बौद्ध धम्म आणि स्त्रीमुक्ती

जग २५६६ वी बौद्ध पौर्णिमा साजरी करत असताना बुद्धाचे विचार आजही मार्गदर्शक ठरताहेत. स्त्रियांमध्ये जशी पुरुषत्वाचा निर्देश करणारे गुणविशेष असतात तशी पुरुषांमध्येही स्त्रीत्वाचा निर्देश करणारे गुणविशेष असतात, असे बुद्ध विचारप्रणाली मानते. समाजामध्ये स्त्रियांना न्याय आणि समानता कशी मिळू शकेल याचा विचार बुद्धाने केला.

  • डॉ. प्रवीण घोडेस्वार

स्वातंत्र्य-समता-बंधुता-न्याय-नीती-विज्ञाननिष्ठा ह्या जीवानावश्यक मूल्यांचा आग्रह धरणारी विचारप्रणाली म्हणजे बौद्ध धम्म. भारतीय समाजातील हरेक व्यक्तीच्या सर्वांगीण उन्नतीला सर्वार्थाने प्रेरक नि पोषक ठरणारे हे तत्त्वज्ञान आहे. व्यक्तीला तिच्यातल्या मनुष्यत्वाची नि सामर्थ्याचा परिचय करून देण्याचे मूलभूत कार्य बुद्धाने केले. बुद्ध धम्म भारतात जन्मला आणि आशिया खंडासह जगभर पसरला. जीवशास्त्राच्या दृष्टीकोनातून स्त्री नि पुरुष यांच्यात फरक असला तरी त्यांची तात्विक मानवशास्त्रीय ( anthropological ) जडणघडण वेगळी नसते. त्यामुळे पुरुषांना असलेले अधिकार स्त्रिया आपल्या कर्तृत्वाच्या बळावर प्राप्त करू शकतात. स्त्रियांमध्ये जशी पुरुषत्वाचा निर्देश करणारे गुणविशेष असतात तशी पुरुषांमध्येही स्त्रीत्वाचा निर्देश करणारे गुणविशेष असतात, असे बुद्ध विचारप्रणाली मानते. समाजामध्ये स्त्रियांना न्याय आणि समानता कशी मिळू शकेल याचा विचार बुद्धाने केला. बुद्धाला अपेक्षित असलेल्या समाजरचनेत स्त्रियांना आर्थिक-अध्यात्मिक-धार्मिक –राजकीय स्वातंत्र्य आणि समानता होती. बुद्धाने स्त्रियांच्या संघाची स्थापना करून भिक्षुंप्रमाणे भिक्षुणी यांनाही धर्मप्रसार करण्याची मुभा दिली. भिक्षुंणीना ‘थेरी’ असेही म्हणतात. बुद्ध धम्माची तत्वे लोकांना समजवून सांगणे आणि इतर धर्मातल्या लोकांशी चर्चा-विचार विनिमय-संवाद करण्यात ‘उप्पलवण्णा’ नामक थेरी निष्णात होती. विविध थेरींनी त्यांच्या पूर्वायुष्यात आलेल्या अनुभवांचे केलेले कथन म्हणजे ‘थेरीगाथा!’ बौद्ध वाड्मयातील हा एक महत्वाचा ग्रंथ होय.

