‘झॉलीवूड’ – नव्या विषयाची ओळख करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न

Your film's heart should be in the right place. असाच एक चित्रपट सध्या चित्रपटगृहांत आहे, ज्याचं नाव आहे 'झॉलीवूड'.

उत्तम चित्रपटाची रेसिपी काय, या प्रश्नाचं उत्तर व्यक्तिगणिक बदलेल. माझं उत्तर हे आहे की, चित्रपटगृहातून बाहेर पडल्यानंतरही चित्रपट मनात रेंगाळत राहिला पाहिजे. कलाकार विस्मरणात जातात, पॉलिश्ड फ्रेम्स विस्मरणात जातात. पात्रं आणि कथा लक्षात राहतात लोकांच्या. संवाद लक्षात राहतात. जीव ओतून केलेलं काम लक्षात राहतं. चित्रपटाचं टेक्निक एक वेळ शिकता येईल, पण मुळात तुमच्याकडे सांगण्यासारखं काहीतरी हवं आणि ते रंजक पद्धतीने सांगण्याची हातोटी हवी. विषय तुमच्या आवडीचा असेल, तरी त्या विषयात काडीचाही रस नसलेल्या लोकांनाही तो जाणून घ्यावासा वाटेल, चित्रपट सुरु झाल्यापासून तो संपेपर्यंत त्यांना कंटाळा येणार नाही, अशा रसाळ पद्धतीने तो समजावून सांगता आला, तर तो चित्रपट टिकेल, अन्यथा नाही, इतकं सोपं आहे सगळं. थोडक्यात, your film’s heart should be in the right place. असाच एक चित्रपट सध्या चित्रपटगृहांत आहे, ज्याचं नाव आहे ‘झॉलीवूड’.

तृषान्त इंगळे लिखित, दिग्दर्शित ‘झॉलीवूड’ हा चित्रपट विदर्भातल्या झाडीपट्टी रंगभूमीची आपल्याला ओळख करून देतो. वर्षभरातले चार महिने ही नाटकं चालतात आणि त्यात कोटींची उलाढाल होते. काही वर्षांपूर्वी या रंगभूमीसाठी काम करणाऱ्या काही कलाकारांचा एका भीषण अपघातात मृत्यू झाला होता. त्या घटनेवर आधारित हा चित्रपट आहे. अमनची स्वतःची प्रेस आहे. म्हणजेच प्रॉडक्शन हाऊस, ज्याद्वारे तो ही नाटकं सादर करतो. मात्र त्याच्याकडेच काम करणारा राजा स्वतःची प्रेस टाकतो आणि सवंग लोकप्रियतेच्या मोहापायी नाटकाच्या दर्जाची पर्वा न करता त्यात डान्स नंबर्स घुसवणे, चित्रपटातल्या सुपरस्टार्सच्या नावावर गर्दी खेचणे, असे प्रकार सुरु करतो. याला कंटाळून लेखक दीपक त्याची स्वतःची प्रेस सुरु करतो आणि नारायणराव, रजनी हे सगळे कलाकार दीपकच्या नाटकात काम करू लागतात. पुढे काय होतं, कोणतं नाटक टिकतं, या नाटकांची सध्या काय अवस्था आहे, हे सगळं चित्रपटात पुढे ओघाने येतं.

तृषान्त इंगळे लिखित, दिग्दर्शित ‘झॉलीवूड’ हा चित्रपट विदर्भातल्या झाडीपट्टी रंगभूमीची आपल्याला ओळख करून देतो.

या चित्रपटाची श्रेयनामावली पाहिली की एक गोष्ट जाणवते, ती म्हणजे अमित मसुरकर वगळता एकही मोठं नाव चित्रपटाशी जोडलेलं नाही. सर्व कलाकार नवखे आहेत. मात्र सर्वांचाच अभिनय नेटका आणि उत्तम आहे. चित्रपटाला एक रॉ लूक आहे, ज्यामुळे तो ऑथेंटिक वाटतो. कथा सांगण्याच्या पद्धतीत एक गोड निरागसता आहे, त्यामुळे चित्रपट भिडतो. कुठेही ‘आम्ही बघा किती भारी पिच्चर बनवलाय’ हे दाखवण्याची खुमखुमी नाही. कथेत ओघाने येणारी पथनाट्याची दृश्यं अनेक सामाजिक प्रश्नांवर नेमकं भाष्य करतात. झाडीपट्टीच्या रंगीबेरंगी झगमगाटी दुनियेचं नेत्रसुखद चित्रण कथावस्तूला योग्य न्याय मिळवून देणारं आहे. त्यासाठी डीओपीचं विशेष कौतुक. चित्रपटात वाजणारी जुनी गाणी नॉस्टॅल्जिक करतात. अनेक ठिकाणी प्रेक्षकांच्या प्रतिक्रियाही टिपल्या आहेत. प्रेक्षकांत बसलेल्या स्त्री-पुरुषांच्या चेहऱ्यावरचे कॅमेऱ्याने टिपलेले भाव चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवर नेतात. ही दृश्यं जाणीवपूर्वक अधूनमधून चित्रपटभर दिसत राहतात, मात्र ती सुटी वाटत नाहीत. जागा भरण्यासाठी केलेलं हे पॅचवर्क नाही. ती चित्रपटाच्याच रंगात बेमालूम मिसळून गेली आहेत.

या चित्रपटाचे मुंबईत सध्या फक्त चार शोज सुरु आहेत. तेही किती वेळ टिकतील, सांगता येत नाही. काल मी पाहिलेल्या शोला मी वगळून फक्त पाच प्रेक्षक उपस्थित होते. बिग बजेट चित्रपटांच्या भाऊगर्दीत हे असे प्रामाणिक प्रयत्न टिकून राहायला हवेत आणि जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत ते पोहोचायला हवेत. तरच तृषान्तसारख्या असंख्य प्रामाणिक गुणी लेखक-दिग्दर्शकांना आपली कथा सांगावीशी वाटेल. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर येईल का, आलाच तर कधी, याबद्दल सध्या काहीच माहीत नाही. त्यामुळे शक्य असल्यास जवळच्या चित्रपटगृहात जाऊन लवकर पाहून घ्या.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here