- डॉ. प्रशांत पाटील
प्रस्थापितांच्या बरोबरीने उभं राहत आपल्याला हवं ते सांगणारा चित्रपट करणं बॉलीवूडमध्ये शिरणाऱ्या मंडळींसाठी अंमळ अवघड गोष्ट आहे. मात्र गेल्या काही वर्षांचा ताळेबंद मांडला तर प्रस्थापितांनाही विचार करावा लागेल, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. अमुक एक प्रकारचे चित्रपट चालतात, हे छातीठोकपणे सांगणं कोणालाही शक्य नाही. त्यामुळे सातत्याने प्रयोग करत राहणं हे ओघाने आलंच. मात्र असं असूनही अतिशय हिमतीने आपल्याला हवे ते विषय घेऊन येणाऱ्या नवोदित दिग्दर्शकांचे प्रमाण जसे वाढलयं तसेच कलाकारांचे प्रमाणही निश्चितच वाढलयं. बॉलीवूडचे तथाकथित बादशाह, सुपरस्टार आदी आघाडीची मंडळी चौकटीत अडकलेली असताना, मनावर कुठलेही दडपण न घेता येईल ती भूमिका सहजपणे निभावत तिकीटबारीवर तुफान फटकेबाजी करणारे काही चेहरे सध्या प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहेत. छोट्या शहरांमधून आलेले हे तरुण कलाकार आपल्या अभिनयाच्या बळावर सध्या अष्टपैलू कलाकार म्हणून आपली ओळख निर्माण करताना दिसत आहेत.
गेल्या काही वर्षांत छोट्या बजेटचे आणि चांगला आशय असलेले चित्रपट तिकीटबारीवर प्रचंड हिट ठरले. त्यामुळे सुरुवातीला यांना कोण विचारणार? यांना ना हिरोचा चेहरा ना तसे व्यक्तिमत्त्व.. अशी हेटाळणी केली गेलेल्या या मंडळींचा भाव इतका वधारला आहे की सध्या त्यांना हिरो म्हणून चित्रपटात घ्यायचे तर अगदी करण जोहरसारख्या निर्मात्यालाही घाम फुटू लागला आहे… आघाडीची खान मंडळी आणि देवगण, अक्षय कुमार यांच्यानंतर रणबीर कपूर, रणवीर सिंग, टायगर श्रॉफ, वरूण धवन ही मंडळीही यशस्वीरीत्या कार्यरत असली तरी सध्या तिकीटबारीवर हिट ठरलेले चेहरे हे यांच्यापेक्षा वेगळे आहेत. बॉलीवूडच्या साच्यात अडकलेल्या कलाकारांपेक्षा या नवीन चेहऱ्यांना सध्या जास्त पसंती मिळते आहे. अर्थात, फार कमी कालावधीत या कलाकारांनी आपले नाणे खणखणीतपणे सिद्ध केले आहे आणि त्याचे एकमेव कारण म्हणजे “मुझे काम से इश्क है’ ही त्यांची वृत्ती. याच वृत्तीच्या बळावर बॉलीवूडमध्ये कमालीचा “सक्सेस’ झालेला आणि मुळात प्रेक्षकांनी ज्या कलाकारांना मोठं होताना पाहिलं आहे त्यातले एक नाव… विकी कौशल!
“अपने आज को पुरा जियो, सच्चाई से जियो’ हा वडिलांचा मुलमंत्र आपल्या शालेय आणि महाविद्यालयीन काळात विकीने कायमच जोपासला आणि अतिशय “सच्चाई’ने अभ्यास करून इंजिनियरची पदवी आणि नोकरही मिळवली. मात्र नोकरीच्या पहिल्याच दिवशी त्याच्यासारख्या शेकडो तरुणांचे 9 ते 5 मधले विश्व पाहून पहिल्यांदाच त्याने वडिलांचा सल्ला धुडकावून “आज’ पेक्षा “उद्या’चा विचार केला आणि मग पुढचे भविष्य घडले.

