भेंडवळीची अक्षय्य पंरपरा !

बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्याच्या भेंडवळ या गावाची घटमांडणी ही 350 वर्षांची एक परंपरा. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी असाच वर्षभराच्या घटना-घडामोडींचा अंदाज बांधला जातो. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या आधारे हा अंदाज व्यक्त होत असतो. त्यामुळे तिथे सांगितलेल्या अंदाजावर सातपुड्याच्या अंगाखांद्यावर पसरलेल्या खानदेश, विदर्भासह मराठवाडा, मध्यप्रदेशच्या शेतकर्‍यांच्या नजरा असतात.

  • रणजितसिंग राजपूत

मान्सूनच्या अंदाजाचे वारे वाहू लागले आहेत. दरवर्षीप्रमाणेच तारखाही जाहीर होत आहेत. एरवी हवामान खाते वेळोवेळी पाऊसपाण्याची, उन्हातान्हाची खबर देतच असते. त्याशिवाय गावात वेगवेगळ्या तर्‍हेने हे अंदाज बांधले जातात. तशा बातम्याही येत असतात. आता कावळ्यांनी घरटे कुठे बांधले, याच्याही बातम्या येतील. घरटे झाडाच्या वरच्या भागावर असेल तर पाऊस कमी पडेल. मध्यभागी असेल तर साधारण आणि खालच्या बाजूला असेल तर जोरदार पाऊस पडेल, असे अंदाज वर्तवणे सुरू होईल.
निसर्ग आणि नशीब या दोन गोष्टींवर शेतकर्‍यांनी नेहमीच विश्वास ठेवला; मात्र प्रत्येक वेळी त्यांचा घातच झाला आहे. शेती पारंपरिक असो किंवा आधुनिक, तिचे भविष्य हे पाण्यावरच ठरते. मात्र, निसर्गाचे अचूक भविष्य सांगणारी यंत्रणा अजूनही विकसित झालेली नाही. अनेकदा हवामानशास्त्राचे अंदाजही निसर्गापुढे चुकताना दिसतात. अशा स्थितीत बळीराजाला आधार देणार्‍या अनेक परंपरा आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्याच्या भेंडवळ या गावाची घटमांडणी ही 350 वर्षांची अशीच एक परंपरा. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी असाच वर्षभराच्या घटना-घडामोडींचा अंदाज बांधला जातो. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या आधारे हा अंदाज व्यक्त होत असतो. त्यामुळे तिथे सांगितलेल्या अंदाजावर सातपुड्याच्या अंगाखांद्यावर पसरलेल्या खानदेश, विदर्भासह मराठवाडा, मध्यप्रदेशच्या शेतकर्‍यांच्या नजरा असतात.

