- अनिल साबळे
आश्रमशाळेचं वनभोजन मांडवीच्या पात्राकडे निघाले तेव्हा चालता चालता आम्ही चूल पेटवण्यासाठी वाळलेल्या झाडाचं सरपण गोळा करु लागलो. वाळलेल्या निवडुंगाचं सरपण घेऊ नका. त्यामुळे चुलीत सगळा धूर होऊन जातो, असं मुलांनी मला सांगितलं. मांडवीच्या पात्रात अनेक माणसांनी सरपण गोळा करुन ठेवलं होतं. त्यातल्या एकासुद्धा फांदीला हात न लावता मुलं दुसरं सरपण सापडत पुढे निघाली. ते हिवाळयाचे दिवस लवकर अंधाणारे होते. अंधार पडण्याआधीच आपण वनभोजन करुन पुन्हा माघारी फिरलं पाहिजे. असाच विचार आमच्या मनात होता.
नदीच्या पात्रात दगडांना तोटा नव्हता. दोन चुलीसाठी सहा दगडं गोळा करुन आम्ही चुलीसाठी आणखी सरपण गोळा करत होतो. तेव्हा माझ्यासोबत अर्जुन कुडळ हा मुलगा होता. एका उंबरांच्या खोडाजवळ मी थांबलो. पिकलेले लालबुंद उंबरं खोडापासून शेंडयाच्या फांदीपर्यंत लगडलेले होते. उंबरांच्या पोकळ खोडाजवळ थोडासा कानोसा घेत अर्जुन मला म्हणाला,“ह्या उंबरांच्या खोडात मोहळांची मोठी मोहर आहे.” मी उंबरांच्या खोडाजवळ जाऊन आत पाहिलं. आत मला नुसताच अंधार दिसत होता. मधमाश्यांची गुणगुण मला देखील ऐकू आली, पण सगळं उंबराचं झाड पोखरुन ती मोहर काढणं काही सोपं काम नव्हतं. आपण टिकाव, पावडी आणून ही मोहर काढू असा अर्जुनचा बेत होता. मी त्या गोष्टीला नकार दिला आणि ह्या उंबरांच्या ढोलीत मोहर आहे असं कुणाला सांगू नको, असं अर्जुनला मीच बजावून सांगितलं.
मी आणि अर्जुन आणखी सरपण शोधत नदीच्या पात्रापासून दूर गेलो तेव्हा आपण नेमके कुठे आलोय? आपण वनभोजनासाठी निवडलेली जागा कुठे आहे, याचा मला काहीच बोध होईना. झाडांच्या गर्दीतून धूर निघत होता. त्याचा थोडासा अंदाज काढत काढत अर्जुनने मला पेटलेल्या चुलीजवळ आणले. तेव्हा मला वाटलं, एक छोटीशी मधमाशी आपल्या लहान सोंडेत मध धरुन आपल्या मोहळांजवळ पुन्हा कशी येत असेल…? आभाळात तिच्यासाठी -जाण्यांच्या वाटा तरी कुठे आखल्या आहेत.
आमच्याकडे आठवीचा वर्ग नसल्यामुळे अर्जुन दुसऱ्या आश्रमशाळेत गेला. मी हळूहळू अर्जुनला विसरुन गेलो. एका रविवारी डोक्यावर मुसळधार पाऊस पडत असताना मी अंगात रेनकोट घालून दूरच्या किल्यावर फिरायला गेलो. पाऊस आणि जीवघेणी थंडी. वाटेत अंगावर घोंगडी घेतलेली माणसं गायीगुरं चरताना भेटायची. पाऊस आणि बेफाम धुक्यामुळे आम्हाला समोरचा किल्ला दिसतच नव्हता. पाऊस कमी झाल्यावर माझ्या डोळयासमोरच अचानक आश्रमशाळेच्या मुलांची भलीमोठी रांग आली. हाडं फोडणाऱ्या थंडीत पंधरा-वीस मुलं कुडकुडत चालली होती. त्या मुलांमध्ये मला अर्जुन दिसला. मी त्याला हाक मारुन जवळ बोलवले. तेव्हा अर्जुन मला सांगू लागला, या गावात संस्थेची एक खाजगी आश्रमशाळा आहे. त्या आश्रमशाळेत राहीलं म्हणजे मला घरी यायला-जायला सोपं पडतंय. अर्जुनचं गाव मला माहित होतं. त्या गावाजवळून अर्जुनच्या घरी जायला काही साधासोपा रस्ता नव्हता. डोंगरातून जाणाऱ्या अवघड पायवाटा. अशा अफाट धुक्यांत ही मुलं सुट्टी असली म्हणजे घरी कशी जात असतील, या विचारांनी माझ्या काळजात धडकीच भरली.
आजूबाजूच्या जंगलात वाघाचं आणि रानडुकराचं भय होतं. रानडुकरांच्या मुंसडीने डोंगराच्या कडयावरुन पडलेला माणूस मी पाहिला होता. त्यात जणलेलं रानडुकर तर खूपच भयंकर असतं. डोंगरकडयावरुन घरी जाणारे सगळेच रस्ते शेवाळून गेल्यामुळे निसटते झालेले असतात. त्यावरुन पाय घसरला तरी पडलेला माणूस सुद्धा सापडणार नाही.