एका ‘स्टंटमॅन’ चा मुलगा आयटीची नोकरी सोडतो तेव्हा…
आपण असे काहीतरी शोधत असतो ज्याने आपल्याला आशा मिळेल, अखंड उत्साह येईल. मग हे कामाच्या बाबतीत असो, आयुषाच्या असो की आणखी कशाच्या. आपली खरी अडचण असते ती आपले उद्दिष्ट काय आहे ते ओळखण्याची. आपली उद्दिष्टेच कधी स्पष्ट नसतात. रोज रोज तेच काम करत रटाळवाणे आपल्या न आवडीचे काम करत जगत असतो. विकी कौशल याने देखील मुंबईतील राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेजमधून इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युुनिकेशन ची इंजिनिअरिंग पदवी (2009) प्राप्त केली. पास झाल्यावर एका कंपनीत इंटरव्ह्यूदेखील दिला आणि जॉइनिंग लेटर देखील मिळवलं…. पण त्या कंपनीत कॉम्प्युटरवर बसणारे असंख्य मुलं पाहून आणखी पाच दहा वर्षे देखील आपण हेच करत राहणार आणि यात आपल्याला रस नाही हे त्याने पक्के ठरवले. घरी आल्यावर वडिलांना जॉइनिंग लेटर दाखवलं आणि आपल्या मनातील खळबळ देखील बोलून दाखवली. कौशल खानदानमध्ये स्थिर नोकरीचे सगळ्यांचीच स्वप्ने होती. आजोबा होशियारपूर, पंजाबमध्ये किराणा दुकान चालवत. त्यांना आपला मुलगा बेभरवशाच्या व्यवसायात न पडता स्थिरस्थावर नोकरी, नियमितपणे पगार व हक्काची सुट्टी यासाठी तरी प्रयत्न करावेसे असं वाटायचे. वडील श्याम कौशल इंग्लिश लिटरेचरमध्ये बीए, एम ए झाले होते, तिथे कॉलेजमध्ये नोकरी लागणार होती पण त्यासाठी “एम.फिल’ची अट होती परंतु घरची परिस्थिती लक्षात घेता ते मुंबईत आले, पैसे मिळवण्यासाठी. मालाडमध्ये चाळीत राहत, छोट्या नोकऱ्या करीत पुढे रूममध्ये राहणारा “स्टंटमॅन’ जो दररोज संध्याकाळी पैसे घेऊन यायचा ते काम देखील त्यांनी स्वीकारले पण आज मुलगा जेव्हा स्थिर कायमस्वरूपी नोकरी सोडायचं म्हणत होता तेव्हा काय वाटलं असेल.
विकीने आपला निर्णय घेतला होता, शाळेपासून त्याला स्टेजवर काम करायला आवडायचे. बस्स! हेच करायचे हे एकदा ठरले आणि नोकरीचे लेटर त्याने फाडून टाकले. नसिरुद्दीन शहा यांनी एकदा नाटकाची तालीम करत असताना विकीच्या खांद्यावर हात ठेवून म्हंटले होते, चांगलं काम करतो तू . हेच शब्द होते ज्याने त्याला या निर्णयाला पोहचवले होते. मानव कौल, नसीर साब, कुमुद मिश्रा यासारख्या दिग्गजांच्या बरोबर इंजिनियरींग शिकत असतानाही तो रंगमंचावर काम करीत राहिला. श्याम कौशल यांनी “ब्लॅक फ्रायडे’ या अनुराग कश्यपच्या चित्रपटात काम केले होते ते फाईट मास्टर म्हणून… विकीची तीव्र इच्छा होती सिनेमाचे सर्व अंग शिकण्याची, त्यांनी विकीला “गँग्स ऑफ वासेपूर’ या अनुरागच्या चित्रपटात “इंटर्न’ म्हणून कामाला लावले.

