दहा वर्षांनंतर ‘शिवाजी अंडरग्राउंड’ कडे पाहताना…!

'शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला'.... मे २०१२ मध्ये महाराष्ट्राच्या रंगभूमीवर शिवाजी महाराजांची दुसरी बाजू दाखविणाऱ्या 'शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला' या नाटकाचे पदार्पण झाले आणि या ऐतिहासिक नाटकाला दहा वर्षे पूर्ण झाली यानिमित्ताने 'खरा शिवाजी' समजून घेण्यास मदत करणाऱ्या या नाटकाद्वारे सामाजिक संवेदनांचा लाव्हा प्रवाहित करणारे लेखक राजकुमार तांगडे यांचे प्रवाही मनोगत...

  • राजकुमार तांगडे

‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’…. अनेकांनी हे नाव ऐकलं असेल आणि अनेकांना हे नाव थोडंसं विचित्र वाटलं असेल. वेगवेगळ्या धर्मांच्या आणि भिंतीच्या आड राहणाऱ्या आजकालच्या समाजाला शिवाजी, भीमनगर आणि मोहल्ला या तीन संज्ञा एकाच वाक्यात कशा बोलल्या किंवा लिहिल्या जाऊ शकतात असा प्रश्न पडलाच असेल. मे २०१२ मध्ये महाराष्ट्राच्या रंगभूमीवर शिवाजी महाराजांची दुसरी बाजू दाखविणाऱ्या ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाचे पदार्पण झाले आणि या ऐतिहासिक नाटकाला दहा वर्षे पूर्ण झाली यानिमित्ताने ‘खरा शिवाजी’ समजून घेण्यास मदत करणाऱ्या या नाटकाद्वारे सामाजिक संवेदनांचा लाव्हा प्रवाहित करणारे लेखक राजकुमार तांगडे यांचे प्रवाही मनोगत…
२० मे २०१२ ला ‘शिवाजी अंडरग्राउंड’ पहिल्यांदा रंगभूमीवर आले आणि आज त्या घटनेला दहा वर्षे झाली आहेत. या दहा वर्षात या नाटकाचा लेखक म्हणून किंवा या समुहानाट्याचा एक भाग म्हणून मला आणि या प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या प्रत्येकाला काय मिळालं याचा विचार केला तर या कलाकृतीने आम्हाला माणूस म्हणून समृद्ध केलं. क्षणाक्षणाला बदलणाऱ्या या जगात काय करायला हवं, काय करायला नको, कोणत्या गोष्टी नैतिक आहेत, कोणत्या अनैतिक आहेत याची जाणीव तर होत होतीच पण याउपर माणूस म्हणून जगत असताना मनामध्ये एकप्रकारचं ‘भान’ असायला हवं हे आम्हाला या नाटकाने शिकवलं. ‘शिवाजी अंडरग्राउंड’ हे केवळ पैसा आणि प्रसिद्धीसाठी काही कलाकारांनी मिळून केलेलं एक नाटक नव्हतं तर हा एक विचार मांडण्याचा प्रामाणिकपणे केलेला प्रयत्न होता. लोकशाहीर संभाजी भगत यांच्या संकल्पनेला मी माझ्या लिखाणाचे कौशल्य वापरून मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. नंदू माधवांनी ही कलाकृती रंगमंचावर सुंदर पद्धतीने मांडली आणि इतर कलाकारांनी त्यामध्ये जीव ओतला. आम्ही सगळ्यांनी मिळून केलेल्या मेहनतीला महाराष्ट्रातील बहुजनांनी, जाणत्या अभिजनांनी आणि एकंदर सुधारणावादी, समतावादी आणि पुरोगामी विचार असणाऱ्या रसिक मायबापांनी भरभरून प्रेम दिलं, दाद दिली आणि यासाठी आम्ही नक्कीच कृतज्ञ आहोत.


