- भगवान राऊत
संगीत नाटक अकादमी नवी दिल्ली व पु.ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मुंबईतील प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात बुधवार दिनांक 8 मार्च रोजी सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत एक दिवसीय अखिल भारतीय महिला लोककला संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. उद्घाटन, विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा विशेष सन्मान, दोन परिसंवाद तसेच आदिरंग, भक्तीरंग व लोकरंग कार्यक्रम समारोप असे या संमेलनाचे स्वरूप होते.
सकाळी 10 वाजता महिला व बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे रवींद्र नाट्य मंदिर या कार्यक्रम स्थळी आगमन झाले. तेव्हा संगीत नाटक अकादमी तथा डब्ल्यू 20 च्या अध्यक्षा डॉ. संध्या पुरेचा, पु.ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे प्रकल्प संचालक संतोष रोकडे व मुंबई विद्यापीठातील शाहीर अमर शेख अध्यासनाचे प्रमुख डॉ. प्रकाश खांडगे यांच्यासह ढोल ताशा पथकातील कलावंतांनी त्यांचे स्वागत केले. उद्घाटन कार्यक्रमात शालेय शिक्षण मंत्री तथा मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अखिल भारतीय महिला लोककला संमेलनासाठी यंदाच्या महिला आर्थिक धोरणामध्ये भरीव आर्थिक तरतूद करावी अशी मागणी या संमेलनाचे संयोजक तथा शाहीर अमर शेख अध्यासनाचे प्रमुख डॉ. प्रकाश खांडगे यांनी उपस्थित मंत्री महोदयाकडे केली. तर जी 20 परिषदेच्या माध्यमातून आगामी काळात भारतातील 10 हजार कर्तुत्वान महिलांना एकत्रित आणून त्यांचा सन्मान करण्याचा महोदय संगीत नाटक अकादमी तथा डब्ल्यू 20 च्या अध्यक्ष डॉ. संध्या पुरेचा यांनी व्यक्त केला.

प्राचार्य डॉ. दीपा क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय संत कवयित्रींचे योगदान या परिसंवादात डॉ. रवींद्र बेंबरे, डॉ. रंजना हरीश, डॉ विरल शुक्ल यांचा सहभाग होता. ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांच्या अध्यक्षतेखाली चित्रपटातील स्त्री भिमुख लोककला प्रदर्शन या परिसंवादात डॉ. प्रकाश खांडगे डॉ. गणेश चंदनशिवे, सोनिया परचुरे, सुभाष नकाशे व लावणी सम्राज्ञी राजश्री काळे नगरकर यांचा सहभाग होता. दुसऱ्या सत्रातील आदिरंग कार्यक्रमात पालघर येथील राजन वैद्य व सहकाऱ्यांचे आदिवासी तारपा नृत्य व गौरी नृत्य तसेच श्री कणेश्वर जनपदा कला संघ, शिमोगा कर्नाटकचे ढोलू कुनिथा हे ढोल नृत्य सादर झाले.
भक्तीरंग कार्यक्रमात भजन सम्राज्ञी गोदावरी मुंडे (बीड) यांचे भजन, भारुड सम्राज्ञी चंदाताई तिवाडी (पंढरपूर) यांचे संत एकनाथांचे सोंगी भारुड व सुप्रिया पूजा निषाद (छत्तीसगड) यांचे पंडवानी गायन सादर झाले. तर लोकरंग कार्यक्रमात शाहीर कल्पना माळी (सांगली) यांचा पोवाडा, लावणी सम्राज्ञी प्रमिला लोदगेकर (सांगली) यांचे लावणी नृत्य व जेबा बानो (मुंबई) यांची कव्वाली सादर झाली.

शानदार उद्घाटन
लोककला हे आपले जीवन आहे. जीवनात जोपर्यंत रस नाही तोपर्यंत त्याचा आनंद घेता येत नाही. मात्र पाचव्या अखिल भारतीय महिला लोककला संमेलनाच्या निमित्ताने आपल्याला देशातील विविध लोककलांचा आस्वाद घेता येणार आहे असे प्रतिपादन उद्योग, पर्यटन, महिला व बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले. महिला दिनाच्या निमित्ताने आज या संमेलनात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा गौरव होत आहे ही आनंदाची बाब आहे. हा महाराष्ट्राच्या स्री शक्तीचा गौरव आहे. आपल्या देशाची संस्कृती आपला प्राण आहे आणि ही संस्कृती विविध लोककला आणि लोककलावंतानी टिकवली आहे. लोक सहभागाशिवाय कुठल्याही कार्यक्रमाला शोभा येत नाही. त्यामुळे आपला सहभाग ही तितकाच महत्त्वाचा आहे. या देशातील लोककलेचे जतन व संवर्धन होण्यासाठी आपण सामूहिक प्रयत्न करू असे ते म्हणाले.