bhendwal jamod
घटमांडणीच्या अंदाजाकडे शेतकरी मोठ्या अपेक्षेने दरवर्षी पाहत असतात

बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात पूर्णा काठावर आणि सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेले भेंडवळ हे छोटेसे गाव. गावातील व्रतस्थ चंद्रभान महाराज वाघ यांनी ही परंपरा सुरू केली. असे म्हणतात की, जंगलात तपश्चर्या करून त्यांनी नीलावती विद्या प्राप्त केली. त्या माध्यमातून ते पशूपक्ष्यांशी संवाद साधायचे. महाराजांनी गुढीपाडव्याच्या दिवशी गावाच्या पारावर आणि अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर गावालगतच्या शेतात घटमांडणी करून पीक-पाण्याविषयी अंदाज वर्तविण्यास सुरुवात केली. पीक-पाणी, हवामान, देशाची राजकीय, सामाजिक आणि आर्थिक स्थिती पुढील वर्षभरात कशी राहील, याविषयी अंदाज वर्तविला जातो. या अंदाजावरूनच पंचक्रोशीतील शेतकरी खरीप आणि रबी पिकांचे नियोजन करतात. चंद्रभान महाराजांचा हा वसा आज त्यांची तेरावी पिढी सांभाळत आहे.
रामदास महाराज यांनी हा वारसा अनेक वर्षे चालविला. गेल्या वर्षी त्यांच्या मार्गदर्शनात पुत्र पुंजाजी महाराज आणि सहकारी सारंगधर पाटील यांनी घटमांडणीचे अंदाज मांडले होते. काही महिन्यांपूर्वीच रामदास महाराजांचे निधन झाले. यंदा ही मुख्य जबाबदारी पुंजाजी महाराजांवर आली होती. या मांडणीसाठी पुंजाजी महाराजांचे एक महिना पूर्वीपासून व्रतस्थ जीवन सुरू झाले. या काळात त्यांचा जंगलात अज्ञातस्थळी वास असतो. भेंडवळमधील वाघ परिवार वंशपरंपरेने हा वारसा अव्याहतपणो चालवत असून याच आधारावर शेतकरी मानसिक आधार शोधत आपापल्या पिकांचे नियोजन करीत असतात. ही मांडणी होणार म्हणून कुठेही जाहिरात होत नाही, कोणी आमंत्रण देत नाही किंवा मांडणीचे निष्कर्ष सांगण्यासाठी कुठल्याही स्वरूपाचे शुल्क उकळले जात नाही. हे सर्व खरे असले तरी मांडणीतून बाहेर आलेले निष्कर्ष हे हवामानशास्त्र, पर्यावरणशास्त्र वा ज्योतिषशास्त्राच्या आधारावर काढले जात नाहीत. पण आजही हजारो शेतकरी निष्ठेने आणि मोठ्या विश्वासाने भेंडवळची घटमांडणी ऐकण्यासाठी केवळ जातच नाहीत, तर त्यावर अंमलबजावणीही करतात.

साडेतीन मुहूर्तांपैकी अक्षय्यतृतीया हा एक महत्त्वाचा मुहूर्त. हा मुहूर्त साधत सूर्यास्तापूर्वी भेंडवळ गावाबाहेरील शेतात घटमांडणी केली जाते. शेतात मध्यभागी छोटा खड्डा खोदला जातो. या खड्ड्यात पानाचा विडा, मातीची चार ढेकळे ठेवतात. या ढेकळांवर पाणी भरलेली मातीची घागर ठेवली जाते. घागरीवर पुरी, करंजी, सांडई-कुरुडई, वडा-भजा, पापड ठेवतात. खड्ड्यातील पानाचा विडा म्हणजे देशाचा राजा, मातीची ढेकळे म्हणजे पावसाळ्याचे चार महिने, घागर हे समुद्राचे प्रतीक; तर पुरी म्हणजे पृथ्वी असते. या खड्ड्याच्या भोवती गोलाकारात 18 धान्यांच्या राशी मांडल्या जातात. त्यामध्ये अंबाडी, सरकी, ज्वारी, तूर, मूग, उडीद, तीळ, भादली, बाजरी, हिवाळी मूग, धान, जवस, लाख, वाटाणा, गहू, हरभरा, करडी, मसूर यांचा समावेश असतो. अंबाडीवरून देशाच्या सांस्कृतिक आणि पारंपरिक स्थितीचे अंदाज मांडले जातात. भादलीचे पीक कोणी घेत नाहीत; मात्र मांडणीत भादलीचा वापर होतो. ते रोगराईचे प्रतीक मानले जाते. त्यावरून पिकांवर पडणार्‍या रोगांविषयी अंदाज व्यक्त केला जातो. हिवाळी मुगाची लागवडसुद्धा फारशी केली जात नाही. मात्र यावरून हिवाळ्यात घेतल्या जाणार्‍या सूर्यफूल आणि इतर पिकांबाबत अंदाज व्यक्त केला जातो. करडी हे पीक देशाच्या सरंक्षणाचे प्रतीक समजले जाते. त्यावरून देशाच्या सामरिक स्थितीचे वर्णन केले जाते. मसूर शत्रूपीडेचे प्रतीक आहे. देशाला दहशतवाद, परराष्ट्र यापासून धोका राहील किंवा नाही, याबाबत तर्क मांडले जातात.

