- समीर गायकवाड
रावळपिंडी कटातील आरोपींची सुनावणी सुरु होती. आरोपीच्या पिंजऱ्यात फ़ैज उभे होते. सरकारी वकिलांनी त्यांच्याकडे तिरकी नजर टाकत सवाल केला त्यावर फ़ैज तल्लखतेने उत्तरले – “सुगंध कसा पसरवला जावा याची देखील सुन्नाह आहे (प्रेषित पैगंबरांच्या आज्ञा – सुन्नाह sunnah) त्यामुळे तुम्ही इथे जे काही खोटेनाटे पसरवत आहात ते तर खूप गैर आहे!” फ़ैज यांनी केलेल्या या अनपेक्षित बचावापुढे सरकारी वकील हडबडून गेले. बरेच दिवस त्यांना डांबून ठेवण्यात आलं मात्र अखेरीस रिहा करावंच लागलं. फ़ैज अहमद फ़ैज यांची शायरी उस्फुर्त अशा प्रकारची होती !
भारत आणि पाक स्वतंत्र झाल्यावर पाक सरकारने फ़ैज यांना रावळपिंडी कटाचे आरोपी जाहीर करून तब्बल पंचवीस वर्षे तिथल्या तुरुंगात डांबले. लष्करात राहूनही कवीहृदय असणाऱ्या या कमालीच्या हळव्या माणसाचे तिथे अतोनात हाल झाले. तिथल्या तुरुंगात राहून त्यांनी शायरी केली, लेखन केले. सहा भाषा अवगत असलेल्या, कर्नलच्या हुद्द्यावर काम केलेल्या या शायरला 1962 मध्ये तत्कालीन रशियन सरकारने लेनिन शांतता पुरस्कार दिला होता. प्रगतीशील लेखन चळवळीचे फ़ैज सक्रीय सदस्य होते. मात्र पाकचे पंतप्रधान लियाकत अली खानांना फ़ैज भारतीय हेर असल्याचा संशय होता. फ़ैज यांच्या मृत्यूपश्चात त्यांचे समग्र साहित्य प्रकाशित झाले आणि एका प्रतिभावंत शायराचा बहुआयामी परिचय जगाला झाला. अनेक वर्षे कारावासात झिजवत ठेवल्यानंतर पाकिस्तान सरकारला पुढे उपरती झाली आणि 1990 मध्ये कर्नल फ़ैज़ अहमद फ़ैज़ यांना निशान- ए- पाकिस्तानचा पुरस्कार मरणोत्तर देण्यात आला. काहींची खरी कदर त्यांच्या मरणानंतर केली गेलीय अशा लोकांत दुर्दैवाने फ़ैज यांचेही नाव आहे ही मोठी क्लेशदायक बाब होय.

बालपणातील शिक्षण दर्गाह-मस्जिदमध्ये घेतल्यानंतर त्यांच्या वडिलांच्या लक्षात आले की इथे फक्त इस्लामी धारणेचे शिक्षण मिळतेय, मग त्यांनी मुलाला तिथून काढून स्कॉट मिशन स्कूलमध्ये भरती केले. महाविद्यालयीन शिक्षण मरे कॉलेज ऑफ सियालकोटमध्ये केले. लाहोरच्या जीसीयुतून फ़ैजनी साहित्य आणि कवितेवरील प्रेमापायी कला शाखेच्या पदवीसाठी प्रवेश घेतला. इंग्रजी साहित्यातून त्यांनी मास्टर ऑफ आर्ट्सची पदवी मिळवली. बालपणी अरेबिक, पर्शियन आणि उर्दू शिकलेल्या फ़ैज अहमदनी आता इंग्रजीवर प्रभुत्व मिळवले होते. त्यांचा जन्म नारोवाल या स्वातंत्र्यपुर्व भारतातील पंजाबातल्या शहराचा असल्याने त्यांना पंजाबी जन्मतः अवगत होती! इंग्रजी साहित्यातील ‘एमए’ची डिग्री मिळवतानाच त्यांनी अरेबिक भाषा विषयात देखील त्याच वर्षी (1932 मध्ये ) पदवी संपादन केली.
