Chess Olympiad: 9 महिन्यांची गरोदर असूनही हरिकाने रचला इतिहास

  • टीम बाईमाणूस

मोठ्या थाटामाटात पार पडलेल्या चेन्नई येथील बुद्धिबळ ऑलिम्पियाड 2022 (Chess Olympiad 2022) स्पर्धेत भारताच्या महिलांना कांस्य पदकावर जरी समाधान मानावे लागले असले तरी असे यश भारताने पहिल्यांदाच प्राप्त केले आहे. या ऑलिम्पियाडमध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती भारताच्या ग्रँडमास्टर हरिका द्रोणावल्लीची… नऊ महिन्यांची गर्भवली असताना हरिकाने संघासाठी खेळत भारताला पदक मिळवून देण्यात मोलाची कामगिरी केली. हरिका द्रोणावल्ली या संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिली. तिने तिचे सात सामने ड्रॉ केले.

मागील दोन वर्षे कोरोनामुळे ऑनलाईन पार पडलेली बुद्धिबळ ऑलिम्पियाड यंदा भारताच्या चेन्नई शहरात खेळवली गेली. या स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करत भारताच्या महिला गटाने कांस्य पदकाला गवसणी घातली. भारतीय संघातून कोनेरू हंपी, हरिका द्रोणवल्ली, तानिया सचदेव, आर वैशाली आणि भक्ती कुलकर्णी यांनी मिळून ही कामगिरी करुन दाखवली. यातील हरिका ही गर्भवती असतानाही तिने अशा स्थितीतही खेळत एक प्रेरणादायी उदाहरण सर्वांसमोर ठेवलं आहे.

9 महिन्यांची गर्भवती

पदक जिंकल्यानंतर नऊ महिन्याच्या गरोदर हरिकाने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून आपल्या भावना व्यक्त केल्या. ती आपल्या इन्स्टाग्राम पोस्ट मध्ये म्हणते, ‘मी वयाच्या 13 व्या वर्षी भारतीय महिला बुद्धीबळ संघात पदार्पण केले होते. तेव्हापासून मी 18 वर्षे भारतीय महिला संघाकडून खेळत आहे. मी आतापर्यंत 9 चेस ऑलिम्पियाड खेळले आहे. भारतीय महिला संघाला पदक पोडियममध्ये पाहण्याचे माझे स्वप्न होते. ते यंदाच्या चेस ऑलिम्पियाडमध्ये पूर्ण झाले.

जेव्हा मी भारतात ऑलिम्पियाड आयोजित केल्याबद्दल ऐकले आणि तेव्हा माझ्या डॉक्टरांशी खेळण्याबाबत सल्ला घेतला. तेव्हा त्यांनी तू योग्य काळजी घेऊन तणाव न घेता खेळू शकतेस तर खेळ. त्यामुळे संपूर्ण वेळ हा सराव आणि सामन्यात गेल्याने कोणतीच पार्टी, बेबी शॉवर तसंच सेलिब्रेशन करचा आलं नाही. पण मी ठरवलं की पदक जिंकल्यावरच मी सेलिब्रेशन करेल आणि अखेर मी हे करुन दाखवलं. भारतीय महिला बुद्धिबळ संघासाठी पहिले ऑलिम्पियाड पदक जिंकून दिले आहे.”

हरिका द्रोणावल्ली ही वयाच्या 13 व्या वर्षापासून भारतीय महिला बुद्धीबळ संघाचा भाग आहे. तिने जवळपास 18 वर्ष बुद्धीबळात भारताचे नेतृत्व केले. हरिका गरोदरपणात सहभागी झालेल्या खेळाडूंच्या यादीत सामील झाली आहे. सेरेना विल्यम्सने 2017 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली जेव्हा ती 8 आठवड्यांची गरोदर होती आणि तिला स्पर्धेच्या काही दिवस आधी हे समजले होते.

केरी वॉल्श जेनिंग्ज, अमेरिकन बीच व्हॉलीबॉल स्टार, तिने 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले तेव्हा तिच्या गर्भधारणेला पाच आठवडे झाले होते. माजी सोव्हिएत युनियनमधील आर्चर खातुना लोरिगने 1992 च्या बार्सिलोना गेम्समध्ये कांस्यपदक जिंकले होते जेव्हा ती चार महिन्यांची गरोदर होती.

हरिकाने जागतिक ज्युनिअर महिलांचे अजिंक्यपद, राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धांमध्ये सुवर्णपदक असे महत्त्वाचे यश मिळवलं आहेच; पण तब्बल तीन वेळा तिला महिलांच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत ब्राँझ पदकावर समाधान मानावं लागले आहे. कोनेरू हम्पीपाठोपाठ पुरुषांचा ग्रँडमास्टर किताब जिंकणारी ती दुसरी खेळाडू आहे. केंद्र सरकारनं तिला 2008 मध्ये अर्जुन पुरस्कार आणि 2019 मध्ये पद्मश्री देऊन गौरविले आहे.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here