दीपक केसरकर म्हणाले की, अखिल भारतीय महिला लोककला संमेलन प्रत्यक्ष कृतीत आणणारे महाराष्ट्र हे या देशातील पहिले राज्य आहे. आपल्या देशातील विविध लोककलांना आगळे वेगवेगळे महत्त्व आहे. बोलीभाषा जशी बदलते तशी संस्कृती ही बदलत जाते. मात्र मराठी भाषा, संस्कृती आणि लोककलेचे अविट स्वरूपाची गोडी टिकवून ठेवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. आपल्या भाषेचा, आपल्या संस्कृतीचा आणि लोककलांचा आपल्या सर्वांनीच अभिमान बाळगला पाहिजे. महाराष्ट्र ही सांस्कृतिक विचारधारेची क्रांतिकारी भूमी आहे.अशा या प्रागतिक महाराष्ट्रात सातत्याने महिलांची प्रगती होत राहो.
डॉ. संध्या पूरेचा म्हणाल्या की, स्रीला आपल्या कडे उच्चतम दर्जा आहे. त्याच बरोबर स्रीला समान दर्जा मिळावा म्हणून आपण प्रयत्न करीत आहोत. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त संगीत नाटक अकादमी व पू. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अखिल भारतीय महिला लोककला संमेलन हा त्याचाच एक भाग आहे. W20 च्या माध्यमातून देशातील 10 हजार महिलांना एकाच व्यासपीठावर एकत्र आणून त्यांचा सत्कार करण्याचा आपला मानस आहे असे त्या म्हणाल्या.

यावेळी राजश्री काळे नगरकर (लावणी नृत्य), चंदा ताई तिवाडी (भारुड), ताई भिकल्या धिंडा (वारली कला), गोदावरी मुंडे (वारकरी भजन), सरला नांदुरेकर (पारंपरिक लावणी नृत्य), कल्पना माळी (शाहिरी पोवाडा), भावना गवळी (शिक्षण), विद्या ताई साठे (शिक्षण), कुंदा ताई पाठक (शिक्षण), प्रगती भोईर (पर्यावरण) यांचा मंत्री महोदयांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
संत कवयित्रींचे योगदान मोलाचे.
सर्व संत कालीन कवयात्रिने स्वकालीन अध्यात्मिक जीवनात आपल्या तेवजस्वितेने आपल्या बुध्दीमत्तेने, स्व कर्तुत्वाने स्वतःच्या कर्तृत्वाचा एक वेगळा ठसा उमटवला. या सर्व संत कवयत्रिंचे व्यक्तिमत्त्व आत्म तेजाने झळाळून उठते. व या तेजाची प्रभा समकालीन संतजनावरच नाहीतर सर्व दूर समाजावर पडलेली दिसते. त्यामुळे त्यांचे अध्यात्मिक, सामाजिक, व साहित्यिक योगदान फार मोठे आहे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. दिपा ताई क्षिरसागर यांनी केले.
भारतीय संत कवयत्रिंचे योगदान या विषयांवरील परिसंवादात अध्यक्षीय समारोप करताना त्या बोलत होत्या. त्यांनी महादंबा, संत मुक्ताबाई, संत मीराबाई, संत जनाबाई, संत सोयराबाई, संत वेनाबाई व बहिणाबाई या संतकवयत्रिंच्या कार्याचा आलेख सारांश रुपाने मांडला. या परिसंवादात सहभागी झालेले. रवींद्र बेंबरे यांनी बसवेश्र्वरांच्या काळात कितीतरी स्रीया मुक्तपणे वावरत असल्याचे सांगितले. डॉ. रंजना हरिष यांनी संत मीराबाई ची श्रीकृष्ण भक्ती व वैयक्तिक जीवन कार्य सांगितले. राजश्री शिर्के यांनी भक्तीच्या साधनेने संत पदाला पोहोचलेल्या संत कान्होपात्रा या गानिकेची महती विषद केली. विरल शुक्ला यांनी गुजरात मधील महापंथातील स्री गुरू महिमा सांगितला. समाजाच्या टीकेची परवा न करता समाजाच्या हिताचे कार्य करणाऱ्या सर्व संत कवयात्रिंचे योगदान महत्त्वाचे असल्याचा सुर या परी संवादातून निघाला.

