- टीम बाईमाणूस
27 नोव्हेंबर 1973…
केईएममध्ये सत्तरच्या दशकात कुत्र्यांवर संशोधन करण्याचा एक स्वतंत्र विभाग होता. माणसांवर उपचारापूर्वी औषधांचा प्रयोग आधी कुत्र्यांवर केला जायचा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नर्सेस कुत्र्यांवर उपचार करत असत… यापैकी एक नर्स होती अरुणा शानबाग! 27 नोव्हेंबर 1973 हा दिवस अरुणाच्या आयुष्यात काळाकुट्ट अंधार करून गेला. मूळची कारवारची (कर्नाटक), पण करिअर करण्यासाठी मुंबईत आलेली अरुणा एखाद्या सुंदर नटीसारखी दिसायची. मुळात ती उत्साही हाेती, असे तिच्या सहकारी सांगायच्या. सर्वांना मदत करण्यासाठी ती कायम पुढे असायची. त्या दिवशी ड्यूटी संपवून ती घरी परतण्याच्या तयारीत होती. कपडे बदलण्यासाठी ती केईएमच्या सीव्हीटीसी इमारतीच्या तळघरात गेली होती. आणि त्याच वेळी दबा धरून बसलेला नराधम वाॅर्डबाॅय सोहनलाल वाल्मीकीने डाव साधला. बलात्कार करण्याआधी त्याने कुत्रे बांधण्याच्या जाड साखळीने अरुणाचा गळा आवळला. त्याच्या तावडीतून सुटण्यासाठी अरुणाने जिवाचा आकांत केला. मात्र या झटापटीत तिच्या मेंदूला होणारा रक्तपुरवठा बंद होऊन ती कोमात गेली आणि चार दशके त्याच अवस्थेत राहिली.
तक्रारीच्या भीतीने घेतला सूड
कुत्र्यांच्या विभागात सोहनलाल हा वॉर्डबॉय म्हणून काम करायचा. वयाच्या तिशीत असलेल्या सोहनलालला दारूचे व्यसन होते. या दारूपायी तो कुत्र्यांचे खाणे केईएममधून चोरून बाहेर विकत असे. दांड्या मारण्याबरोबरच तो कामावरही वेळवर येत नसे. यामुळे वाॅडबाॅर्यची कामेही नर्सेसना करावी लागत. अरुणाने त्याला दोन – चारदा समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्याने ऐकले नाही. ‘यापुढे असेच वागलास तर तुझी लेखी तक्रार करेन’, असा दम अरुणाने दिला हाेता, त्यामुळे सोहनलाल संतापला आणि त्याने राक्षसी अत्याचार केले.
शिक्षा भोगून आल्यानंतर पुन्हा हल्ला!
सोहनलाल अंगकाठीने तसा तोळामासाच, तर अरुणा उंचपुरी व मजबूत शरीरयष्टीची. त्याच्या हल्ल्याला तिने समर्थपणे मुकाबला केला असता. यामुळेच कदाचित सोहनलालने आपल्याबरोबर आणखी दोघांना आणून अरुणावर हल्ला तसेच बलात्कार केला असावा, असा संशय 40 वर्षांपूर्वी अरुणाच्या सहकारी नर्सेसनी व्यक्त केला होता. मात्र, कोर्टासमोर तसे सिद्ध हाेऊ शकले नाही. त्यामुळे सोहनलालला बलात्कारासाठी शिक्षाच झाली नाही. फक्त खुनाचा प्रयत्न केल्याच्या आराेपावरून त्याला 7 वर्षे तुरुंगवास भोगावा लागला. (कदाचित अरुणाचे लग्न ठरले असल्यामुळे केईएमचे तत्कालीन डीन डॉ. देशपांडे यांनी तिच्यावर बलात्कार झाल्याची तक्रार लपवून ठेवली असावी, असा अंदाज आहे.) शिक्षा भोगल्यानंतरही साेहनलालमधील सुडाची ठिणगी शांत झाली नव्हती. सुटून बाहेर आल्यानंतर त्याने केईएममध्ये जाऊन काेमातील अरुणावर हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र आजूबाजूच्या लोकांनी तो हाणून पाडला.