1935 मध्ये फ़ैज अलिगढ मधील महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. 1937 ला ते लाहोरला कुटुंबियांच्या आग्रहास्तव परत आले आणि तिथे प्राध्यापकी नोकरी स्वीकारली. 1942 ला दुसऱ्या विश्वयुद्धाच्या काळात ब्रिटीश भारतीय लष्करात भरती झाले.तिथे त्यांना त्यांच्या शौर्यामुळे बढत्या मिळत गेल्या. 1943 ला ते दिल्लीतल्या इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशनमध्ये सामील झाले. तिथे त्यांना 1947 मध्ये लेफ्टनंट कर्नल पदाची बढती मिळाली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सगळे कुटुंब लाहोरला असल्याने ते भारतात येण्याचा प्रश्नच आला नाही. पण स्वातंत्र्योत्तर काळात पाक लष्कराने काश्मीरमध्ये केलेले हल्ले आणि शिरकाण यामुळे ते व्यथित झाले आणि त्यांनी लष्करातून सेवानिवृत्ती घेतली. पाकिस्तानी लष्कराने भारतातील निरपराध नागरिकांचे शिरकाण केले म्हणून त्यांनी पाक लष्कराच्या नोकरीवर पाणी सोडले आणि आज आपल्या देशातील उजव्या विचारसरणीचे काही लोक फैज यांची संभावना कट्टर भारतद्वेष्टे म्हणून करतात तेव्हा खूप वाईट वाटते.
फ़ैज अहमद फ़ैज यांचे वडील अफगाणिस्तानमधील राजमहालात अनुवादकाची नोकरी करीत. फ़ैज यांचे आयुष्य इंद्रधनुष्यी होते. हॅमिल्टन नावाच्या मैत्रिणीच्या प्रेमाखातर इंग्लंडला गेले व केंब्रिजमध्ये शिकले. पुढे जाऊन एलिस जॉर्ज ह्या ब्रिटीश नागरिकत्व असणाऱ्या आणि विचाराने कम्युनिस्ट असणाऱ्या तरुणीच्या ते प्रेमात पडले.
फ़ैज यांच्या व्यक्तिमत्वावर प्रसिद्ध भारतीय तत्ववेत्ते मानवेंद्र नाथ रॉय (एमएन रॉय) यांच्या विचारांची मोठी छाप होती. 1941 मध्ये फ़ैज यांनी एलिससोबत विवाह केला. मात्र त्याआधीच्या काळात या दोघांनी परस्परांना लिहिलेली पत्रे वाचण्यासारखी आहेत. फ़ैज आणि त्यांच्या वडिलांनाही अफगाणमध्ये हेरगिरीच्या खोट्या आरोपामुळे तुरुंगात जावे लागले होते. दरम्यानच्या काळात एलिसवरील प्रेमाच्या अनुषंगाने फ़ैज यांच्यावर अत्यंत गलिच्छ नि अभद्र आरोप करण्यात आले.
त्याला उत्तर देणारा एक शेर त्यांनी लिहिला होता.
‘हमपर तुम्हारी चाह का इल्जाम ही तो है
दुश्नाम तो नही है यह इकराम ही तो है’..
त्याचा अर्थ असा होता की,
“तुझी लालसा केल्याचा माझ्यावर आरोप तर आहे ;
मात्र ही काही बदनामी नाही हा तर गौरव आहे !”
आपल्या प्रेमावर केल्या गेलेल्या आरोपांना उत्तर देण्याचीही एक कला असते ती ज्याला उत्तुंग साधते त्याचं नि प्रेमाचं नातं अभंग राहतं !