‘’क्या मैं ऑडिशन के लिये फिट हूँ’’
नमित किशोर कपूर यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये अभिनय शिकण्यासाठी ऍडमिशन घेतली आणि प्रत्यक्षात गोड वाटणारे स्वप्न रोजच्या अगणित ऑडिशनवर येऊन थांबले. वडील चित्रपटात फाईटमास्टर असले तरी हा काही “स्टार कीड’ नव्हता की ज्यांच्यासाठी निर्माते लाईन लावून लाँच करण्यासाठी उभे राहतील. सर्व अनुभव घेत तो संधीची वाट पाहत होता, प्रयत्न करीत होता. दररोज एका बॅगेत फॉर्मल शर्ट पॅन्ट, कुर्ता पायजमा, स्पोर्ट्स ट्रॅक सूट व दाढीचे सामान घेऊन त्याने ओशिवरा, वांद्रे व वर्सोवा या भागात अगणित फेऱ्या मारायला सुरुवात केली होती ऑडिशनसाठी, कधी कधी तर दीडशे लोकांच्यामागे याचा नंबर असायचा… वाट सोपी नव्हतीच या इंडस्ट्रीची. दरवेळी तो समोरच्याला एक प्रश्न आवर्जुन विचारायचा “क्या मैं ऑडिशन के लिये फिट हूँ’…
ब्रिटिश फिल्ममेकर मायकल विंटरबॉटमचा एक सिनेमा होता ज्यात फ्रिडा पिंटो मुख्य भूमिकेत होती, चित्रपटाचे नाव होतं त्रिष्णा (2010). अनुराग कश्यपचा विकीला पंजाब येथे आपल्या आजोळी सुट्टीवर असताना एके दिवशी फोन आला, “”अरे तू ताबडतोब मुंबईला निघून ये. एक काम आहे तुझ्यासाठी. हा असा असा चित्रपट आहे त्यात मी देखील काम करतोय, तुझा आणि हुमा कुरेशीचा एक फिल्मी डान्स नंबर आहे, त्यात काम करायचयं. आपण सगळे मिळून धमाल करूयात.”

चित्रपटाचे नाव होतं “मसान’
विकी आयुष्यात पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर उभा राहिला होता आणि तेही एका डान्स नंबरसाठी… खऱ्या अर्थाने त्याचं मोठ्या पडद्यावरील पदार्पण झालं होतं. हा चित्रपट भारतात मात्र कधीच प्रदर्शित झालाच नाही. यथावकाश वासन बाला यांच्या “ग्रीक आऊट’ या शॉर्ट फिल्म (2013) मध्ये तो झळकला होता, त्याही आधी लव शव ते चिकन खुराणा (2012) या चित्रपटात कुणाल कपूरच्या पोरसावदा वयाचा रोल (ओमी) त्याने केला होता. परंतु दखल घ्यावी, लोकांच्या नजरेत यावं असं काम काही केल्या मिळत नव्हतं. मोझेस सिंग यांनी त्याला “जुबान’ या चित्रपटासाठी पहिल्यांदा कास्ट केलं, तो खरंतर विकीचा पहिला चित्रपट, परंतु त्याचे शुटिंग शेड्युल थंडीत ठेवलं होतं आणि त्याला अजून बराच अवकाश होता. याच दरम्यान एके दिवशी “वासेपूर’ च्या वेळी सहदिग्दर्शक असलेले नीरज घेवन व AD असलेली आणखी एक मुलगी जिच्या वडिलांचे पुण्यात निधन झाले म्हणून मुंबईहून पुण्याला गाडीतून चालले होते. सोबतीला विकीसुद्धा होता. राजकुमार राव, मनोज वाजपेयी व रिचा चढ्ढा यांना घेऊन नीरज तेव्हा चित्रपटाची जुळवाजुळव करत होता, चित्रपटाचे नाव होतं “मसान’. या कलाकारांना घेऊन निरजने एक रफ ट्रेलर देखील बनवला होता, तो विकीला दाखवलाही. बरेच दिवस झाले विकी ती गोष्ट विसरूनही गेला होता. आणि अचानक एकेदिवशी भल्या पहाटे मुकेश छाब्रा या कास्टिंग डायरेक्टरचा फोन आला, “”तू काय करतोय विकी? स्क्रिन टेस्ट द्यायला ये.” तिथे पाहतो तर नीरज घेवन दिग्दर्शकाच्या खुर्चीत बसलेला… नीरज विकीला “वासेपूर’पासून ओळखत जरी असला तरी विकी मुंबईत वाढलेला शहरी पंजाबी मुलगा होता हे त्याला माहित होते.