खाऊसाठी अर्जुनला काही पैसे द्यावेत म्हणून मी खिश्यांत हात घातला. तर माझा खिश्यातला हात तसाच धरुन अर्जुन मला म्हणाला, “मला पैसे नको आहेत. तुम्ही मला भेटलात हेच खूप झाले.” पन्नास-शंभर रुपये मी अर्जुनला दिले असते तर ? त्यांने ते पैसे कुठे खर्च केले असते. हा सुद्धा एक प्रश्नच होता. कारण अर्जुनची आश्रमशाळा ज्या गावात होती. ते गाव उंच उंच डोंगरांनी वेढलेलं होतं. त्या गावात सुर्य देखील दोन उशीरा उगवायाचा आणि एक तास लवकर मावळून जायचा. गावात कुठलही दुकान नव्हतं. मी दिलेले पैसे अर्जुनला गावी जाण्यासाठी सुद्धा उपयोगी पडले नसते. कारण सुट्टी लागल्यावर अर्जुन ज्या पायवाटेनं जायचा, त्या वाटेवरुन यायला जायला भाडं लागत नव्हतं. फक्त जाण्या-येण्याच्या पायवाटा लक्षात ठेवाव्या लागायच्या. एक जरी पायवाट चुकली तरी माणूस जंगलात भटकून जायचं. पायवाट शोधणं पुस्तकातलं उत्तर शोधण्यापेक्षाही फारच भयंकर होतं. उत्तर चुकून नापास झालं तरी पुढच्या वर्षी परीक्षेत बसता यायचं पण जंगलात पायवाट चुकण्याची परीक्षा जीवावर बेतणारी होती.
आमच्या सोबत अर्जुन किल्ल्यावर आला नाही. कारण त्याला जवळच्या नदीतून पाणी आणून अंघोळ करायची होती आणि कपडे ही धुवून टाकायचे होते. सलग पाऊस पडत असताना ह्या मुलांचे कपडे कुठे वाळत असतील. कारण मुलांना राहण्यासाठी असलेलं वसतीगृह फारच छोटं आणि अंधारलेलं होतं. कापडे धुवून वाळत टाकले तर धुतलेल्या कपडयाचं पाणी अंगावर टिपकत असेल. फारच पाऊस असल्यामुळे आम्ही किल्ल्यांच्या पायथ्याजवळच जाऊन पुन्हा माघारी आलो. अंघोळ आणि कपडे धुवून अर्जुन थंडीने कुडकुडत आमचीच वाट पाहत बसला होता. “आमच्या पाहुण्यांसाठी दोन कप चहा करा. मी तुम्हाला साखर आणून देईन” असा हट्ट अर्जुनने वसतिगृहाजवळ राहणाऱ्या एका मावशीकडे धरला. आम्ही आलो तेव्हा दोन कप चहा तयारच होता. कपभर चहा पिताना माझं तर काळीजच भाजून गेलं.
एका जीवलग मित्रासाठी मी मध शोधत होतो, तेव्हा अर्जुन मला भेटला. मी मध शोधत आलोय हे ऐकल्यावर अर्जुन आपल्या घरात जाऊन मधाची भलीमोठी बाटली घेऊन आला. अशा भरलेल्या मधांच्या बाटलीची किंमत असेल? आपण अर्जुनला किती पैसे द्यायचे? माझ्या खिश्यात अवघे दोनशे रुपये होते. मधाच्या बाटलीचे आपण अर्जुनला पाचशे रुपये द्यायला पाहिजे, असं मला वाटलं. मी फारच अवघडून म्हणालो, “माझ्याजवळ आता दोनशेच रुपये आहेत. बाकीचे तीनशे रुपये मी तुला पगार झाल्यावर देतो. चालेल का?” माझ्या हातात मधाची बाटली देत अर्जुन म्हणाला, “तुमचा मित्र तो माझा मित्र नाही का? हे मध सोडून तुम्हाला द्यावं असं दुसरं काहीच नाहीये माझ्याजवळ.” मोहळ असलेल्या उंच झाडांवर चढून आपल्या केसाळ अंगाचा फायदा घेत एखादं अस्वल मधमाश्यांनी जमवलेला सगळा मध खाऊन टाकतं, असचं मला अर्जुनकडून मधाची बाटली घेताना वाटलं. अर्जुन पैसे घेणार नाही असा अंदाज आल्यावर मी माझ्या डोळयाचा गॉगल काढला आणि अर्जुन नाही नाही म्हणत असताना त्यांच्या हातात कोंबला. अस्वल जसं आपल्या पिल्लांला पोटाशी घट्ट आवळून धरतं. तशीच मधाची बाटली पोटाशी घट्ट धरुन घरी निघून आलो.
———————————————————————————–
(लेखक कवी, छायाचित्रकार, कथाकार असून आदिवासी आश्रमशाळेत कार्यरत आहेत)
————————————————————————————