काय म्हंटलय ‘थेरीगाथा’ मध्ये…

‘थेरी गाथा’ हा केवळ बौद्ध तत्त्वज्ञानाचा ग्रंथ नसून भारतीय स्त्रीवादाचीही मांडणी करणारा मौलिक ग्रंथ आहे. आज भारतीय स्त्री मुक्ती चळवळीने मोठा पल्ला गाठला असून तिची पुनर्मांडणी नि पुनरावलोकनही करण्यात येत आहे. भारतीय स्त्री मुक्ती चळवळीच्या कार्यकर्ते नि अभ्यासकांनी ‘थेरीगाथा’ कडे दुर्लक्षच केले. अलीकडे काही अभ्यासक आणि विचारवंत मात्र यावर प्रकाशझोत टाकत आहेत. तत्कालीन सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि धार्मिक परिस्थिती ध्यानात घेऊन या थेरीगाथांचा अभ्यास केला तर निश्चितपणे यास भारतीय स्त्री मुक्तीचा आद्य हुंकार म्हणता येईल. असे म्हटले जाते की बुद्धाची मावशी गौतमीने ५०० स्त्रियांना संघात सामील करून घेतले होते. यातल्या ७३ थेरींनी सांगितलेल्या जवळपास पाचशे गाथांना ‘थेरीगाथा’ म्हटले जाते. भारतीय समजातल्या स्त्रियांचा विरोधाचा उमटलेला पहिला आद्यस्वर म्हणजे थेरीगाथा. ह्या स्वरातून स्त्रियांचं एक वेगळं विश्व समोर आलं. यात त्यांच्या सुखाचा उच्चार आहे. दुःखाचा अंतस्वर आहे. वेदना आहेत. व्याकुळता आहे. मुक्ती ची अभिलाषा आहे. मोक्ष प्राप्तीची आकांक्षा देखील आहे. आपल्या वाईट कर्मांची स्वीकृती आहे. तद्वतच त्यांचे प्रायश्चित्त घेण्याचीही तीव्र इच्छा आहे. जीवनातले सर्व रंग ह्या गाथांमध्ये प्रतिबिंबित झालेले दिसून येतात. त्याकाळातल्या चाली-रिती-प्रथा-कुप्रथा-आचार-अनाचार-नीती-अनीती याचं दर्शन यातून घडतं. ज्या काळात ह्या लिहिल्या गेल्या त्या काळाचा विचार करता याचं मह्त्व अजून जास्त अधोरेखित होतं. सामान्यतः स्त्रियांची अभिव्यक्ती ही प्रामुख्याने भावनात्मक समजली जाते मात्र ह्या गाथा अपवाद आहेत. थेरीगाथा भावनेच्या नव्हे तर विचारांच्या ठोस आधारावर उभी असल्याचे जाणवते. ह्या स्त्रिया विदूषी, पंडिता अथवा वादविवादपटू नव्हत्या. त्यांना राजघराण्याचा वारसाही नव्हता. असे असूनही त्यांच्यातल्या ताकतीच्या व सामर्थ्याच्या जोरावर त्यांनी संकटावर विजय मिळवला. संसाराच्या मोहाला बळी न पडता निर्वाण प्राप्त केलं.

तत्कालीन भारतीय सामाजिक संरचनेचा विचार करता बुद्धाने स्त्रियांना संघात प्रवेशाची अनुमती देणं हे क्रांतीकारी पाऊल होते. हे खरंय की सुरुवातीला बुद्ध या विरोधात होते पण शिष्य आनंदने त्याचं मनपरिवर्तन केलं. मग गौतमी च्या रूपाने पहिली भिक्षुणी संघात दाखल झाली. त्यावेळच्या परिस्थितीनुसार बुद्धाचा हा निर्णय समाजाशी केलेला एकप्रकारचा मोठा विद्रोहच होता. स्त्रियांना प्रवेशासाठी कोणतेही जाचक नियम नव्हते. समाजातल्या कोणत्याही वर्गातली स्त्री यात सहभागी होऊ शकत होती. विवाहित असो व अविवाहित, तरुण असो वा वयस्क –वृद्धा, कोणत्याही जाती अथवा वर्गाची असो, श्रीमंत असो वा गरीब, गणिका, वेश्या असो वा गृहिणी, बुद्धाने सर्वांसाठी ज्ञानाचे कवाडे खुली केली. संघात सामील झालेल्या स्त्रिया केवळ उच्च कुलीन, प्रतिष्ठित घरातल्या नव्हत्या तर समाजातल्या खालच्या समजल्या जाणाऱ्या स्त्रियांची संख्याही लक्षणीय होती. संघात आल्याने ह्या स्त्रियांचा आत्मविश्वास द्विगुणीत होऊन त्यांना आपल्या स्त्रीत्वाचा अभिमान वाटायला लागला. जात, धर्म, वर्ग आणि लिंग या आधारावर विभागल्या गेलेल्या समाजात अशा प्रकारच्या संघटनेची कल्पनाच आश्चर्यकारक होती. ज्यात अशा प्रकारची भिन्नता सहज नि सामान्यपणे स्वीकारली गेली. त्याकाळात स्त्रीचं आयुष्य पूर्णतः अभावग्रस्त होतं. तिच्याकडे फक्त उपभोगाचं साधन म्हणून पाहिलं जात होतं. अशावेळी ह्या स्त्रिया मुक्ती आणि स्वातंत्र्याचा उदघोष करत होत्या. ‘’ मी मुक्त स्त्री आहे ! माझी मुक्तता खूप विलक्षण आहे !’’, थेरी सुमंगल च्या या उदगाराने स्त्रियांमध्ये चैतन्याचा उत्साह संचारला. तर थेरी सोया च्या मते, ‘’ज्ञानप्राप्तीसाठी स्त्री असण्याची कोणतीही आडकाठी नाहीये. जेव्हा मनाची नीट समाधी लागली आहे, ज्ञान सर्वत्र आढळून येतंय आणि अंतर्ज्ञानाने धम्माचे सम्यक दर्शन केलंय तर यात आपलं स्त्रीत्व काय करू शकतं !’’ राजकन्या सुमेधा आपल्या आई-वडिलांचा विरोध झुगारून संघात सामील होते. निर्भीड होऊन ती आपल्या वडीलांना भिक्षुणी न झाल्यास प्राण त्यागण्याची इच्छा व्यक्त करते. मुक्ती मिळवणे पुरुषाची मक्तेदारी असण्याच्या काळात ती स्त्रियांनाही सहज लाभत होती. ‘’मी आज जात आणि मृत्यू पासूनही मुक्त झाले आहे. माझी संसार तृष्णा संपुष्टात आलीये’’, असं थेटपणे थेरी मुक्ता सांगते.