“मसान’च्या दीपक या “डोम’ जातीतल्या मुलाला तो कितपत न्याय देऊ शकेल म्हणून नरीजने त्यावेळी विकीला विचारात घेतले नव्हते. राजकुमार रावच्या शुटिंगच्या तारखांचा गोंधळ झाल्यामुळे आणखी एक पर्याय म्हणून निकीला ऑडिशनसाठी बोलवले होते. स्क्रिन टेस्टच्या वेळी मात्र सगळेच हादरले. विकी बॅग पॅक कर आणि बनारससाठी निघायची तयारी कर… इति नीरज घेवन… बनारसमध्ये फक्त नऊ दिवस दुर्गा पूजा उत्सव असतो. बजेट जास्त नसल्यामुळे नवोदित दिग्दर्शक निरजने त्या दुर्गापूजा उत्सवात “मसान’ चे शूट उरकायचं ठरवलं होतं. राजकुमार रावच्या जागी विकीची अशाप्रकारे वर्णी लागली आणि त्याला मिळाला स्वतः चा रिलीज झालेला पहिला चित्रपट “मसान’. शूटच्या दहा एक दिवस आधीच विकी बनारसला पोहचला. तिथल्या घाटावर रमला, जगला आणि डोम समाजातील चालीरीती, बोलीभाषा व लहेजा पकडण्याचा प्रयत्न केला. पहिल्याच प्रयत्नात त्याला यश आलं, चित्रपट नावाजला आणि वाखाणला गेला अगदी थेट कान्स फिल्म फेस्टिव्हलपर्यंत. मसान चित्रपट पाहून अमिताभ बच्चन यांनी विकीच्या अभिनयाची फोन करुन तारीफ केली, त्या रात्री त्याला झोप लागली नाही, असं विकी एका मुलाखतीत म्हणाला होता. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार (2015) जाहीर झाला, विकीला देखील झी, स्टार, आयफा आवर्ड्समध्ये बेस्ट न्यूकमर/ डेब्यु पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

त्याच वर्षी विकीला सर्वप्रथम ज्या मोझेस सिंगने साईन केले होते तो “जुबान’ चित्रपट झळकला. त्याने पंजाबी गायकाची भूमिका केली होती ज्यात तो बोलताना अडखळत बोलतो मात्र गाताना सहज गातो. सत्व हरवलेला आणि गवसण्याचा प्रयत्न करणाऱ्या दिलशारची ही कथा. विकीने समरसून काम केले पण चित्रपट काही व्यवस्थित प्रदर्शित झाला नाही. हा खरंतर विकीने साइन केलेला पहिला चित्रपट. त्यासाठी ऑडिशनच्या तब्बल सात ते आठ राऊंड त्याने दिल्या होत्या, प्रोडक्शन टीमने जवळपास तीनशे लोकांच्या ऑडिशन घेतल्या होत्या.
अनुराग कश्यपच्या बहुचर्चित मल्टिस्टारर, मल्टीकरोड “बॉम्बे वेल्वेट’ मध्ये विकीने एक छोटीशी भूमिका केली होती, जी आज कोणाच्या स्मरणात देखील असेल की नाही माहीत नाही. हा छोटासा रोल त्याने फक्त आपला गुरू आणि आता मित्र बनलेल्या अनुराग कश्यपसाठी केला. अनुरागला तो घरी आपल्या वडिलांसोबत फिल्मवर चर्चा करत बसलेला असताना परोठा आणून द्यायचा, अंकल म्हणायचा त्या वयापासून तो ओळखत होता. “बॉम्बे वेल्वेट’ चित्रपट तर बॉक्स ऑफिसवर फार मोठ्या प्रमाणावर नाकारला गेला. मात्र त्यातून सावरत असतानाच अनुरागच्या मनात आणकी एक फिल्म घोळत होती, त्यात तो विकीला न्याय देणार होता तो योग पुढच्याच वर्षी आला. 2016 साली अनुराग कश्यप घेऊन आला सिरीयल किलर रामन्नावर आधारित असलेला रामन राघव 2.0. यात रामनची भूमिका साकारली होती नवाजुद्दीन सिद्दीकी या कसलेल्या अभिनेत्याने तर विकीच्या वाट्याला आली राघव सिंग या पोलिस इन्स्पेक्टरची भूमिका. या भूमिकेसाठी विकीने झोकून दिले होते, एका खोलीत त्याने स्वतःला पाच दिवस कोंडून घेतले. खोलीत ना फोन होता, ना लाईट, ना वृत्तपत्र… सहाव्या दिवशी विकी सरळ गेला मुकेश छाब्राच्या ऑफिसमध्ये ऑडिशन देण्यासाठी. त्याच संध्याकाळी अनुराग कश्यपने ती पाहिली अन् बस्स भूमिका विकीला मिळाली. या भूमिकेने त्याची मोठ्या चित्रपटाचा कलाकार म्हणून इतरांना नोंद घ्यायला लावली.

