आनंदाची बातमी; 17 वर्षांखालील महिला फुटबॉल वर्ल्ड कप भारतातच

FIFA ने उठवली भारतावरची बंदी

  • टीम बाईमाणूस

आंतरराष्ट्रीय फुटबॉलची सर्वात मोठी संस्था आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाने (FIFA) अखिल भारतीय फुटबॉल महासंघावर (AIFF) लादलेले निलंबन रद्द केले आहे. दहा दिवसांनंतर भारतीय फुटबॉलला मोठा दिलासा देत फिफाने तात्काळ प्रभावाने निलंबन मागे घेण्याचा निर्णय घेतला. यासोबतच ऑक्टोबरमध्ये भारतात होणाऱ्या 17 वर्षांखालील महिला विश्वचषक स्पर्धेलाही फिफाने हिरवा कंदील दाखवला आहे. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासकांच्या समितीच्या हस्तक्षेपाबद्दल नाराजी व्यक्त करत फिफाने 16 ऑगस्ट रोजी एआयएफएफला निलंबित केले होते. PTI वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिल्यानंतर आता इंडियन फुटबॉलने त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन याबाबतची माहिती दिली आहे. यावेळी फिफाकडून बंदी उठवण्याबाबतचं आलेलं पत्रदेखील त्यांनी ट्वीटमध्ये जोडलं आहे.

फिफाने शुक्रवारी निलंबन मागे घेत असल्याची माहिती देणारे अधिकृत निवेदन जारी केले. फिफाच्या प्रसिद्धीपत्रकात फिफाने 22 ऑगस्टच्या निर्णयाचा हवाला देत म्हटले आहे की, या परिस्थितीत, कौन्सिल ब्युरोने 25 ऑगस्टपासून एआयएफएफचे निलंबन तात्काळ समाप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, महिला अंडर 17 विश्वचषक 11 ते 30 ऑक्टोबर 2022 दरम्यान भारतात होणार आहे.

FIFA ने जारी केलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, ‘AIFF’च्या कार्यकारिणी समितीवर प्रशासकीय समिती नेमण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाकडून या समितीचे अधिकार रद्द करण्यात आले. त्यामुळे थर्ड पार्टीच्या हस्तक्षेपाचा मुद्दा निकाली निघाला. तसेच आता या संघटनेवर ‘AIFF’च्याच मॅनेजमेंटचा ताबा राहणार आहे. या कारणांमुळे भारतावरील बंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फिफा व आशियाई संघटना या दोन्हींची भारतातील फुटबॉल विषयी घडामोडींवर नजर राहणार आहे. तसेच 2 सप्टेंबरला होणारी निवडणूक प्रकिया व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी ‘AIFF’ला संपूर्ण सहकार्य करणार असल्याचेही ‘फिफा’ने जाहीर केले आहे.

एआयएफएफमधील भ्रष्टाचार तसेच अनियमिततेमुळे सुप्रीम कोर्टाने एआयएफएफच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर फिफाने तात्काळ कारवाई करत संघटनेवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. कारभार पुन्हा एकदा सुरळीत होण्याचा विश्वास झाल्यानंतर ही बंदी उठवण्याची माहिती फिफाने दिली होती. महासंघाच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता फिफाने आपला शब्द पाळला आहे.

का घातली होती बंदी? वाचा : भारतीय फुटबॉल महासंघाचा ‘सेल्फ गोल’

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here