monsoon preditction
घटमांडणीसाठी खोदला जाणारा खड्डा आणि मडके

अक्षय्यतृतीयेच्या सायंकाळी घटमांडणीची पूजाअर्चा आटोपून वाघ कुटुंबीय घरी येतात. दुसर्‍या दिवशी पहाटे सूर्योदयापूर्वी घटमांडणीची सूक्ष्मपणे पाहणी केली जाते. रात्रभरात मांडणीमध्ये जो काही बदल झाला असेल त्यावरून पीक-पाणी, देशातील राजकीय-अर्थिक स्थितीविषयी अंदाज व्यक्त केले जातात. हा अंदाज ऐकण्यासाठी घटमांडणीच्या भोवती दहा ते बारा हजार शेतकरी गोलाकार करून बसलेले असतात. चंद्रभान महाराजांचा जयजयकार होतो. त्यांचे वंशज एक एक करीत अंदाज व्यक्त करतात आणि शेतकरी ते लिहून घेतात. या अंदाजानुसार पुढच्या वर्षातील पीक-पाण्याची आखणी केली जाते. राजकीय चर्चाही झडतात. त्या कशा खर्‍या ठरल्या, याचीही गावागावात मग वर्षभर चर्चा होत असते.

वर्‍हाडासोबतच खानदेश, मध्य प्रदेशातील अनेक गावांतील शेतकरी अंदाज जाणून घेण्यासाठी आदल्या दिवशीच भेंडवळमध्ये पोहोचतात. हजारो शेतकरी येत असल्यामुळे बी-बियाणे, विविध वाणांची जाहिरात करण्यासाठी पहाटेच प्रचार साहित्य घेऊन कंपन्यांचे प्रतिनिधी भेंडवळमध्ये ठाण मांडतात. या मांडणीच्या सर्वत्र बातम्या छापून येतात. गेल्या काही वर्षांपासून ही घटमांडणी प्रसारमाध्यमांच्याही आकर्षणाचा विषय बनली आहे. आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरूनही या घटमांडणीचे अंदाज प्रसारित केले जातात. येथे परंपरेचे निर्वाहन करणारे कुठला दावा करीत नाहीत. त्यांचा अंदाज असतो आणि लोकांचा या अंदाजांवर विश्वास आहे. जो-तो आपल्या श्रद्धेने घटमांडणीला महत्त्व देतो. त्यामुळेच वैज्ञानिक युगातही ही परंपरा आपली पाळेमुळे घट्ट रोवून आहे. या परंपरेला गरज आहे ती, शासन स्तरावर शास्त्रीय आधारावर शाश्वत ठेवण्याची आणि जतन, संवर्धनाची. राज्यातील कृषी विद्यापीठे, त्यात हवामान विषयावर काम करणारे संशोधक यावर भविष्यात एक आव्हान म्हणून काम करतीलही; परंतु आज तरी भेंडवळच्या शेतकर्‍यांनी घटमांडणीची परंपरा अक्षय्य ठेवली आहे.

काय आहे यंदाचा अंदाज?

भेंडवळ घटमांडणीनुसार यंदा जून आणि जुलै महिन्यात पाऊस साधारण प्रमाणात पडेल. तर ऑगस्ट महिन्यात चांगला आणि सप्टेंबर महिन्यात पाऊस जास्त असेल असं भाकित वर्तवण्यात आलं आहे. देशात आर्थिक टंचाई भासणार असल्याचेही या भविष्यवाणीत म्हटले आहे. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे देशाच्या प्रधान व्यक्तीवर आर्थिक संकट येईल असेही भाकीत या भेंडवळच्या भविष्यवाणीत वर्तवण्यात आले आहे. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे देशाच्या प्रधान व्यक्तीवर आर्थिक संकट येईल असेही भाकीत या भेंडवळच्या भविष्यवाणीत वर्तवण्यात आले आहे. बाजरी, गहू, करडई ही पिके मध्यम स्वरूपात येतील. देशात पीक चांगले येईल. मात्र पिकांना भाव मिळणार नाही, असा अंदाज करण्यात आलाय. राजा कायम असणार म्हणजे देशात सत्तापालट होणार नाही. देशाचं संरक्षण चांगलं राहील. परंतु देश आर्थिक अडचणीत असेल, असंही सांगण्यात आलंय.

————————–

संपर्क – 9422785555
ranjitrajput5555@gmail.com

—————————

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here