2017 साली त्याचा एकही चित्रपट त्याचा रिलीज झाला नाही, तो याकाळात फक्त सातत्याने शूट करत होता कारण त्याला माहित होते की 2018 हे वर्ष आपलंच असणार आहे. “लव्ह पर स्वेअर फूट” या ओटिटी फॉर्मवर आलेल्या चित्रपटात संजय चतुर्वेदी या मध्यमवर्गीय मुलाच्या प्रेमाची कथा त्याने रंगवली. रघुवीर यादव, सुप्रिया पाठक, व रत्ना शहा या दिग्गजांच्या भूमिका त्यात होत्या. नेटफ्लिक्सचा हा पहिलाच हिंदी चित्रपट असावा बहुतेक. मग त्यापाठोपाठ आला मेघना गुलजारचा बहुचर्चित “राजी’. ज्यात आलिया भट्ट जरी मुख्य भूमिकेत असली आणि स्त्रीप्रधान चित्रपट असला तरी पाकिस्तानी मेजर इकबाल सय्यद या व्यक्तिरेखेला अक्षरशः केवळ आठ ओळी संवाद असतानाही त्याने केवळ देहबोलीतून आणि नजरेतून विकीने ती भूमिका प्रेक्षकांसमोर उभी केली. हा चित्रपट पहिल्यांदाच खऱ्या अर्थाने त्याला व्यावसायिक यश आणि मानमरातब देऊन गेला. “लस्ट स्टोरीज’ मध्ये करण जोहरच्या दिग्दर्शनाखाली त्याने एक कथा साकारली होती.
हाऊ इज द जोश?
मग आला राजू हिरानी या मातब्बर दिग्दर्शकाचा संजय दत्त वरील बायोपीक ” संजू’. विकीने कमली उर्फ कन्हैयालाल कापसी या संजूच्या गुजराती मित्राची व्यक्तिरेखा साकारली होती. यापाठोपाठ झळकला अनुराग कश्यपचा “मनमर्जियां’. अभिषेक बच्चन, तापसी व विकी यांच्या प्रेमाचा त्रिकोण यात दाखवला होता. एव्हाना विकीने हमरस्ता धरला होता. “उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ ची स्क्रिप्ट त्याच्या घरी पाठवण्यात आली होती म्हणजे बघा… मेजर विवान सिंघ शेरगिल या भूमिकेसाठी विकी कौशल सर्वोत्कृष्ट अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. विकीचा हा मेजर सोलो हिट म्हणता येईल असा चित्रपट. यातील how is the josh हा डायलॉग अगदी पंतप्रधान ते अगदी सामान्य माणसाच्या तोंडात रुळला आहे. बॉक्स ऑफिसवर याने अक्षरशः धुमाकुळ घातला. उरी हे नाव वाचताच कुतूहल निर्माण होऊन तिथे काय झालं असेल म्हणून त्याने ती स्क्रिप्ट वाचली, दुसऱ्या दिवशी सकाळी श्याम कौशल यांनी देखील ही स्क्रिप्ट वाचली त्यानी विकीला हा चित्रपट जरूर कर म्हणून सुचवले. या चित्रपटासाठी दोन महिने विकीने मिलेट्री ट्रेनिंगचा कसून सराव केला होता. यापूर्वी विकीला प्रेक्षक “मसान’वाला मुलगा म्हणून ओळखायचे आता मात्र विकी कौशल या नावाने तो ओळखला जाऊ लागला. ही ओळख मिळवण्यासाठी तो प्रचंड झगडला आहे. मेघना गुलजारच्या दिग्दर्शनाखाली तो सॅम माणिकशॉ या भारताच्या पहिल्या लष्कर प्रमुखाच्या भूमिकेत दिसणार आहे. सॅम बहाद्दूर या नावाने ते प्रसिद्ध होते. करण जोहरच्या तख्त या आगामी चित्रपटात तो रणवीर सिंग सोबत दिसणार आहे.
