‘चकडा एक्सप्रेस’ आता कायमची थांबणार

निवृत्तीपूर्वी झुलन गोस्वामीचा अखेरचा सामना लॉर्ड्सवर

  • टीम बाईमाणूस

मिताली राजनंतर आता भारताच्या दुसऱ्या सर्वात अनुभवी महिला क्रिकेटपटूने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. ‘चकडा एक्सप्रेस’ नावाने प्रसिद्ध असलेल्या झुलन गोस्वामीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. भारताची अनुभवी वेगवान गोलंदाज इंग्लंड विरूद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. भारतीय महिला क्रिकेट संघ येत्या सप्टेंबर महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. तिथे भारतीय संघाला टी 20 आणि एकदिवसीय मालिका खेळायच्या आहेत. त्यासाठी संघाची निवड करण्यात आली. निवडलेल्या संघामध्ये भारताची अनुभव क्रिकेटपटू झुलन गोस्वामीचा समावेश करण्यात आला आहे. मात्र बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, “झुलन गोस्वामी लॉर्ड्सवर तिचा शेवटचा एकदिवसीय सामना खेळेल.” भारतीय संघाची वाटचाल आणि भविष्यासाठी तयारी करण्याबाबत निवडकर्त्यांनी झुलनशी चर्चा केल्याचे वृत्त आहे. बीसीसीआयने भारतीय महिला क्रिकेटमधील तिच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर शेवटचा सामना खेळण्याची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

‘चकडा एक्सप्रेस’ नावाने प्रसिद्ध असलेल्या झुलनने 2002 मध्ये भारतीय संघात पदार्पण केले होते. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ तिने भारतीय महिला क्रिकेटसाठी योगदान दिले. आपल्या कारकिर्दीत तिने 12 कसोटी, 201 एकदिवसीय आणि 68 टी 20 सामन्यांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. तिने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण 352 बळी घेतलेले आहेत.

झुलनने निवृत्तीनंतचे आपले प्लॅन्स बनवले आहेत. झुलन ही निवृत्तीनंतर पुरुषांच्या आयपीएलमध्ये पाहायला मिळू शकते. सध्याच्या घडीला झुलनची प्राथमिक स्थरावर याबाबत बोलणी सुरु आहेत. झुलन पुरुषांच्या आयपीएलमधील एका संघात मेंटर (मार्गदर्शक) ही भूमिका बजावणार असल्याचे समोर येत आहे. सध्याच्या घडीला झुलन बंगालच्या संघामध्ये ही भूमिका बजावत आहे. त्याचबरोबर झुलनकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा चांगलाच अनुभव आहे. त्यामुळे झुलन ही गोष्ट समर्थपणे करू शकते, असा विश्वास बऱ्याच जणांना आहे. झुलनने भारताच्या महिला क्रिकेटमध्ये आपला एक अमीट असा ठसा उमटवला आहे. आतापर्यंत सर्वात जास्त अनुभव तिच्याकडे आहेच, पण सर्वाधिक बळीही तिच्याच नावावर आहेत. त्यामुळे आयपीएलमध्ये तिच्या अनुभवाचा चांगलाच फायदा खेळाडूंना होऊ शकतो. जर झुलनला पुरुषांच्या आयपीएलमध्ये मेंटर हे पद देण्यात आले तर आयपीएलमध्ये हे पद भूषवणारी ती पहिली महिला क्रिकेटपटू ठरू शकते. त्यामुळे आता झुलन कोणत्या संघाची मेंटर होणार आहे, याची उत्सुकता संपूर्ण क्रिकेट विश्वाला लागलेली असेल. पण त्यासाठी मात्र क्रिकेट चाहत्यांना आता आयपीएलच्या पुढील वर्षी होणाऱ्या सत्राची वाट पाहावी लागेल

Source : News 18 Hindi

झुलन गोस्वामीबद्दल…

1997 सालचा महिला विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना कोलकताच्या इडन गार्डन्स मैदानावर खेळवण्यात आला होता. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघात झालेल्या ह्या सामन्यात झुलनने बॉल गर्ल म्हणून काम केले होते. बेलिंडा क्लार्क, डेबी हॉकली, कॅथरीन फित्झपॅट्रिक ह्या दिग्गज महिला क्रिकेटपटूंचा खेळ जवळून पाहिल्यानंतर झुलन अतिशय प्रभावित झाली होती. त्याच दिवशी तिने क्रिकेटमध्ये करियर घडविण्याचा निश्चय केला.

कसोटी तसेच एकदिवसीय क्रिकेटमध्ये 22 पेक्षाही कमी सरासरीसह सातत्याने किफायतशीर गोलंदाजी करणारी झुलन पदार्पणापासूनच भारतीय संघाचा प्रमुख आधारस्तंभ होती. ह्याच कामगिरीसाठी तिला 2007 साली आयसीसीच्या सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. हा पुरस्कार जेव्हा तिने एमएस धोनीच्या हस्ते स्वीकारला, तो क्षण कारकीर्दीतील एक अविस्मरणीय क्षण असल्याचं झुलन सांगते.

छकडा एक्सप्रेस म्हणून ओळखली जाणारी झुलन गोस्वामी आपल्या वेगासाठी प्रसिद्ध आहे. 5 फुट 11 इंच उंचीची झुलन प्रतितास 120 किमी वेगाने गोलंदाजी करू शकते. कॅथरीन फित्झपॅट्रिकच्या निवृत्तीनंतर झुलन ही महिला क्रिकेटमधील सर्वात वेगवान गोलंदाज असल्याचे मानले जाते.

झुलनने वयाच्या पंधराव्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. कोलकात्यापासून 80 किमीवरील चकदाह गावात राहत असलेल्या झुलनला सुरुवातीच्या काळात सरावासाठी रोज पहाटे 4.30 च्या लोकल ट्रेनने प्रवास करावा लागत असे. इतर पालकांप्रमाणेच झुलनच्या पालकांचीही तिने अभ्यासावर अधिक लक्ष द्यावं, अशी इच्छा होती. मात्र प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर तिने ह्या संघर्षाच्या काळावरही मात केली.

झूलन गोस्वामी हिच्या जीवनावर आधारित असलेला ‘चकडा एक्सप्रेस’ हा बायोपिक चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर करत टीजर रिलीज करण्यात आला आहे. अनुष्का शर्माने तिच्या ट्वीटर अकाऊंटवरून छकडा एक्सप्रेस या तिच्या आगामी चित्रपटाचा टिझर शेअर केला होता.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here