एक ‘अबोध’ कहाणी…!

दिलीप ठाकूर जवळपास चाळीस वर्षे सिनेपत्रकारीतेत ‘अ‍ॅक्टीव्ह ‘ आहेत. लहान मोठ्या फिल्म स्टुडिओपासून ते अनेक आऊटडोअर्स शूटिंगपर्यंत त्यांनी भटकंती/भेटीगाठी/निरीक्षण असा त्यांचा चौफेर आणि अनेक प्रकारच्या अनुभवांचा प्रवास सुरू आहे. अनेक आठवणी/माहिती/तपशील/संदर्भ त्यांच्याकडे आहेत. याच प्रवासात त्यांना अनेक सेलिब्रेटिजना भेटण्याचा योग येतो. त्यातील माधुरीच्या ‘पहिल्या भेटी’च्या अनुभवाची ही गोष्ट…

गिरगावातील खोताची वाडीतील मोजून दहा बाय दहाच्या खोलीत वाढताना एक पडदा थिएटर अर्थात सिंगल स्क्रीन थिएटर्सपेक्षा मी गल्ली चित्रपट जरा जास्तच एन्जॉय केल्याने ‘पडद्यावरचे जग प्रत्यक्षात कसे बरे आहे/असते’ हे जाणून घेणे/पाहणे/अनुभवणे/निरीक्षण करणे याकडे माझा मी मिडियात आल्यावर पहिला रस होता….

तात्पर्य, सिनेमा पहायचा आणि परिक्षण करायचे या चौकटीत रहायचे नाही हे मी पक्के ठरवले आणि मग अनेक प्रकारचे अगणित लाईव्ह अनुभव येत गेले.

माधुरी दीक्षितच्या ‘पहिल्या भेटी’ चा अनुभव अगदी यातूनच आला.

नवशक्ती दैनिकात मी चित्रपट सदर लिहू लागलो आणि अशा सकारात्मक संधीची सतत वाट पाहू लागलो. राजश्री प्रॉंडक्शनच्या वतीने त्या काळात आपल्या आगामी चित्रपटाचे दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ यांची मिडियाशी भेट घालून देत. दक्षिण मुंबईतील एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये दुपारी चार वाजता शुध्द शाकाहारी नाश्ता (त्यांच्या चित्रपट संस्कृतीशी मिळता जुळता) आणि चहा असा त्यासाठी बेत असे. (सिनेमाचे जग म्हणजे ओली पार्टी हे घट्ट समीकरण येथे अपवाद).
मरीन ड्राईव्हच्या नटराज हॉटेलमध्ये (आता त्याचे नाव बदललयं) ‘अबोध’ (१९८४) चे नवीन चेहरे तापस पॉल आणि माधुरी दीक्षित यांच्या भेटीचे आमंत्रण हाती आले तेव्हा ‘ही नावे वाचून इम्प्रेस होण्यासारखे’ तेव्हा खरंच काही नव्हते. आणि ते गरजेचेही नव्हते. राजश्री प्रॉंडक्शनने असे अनेक नवीन चेहरे रुपेरी पडद्यावर आणले, काही आपल्या गुणवत्तेने टिकले, काहींना नशिबाची साथ मिळाली नाही. अर्थात, सिनेमाच्या जगात यशासारखी सुंदर गोष्ट कोणतीच नसल्याने जे यशस्वी ठरले तेच नामवंत ठरले…