फ़ैज आणि त्यांच्या पत्नीची कम्युनिस्ट विचारसरणी आणि जोडीला त्यांचे पूर्वीचे भारताबरोबरचे लष्करी संबंध शिवाय सेक्युलर विचारसरणी यामुळे लियाकत अली खानाच्या मृत्यूशी निगडीत रावळपिंडी कटात त्यांचे नाव गोवण्यात आले त्यात त्यांना प्रदीर्घ तुरुंगवास पत्करावा लागला. नंतर मात्र त्यांना ‘पोएट ऑफ पाकिस्तान’ म्हटले गेले कारण त्यांनी केलेली अभूतपूर्व अशी लाजवाब शायरी. तुरुंगात असताना त्यांना काव्य सुचत गेले आणि त्यांच्यातला हळवा माणूस बहरत गेला. एक सृजन मनाचे काव्य तिथे प्रसवत गेले.
फ़ैज आणि एलिस या दांपत्याला दोन मुली झाल्या सलीमा हाश्मी आणि मोनिजा हाश्मी ही त्यांची नावे. यापैंकी सलीमा हाश्मी सेक्युलर आणि अण्वस्त्रविरोधक विचार चळवळीमुळे पुढे प्रकाशझोतात आल्या होत्या. फ़ैज आणि त्यांच्या कुटुंबियांना (मुलींसह) आजदेखील पाकिस्तानातील कर्मठ कट्टरतावादी लोक धर्मद्रोही म्हणून डिवचताना पाहायला मिळतात. आपल्याकडे सेक्युलर विचारवंतांची नानाविध उपाध्या लावून टवाळी केली जाते त्याची ही पाकिस्तानी आवृत्ती होय.
फ़ैज होतेच कवी हृदयाचे. अमंगल, किळसवाणे, वाईट-साईट त्यांना काही चालायचेच नाही. फ़ैज कधीही मोठय़ा आवाजात बोललेले नाहीत की कविता म्हणताना त्यांचा स्वर उंच झालेला नाही. अत्यंत ‘नाजूक मिजाज’ असल्याने छतावर पाल दिसली की तुरुंगातील अंथरुणाकडे न जाणारे फ़ैजसाहेब अनेकांनी पाहिले आहेत. फ़ैज किती नाजूक मिजाज होते, याचे आणखी उदाहरण- एकदा त्यांचा भाऊ हैदराबाद जेलमध्ये त्यांना भेटायला आला. नमाजची वेळ झाल्यावर नमाज अदा करतानाच हृदयविकाराच्या धक्क्याने तो तेथेच कोसळला. त्याचे दु:ख फ़ैज यांना इतके झाले, की त्यानंतर कितीतरी दिवस फ़ैज यांना चक्कर येत होती. पलंगावरून उठता उठता ते पडत असत. आपल्यामुळेच आपल्या भावाचा अकस्मात मृत्यू झाला अशी अपराधी टोचणी त्यांच्या मनात होती. भावाच्या स्मृतीबद्दल त्यांनी एक नौहा (शोकगीत)सुद्धा लिहिला होता.
‘मुझको शिकवा है मेरे भाई कि तुम जाते हुए
ले गये साथ मेरी उम्रे-गुजिस्ताँ की किताब..’
(माझ्या बंधुराजा, माझी एक तक्रार ऐक. तू जाताना माझ्या भूतकाळातील आयुष्याचे पुस्तकही नेलेस.)
फ़ैज जात्याच हुशार होते. एकदा त्यांना इंग्रजीत पैकीच्या पैकीपेक्षा जास्त गुण मिळाले होते. एका विद्यार्थ्याने आक्षेप घेतल्यावर हेडमास्तर म्हणाले, ‘‘काय करू यापेक्षा जास्त गुण मी देऊ शकत नाही.’’ एकदा त्यांना त्यांच्या हेडमास्तरांनी इक्बाल यांची एक ओळ देऊन गझल लिहायला सांगितली. तसे झाल्यावर तेव्हाचा एक रुपया फ़ैज यांना बक्षीस मिळाला होता. पुढे शायरीचा शौकच फ़ैज यांना सारे काही देऊन गेला. फ़ैज यांच्या ‘गुलो में रंग भरे बादे नौ-बहार चले’ ‘आये कुछ अब्र कुछ शराब आये’, ‘शामे-फिराक अब न पूछ’ वगैरे गझला मेहदी हसन, गुलाम अली, इक्बाल बानो आदिंनी गायलेल्या आहेत. पण अलीकडच्या पिढीला माहीत असलेला आणि खास करून लगेच नर्व्हस होणाऱ्या आणि नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांसाठी फ़ैज अहमद फ़ैज यांचा एक शेर खूप प्रसिद्ध आहे. कधी उदास वाटलं तर हा शेर वाचावा, थोडी तरी उभारी नक्की मिळते..
