सरकारच्या टेलिमेडिसीन योजनेला टाळे

मेळघाटात आदिवासींचे आरोग्य पुन्हा धोक्यात

  • टीम बाईमाणूस

मेळघाटमधील आदिवासींना आरोग्य सेवा तत्काळ मिळावी यासाठी टेलिमेडिसीन हा प्रकल्प राबवला गेला होता. मात्र, याच प्रोजेक्टला आताच्या सरकारच्या काळात टाळे लागले आहे. हा प्रकल्प राबविण्यात आला होता हरिसाल या गावात. देशातील पहिले डिजिटल गाव हरिसाल. आदिवासी बांधवांना नानाविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचा दावा केंद्रच नव्हे तर राज्य शासनाच्या वतीने मोठ्या दिमाखात करण्यात आला होता.

मात्र, 2016 साली सुरू करण्यात आलेली टेलिमेडिसिन सेवा अवघ्या तीन वर्षांतच गुंडाळण्यात आली. मुख्यमंत्र्यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट निधीअभावी शासकीय लालफीतशाहीत अडकला अन् बंद झाला.

काय होता प्रकल्प?

टेलिमेडिसीन सेवेच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधता येत होता. गंभीर आजार किंवा तातडीच्या व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेच्या वेळी रुग्णांवर कोणते व कसे औषधोपचार करावेत, याबाबतचा सल्ला घेण्यात येत होता. रुग्णांवर तत्काळ उपचार करण्यास याची मदत होते. टेलिमेडिसीन सुविधेद्वारे जगभरातील तज्ज्ञांशी संपर्क साधून संबंधित रुग्णांवर काय औषधोपचार करावेत, याबाबत सल्ला घेणे शक्य होते. संबंधित रुग्णांच्या आजारांची इतंभूत माहिती टेलिमेडिसीन यंत्रणेद्वारे तज्ज्ञांना दिल्यानंतर ते संबंधित रुग्णांच्या औषधोपचाराविषयी मार्गदर्शन करत होते. त्यामुळं रुग्णांना इतर ठिकाणी रेफर न करता जागेवरच औषधोपचार करण्यास मदत होत होती.

टेलिमेडिसीनच्या माध्यमातून गंभीर आजार किंवा तातडीची तथा गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेच्या वेळी रुग्णांवर कोणते व कसे औषधोपचार करावेत, यासंदर्भात थेट तज्ज्ञांशी संपर्क साधला जात होता. मुंबई, पुणे व नागपूर येथील तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधून रुग्णांवर उपचार करणे सोयीस्कर होत होते.

देशात नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत असताना मेळघाटात नेटवर्कअभावी टेलिमेडिसिन (व्हिडीओ कॉन्फरन्स) केंद्र बंद पडले आहे. दुसरीकडे ई- संजीवनी आणि महात्मा फुले योजनेतून रुग्णांना लाभ आणि तपासणीचा उपक्रम राबविला जात आहे. मेळघाटातील आदिवासी रुग्णांना मुंबई, पुणे आदी ठिकाणाच्या तज्ज्ञ डॉक्टरांची मदत व्हावी वेळेवर योग्य पद्धतीचा उपचार व्हावा यासाठी सेमाडोह चिखलदरा, हरिसाल, धारणी या ठिकाणी टेलिमेडिसिन सेवा सुरू करण्यात आली.

करार संपला अन् लागले ग्रहण

सेमाडोह येथे 16 जानेवारी 2015 रोजी सुरू करण्यात आलेली सेवा अवघ्या सात महिन्यांतच मनुष्यबळ उपलब्ध न झाल्याने बंद झाली, तर 2016 ला हरिसाल येथे मुख्यमत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्रात टेलिमेडिसिन केंद्र थाटण्यात आले. 2019 मध्ये मायक्रोसॉफ्ट इंडिया प्रा. लि. या कंपनीचा करार संपला आणि या सेवेलाही ग्रहण लागले. विशेष म्हणजे तीन वर्षांत केवळ 367 रुग्णांनाच या सेवेचा लाभ मिळाला.

आरोग्य विभागाने ‘इस्रो’च्या मदतीने महाराष्ट्रात सप्टेंबर 2006 साली ही टेलिमेडिसीन सेवा सुरू केली होती. केंद्र सरकारने कालांतराने यात पुढाकार घेऊन देशभरात ‘इ – संजीवनी’ सॉफ्टवेअरच्या माध्यमातून टेलिमेडिसीन योजना राबविण्यास सुरुवात केली. आरोग्य विभागाच्या टेलिमेडिसीन सेवेचा लाभ प्रामुख्याने जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, सामान्य रुग्णालये, तसेच ग्रामीण व स्त्री रुग्णालयांमध्ये उपचारासाठी केला जातो. तर इ – संजीवनी ही केंद्र शासनाअंतर्गत येणाऱ्या योजनेच्या माध्यमातून आरोग्य उपकेंद्र, ग्रामीण व शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये राबविण्यात येते. साधारणपणे 2015-16 पासून आतापर्यंत आरोग्य विभागाच्या टेलिमेडिसीन योजनेच्या माध्यमातून 23 लाख रुग्णांना उपचारासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळाले आहे, तर 2020 साली सुरू झालेल्या इ – संजीवनी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 44 लाख 44 हजार 383 रुग्णांना मदत मिळाली असा दावा सरकारतर्फे करण्यात येत आहे.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here