याच वर्षी त्याला करण जोहरच्या पार्टीत अंमली पदार्थांचे सेवन करतो म्हणून ट्रोलिंग केलं गेलं, खरंतर तो त्या पार्टीच्या तीन दिवस अगोदर डेंग्यूच्या आजारातून बरा झाला होता. काहीही सेवन न करता कारण नसतानाही तो टीकेचा धनी झाला. आता जाहीर कार्यक्रमात त्याला यावर विचारले जाते तेव्हा तो हसून उत्तर देतो, व आपण नशापान कधीच करत नाही. त्या दिवशी केवळ आजारी असल्यामुळे व नाकाला हात लावल्यामुळे तसं वाटलं असावं लोकांना. सत्य फार काळ लपून राहत नाही.

मालाड मुंबई येथे दहा बाय दहाच्या एका चाळीतील खोलीत त्याच बालपण गेलं आहे. पुढे वडिलांची स्थिती सुधारली आणि घरात कार आली तरी मुलांना शाळेत कधीच कारने जायला मिळालं नाही, बस किंवा ट्रेनने फक्त. आज विकी महागड्या मर्सिडीजमधून फिरतो परंतु आपण कोण, आपली मुळं काय याची जाण त्याला नक्कीच आहे. श्याम कौशल हे नाना पाटेकर यांच्या प्रहार ते अगदी शाहरुखच्या ओम शांती ओम, अशोका ते आजवर अनेक चित्रपटाचे अॅक्शन डायरेक्टर राहिले आहेत. विकी कधीही वडील इंडस्ट्रीत आहे म्हणून फिल्मी सेटवर कोणाला भेटायला गेला नव्हता. दहावीत असताना हृतिक रोशन “कहो ना प्यार है’ मुळे तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनला होता. फिजा चित्रपटात तो विकीच्या वडिलांसोबत काम करीत होता, तेव्हा त्याने गळ घातली हृतिकला भेटण्यासाठी. वडिलांचा असिस्टंट त्याला मजेत म्हणाला की, त्याला डान्स करावा लागेल हृतिकसमोर तरच तो भेटेल. विकीने मग तीन दिवस डान्सची प्रॅक्टिस केली.
“आपकी आंखो में एक इमानदारी है जो बाकीयों में नही’… मसानमध्ये शालू (श्वेता त्रिपाठी) असं जेव्हा दीपकला (विकी) म्हणते ते खरंच विकी कौशलला लागू होतं. ज्या इमानदारीने, निष्ठेने तो काम करत चालला आहे त्याला खरंच उत्तर नाही. मेघना गुलजार म्हणते की, विकी फारच संवेदनशील अभिनेता आहे, तो आपल्या भावना आणि बोलणं केवळ देहबोलीतून दाखवून देऊ शकतो, संवाद नसला तरीही. फक्त डोळ्यांतून तो विविध प्रकाराने व्यक्त होऊ शकतो.
विकीने जेव्हा इंजिनियरींग सोडून मनाचा कौल ऐकला तेव्हा आज त्याला समाधान मिळतयं… तो यशाच्या शिखरावर आहे. आपण आणि आपले लक्ष काही वेगवेगळे नसते. आपण आपल्या विचारांची दिशा, स्वतःची पार्श्वभूमी न ओळखल्यामुळे सगळा गोंधळ होतो. स्वतःला ओळखले पाहिजे. ते अर्थातच इतके सोपे नसले तरी फार अवघड नाही.
सो हाऊ इज द जोश बॉइज.