गझलेतील विठ्ठलदर्शन

विठ्ठलाच्या दर्शनानं जीवनाची कोडी सुटतात. अस्तित्वाचं गूढ उकलत जातं. रोज करतो तुझी प्रार्थना विठ्ठला, पूर्ण होईल का सांगना विठ्ठला. अशी विनवणी गझलकारही विठ्ठलाला करताहेत. त्यांनी विठ्ठलाची साधना कशी केलीय. विठ्ठलाकडं काय मागणं मागितलंय, कोणतं साकडं घातलंय हे त्यांच्या शेरांतून जाणून घेऊ या.

  • बदीऊज्जमा बिराजदार (साबिर सोलापुरी)

विठ्ठल हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. त्याला पांडुरंगही म्हणतात. त्याच्या नावात जो रंग आहे तो मातीचा रंग आहे म्हणूनही त्याला सावळा म्हटलं जातं. ही माती भक्तिभावानं कपाळी लावली की जीवन धन्य धन्य होते. या काळ्यासावळ्या मूर्तीनं साऱ्या लेकरांना लळा लावलाय. आईची माया दिलीय. म्हणूनही त्याला विठूमाऊली, विठाई म्हणतात. विठ्ठलाच्या दर्शनानं जीवनाची कोडी सुटतात. अस्तित्वाचं गूढ उकलत जातं. रोज करतो तुझी प्रार्थना विठ्ठला, पूर्ण होईल का सांगना विठ्ठला. अशी विनवणी गझलकारही विठ्ठलाला करताहेत. त्यांनी विठ्ठलाची साधना कशी केलीय. विठ्ठलाकडं काय मागणं मागितलंय, कोणतं साकडं घातलंय हे त्यांच्या शेरांतून जाणून घेऊ या.
विठ्ठल अंतर्यामी आहे. खरं काय, खोटं काय, सत्य काय, असत्य काय? इमान काय, बेमान कोण? हे सगळं तो जाणून असतो. विठ्ठलाच्या दरबारी खोटेपणाला, दांभिकपणाला अजिबात थारा नसतो. तिथं अहंकाराचा वारा नसतो. विठ्ठल खऱ्याचा सोबती आहे. सत्याचा वाली आहे. इथं भक्ती, श्रद्धा पावित्र्यात फुलत असते. त्यात दुटप्पीपणा, ढोंगीपणा नसतो. इथं ज्याच्या-त्याच्या कर्मावर फैसला होत असतो. ‘जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर’ हे विठ्ठलाच्या बाबतीत कैक पटीनं सत्य आहे. याची प्रचीती लाखो भाविकांना सातत्यानं येत राहाते. म्हणून ते तहान भूक हरपून श्रद्धेची पालखी खांद्यावर घेऊन त्याच्या चरणी आपली सेवा अर्पण करतात. इथं आपला-परका हा भेदभाव नाही. विठ्ठल जात धर्म पाहात नाही. बाह्य रंगरूप पाहात नाही. तो भक्तांच्या आत्म्याशी तादात्म्य पावतो. अठरापगड जाती हाच त्याचा गोतावळा आहे. विठ्ठल हा इमानदार भक्तांचा देव आहे.
सुरेश भट म्हणतात.

मठोमठी मंबाजींना कीर्तने करू द्या;
विठू काय बेमानांना पावणार आहे?”

विठ्ठल अन् भक्त यांची भेट जिवाशिवाची असते. या भेटीत भक्तांच्या आनंदाला पारावार नाही राहात. ही शतजन्माची पुण्याई असते. ती लाभणं दुर्मिळ असतं. विठ्ठलाचं दर्शन आभाळासारखं विराट असतं. त्याचं सावळंरूप भक्ताच्या डोळ्यात नाही मावत. विठ्ठल भेटीनं त्याच्या डोळ्यातून आनंदाचे, सार्थकतेचे अश्रू वाहू लागतात. ही तीर्थरूप अमृताची पर्वणी असते. सुखाची अमूल्य देणगी असते. पुण्याईचा संचय असतो. मूर्तीचं हे सावळंरूप पाहायला दोन डोळे कमी पडतात. साऱ्या देहाचे डोळे झाले तरी विठ्ठलाला डोळ्यांमध्ये साठवता नाही येत. विठ्ठलानं डोळ्यातून मनात अलगद उतरावं. कारण भक्ताचा जन्म म्हणजे विठ्ठलाच्या मंदिराच्या पायऱ्या बनतात अन् त्याचं संपणंही त्या मंदिराचा उंबरा होऊन जातो अवघ्या देहालाच देऊळाचं रूप यावं अशीच भक्ताची मनोकामना असते.

हाच आंतरीक भाव वैभव कुलकर्णी (वैवकु) यांच्या शेरातून प्रकट होतो.

