कोरोनात काम करणाऱ्या महिलांची संख्या 19 टक्क्यांवरून घटून 9 टक्के

कोरोनाकाळात काम करणाऱ्या महिलांची टक्केवारी कमी झाली आहे.

टीम बाईमाणूस / ०३ जून २०२२ :
कोरोना महामारीचा देशातील रोजगारांवर वाईट परिणाम झाला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत २५ मार्च २०२० रोजी संपूर्ण देशातच लॉकडाउन झाले. त्यामुळे जवळपास सर्वच उद्योग-व्यापार-व्यवसाय अचानक ठप्प झाले. काही आठवड्यातच देशभरातील अंदाजे १० कोटी लोकांना त्यांचे व्यवसाय किंवा नोकऱ्या गमवाव्या लागल्या. तसेच मोठ्या प्रमाणात कामगारांना गावी परतावे लागले. या वेळी मोठ्या संख्येने नोकरदार महिला कर्मचारीही कामापासून वंचित राहिल्या. जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार, २०१० मध्ये भारताच्या कर्मचाऱ्यांमध्ये कामकाज करणााऱ्या महिलांचा वाटा २६% होता, जो २०२० मध्ये १९% पर्यंत खाली आला. साथीच्या रोगाने परिस्थिती आणखीनच बिघडवली. यामुळे २०२२ मध्ये नोकरदार महिलांची संख्या ९% पर्यंत घसरली आहे. ब्लूमबर्ग इकॉनॉमिक्सच्या विश्लेषणानुसार दैनिक भास्कर वृत्त समुहाने ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

अर्थशास्त्रज्ञांच्या मते भारतात पुरुषांच्या तुलनेत महिला कामावर परतण्याची शक्यता कमी आहे. यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला अब्जावधी डॉलर्सचा फटका बसू शकतो. विशेषत: भारतासारख्या विकसनशील देशात महिलांना पुन्हा कामात सहभागी होण्याच्या संधी धुसरच आहेत. ब्लूमबर्ग इकॉनॉमिक्सच्या विश्लेषणानुसार, देशातील पुरुष आणि महिलांमधील रोजगारातील अंतर ५८% आहे. हे काढून टाकल्यास २०५० पर्यंत भारताची अर्थव्यवस्था सुमारे एक तृतीयांश वाढू शकते. स्थिर डॉलर मूल्याच्या बाबतीत हे ६ लाख कोटी डॉलरच्या (सुमारे ४६५.६० लाख कोटी) समतुल्य आहे. त्याच वेळी, काहीही न केल्याने जागतिक बाजारपेठेसाठी स्पर्धात्मक उत्पादक बनण्याचे भारताचे ध्येय धोक्यात येईल.

जीडीपीमध्ये ४८ टक्के महिलांचे योगदान केवळ १७%

भारताच्या जीडीपीत महिलांचा वाटा १७% असला तरी लोकसंख्येत त्यांचे प्रमाण ४८% आहे. चीनच्या जीडीपीमध्ये महिलांचा वाटा ४०% इतका आहे. स्त्री-पुरुष असमानता दूर करून काम करणाऱ्या महिलांची संख्या वाढवल्यास २०५० पर्यंत जगाच्या जीडीपीमध्ये २० ट्रिलियन डॉलर्स (सुमारे १,५५२ लाख कोटी) जोडण्यास मदत होईल.

महिलांसाठी नोकरीच्या संधी वाढवण्याचे आव्हान

अर्थतज्ञांच्या म्हणण्यानुसार, साथीच्या आजारापूर्वीच भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग मंदावला होता. अशा परिस्थितीत नोकरदार महिलांचे प्रमाण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने चिंताजनक आहे. त्याच वेळी, सरकार देखील नोकरदार महिलांसाठी रोजगाराच्या संधी सुधारण्यासाठी फारशी सुधारणा करू शकलेले नाही. विशेषत: ग्रामीण भागात, जिथे देशातील १३० कोटी जनतेपैकी दोन तृतीयांश लोक राहतात. खेड्यापाड्यात आणि ग्रामीण भागात महिलांच्या नोकऱ्या संपत आहेत. शहरांमध्ये आर्थिक विस्तार होत असतानाही, महिलांना कोरोनाच्या काळात कामासाठी संघर्ष करावा लागला होता.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here