लोककलेचा गोवर्धन पर्वत सर्वांनी उंचलावा
लोककलेचा गोवर्धन पर्वत उचलण्यासाठी प्रत्येकाने आपला हातभार लावून आपली लोककला साता समुद्रापार नेण्याचा वारसा पुढे चालु ठेवावा व या लोककलेमध्ये स्वता:चेही रंग भरून लोककला अधिक समृध्द करावी असे आवाहन ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राज दत्त यांनी केले.लोककलेचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे, लोककला अकादमी चे प्रमुख डॉ. गणेश चंदनशिवे, सिने नृत्य दिग्दर्शक सुभाष नकाशे, सोनिया परचुरे व लावणी सम्राज्ञी राजश्री काळे नगरकर आदी या परिसंवादात सहभागी झाले होते.
याविषयी आपले मत व्यक्त करतांना सोनिया परचुरे म्हणाल्या की, रंगमंचीय नृत्य आविष्कार व चित्रपटासाठी केले जाणारे नृत्य दिग्दर्शन या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. चित्रपटामध्ये 2 प्रसंगाना सांगणारा पुल बांधण्याचे काम नृत्य दिग्दर्शकाला करावे लागतो. डॉ. गणेश चंदनशिवे म्हणाले की, पारंपरिक लोककला व लोकसंगीताचा वापर मराठी व हिंदी चित्रपटामध्ये केला जातो. बाजीराव मस्तानी या चित्रपटातील गीत गायनासाठी मी तमाशातील कटाव, टाकणी व शिलकार हे प्रकार वापरले आणि त्यातूनच नभातून आली अप्सरा हे गीत साकारले आणि ते तुफान लोकप्रिय देखील झाले. चित्रपटात लोककला व लोक संगीत वापरताना त्याचा आत्मा हरवू देवू नका असे ते म्हणाले.
नृत्य दिग्दर्शक सुभाष नकाशे म्हणाले की, अलीकडच्या काळामध्ये तरुण पिढीमध्ये पाश्चात्य नृत्य शैलीचा प्रभाव वाढत आहे. तसेच लोकनृत्य व लोककला बाबत संभ्रम निर्माण झालेला आहे. मात्र मी लोकनृत्याचा वापर लोकांना अधिक ठळक पणे समजण्यासाठी करतो. जय मल्हार, हिरकणी, फत्तेशिकस्त, देवदास, हू तु. तु. अशा अनेक चित्रपटात तसेच स्टेज शो, मालिका, इव्हेंट शो मध्ये लोककलेचा वापर करतो. लावणी सम्राज्ञी राजश्री काळे नगरकर म्हणाल्या, बोर्डावर सादर होणारी लावणी व रुपेरी पद्यावरील लावणी सादरीकरण यामध्ये खूप फरक आहे. लोककला माझ्या घरातच होती. तरीही मी कथ्थक व भरतनाट्यम चे शास्त्रोक्त प्रशिक्षण घेतले. बरखा सातारकर या चित्रपटासाठी लावणीचे दृश्य साकारताना मी त्या प्रसंगाशी खूप एकरूप झाले होते. त्यामुळे ग्लिसरीन चा एकही थेंब न वापरता मी त्या चित्रपटातील लावणी व कारुण्य दृश्य देऊ शकले. मला नृत्याचा अनुभव होता मात्र अभिनयाचा सराव नव्हता तरीही हे दृश्य मी उत्कृष्टपणे केले. चित्रपटात रंगवलेली कहाणी वेगळी असते तर कलावंतांचे पडद्या मागचे जीवन त्याहूनही वेगळे असते असे त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी डॉ. गणेश चंदनशिवे यांनी गायिलेल्या आशुक माशुक, नार नाशिकची या बालेघाटी पारंपरिक लावणीवर नृत्य, मुद्राभिनय व खास नजाकतीसह केलेल्या अदेमुळे या परिसंवादाला चार चांद लागले. डॉ. प्रकाश खांडगे म्हणाले की, बोर्डावरची लोककला दर्शनीय आणि पडद्यावरील लोककला ही प्रदर्शनीय असते.