दिल ना-उम्मीद तो नही, नाकाम ही तो है
लम्बी है गमकी शाम, मगर शाम ही तो है….
मन अपयशी असेल; पण आशा तर बाकी आहे ना ?
दु:खाची सायंकाळ प्रदीर्घ असली म्हणून काय झाले, ती संध्याकाळच तर आहे ना ?
म्हणजेच सकाळ येईलच ना केव्हातरी ?
‘1942 अ लव्ह स्टोरी’ चित्रपटात ‘ये सफर बहुत ही कठीन मगर’ या गीतापूर्वी हा शेर होता.
विशेष म्हणजे 1942 मध्येच फ़ैजसाहेब सैन्यात भरती झाले होते. ते 1947 पर्यंत. पुढे पाकिस्तान सरकारने तुरुंगात टाकल्यावर ते लिहू लागले –
‘मता ए लौहो-कलम छिन गयी, तो क्या गम है
कि खूने-दिल में डुबोली है उँगलियाँ मैने
जबाँ पै मुहर लगी है तो क्या, कि रख दी है
हर एक हलक-ए-जंजीर में जबाँ मैने’

माझ्या हातातील कागद-पेन हिसकावून घेतले तर त्यात काय दु:ख ? मी माझी बोटं रक्तात बुडवून ठेवली आहेत. आता रक्तानेच कविता लिहीन. माझ्या बोलण्यावर बंदी आणली आहे. पण बंदी आणणार्यांना माहिती नाही की माझी वाणी मला जखडणाऱ्या साखळदंडाच्या हरेक कडीत मी ठेवली आहे.
‘बज्मे-खयाल में तेरे हुस्न की शमा जल गयी
दर्द का चाँद बुझ गया, हिज्र की रात ढल गयी’
माझ्या कल्पनेच्या मैफिलीत तुझ्या सौंदर्याचा प्रकाश पडला आणि दु:खाचा चंद्र विझून गेला, विरहाची रात निघून गेली.
‘मेरी किस्मत से खेलनेवाले
मुझको किस्मत से बेखबर कर दे’
(माझ्या नशिबाशी खेळणार्या प्रिये, मला नशीब आहे याचाच विसर पडू दे.)
1984 मध्ये मृत्यू होण्याआधी काही दिवस फ़ैज अहमद फ़ैज यांचे नाव त्या वर्षीच्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकित झाले होते. जगातील अनेक भाषांत त्यांच्या कविता अनुवादित केल्या गेल्या व विविध विद्यापीठात जगभरात अभ्यासाला ठेवल्या गेल्या. अभिनेते दिलीपकुमार यांचे ते आवडते कवी होते. पंकज उधास यांनी दस्तखत हा संपूर्णतः फ़ैज अहमद यांच्या गझलांचा अल्बम काढला होता नर्गिस, सुनील दत्त, यासिर अराफात, मुजफ्फर अली ते गुलजार अशी विविध स्तरातल्या लोकांची आपल्याकडच्या चाहत्यांची त्यांची यादी आहे.
ज्यांना चांगले वाईट कळते, सकल मानवजातीच्या कल्याणासाठी ज्यांचे मन झुरते अशा कवी पैकी एक फ़ैज अहमद होते. त्यामुळे ते पाकिस्तानी की आणखी कुणी अशा वादात न पडता मी त्यांच्यातला भला माणूस पाहतो अन त्यांच्या लाजवाब शायरीला सलाम करतो…
I m very fond of ur article. I m also social working in NT DNT Community
I like it very much
U will be voice very depressed community