- अश्विनी सुतार (डहाणू)
वारली ही खरंतर एक आदिवासी जमात. प्रत्येक समाजात असलेल्या चालीरीतींचा नकळतपणे त्या कलेवर परिणाम होत असतो. वारली चित्रकलाही याला अपवाद नाही. अश्याच काही चित्रांच्या माध्यमातून आदिवासी संस्कृती, परंपरा रेखाटली आहे बाईमाणूसच्या रिपोर्टर अश्विनी सुतार यांनी

वारली चित्रकला ही आदिवासी लोकांच्या दैनंदिन, धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाची एक ज्वलंत अभिव्यक्ती आहे. तसेच ते आणि त्यांचे देव आणि मातृ निसर्ग यांच्यातील घनिष्ठ संबंधाचे प्रदर्शन आहे. आदिवासी लोक आणि त्यांचे दैवत यांना जोडण्याचे हे माध्यम आहे.


वारली चित्रे प्रामुख्याने धार्मिक आणि सांस्कृतिक विधींवर आणि जन्म, मृत्यू आणि विवाह इत्यादी विशेष प्रसंगी केली जातात. वारली पेंटिंग देवांना आशीर्वाद देण्यासाठी आमंत्रण देण्यासाठी बनवणे शुभ आहे असे मानले जाते. सवसीन, ढवलेरी, भगत, चौकेर्या यांच्या भूमिकेसाठी आदिवासी लोकांची निवड केली जाते.

वारली ही खरंतर एक आदिवासी जमात. प्रत्येक समाजात असलेल्या चालीरीतींचा नकळतपणे त्या कलेवर परिणाम होत असतो. वारली चित्रकलाही याला अपवाद नाही. चौक हा वारली चित्रपरंपरेचा एक मुख्य भाग. याचेही दोन प्रकार आहेत. देव चौक आणि लग्न चौक. लग्नसमारंभात सवाष्ण हा चौक काढते. चौकाच्या आजूबाजूला लग्नातले काही विधी, लोकांची रेलचेल, आजूबाजूचे वातावरण असे सारे चित्र रंगवलेले असते. लग्नात काढल्या जाणाऱ्या चित्ररूपी रांगोळीला कणा भरणे असं म्हणतात. जमीन शेणाने सारवून त्यावर तांदळाच्या पिढीने चित्र काढले जाते व नंतर तिथे पुढचा लग्न विधी, रीत पूर्ण केली जाते. घरात एखादा जन्म झाला किंवा मृत्यू झाला तर सटी भरण्याची रीत आहे. यामध्ये सटीच्या देवाची पूजा करतात व त्याचं प्रतीक म्हणून चित्र काढतात. या रीतीभाती जपताना वारली चित्र काढली जातात.

“डहाणू, रायतली परिसरात राहणारे मल्हार कोळी, कोकणा, वारली, समाजाचे लोक आहेत हे सुध्दा वारली चित्र काढतात. परंतु एकाच जमातीचा शिक्का यावर बसला, याचं कारण या भागात राहणारी जमात आणि त्यांनी काढलेली चित्र म्हणून वारली चित्रकला असं नाव याला पडले. सुरुवातीला वारली हा ब्रँड नव्हता. तो हळूहळू ब्रँड बनला”.

भित्तिचित्रांपासून सुरू झालेला हा प्रवास कॅनव्हास, कापड, छोट्या छोट्या वस्तूंवर काढली जात आहे. वारली कला जपली जावी याकरता या प्रयत्न असल्याचे अनेकदा सांगितले जाते. परंतु अनेकदा वारली समाजाच्या परंपरा समजून न घेता त्याचा आपले उत्पादन शुल्क वाढवण्याच्या हेतूने वारली चित्रकलेच्या प्रसिद्धीचा गैरवापर केला गेला.

आदिवासींची अस्मिता म्हणजे वारली. आदिवासींच्या भावना आणि संस्कार वारलीसोबत जोडलेल्या आहेत.

वारली समाजाचा सांस्कृतिक ठेवा म्हणजे वारली. ही वारली चितारण्यासाठी तल्लीनता आणि कलेची भक्ती आवश्यक आहे.

वारलीमध्ये चितारलेले तारपा नृत्य. आदिवासींच्या आयुष्यातील सण उत्सव वारलीच्या माध्यमातून साकारले जातात.