डाॅक्टरबरोबर लग्न ठरले होते
अरुणाचे केईएममधील एका डाॅक्टरबरोबर लग्न ठरले होते. त्यामुळे ती खूप सुखावली होती. तिने लग्नासाठी पैसेही जमवायला सुरुवात केली होती. मात्र, तिच्या भावाचा लग्नाला विरोध होता. लहान बहीण शांता मात्र पाठीशी हाेती. सुखी संसाराची स्वप्ने पाहत असताना हा दुर्दैवी प्रसंग ओढवला. या घटनने त्या डाॅक्टरला प्रचंड धक्का बसला. यामधून सावरत त्याने अरुणावरील प्रेमापोटी वर्षभर तिची स्वत: सेवाही केली. तिला जेवण भरवायचा, फिजिओथेरपी द्यायचा. मात्र वर्षभरानंतरही अरुणा अर्धवट कोमातून बाहेर येत नसल्याने डाॅक्टरांच्या नातेवाइकांनी त्याचे दुसर्या मुलीबरोबर लग्न लावून दिले. खरेतर त्या काळात अरुणाच्या समोर दुसरा कुणी पुरुष गेला तर ती किंचाळायची. पण, आपला मित्र आल्याची तिला जाण होत असे. त्यावेळी ती शांत असायची… लग्न झाल्यानंतर त्या डाॅक्टरने मात्र केईएम सोडले.
नर्सेसनी दिले भरीव प्रेम
बहीण सोडली तर अरुणाला जवळचे नातेवाईक नव्हते. भाऊ असून नसल्यासारखा होता. बहिणीची परिस्थिती जेमतेम, अरुणाला सांभाळणे तिच्यासाठी कठीणच. पण, केईएममधील नर्सेसनीच अरुणाला बहीण मानत 42 वर्षे अविरत सेवा केली. केईएममधील वाॅर्ड 4 ए साइड रूम ही गेली अरुणाचे जणू घरच बनले हाेते. अरुणाबरोबरच्या परिचारिका आता निवृत्त झाल्या आहेत. मात्र, नव्याने आलेल्या नर्सेसही तिची मनापासून काळजी घेत. अरुणाला जुनी गाणी खूप आवडत, त्यामुळे नर्सेस तिच्यासाठी अशी गाणी लावत.
अरुणासाठी परिचारिकांनी पुकारला संप
अरुणा काेमातून बाहेर येत नसल्याने अखेर ‘केईएम’ प्रशासनाने तिला घरी घेऊन जाण्यासाठी तगादा लावला हाेता. हे कळल्यानंतर सहकारी नर्सेसनी अरुणासाठी तीन दिवस संप केला होता. अरुणा ही केईएमची स्टाफ असून तिच्यावर रुग्णालयात हल्ला झाला आहे, म्हणून तिची काळजी घेणे, ही केईएमची जबाबदारी असल्याचे नर्सेसनी ठणकावल्याने शेवटी प्रशासनाला माघार घ्यावी लागली.

दयामरणासाठी अर्ज
‘अरुणाची गोष्ट…’ असे पिंकी विराणी यांनी पुस्तक लिहिले आहे. तिच्या दयामरणासाठीही विराणी यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला होता. हे प्रकरण खूप गाजले. कईएमच्या नर्सेसचा मात्र याला विरोध होता. ‘तिचे डोळे मिटेपर्यंत आम्ही तिची सेवा करण्यास समर्थ आहोत,’ अशी त्यांची भूमिका हाेती. नर्सेसनी निदर्शनेही केली, त्याला देशभरातून पाठिंबा मिळाला. शेवटी न्यायालयाने डाॅक्टरांची समिती नेमून अहवाल मागवून मग निर्णय देण्याचे ठरवले. ‘अरुणा अर्धवट काेमात हाेती. ती जेवण तसेच औषधेही वेळेवर घेत आहे, असा अहवाल समितीने दिला हाेता. यावरून तिची जगण्याची ओढ संपली नसल्याचे स्पष्ट झाल्याने न्यायालयाने याचिका फेटाळली. या निर्णयाचे नर्सेसनी पेढे वाटून स्वागत केले.
अंत्यसंस्कारांसाठी नर्सेसचा हट्ट
रुग्णालयाने अरुणाचे पार्थिव त्यांच्या दोन नातेवाइकांकडे सोपवले. त्याला रुग्णालयातील परिचारिकांनी आक्षेप घेतला होता. 42 वर्षांपासून हे नातेवाईक कुठे होते? अरुणाला कोणी भेटायलाही आले नव्हते. अरुणा आमच्या कुटुंबाच्या सदस्यासारखीच होती. तिच्यावर अंत्यसंस्कार करणे हा आमचाच अधिकार आहे. अन्य कोणालाही आम्ही अंत्यसंस्कार करू देणार नाही, असे परिचारिकांच्या प्रभारी कल्पना गजुला म्हणाल्या. शेवटी त्यांच्यात समझोता घडवून आणला आणि परिचारिका व कुटुंबीयांनी मिळून मुंबईच्या भोईवाडा भागात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.

वेदनादायी अनुभवांवर पुस्तक, नाटक
पिंकी विराणी यांनी अरुणा यांच्या या वेदनादायी अनुभवांवर 1998 मध्ये ‘अरुणाची गोष्ट’ हे पुस्तक लिहिले होते. दत्तकुमार देसाई यांनी 1994-95 मध्ये ‘कथा अरुणाची’ हे मराठी नाटक लिहिले होते. प्रख्यात अभिनेता-दिग्दर्शक विनय आपटे यांनी ते 2002 मध्ये रंगमंचावर आणले होते.