोविनसारखे करावे लागेल. किंबहुना या भोंगऱ्या बाजारातल्या मिरवणुकीला हॅलोविनसारखा ग्लॅमर जरी नसला तरी हॅलोवीनलाही फिके पाडेल अशी कल्पकता आणि विविधता या आदिवासींच्या चित्रविचित्र पेहरावामध्ये दिसून येतो. आदिवासींचे पारंपरिक ढोल, मांदळ आणि बासरीच्या तालावर हे सगळे लोक या मिरवणुकीत नाचत असतात. एक गोष्ट मात्र प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून येते आणि ती म्हणजे आनंद. होळी हा सण आदिवासींसाठी केवळ एक सण नाही तर ती एक संधी आहे. वर्षभर झालेले वादविवाद विसरून, एकमेकांचे द्वेष मागे सोडून एकत्र येण्याची, आनंद साजरा करण्याची आणि पुन्हा एका नवीन आयुष्याला सुरुवात करण्याची.
भोंगऱ्याच्या मिरवणुकीत ढोल मांदळाच्या तालावर बेधुंद होऊन नाचणाऱ्या आदिवासींना पाहण्यासाठी शेकडो बघ्यांची एकच गर्दी झालेली असते. देहभान हरपून एखादा सण साजरा करत असताना तल्लीन झालेल्या या आदिवासींना उन्हाळ्यात तळपणाऱ्या सूर्याचे भानही राहत नाही. एकदा का मिरवणूक झाली की मग सुरु होते खरेदीची धावपळ. होळीसाठी लागणाऱ्या साखरेच्या माळा, गूळ, शेंगदाणे, डाळ खरेदी करून आपापल्या आदिवासी पाड्यांवर सगळे परत जातात.
भोंगऱ्याच्या या बाजाराबाबत अनेकांनी याआधी चुकीचे उल्लेख केलेले आहेत. संतोष पावरा म्हणतात की, “या बाजारात गुलाल लावून मुली पळवल्या जातात, हा बाजार म्हणजे आदिवासींचे एक प्रणयपर्व आहे अशा आशयाचे लेखन याआधी झालेले आहे मात्र हा बाजार हा फक्त आणि फक्त आनंद साजरा करण्याचा एक प्रसंग आहे. सणासाठी लागणारे सामान खरेदी करण्यासाठी हा बाजार भरवला जातो आणि मुळात होळीच्या एक महिना आधीच आम्ही समाजात कोणतेही कार्य करत नाही. या महिन्यात आमच्याकडे विवाह केले जात नाहीत, कसलेच धार्मिक समारंभ केले जात नाहीत आणि असे असताना कोण कशाला मुली पळवेल? आणि विशेष म्हणजे या मिरवणुकीत सहभागी झालेल्या प्रत्येकाच्या हातात तलवार, भाले, तिर कमान अशी हत्यारं असतांना लेकीबाळींना गुलाल लावून पळवून नेणे किती जोखमीचे आहे हे तुम्ही समजू शकता.”

भोंगऱ्याचा बाजार झाला की मग वेगवेगळ्या आदिवासी पाड्यांवर होळी पेटवली जाते. होळीसाठी गावातील काही ज्येष्ठ लोकांच्या मार्गदर्शनाखाली काही तरुण जंगलात जातात. जंगलात जाऊन तिथे असणारा सगळ्यात उंच बांबू मुळासकट खोदून आणला जातो. एकदा का हा बांबू होळीसाठी उभा केला की मग त्याच्याभोवती लाकूड, शेणाच्या गौऱ्या इत्यादी लावून एक मोठी होळी उभी केली जाते. होळी पेटवण्याच्या आधी गावातील पुजारी, सरपंच, पोलीस पाटील आणि इतर ज्येष्ठांच्या हस्ते वेगवेगळ्या पूजा केल्या जातात. एकदा का ही पूजा झाली की मग होळी पेटवली जाते. होळीच्या पेटण्याने पुन्हा एकदा आनंदाचा आणि उत्साहाचा संचार होतो आणि भोंगऱ्या बाजारात नाचून थकलेले गेर पुन्हा होळीभोवती फेर धरून नाचू लागतात.
रात्रभर होळी जळत असते आणि होळीच्या जळण्यासोबत आदिवासी एका नवीन पर्वात प्रवेश करीत असतात. एकत्र येऊन होळीची तयारी करणे, भोंगऱ्या बाजाराला जाणे, होळीच्या भोवती फेर धरून नाचणे या सगळ्या कृतींमधून आदिवासींनी एक सामूहिक तत्व जपून ठेवले आहे. जातीपातीवरून, पैश्यांवरून होणारा भेदभाव या सणांमध्ये दिसत नाही. जंगलाची पूजा करणाऱ्या, निसर्गाला देव मानणाऱ्या आदिवासी समाजाचे बाह्यरूप आधुनिकीकरणामुळे बदलले असले तरीही निसर्गाची कृतज्ञता आणि संस्कृतीचा आदर अजूनही त्यांच्यात टिकून आहे. त्यामुळे आदिवासींबाबत लिहिताना त्यांच्यासोबत जगण्याची गरज आहे आणि तसे केले तर आणि तरच त्यांच्या परंपरांचा, रूढींचा खरा अर्थ समजून घेता येईल हे नक्की.