शिवाजी अंडरग्राउंड’ने अनेकांना उघडं पाडलं…

शिवाजी अंडरग्राउंडच्या मागील दहा वर्षांच्या प्रवासात ज्याप्रमाणे या नाटकाच्या यशाची सगळीकडे चर्चा झाली अगदी त्याच प्रमाणात किंवा त्याहीपेक्षा जास्त तीव्रतेने समाजातील काही घटकांकडून विरोधदेखील झाला. मी या नाटकाचा लेखक आणि कलाकार म्हणून या विरोधाच्या आणि विरोध करणाऱ्यांच्या बाबतीतील काही निरीक्षणे नोंदविली आहेत. या नाटकाने कुणाच्या अस्मितेवर नव्हे तर सरळ सरळ काही मंडळींच्या ताटावर आणि पोटात लाथ मारली आहे. कारण वर्षानुवर्षांपासून या सगळ्या प्रवृत्तींनी समजाला, विघटनाचे, वर्चस्ववादाचे, वर्णव्यवस्थेचे विचार देऊन त्यावर आपली आणि आपल्या पुढील पिढ्यांची पोटं आरामात भरण्याची सोय करून ठेवली होती. खरंतर असं म्हणतात की, जो माणूस स्वतः भाकरी बनवतो तो पहिल्यांदा ती भाकरी स्वतः न खाता कुटुंबातील इतर सदस्यांचे पोट भरतो पण ‘शिवाजी अंडरग्राउंड’चे अनेक टीकाकार कुठल्यातरी विचारधारेची आयती भाकर मिळवून त्यावर स्वतःचे पोट भरत होते आणि ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाने नेमक्या याच मंडळींना उघडं पाडलं. आणि समाजासमोर समानतेच्या, पुरोगामित्वाच्या आधारावर शिवाजी महाराजांनी जगलेलं आयुष्य मांडून सत्य सांगण्याचा प्रयत्न केला. कदाचित हेच काही लोकांना पटलं नाही आणि ‘शिवाजी’ला टोकाचा विरोध केला गेला.

इतिहासाची खरी पाने उलगडायचा प्रयत्न

आजकालच्या जगात दहा पंधरा सेकंदात संपूर्ण गोष्ट सांगण्याची घाई प्रत्येकाला झालीय. वर्तमानात आपण एवढे गुंतून गेलोय की इतिहासात डोकावायला हवं, इतिहासातून शिकायला हवं आणि इतिहास महत्वाचा आहे हिच जाणीव कमी होताना दिसते. एखाद्या झाडाकडं पाहिलं की त्या झाडाच्या आकाराची कल्पना आपल्याला येऊ शकते पण तेच झाड किती वर्षांचं आहे, त्या झाडाचे आयुष्य किती आहे ,या प्रश्नांची उत्तरे शोधायची असल्यास तुम्हाला त्या झाडाच्या खाली खोल खणावं लागतं आणि त्याच्या मुळांचा शोध घ्यावा लागतो. अगदी त्याचप्रमाणे माणूस म्हणून जगताना तुमच्या भविष्याचा कानोसा घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या इतिहासात, तुमच्या समूहाच्या इतिहासात डोकावणं अत्यंत गरजेचं आहे. इतिहास तुम्हाला काय करायला हवं, माणसांसोबत कसं वागायला हवं, चांगलं काय वाईट काय हे शिकविण्याचं काम इतिहास नेहमी करत असतो. ‘शिवाजी’च्या माध्यमातून आम्ही याच इतिहासाची खरी पाने उलगडायचा प्रयत्न केला आणि आजवर आमच्या कानावर पडलेला इतिहास कसा वेगळा आहे, तो कसा हेतुपुरस्सर लिहिला गेलाय आणि केवळ काही लोकांच्या भविष्यातील पिढ्या सुखाने जगव्यात म्हणून तो इतिहास कसा वापरला जातो याची जाणीव झाली.

scene from shivaji underground

ज्या लोकांनी दहा वर्षांपूर्वी हे नाटक पाहिलं आणि मागच्या काही वर्षात हे नाटक पाहिलं त्या लोकांना आजही हे नाटक तितकंच कालसुसंगत वाटतं, तितकंच गरजेचं वाटत किंबहुना कित्येकांना ते आजच्या परिस्थितीत जास्त महत्वाचं वाटतं. या देशातील खूप निवडक लोकांच्या फायद्यासाठी लोकांच्या गरजेचे, पोटापाण्याचे, उदरनिर्वाहाचे प्रश्न सोडून निष्फळ गोष्टींना महत्व देण्याचा प्रघात देशात पडतो आहे आणि अशा सगळ्या विखारी, विघटनवादी आणि विषारी वातावरणात शिवाजी अंडरग्राउंडचा विचार अधिक सशक्तपणे मांडण्याची गरज आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत विचारांनी आणि भूमिकांनी भ्रष्ट प्रवृत्ती समाजात बोकाळलेल्या असतांना त्याला उत्तर म्हणून ‘शिवाजी अंडरग्राउंड’ सारखे विचार सांगत राहणे अत्यंत गरजेचे आहे.

