स्वातंत्र्यासाठी सर्वस्व त्यागलेल्या जानकीदेवी बजाज!

भारताचा 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना टीम बाईमाणूस घेऊन आली आहे भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात लढलेल्या, झिजलेल्या 75 महिला स्वातंत्र्यसैनिकांच्या 75 गोष्टी. या लेखमालेमध्ये भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात लढलेल्या महिलांबाबत 15 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट या कालावधीत रोज पाच लेख वाचायला मिळतील...

टीम बाईमाणूस

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील महिलांच्या योगदानाला भारतीय इतिहासात एखाद दुसऱ्या प्रकरणापलीकडे कोणत्याही शासकीय शाळेतील अभ्यासक्रमाच्या इतिहासाच्या पुस्तकात महत्व दिले गेलेले नाहीत. त्यातही ज्या महिला स्वातंत्र्य सैनिकांचा उल्लेख केलेला आहे त्यामध्ये फार कमी ठिकाणी जानकीदेवी बजाज यांचा उल्लेख आढळून येतो. राष्ट्रासाठी कणखर भूमिका घेतलेल्या आणि स्वातंत्र्य लढ्यात जमिनीवर उतरून लढलेल्या जानकीदेवींची ही प्रेरणादायी गोष्ट.

प्रारंभिक जीवन

जानकीदेवी बजाज यांचा जन्म 1893 मध्ये मध्य प्रदेशातील जाओरा येथील मारवाडी कुटुंबात झाला. त्यांचे कुटुंब श्रीमंत आणि तितकेच उदार होते त्या भागातील सर्व वर्ग, जाती, धर्मातील लोकांना त्यांचा फायदा होत असे. जानकीदेवींना एक मोठा भाऊ, चिरंजी लालजी आणि एक धाकटा भाऊ, पुरुषोत्तम दास होता. त्यांची आई मैना देवी या साधेपणा आणि प्रेमळपणाचे मूर्तिमंत उदाहरण होत्या. त्या केवळ शेजाऱ्यांनाच नव्हे तर त्यांच्या नोकरांनाही सर्वप्रकारे मदत करीत असत.

जानकीदेवींचे लग्न बजाज समूहाचे संस्थापक जमनालाल बजाज यांच्याशी झाले आणि त्या बजाज कुटुंबातील स्त्रीप्रमुख बनल्या. लग्नानंतर 1902 मध्ये त्या वर्धा येथे राहावयास आल्या.

स्वातंत्र्य लढ्यातील भूमिका

त्या महात्मा गांधींच्या जवळच्या सहकारी होत्या. स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होण्यासोबतच त्यांनी खादी वापरण्यास आणि चरख्यावर सूतकताई करण्यास सुरुवात केली. 1921 मध्ये गांधींच्या प्रेरणेने जानकीदेवी बजाज यांनी घरात आणि बाहेर वापरलेले विदेशी कपडे जाळले. त्यांनी सगळ्यांना खादीचे कपडे घातले. रात्रंदिवस त्यांनी चरखा आणि धुरीवर काम केले आणि घरोघरी जाऊन लोकांना सूतकताई शिकवली.

त्यांनी महिलांच्या उत्थानासाठी, ‘गौ सेवा‘ आणि हरिजनांचे जीवन सुधारण्यासाठी आणि 1928 मध्ये त्यांच्या मंदिर प्रवेशासाठीही काम केले. स्वातंत्र्यानंतर जानकीदेवींनी विनोबा भावेंसोबत भूदान चळवळीतही काम केले.

मृत्यू आणि पुरस्कार

जानकीदेवी बजाज यांना 1956 मध्ये पद्मविभूषण हा भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘मेरी जीवन यात्रा’ नावाचे त्यांचे आत्मचरित्र 1965 मध्ये प्रकाशित झाले. 1979 मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ अनेक शैक्षणिक संस्था आणि पुरस्कारांची स्थापना करण्यात आली आहे, ज्यात जानकी देवी बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज आणि बजाज इलेक्ट्रिकल्सद्वारे स्थापित ‘जानकीदेवी बजाज ग्राम विकास संस्था‘ यांचा त्यामध्ये समावेश आहे.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here