- वर्षा कोडापे (चंद्रपूर)
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथील इंदिरानगर परिसरात टिनपत्रे बांधून साध्या झोपडीवजा घरात राहणाऱ्या एका मजूरास महावितरणने चक्क 19 हजार 840 रुपयाचे महिनाभराचे वीज बिल पाठवले आहे. इतक्या मोठ्या रकमेचे बील बघून विद्यूत ग्राहक चक्रावले आहे. सदर वीज बिल चुकिने आले असावे म्हणून ग्राहकाने महावितरण कार्यालयात दोनदा तक्रार केली. मात्र महावितरणचे अधिकारी चौकशी करण्यास टाळाटाळ करत असून महावितरणचा सावळा गोंधळ समोर आला आहे.
चिमूर शहरातील इंदिरानगर येथील रहिवासी अल्ताफ अहेमद अब्दुल सत्तार कुरेशी हे वीज ग्राहकाचे नाव. रोज मिळेल ते काम करुन मजूरी करणारे अल्ताफ आपल्या कुटुंबाचा गाडा चालवतात. त्यांच्या टीनाचे पत्रे लावलेल्या छोट्याशा घरात एक लाईट व एक पंखा याशिवाय काहीही विद्यूत उपकरणे नाहीत. तरीही महावितरणने चक्क त्यांचे महिनाभराचे युनिट 1253 दाखवले आहे. त्यांचे मागील एप्रिल महिन्याचे बील 19 हजार 930 रुपये महावितरणकडून पाठवण्यात आले. 10 मे पर्यंत बील भरल्यास 19 हजार 600 रुपये व त्यानंतर भरल्यास 19 हजार 840 रुपये वीज बिल भरणा करावा लागणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
मिळेल ते काम करुन झोपडीच्या घरात राहणाऱ्या व मजूरी करणा-या सर्वसाधारण कुटुंबाला 19 हजार 840 रूपयाचे वीज बिल आले आहे. महावितरणने पाठवलेले वीज बिल बघून ग्राहकास धक्काच बसला. या संदर्भात विद्युत ग्राहक अल्ताफ अहेमद अब्बदुल सत्तार कुरेशी यांनी दिनांक 17 एप्रिल रोजी महावितरण कार्यालयास लेखी तक्रार देवून विद्युत मीटर व्यवस्थित नसून उचित कार्यवाही करुन न्याय द्यावा, असे सांगितले. मात्र या तक्रारीवर कोणतीही कारवाई झाली नाही. दिनांक 8 मे रोजी पुन्हा विद्युत मीटर योग्य नसून योग्य चौकशी करून तत्काळ नवीन मीटर बदलवून देण्यासंदर्भात अर्ज केला. मात्र आठ ते दहा दिवस सारखे कार्यालयीन हेलपाटे मारुनही महावितरण अधिकाऱ्यांनी आतापर्यंत कोणतीच दखल घेतली नाही. यावरून महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

वीज बिल भरण्याची तारीख निघून गेली तरीही कोणतीही कार्यवाही ग्राहकांच्या बाजूने महावितरण विभागाने अद्याप केलेली नाही. दोन वेळच्या खायचा वांदा व जगण्याचे प्रश्न असलेल्या कुटुंबांना हजारो रुपयांचे अंदाजे बिल पाठवण्यात आल्याने ते भरायचे कसे? हा पेच ग्राहक अल्ताफ अहेमद अब्दुल सत्तार कुरेशी यांना पडला आहे. महावितरण विभागाने हा भोंगळ कारभार बंद करुन योग्य युनिट तपासणी करुनच विज बील पाठवावे. कुणाचीही फसवणूक करु नये, अशी मागणी ग्राहक अल्ताफ अहेमद अब्दुल सत्तार कुरेशी यांनी केली आहे.