आदिरंगमध्ये तारपा नृत्य, गौरी नृत्य व ढोलु कुनिथा
अखिल भारतीय महिला लोककला संमेलनात दुपारच्या सत्रातील ‘आदिरंग’ या आदिवासी लोककला प्रकारामध्ये पालघर जिल्ह्यातील राजन वैद्य आणि सहकाऱ्यांनी तारपा नृत्य व गौरी नृत्य हे 2 महत्त्वाचे लोकनृत्य प्रकार सादर केले. त्यामध्ये बांबू व दुधी भोपळ्या पासून तयार केलेले तारपा हे वाद्य व घुंगर काठीच्या ठेक्यावर, टाळ्या वाजवत महिला व पुरुषांनी तारपा नृत्य सादर केले. महिला व पुरुष एकमेकांच्या हातात हात घालून फेर धरीत कमरेतून वाकत हे नृत्य सादर करतात. गौरी नृत्य प्रकारामध्ये मध्यभागी ढोलकी वादक ढोलकी वाजवतो त्याच्या भोवती गोल फेर धरत व टाळ्यांच्या ठेक्यावर पिवळी साडी व पांढऱ्या उपरण्याचा पदर किंवा ओढणी सारखा वापर करीत पारंपरिक वेशभूषा केली जाते. केसांचा अंबाडा त्यावर गजरा व त्यावर खोवलेली हिरवी पाने असा आदिवासी साज चढवलेल्या स्त्रियांनी मुखाने गीत गायन करीत हे गौरी नृत्य सादर केले.

श्री कंनेश्वरा जनपदा कला संघ शिमोगा, कर्नाटक या पथकाने ढोलु कुनिया हा कर्नाटकी ढोल वादन लोककला प्रकार सादर करून अनोखी अनुभूती दिली. शंकराचा वेष परिधान केलेले २ पुरुष कलावंत, डमरूच्या आकाराचे ढोल हे वाद्य वाजवत होते. तर त्यांना भगव्या वेषातील महिला कलावंतांनी देखील ठेका धरीत कूनिथा हा लोककला प्रकार सादर करीत ढोलवर चढत विविध कसरती देखील केल्या. या आगळ्या वेगळ्या कला सादरीकरणाने नाट्यगृहातील प्रेक्षक भारावून गेले.
भक्तीरंग मध्ये भजन, भारुड व पंडवानी गायन
भक्तीरंग कार्यक्रमात भजन सम्राट गोदावरी मुंडे आणि सहकाऱ्यांनी वारकरी भजन, अभंग, गवळण सादर केली. पंढरपूरच्या भारुड सम्राट चंदाताई तिवाडी आणि सहकाऱ्यांनी संत एकनाथांची सोंगी भारुडे तर छत्तीसगढ येथून आलेल्या समप्रिया पूजा निषाद व सहकार्याने पंडवानी गायन सादर करून भक्तीरसाची उधळण केली. भजन सम्राज्ञी गोदावरी मुंडे यांनी धरिला पंढरीचा चोर, डोईचा पदर आला खांद्यावरती, रुणझुण रुणझुण रे भ्रमरा असे वारकरी अभंग, भजन व गवळण सादर केली. त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांनी टाळ, मृदंग, तबला व गायनाची साथ दिली. पंढरपूरच्या सुप्रसिद्ध भारुड कलावंत चंदाताई तिवाडी यांनी वेडी झाले मी व एक ढालगज निर्माण झाली हे सोंगी भारुड सादर केले. वारकरी संप्रदायाच्या दिंडीने त्यांच्या कार्यक्रमास प्रारंभ झाला. त्यांना संध्या साखी, सरिता मोहोळ, गीता तिवाडी, अर्चना तिवाडी, सविता मेश्री व हेमा दळवी या महिला कलावंतांनी गायन व नृत्य साथ केली. तर ढोलकी वर संदेश तावरे व कीबोर्ड वर अमित दरीबकर यांनी संगीत साथ दिली.