‘अबोध’ हे राजश्री प्रॉंडक्शनच्या चित्रपटाच्या परंपरेतील नाव आहे एवढेच कौतुक होते. उपहार, पिया का घर, पहेली वगैरे नावं सांगता येतील. त्या काळात मुंबई आकाशवाणीवर कोणी दीक्षित बातम्या वाचत असे, ते करताना दीक्षितमधील दी… दीर्घ उच्चारत, पण त्यांचा आणि ‘नवतारका माधुरी’ चा काही संबंध असेल असे वाटत नव्हते. हिंदी चित्रपटसृष्टीत सी. पी. दीक्षित नावाचे दिग्दर्शक होते. फकिरा (शशी कपूर व शबाना आझमी), गजब (धर्मेंद्र व रेखा) हे त्यांचेच चित्रपट. ही माधुरी कोणी आहे का असा प्रश्न मनात होता. पण त्याचे उत्तर मिळण्यासाठी खुद्द माधुरीशी बोलायला हवे. पण पाच साडेपाच वाजले तरी तिचा पत्ता नाही. त्या काळात घरी साधा लॅन्डलाईन असणे प्रतिष्ठेचे होते, तर मग मोबाईल हा शब्ददेखील माहिती असणे शक्य नव्हते. तिला यायला उशीर का बरे होतोय हे समजायला मार्ग नव्हताच. राजश्री प्रॉंडक्शन तसे शिस्तबद्ध आणि वक्तशीर. पण हे काय? आम्हा उपस्थित पत्रकारात चुळबुळ होणारच.

…. अखेर आपल्या आई बाबांसोबत माधुरी आली आणि आल्या आल्याच शुध्द मराठीत म्हणाली, उशीर झाल्याबद्दल क्षमस्व. विलेपार्लेवरुन आम्ही वेळेवर निघालो होतो, पण मुंबईतील ट्रॅफिकची सगळ्यांनाच कल्पना आहे….. पण अगदीच शाळकरी विद्यार्थीनी हो. तिच्यात तत्क्षणी ‘स्टार मटेरियल’ असे काही नव्हतेच. राजश्री प्रॉंडक्शनच्या चित्रपटाची नायिका अशीच सोज्वळ, साधी असते/असावी अशा इमेजला हे रुपडे एकदम फिट्ट होते. अगदी छोटी गोष्ट वाटते पण महत्वाची आहे. औपचारिक पत्रकार परिषद झाली आणि अनौपचारिक भेटीगाठी, गप्पा सुरु झाल्या, त्या जास्त महत्वाच्या असतात. त्याच कलाकार आणि पत्रकार यांच्यातील अंतर शक्य तितकं कमी करतात.

यातूनच माधुरी दीक्षितशी माझी पहिली भेट झाली. पहिल्या भेटीत आवडला तो तिचा आत्मविश्वास आणि अतिशय उत्तम मराठी. ‘मी अंधेरीत जे.बी.नगरला राहते, कधीही फोन करा, आपण सविस्तर मुलाखत करु’ हे तिचे म्हणणे आणि ‘अबोध’ बद्दल साधारण बोलणे हे इतकेच तेव्हा बोलणे शक्य झाले….

सिनेमाच्या जगात अशा अनेक भेटी होत असतात, त्यातील काही विसरल्या जातात, तर काहींच्या बाबतीत काही वेगळेच घडते. ‘पहिल्या भेटीत सर्वसाधारण वाटणारे आपल्या गुणवत्ता आणि मेहनतीच्या जोरावर स्टार बनतात’. माधुरी दीक्षितचे तेच झाले. आणि त्याचीच तर ‘स्टोरी’ होते. अनाकलनीय घडणे हीच चित्रपट व्यवसायाची जादू आहे.

न्यू एक्सलसियर थिएटरच्या चौथ्या मजल्यावरील मिनी थिएटरमध्ये (कालांतराने ते बंद झाले) ‘अबोध’ च्या प्रेस शोला मात्र माधुरी आपल्या आई बाबांसोबत अगदी वेळेवर आली, आम्हा समीक्षकांना भेटली तरी हा चित्रपट अगदी साधारण असल्याने यशाची शंका होती. मुंबईतील मेन थिएटर ऑपेरा हाऊसमधून मोजून अवघ्या चार आठवड्यात या चित्रपटाची रिळे गोडावूनमध्ये जमा झाली, पण माधुरीच्या कर्तबगारीची रिळे मात्र तिला स्टार घडवणारी ठरली…

—————————-

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here