थेरी विमला वैशालीत जन्मलेली गणिका होती,पद्मावती व आम्रपाली पण गणिका होत्या, पूर्णीका एका दासीची कन्या होती. ह्या सर्वांनी सामाजिक विषमतेचा त्याग केला नि एकाच पावन उद्देशाने प्रेरित होऊन संघसदस्या झाल्या. संघात प्रवेश करण्याची प्रत्येकाची कारणं वेगळी होती. कोणाला चीर शांतीचा शोध घ्यायचा होता तर कोणाला मोक्ष प्राप्ती हवी होती. तोपर्यंत हिंदू धर्मातल्या सर्व अधिकारांचे भोक्ते केवळ पुरुषच होते. घर-कुटुंब असो अथवा घराबाहेरचे निर्णय यावर त्यांचेच अधिकार होते. स्त्रियांना तर ज्ञान प्राप्त करणे वर्जित होते. घरदार-कुटुंब हेच तिचं कार्यक्षेत्र होतं. अशा सामाजिक संरचनेत स्त्रियांच्या आत्मसन्मानाचा विचारच करता येत नव्हता. पण ह्या थेरीगाथेत आत्मविश्वासाने ओतप्रोत भरलेली स्त्री अभिव्यक्ती दिसून येते. भारतीय साहित्यात स्त्री च्या अस्तित्वाचे स्वातंत्र्य इतक्या मोकळेपणाने स्वीकारलेले याआधी आढळून येत नाही. ह्या थेरींनी ज्या धाडसाने संकुचित नि विषम मानसिकतेने बरबटलेलल्या समाजाच्या विरोधात आवाज उठवला, ही बाब आजही प्रेरणादायी आहे. तत्कालीन समाजातल्या स्त्रियांची अवस्था जाणून घेण्याचा एक मौलिक ऐतिहासिक दस्तऐवज म्हणजे थेरीगाथा. भारतीय समाजाच्या शोषित नि पिडीत स्त्रियांच्या मुक्तीच्या या कहाण्या आहेत. समाजमान्य व्यवस्था, मूल्ये ,परंपरा, आदर्श, नीती-अनीतीच्या संकल्पना विरोधात उठणारा आवाज म्हणजे क्रांती. या अनुषंगाने थेरीगाथा क्रांतिकारीच होय. भारतीय स्त्री विद्रोहाचा हा आद्यस्वर इतिहासाच्या पानांमध्ये हरवला आहे, तो आता नव्याने समजून घेण्याची गरजनी वेळ आली आहे.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here