टीम बाईमाणूस
भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेल्या नवीन गुजरात सरकारमध्ये 12 डिसेम्बरला 17 मंत्र्यांनी शपथ घेतली. गुजरातच्या मंत्रिमंडळात नियुक्त केल्या गेलेल्या एकमेव महिला मंत्री म्हणून भानुबेन मनोहरभाई बाबरिया यांनीही शपथ घेतली. पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखाली नियुक्त करण्यात आलेल्या मंत्रिमंडळामध्ये भानूबेन या एकमेव महिला मंत्री म्हणून आता काम पाहणार आहेत.
संबंधित वृत्त :
गुजरातच्या नव्या विधानसभेत 1 मुस्लिम आणि 15 महिला आमदार
तीनवेळा गुजरात विधानसभेच्या सदस्य म्हणून निवडून आलेल्या भानूबेन या अनुसूचित जाती समूहाच्या प्रतिनिधी आहेत. बाबरिया यांनी राजकोट ग्रामीण विधानसभा मतदारसंघात आम आदमी पक्षाचे (आप) उमेदवार वशरामभाई सगठिया यांचा पराभव केला आणि त्यांच्या या विजयानंतर बाबरिया यांनी गांधीनगरमधील नवीन सचिवालयाजवळ झालेल्या एका कार्यक्रमात मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
1998 पासून गुजरातमध्ये गठीत करण्यात आलेल्या मंत्रिमंडळांपैकी हे मंत्रिमंडळ सगळ्यात लहान असून यामध्ये 17 सदस्यांची गुजरात राज्याच्या मंत्रिमंडळात निवड करण्यात आलेली आहे. याआधीच्या सरकारमध्ये भूपेंद्र पटेल यांच्याच नेतृत्वाखाली 24 सदस्यीय मंत्रिमंडळ काम करीत होते. या मंत्रिमंडळात निवड करण्यात आलेल्या भानूबेन या यंदाच्या सरकारमध्ये मंत्री झालेल्या नवीन चेहऱ्यांपैकी एक असणार आहेत.
कोण आहेत भानूबेन बाबरीया?
- गुजरात मंत्रिमंडळातील एकमेव महिला मंत्री भानुबेन बाबरिया या राजकोट ग्रामीणमधून तीन वेळा आमदार आहेत आणि त्यांनी त्याच जागेवरून निवडणूक जिंकली आहे.
- 47 वर्षीय बाबरिया यांनी यापूर्वी 2007 आणि 2012 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत राजकोट ग्रामीणमधून विजय मिळवला होता.
- भानूबेन यांनी राजकोट ग्रामीणच्या जागेवर 1,19,695 मतांनी विजय मिळवला आहे. एकूण मतांच्या 52.5 टक्के मते त्यांनी मिळवली आहेत.
- आपच्या सगठिया यांना 71,201 आणि काँग्रेसचे बथवार सुरेशकुमार करशनभाई यांना 29,175 मते मिळाली.
- तीन वेळा आमदार झालेल्या बाबरिया यांचा विवाह मनोहरभाई मनुभाई बाबरिया यांच्याशी झाला आहे. त्यांचे पती शेती आणि बांधकाम व्यवसायात असून ते भाजपचे सक्रिय नेते आहेत.
- त्यांचे सासरे मधुभाई बाबरिया हे देखील राजकोटचे आमदार होते.
- राजकोटमधील कंसागरा महाविद्यालयातून कायद्याचे शिक्षण मिळवलेले मनोहरभाई बाबरीया हे राजकोट महानगरपालिकेचे नगरसेवकही आहेत.
भानुबेन बाबरिया यांच्याशिवाय, भाजपच्या नेतृत्वाखालील गुजरात सरकारमध्ये 16 मंत्र्यांनी शपथ घेतली. या आठवड्याच्या सुरुवातीला शपथ घेणार्या मंत्र्यांमध्ये भूपेंद्र पटेल, रुषिकेश पटेल, कानू देसाई, राघवजी पटेल, कुंवरजी बावलिया, बलवंत सिंह राजपूत, मुलुभाई बेरा, कुबेरभाई मनसुखभाई दिंडोर, हर्ष संघवी, परशोत्तम सोलंकी, जगदीश विश्वकर्मा, कुवरजीभाई हलपती, कुंवरजीभाई हलपती, कुबेरभाई मनसुखभाई दिंडोर यांचा समावेश आहे.