जन्म माझा विठ्ठलाच्या मंदिराच्या पायऱ्या
आणि माझे संपणे त्या मंदिराचा उंबरा

पंढरीच्या वारीला जाण्यासाठी वारकरी निमंत्रणाची वाट नाही पाहात. विठ्ठलाविषयीची श्रद्धा, ओढ हेच त्याचं खरंखुरं निमंत्रण असतं. वारी जवळ आली की विठ्ठलाची साद ऐकू येते. डोळ्यात आनंदमेघ दाटून येऊ लागतात. संसाराचं रहाट गाडगं विसरून वारकरी विठ्ठल नामाचा गजर करीत परब्रम्ह विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरीची वाट चालू लागतात. टाळ चिपळ्या हाती, कृपेची, मायेची छत्रछाया मोठी निरंतर, विठ्ठल… विठ्ठल… कीर्तनरंगी नाचत-नाचत देहभान विसरून मजल-दरमजल करीत वारकऱ्यांच्या दिंड्या पंढरीत दाखल होतात. जनसागर उसळतो इथं त्यांना जिवाभावाचा सच्चिदानंद भेटतो. त्याच्या निळ्या सावळ्या रूपानं भक्तांच्या डोळ्यांचं पारणं फिटतं. जीवन कृतकृत्य होतं. तीच पंढरी, तीच वारी, तीच वाट वर्षानुवर्षे पायीपायी होणारा हा प्रवास अवर्णनीय आहे. जिव्हाळ्यानं ओथंबलेला हा प्रवास ठायीठायी पाहतच राहावा.
असं अलका देशमुख यांना वाटणं स्वाभाविक आहे म्हणून त्या असा शेर लिहितात.

वारीत पाहते ती वाट पंढरीची
दिनरात पाहते ती वाट पंढरीची

द्वेष, मत्सर, क्रोध, क्लेश, विकार झटकून टाकता आलं की देहाचं पंढरपूर होऊन जातं. त्यासाठी गरज असते ती आत्मशुद्धीची. माणसाच्या चांगल्या वर्तनात सद्भावनेत, परोपकारात, दुसऱ्यांवर दया दाखविण्यात खरं अध्यात्म दडलेलं असतं. नुसतं कपाळी गंधटिळा लावणं, जपजाप्य करणं, उपासतापास करणं, पूजाअर्चा करणं, तीर्थाटन करणं हे सारं बाह्यरूप आहे. चंद्रभागेच्या स्नानानं देहाची तर स्वच्छता होईलच. परंतु आत्म्याचं काय? त्याची शुद्धी झाली ही आत्म्यात परमात्मा वास करतो. भक्त अन् भगवंत यांच्यातलं अंतर नाहीसं होत जातं. परमेशाच्या अनंतत्वाची जाणीव वृध्दिंगत होत जाते. जगण्याला खऱ्या अध्यात्माचं अधिष्ठान प्राप्त होतं मग देह जणू ही पंढरी आत्मा पांडुरंग होऊन जातो. जीवनाच्या सन्मार्गावर सात्विकतेची फुलं उमलू लागतात. अध्यात्मानं केलेला हाच तर आत्मोद्धार असतो.
निशब्द देव त्यांच्या शेरातून हेच सूत्र मांडतात.

द्वेष, मत्सर, क्रोध सारे दूर करू या
आपल्या देहास पंढरपूर करू या

न थकता, न बसता, घडीभर उसंत न घेता विठ्ठल युगानयुगे कर कटीवर ठेऊन विटेवर उभाच आहे. ही थक्क करणारी गोष्ट आहे. कैकवर्षांपासून पंढरीची वारी सुरू आहे. भाविक झुंडीनं, दिंडीनं विठ्ठलाच्या दर्शनासाठी निरंतर येताहेत. विठ्ठलाच्या वास्तव्यानं पावन झालेली पंढरी म्हणजे मन:शांतीचा, सुखाचा ठेवा असतो. या श्रद्धेनं, ओढीनं वीणा, टाळ, चिपळ्यांसवे नाचत नाचत वारकरी पंढरीत दाखल होतात. विठ्ठल त्यांना भेटतो. त्यांची गार्‍हाणी ऐकतो. त्यांच्या प्रापंचिक दुःखाचं, समस्येचं निराकरण करतो. वारकरी भरून पावतात. धन्य धन्य होतात. मात्र विठ्ठलाला आराम नाही, विश्राम नाही. तो विटेवर उभाच आहे. विठ्ठलाचे पाय किती दुखत असतील. विठ्ठलानं थोडासा विसावा घ्यावा. त्यांनं बसावं मी त्याचे पाय चेपून देतो.
अशी भावनिक साद कमलाकर देसले यांनी विठ्ठलाला शेरातून घातलीय.

तुझे पाय चेपून देतो, अरे
जरासा तरी बैसना विठ्ठला

पालनकर्त्या बापापेक्षा लेकरांवर आईची माया जरा जास्तच असते. आपलं लेकरू सदानकदा आनंदात, सुखात राहावं, असं तिला वाटतं. पंढरीत पांडुरंग बाप असतो तर चंद्रभागा माय असते. इथं येणाऱ्या प्रत्येक लेकरांच्या सुख-दुःखाची चंद्रभागेला जाणीव असते. ती लेकरांना नाहू घालते. निर्मळ बनवते. पांडुरंगाच्या दर्शनाला पाठवते. तिची पुण्याई, तिचा आशीर्वाद तर लेकरांबरोबर असतोच. तरीही पांडुरंगानं लेकरांचा सांभाळ लाडाकोडात करावा असं ती विनवत असते. लेकरांप्रती तिच्या मायेचा पाझर सतत झरत असतो.
म्हणून तर मुबारक शेख चंद्रभागेला माझी माय म्हणतात.

बा रोज विनविते माझी माय चंद्रभागा
‘सांभाळ लेकरांना लाडात पांडुरंगा

पंढरी सारखी दुसरी समृद्धीपूर्ण, आनंदीपूर्ण वाट नाही. या वाटेनं चालत राहिलं की टाळ अन् अभंगाचं परमभाग्य लाभतं. पांडुरंगाच्या रंगात रंगून जाणं हेच तर अध्यात्म साधनेचं प्रमुख अंग आहे. याचंच प्रकटीकरण गझलकारांनी त्यांच्या शेरांमधून केलंय.

————————-

contact@sabirsolapuri.com

————————–

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here