छत्तीसगढ इथून आलेल्या समप्रिया पूजा निषाद व सहकाऱ्यांनी महाभारतातील कौरव पांडवाच्या युद्धाचे प्रसंग जिवंत उभे करणारे पंडवानी गायन सादर केले. पुरुष कलावंतांनी गळ्यात कवड्याच्या माळा, डोक्याला भगवे वस्त्र, मोरपीस, पिवळे पितांबर, दंडात दंडावळी व हातात कडे अशा पारंपारिक वेशभूषेत बासरी, हार्मोनियम, तबला, ढोलक, टाळ या पारंपरिक वाद्यासह संगीत साथ दिली. समप्रिया पूजा निषाद यांनी लाल रंगाची साडी, काळा रंगाचे ब्लाऊज असा पोषक परिधान केला होता. गळ्यात गळा भरून दागिने, कमरेला कमरपट्टा, दोन्ही हातात हातभर बांगड्या, पायात तोडे, हातात मोरपीस लावलेली एकतारी तंबोरा हे वाद्य घेऊन मोठ्या झोकात पंडवानी गायन केले. या आगळ्यावेगळ्या कथा पुराण गायनाने श्रोत्यांना खिळवून ठेवले.
‘लोकरंग’ मधील शाहिरी, कव्वाली व लावणी
लोकरंग या कार्यक्रमामध्ये सांगलीच्या महिला शाहीर कल्पना माळी यांची शाहिरी, पोवाडा, मुंबईच्या कव्वाली क्वीन झेबा बानो आणि सहकाऱ्यांचा कव्वालीचा मुकाबला व लावणी सम्राज्ञी प्रमिला लोदगेकर आणि सहकाऱ्यांनी सादर केलेल्या मराठमोळ्या लावणीने रसिकांना घायाळ केले. शाहीर कल्पना माळी आणि सहकाऱ्यांनी झाशीच्या राणीच्या पराक्रमाची गाथा सांगणारा पोवाडा सादर करून वीररसाची उधळण केली. त्यांना शाहीर देवानंद माळी, पृथ्वीराज माळी यांनी गायनाची तर इतर कलावंतांनी संबळ, खंजिरी, हार्मोनियम, डफ, ढोलकी या पारंपारिक वाद्यासह सुरेख संगीत साथ केली.

मुंबईच्या सुप्रसिद्ध शायर कव्वाली क्वीन जेबा बानो आणि सहकाऱ्यांनी कव्वालीचा शानदार मुकाबला सादर केला. कव्वाली सादरीकरणासाठी त्यांनी काळा खानदानी पेहराव केला होता. झेबा बानो यांनी काबे मे तेरा जलवा, काशी मे नजारा है, या ईश्वर वंदनेने आपल्या कव्वालीस प्रारंभ केला. मांगू मै क्यू किसी से, कोई देगा क्या मुझे, देता है तो क्या मैं खुदा मुझे परवर दिगार रही खुदा, आगे चले तो रेगिस्तान, आगे चले तो कब्रस्तान, हम भी कभी इंसान थे अशी एकाहून एक सरस शेरोशायरी करत कव्वालीची ही मैफल उंचीवर नेत महिला दिनाची सायंकाळ रम्य केली. त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांनी बँजो, हार्मोनियम, ढोलक, पॅडवर बेहतरीन संगीत साथ केली. मुंबई विद्यापीठातील लोककला अकादमीचे प्रमुख डॉ. गणेश चंदनशिवे यांच्या हस्ते सर्व कलावंतांचा सत्कार करण्यात आला.
सोलापूर जिल्ह्यातील मोडनिंब येथून आलेल्या लावणीसम्राज्ञी प्रमिला, नंदा, गीता लोदगेकर आणि सहकाऱ्यांनी अस्सल पारंपारिक मराठमोळ्या शृंगारिक लावण्यांची बहारदार मैफल सजवली. मुजरा, गवळण,लावणी आणि भैरवी अशा चढत्या क्रमाने जाणाऱ्या या लावणीने रसिक प्रेक्षकांना भुरळ घातली. सोळा हजारात देखणी, बाई मी लाडाची गं कैरी पाडाची, हिला बघताय, बघून हसताय काय, बाई गं कसला नवरा हवा गं तुला सांग, माझ्या कातड्याचा जोडा शिवावा तुमच्या पायात अशा एकाहून एक सरस लावण्या प्रमिला, नंदा, गीता लोदगेकर यांनी सादर केल्या. ज्योती महामुनी यांनी गायलेल्या लावण्यांना मोडनिंब च्या लोदगेकर संगीत बारी मधील कलावंतांनी ढोलकी, तबला, पायपेटी अशा पारंपारिक वाद्यांनी सुरेख संगीत साथ केली.