महापुरुषांच्या नावाने केवळ जयघोष करून उपयोग नाही


महापुरुष समजून घेताना त्यांच्यातला माणूस समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. प्रतिमांच्या आणि प्रतीकांच्या काळात महापुरुषांमधला माणूस समजून घेतला तर त्यांनी सांगितलेली शिकवण, त्यांनी जगलेलं आयुष्य आपल्यात रुजवून घेणे सोपे होईल. कारण केवळ महापुरुषांच्या नावाने जयघोष करून उपयोग नाही तर त्या महापुरुषांचे विचार आत्मसात करून त्यांचा आपल्या दैनंदिन आयुष्यात वापर करून स्वतःला चांगला माणूस म्हणून घडवणं अत्यंत महत्वाचं आहे. महापुरुषांना देव करून आपण बऱ्याचदा स्वार्थी भूमिका घेत असतो कारण एकदा का त्यांचा देव झाला, आपण त्यांची आरती केली की आपण जगात बेईमानीने जगायला, तत्वांशी तडजोड करायला मोकळे होतो आणि यामुळे आपण आपल्या या पूर्वजांशी माणुसकीचं नातं जोडणं अत्यंत महत्वाचं आहे ज्यामुळे आपण जबाबदार बनू आणि अर्थात शेवटी चांगली माणसं देखील याच प्रक्रियेतून तयार होऊ शकतील. क्रांतीची पिके उभी राहतील, समतेचे वृक्ष उभारले जातील.
लोकांची गर्दी जमविण्यासाठी एखादा उद्देश लागतो, हेतू लागतो. तो उद्देश चांगला की वाईट यावरून मग त्या गर्दीचा समाजावरील परिणाम ठरत असतो. शिवाजीअंडरग्राउंडच्या माध्यमातून आम्ही सुधारणावादी, समतावादी गर्दीला एकत्र बांधण्याचं काम केलं. शिवाजी अंडरग्राउंड हा एक विचार आहे नव्हे नव्हे तर ही एक ठिणगी आहे आणि आता या ठिणगीचा वापर करून स्वतःमध्ये क्रांतीची आग पेटवायची की नाही हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं. ‘शिवाजी अंडरग्राउंड’ची समाजमनावरील परिणामकारकता मोजत असतांना बऱ्याच गोष्टी अनुभवायला मिळाल्या. अनेकांना आत्मभान आलं, अनेकांना समाजभान आलं, अनेकांच्या डोळ्यावरील चुकीच्या इतिहासाची झापडं उघडायला ‘शिवाजी अंडरग्राउंड’ने मदत केली आणि यामुळेच एक लेखक आणि कलाकार म्हणून असं वाटतं की हे नाटक म्हणजे ‘माती’ आहे. या मातीचा रंग, पोत कधी बदलणार नाही याची आम्ही काळजी घेऊच पण या मातीतून कितीतरी नवीन क्रांतीची पिके उभी राहतील, समतेचे वृक्ष उभारले जातील. शक्यता अपरिमित आहेत त्यामुळे असं काहीतरी मूलभूत आपण देऊ शकलो याचं समाधान आहे. शेवटी एवढंच की शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला हे नाटक कुणा एका कलाकाराच्या, लेखकाच्या, दिग्दर्शकाच्या प्रसिद्धीचा आणि समृद्धीचा प्रकाश सर्वदूर पडावा म्हणून बनवलेली कलाकृती नाही तर हे एक समूह नाट्य आहे याच्या प्रत्येक यशामध्ये, अपयशामध्ये या नाटकाच्या प्रक्रियेत सहभागी असलेल्या प्रत्येकाचा तेवढाच वाटा आहे.

‘रंगमळा’ अधिक फुलवणार

‘रंगमळा’…. जालन्यातील खेड्यांमध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या हौशी पोरांचा एक समूह. आम्ही बरीच वर्षे सोबत होतो आणि या प्रवासात जगाला एक सुंदर कलाकृती आम्ही ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’च्या माध्यमातून देऊ शकलो, पण ही प्रक्रिया इथेच संपत नाही. खरंतर असं म्हणतात की एखाद्या गोष्टीला जन्म देणं अत्यंत सोपं असतं पण त्याचं जतन करणं, पोषण करणं आणि उत्तरोत्तर संवर्धन करणं अत्यंत जिकिरीचं आणि महत्वाचं काम असतं आणि कदाचित यामुळेच मागील दहा वर्षे आमच्या या नाटकरूपी बाळाला आम्ही जन्म दिला, अंगाखांद्यावर खेळवलं पण आता कुठे या कलाकृतीचा अधिक वेगाने प्रचार करण्याची, हा विचार अधिक सशक्तपणे मांडण्याची गरज आहे आणि आम्ही सगळे ‘रंगमळ्या’चे साथी हे काम इथून पुढेही करत राहू.

rangmala production

आम्ही आता शिवाजी अंडरग्राउंड हे नाटक सांभाळून अजून काही करता येईल का हे नक्कीच पाहतो आहोत आणि त्यानुसार रंगमळ्याच्या माध्यमातून काही नवीन चित्रपट आणि नाटकं येऊ घातली आहेत पण ज्याप्रमाणे कुठल्याही संस्थेचा एक श्वास असतो अगदी त्याचप्रमाणे रंगमळ्याचा श्वास हा आम्ही दहा वर्षांपूर्वी या नाटकाच्या माध्यमातून मांडलेला ‘विचार’ आहे आणि हाच विचार अधिकाधिक प्रबळ करण्याचा, समाजमनावर जास्तीत जास्त रुजविण्याचा आम्हा सगळ्यांचा प्रयत्न असेल हे मात्र नक्की..

शब्दांकन – आशय बबिता दिलीप येडगे

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here